सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी २५१ ते २७५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

251-13
ऐसिया जतना । चालणें जया अर्जुना । हें अनिर्वाच्य परिमाणा । पुरिजेना ॥13-251॥
अर्जुना, अशा रीतीने जपून ज्याचे चालणे असते त्या चालण्याचे वर्णन करता येत नाही आणि ते चालणे अमक्यासारखे आहे म्हणून प्रमाण दिले तर ते पुरे पडत नाही.
252-13
पैं मोहाचेनि सांगडें । लासी पिलीं धरी तोंडें । तेथ दांतांचे आगरडे । लागती जैसे ॥13-252॥
जेव्हा मांजरी मोहाच्या योगाने आपले पिल्लू आपल्या तोंडात धरते त्यावेळी त्या पिल्लास जशी तिच्या दातांची टोके लागतात (मांजरीने दातांनी पिल्लू जरी बळकट धरलेले असते, त्यावेळी त्या पिल्लास जशी तिच्या दाताची टोके लागत नाहीत)
253-13
कां स्नेहाळु माये । तान्हयाची वास पाहे । तिये दिठी आहे । हळुवार जें ॥13-253॥
अथवा प्रेमळ आई जशी आपल्या तान्ह्या मुलाची वाट पहाते, त्या दृष्टीमधे जो नाजुकपणा असतो,
254-13
नाना कमळदळें । डोलविजती ढाळें । तो जेणें पाडें बुबुळें । वारा घेपे ॥13-254॥
अथवा वारा घेण्याकरता कमळाचे फूल हळू हळू हलवले असता, त्यापासून निघालेला वारा तो ज्याप्रमाणे डोळ्याच्या बुबुळास मोठा सुखकर वाटतो (बुबुळास खुपत नाही)
255-13
तैसेनि मार्दवें पाय । भूमीवरी न्यसीतु जाय । लागती तेथ होय । जीवां सुख ॥13-255॥
तितक्या मऊपणाने भूमीवर पाय ठेवीत तो जातो. ते पाय जेथे लागतील तेथे लोकांना सुख होते.


256-13
ऐसिया लघिमा चालतां । कृमि कीटक पंडुसुता । देखे तरी माघौता । हळूचि निघे ॥13-256॥
अर्जुना, अशा हळूवारपणाने चालत असतांना कृमीकीटक पाहिले तर, हळूच माघारा फिरतो.
257-13
म्हणे पावो धडफडील । तरी स्वामीची निद्रा मोडैल । रचलेपणा पडैल । झोती हन ॥13-257॥
तो म्हणतो पाय जोराने पडल्यामुळे आवाज निघाला तर (सर्व भूतांना व्यापून असलेल्या) प्रभूची झोप मोडेल व असलेल्या सुखरूपतेस विक्षेप येईल.
258-13
इया काकुळती । वाहणी घे माघौती । कोणेही व्यक्ती । न वचे वरी ॥13-258॥
या करुणेने मागे परततो वकोणत्याही व्यक्तीवर (प्राण्यावर) पाय ठेवीत नाही.
259-13
जीवाचेनि नांवें । तृणातेंही नोलांडवे । मग न लेखितां जावें । हे कें गोठी? ॥13-259॥
गवताच्या काडीत जीव आहे असे समजून ती ओलांडीत नाही (तुडवून जात नाही). मग समोर प्राणी पाहिल्यावर त्याला न जुमानता तो त्याला तुडवीत जाईल ही गोष्ट कोठली?
260-13
मुंगिये मेरु नोलांडवे । मशका सिंधु न तरवे । तैसा भेटलियां न करवे । अतिक्रमु ॥13-260॥
मुंगीला ज्याप्रमाणे मेरु पर्वताचे उल्लंघन करता येत नाही, चिलटाला ज्याप्रमाणे समुद्र तरून जाता येत नाही, त्याप्रमाणे कोणताही प्राणी भेटला असता त्याच्याने उल्लंघन करवत नाही.


261-13
ऐसी जयाची चाली । कृपाफळी फळा आली । देखसी जियाली । दया वाचे ॥13-261॥
अहिंसकाचे बोलणे याप्रमाणे ज्याची चालण्याची रीत कृपारूपी फळांनी फळाला आली, व जेथे वाचेमधे दया जगलेली तू पहाशील.
262-13
स्वयें श्वसणेंचि सुकुमार । मुख मोहाचें माहेर । माधुर्या जाहले अंकुर । दशन तैसे ॥13-262॥
स्वत: श्वासोच्छ्वास नाजूक रीतीने करतो, त्याचे मुख प्रीतीचे माहेर असते व त्याचे दात हे जणुकाय मधुरपणाला अंकुरच फुटले आहेत !
263-13
पुढां स्नेह पाझरे । माघां चालती अक्षरें । शब्द पाठीं अवतरे । कृपा आधीं ॥13-263॥
(तो कोणाशी बोलत असताना) पुढे प्रेम पाझरते व मागून अक्षरे चालतात आणि कृपा आधी प्रगट होते व शब्द मागून प्रगट होतात.
264-13
तंव बोलणेंचि नाहीं । बोलों म्हणे जरी कांहीं । तरी बोल कोणाही । खुपेल कां ॥13-264॥
अगोदर त्याचे कोणाशी बोलणेच नसते आणि जर काही कोणाशी बोलू म्हणेल (बोलण्याचे मनात आणेल) तर आपले बोलणे कोणाला खुपेल का (लागेल का) (अशी त्याच्या मनात शंका येते).
265-13
बोलतां अधिकुही निघे । तरी कोण्हाही वर्मीं न लगे । आणि कोण्हासि न रिघे । शंका मनीं ॥13-265॥
(त्याला असे वाटत असते की) यदा कदाचित बोलतांना काही जास्त बोलणे झाले तर ते कोणाच्या वर्मी तर लागणार नाही ना? आणि त्या जास्त बोलण्याने कोणाच्या मनात शंका तर येणार नाही ना?


266-13
मांडिली गोठी हन मोडैल । वासिपैल कोणी उडैल । आइकोनिचि वोवांडिल । कोण्ही जरी ॥13-266॥
कोणी एखाद्या गोष्टीविषयी आरंभलेल्या बोलण्याचा रंग आपल्या बोलण्याने बिघडेल, कोणी भिईल, कोणी दचकून उठेल आणि आपले बोलणे ऐकूनच कोणी त्या बोलण्याची उपेक्षा करील.
267-13
तरी दुवाळी कोणा नोहावी । भुंवई कवणाची नुचलावी । ऐसा भावो जीवीं । म्हणौनि उगा ॥13-267॥
तरी आपल्या बोलण्याने कोणासही क्लेश होऊ नयेत (अथवा रागाने) कोणाचीही भिवई उचलू नये, असा त्याच्या मनात अभिप्राय असतो, म्हणून तो उगा असतो.
268-13
मग प्रार्थिला विपायें । जरी लोभें बोलों जाये । तरी परिसतया होये । मायबापु ॥13-268॥
मग आपण बोलावे, अशी कोणी कदाचित प्रार्थना केल्यास, तो प्रेमाने बोलायला लागला, तर त्याचे बोलणे जे ऐकतात, त्यांना तो आपला आईबापच आहे की काय? असे वाटते.
269-13
कां नादब्रह्मचि मुसे आलें । कीं गंगापय असललें । पतिव्रते आलें । वार्धक्य जैसे ॥13-269॥
त्याचे बोलणे म्हणजे जणु काय नादब्रह्मच आकार धरून आले, असे मधुर, किंवा गंगेचे पाणीच उसळले असे पवित्र, अथवा पतिव्रतेला जसे काही म्हातारपण आले आहे
270-13
तैसें साच आणि मवाळ । मितले आणि रसाळ । शब्द जैसे कल्लोळ । अमृताचे ॥13-270॥
त्याप्रमाणे खरे आणि मऊ (कोणास न खुपणारे) मोजके परंतु सरळ, त्याचे बोलणे म्हणजे जशा काही अमृताच्या लाटाच.


271-13
विरोधुवादुबळु । प्राणितापढाळु । उपहासु छळु । वर्मस्पर्शु ॥13-271॥
उपरोधिक बोलणे, तंट्यास उत्तेजन देणे, प्राण्यात पाप उत्पन्न करण्यास वाहवणे, टर उडवणे, टाकून बोलणे, वर्मास झोंबणारे शब्द बोलणे,
172-13
आटु वेगु विंदाणु । आशा शंका प्रतारणु । हे संन्यासिले अवगुणु । जया वाचा ॥13-272॥
हट्ट, आवेश, कपट, आशा लावणे, संशयात पाडणे, फसवेगिरी (वगैरे) हे जे बोलण्यातील दोष आहेत त्या सर्वांचा ज्या वाचेने पूर्णपणे त्याग केलेला असतो.
273-13
आणि तयाचि परी किरीटी । थाउ जयाचिये दिठी । सांडिलिया भ्रुकुटी । मोकळिया ॥13-273॥
अहिंसकाची दृष्टी = आणि अर्जुना त्याचप्रमाणे ज्याच्या दृष्टीची स्थिती आहे व ज्याच्या भिवया मोकळ्या टाकलेल्या आहेत म्हणजे ज्याने रागाने भिवया चढवल्या नाहीत
274-13
कां जे भूतीं वस्तु आहे । तियें रुपों शके विपायें । म्हणौनि वासु न पाहे । बहुतकरूनी ॥13-274॥
प्राणिमात्रामधे वस्तु (परब्रह्म) आहे, तिला कदाचित आपली दृष्टी बोचण्याचा संभव आहे म्हणून बहुतकरून तो कोणाकडे पहात नाही.
275-13
ऐसाही कोणे एके वेळे । भीतरले कृपेचेनि बळें । उघडोनियां डोळे । दृष्टी घाली ॥13-275॥
असाही कोणी एका वेळेला आतल्या कृपेच्या जोराने डोळे उघडून त्याने कोणाकडे दृष्टी घातली.

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *