संत सोपानदेव चरित्र १५

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

भाग – १५.

अनुक्रमणिका

कधी कधी विठ्ठलपंतांच्या घरी चुल पेटली नाही की,काका कोरडा शिधा आणुन द्यायचे व मुलांना घरी घेऊन जायचे.तेव्हा काका-काकुंना मुलंबाळं नसल्यामुळे सारी माया,वात्सल्य या पोरां वर उधळली जायची.ज्यावेळी विठ्ठलपंत रुख्मिणीने देह गंगार्पण केले ते दुःख सहन न होऊन भोजलिंगकाकाही देवाच्या शोधार्थ तिर्थयात्रेला निघुन गेले होते.आईबाबांसारखा हा दुसराही आधार गेला.यातुनही ही चार निरागस बालकं सावरली व आज अचानक भोजलिंग काका समोर उभे राहिले.चौघही भावंडं अभावितपणे त्यांना बिलगली,आणि चौघांचेही हुंदक्यांची आवर्तनावर आवर्तनं झाली.प्रथम सावरले ते काकाच त्यांनी सगळ्यांच्या चेहर्‍यावर,पाठीवर हात फिरवुन निवृत्तींचा हात हाती घेत म्हणाले,निवृत्ती लेकरा!मला माफ कर!काय करुं? तुमचे आईबाबा गेल नी मला सगळं जग जणूं खायला उठलं.मग भानच राहिलं नाही.सर्वांचा राग राग आला.तुमचे वडील एवढे विद्वान,पण धर्मसभेविरुध्द तोंड उघडले नाही याचा, हे सगळं चुकीचं घडतय हे ठावुक असुन, कांही करुं शकत नाही म्हणुन स्वतःचा.. आणि त्या तिरिमिरीतच बाहेर पडलो.

भटकत भटकत प्रयागला गेलो.राग ओसरल्यावर तुमची आठवण आली नी खाडकण भानावर आलो.तडक निघुन इथे पोहचलो.बाळांनो जेव्हा तुम्हाला माझी गरज होती,तेव्हा नव्हतो.माफ करा माफ करा.. काय बोलावे कुणालाच समजत नव्हते.यातुन सावध झाले ते सोपानच! म्हणाले,काका! वाईट वाटुन नका घेऊ. आईबाबा गेले तेव्हा तुम्ही हवे होते हे खरय!पण एकप्रकारे बरच झालं.आम्ही आपापलं जगायला शिकलो.तुमचा आधार असतां तर आतांही तुमच्याच आधारावर अवलंबुन राहिलो असतो. नियतीला ते मान्य नव्हते.म्हणुनच तुम्हाला आमच्यापासुन दूर जायची बुध्दी झाली आणि आम्हाला स्वधाराची!

चला मुलांनो!मी दशम्या,चटणी व करडुची भाजी आणली.दोन दोन घास खाऊन घेऊ.मघाशी अर्धवट जेवनावरुन उठल्यामुळे आणखीनच भूक लागली होती.कितीतरी दिवसांनी त्यांना असा मायेचा घास मिळाला होता..निर्मळ, पारदर्शी,मधूर अविरत वाहणार्‍या वात्सल्याने पुन्हा काकांनी सर्वांना कवेत घेऊन पाठीवरुन हात फिरवला.आजारी काकुंसाठी जाणे भाग असल्यामुळे जड पावलांनी निघुन गेले.सोपानांंना वाटले आज पुन्हा एकदा पोरके झालो. या सर्व भानगडीत गुरुगंडा बांधायचं पुन्हा लांबणीवर पडलं याची बोच,रुखरुख सोपानाच्या मनाला लागुन राहिली.ज्ञानेशांच्या लक्षात त्यांची ही तगमग आल्यावर,तसे निवृत्तींना सांगीतले.निवृत्ती म्हणाले,ज्ञानोबा मी जाणतो.ही एक प्रकारे त्याची परीक्षा आहे.मला गुरु करण्याची,गुरुगंडा बांधण्याची सोपानला किती आस्थाआहे हे तपासायचं आहे.ज्ञानदेव कांही बोलले नाही,बोलण्यांत कांही अर्थही नव्हता. सोपानाची तगमग,घुसमट आणि दादाची परीक्षा घेणं ही कोंडी कधी व कशी सुटेल

आणि अचानक एके दिवशी ही कोंडी फुटली.
त्यादिवशी नेहमीप्रमाणे घाटावर जाण्यासाठी निवृत्ती,ज्ञानेशा भल्या पहाटे घाटावर जाण्यासाठी निघाले असतां, सोपानाचे अंथरुण रिकामे दिसले,दादा! सोपान? निवृत्तींनी हातानेच थांबवले व दोघेही बाहेर पडले.दोघेही घाटाजवळ आले आणि त्या स्तब्ध वातावरणांत, निरव शांततेला छेदत,भेदत आवाज ऐकु येऊं लागला.त्या धीरगंभीर आवाजात एक कोवळी माधुरी होती,विलक्षण स्पंदनं होती.आसमंत उजळुन टाकणार्‍या विद्युल्लते सारखा गगनभेदी नाद होता.दोघेही त्या आवाजाच्या रोखाने जाऊ लागले.त्यांचा लाडका धाकटा भाऊ,काळजाचा तुकडा सोपान गुडघाभर पाण्यांत पद्मासन घालुन बसला होता.डोळ्यातुन घळघळा अश्रू वाहत होते.निवृत्तीदादा गुरुगंडा कां बांधत नाही,त्याचा शिष्य होण्याची माझी योग्यता नाही का?माझी घुसमट दिसत नाही का?असे प्रश्न मुखातुन बाहेर पडत होते. पुढे होऊन निवृत्तींनी सोपानांचे डोळे पुसले.त्या स्पर्शाने डोळे उघडल्या वर समोर निवृत्तीदादांना बघुन त्यांचा बांध फुटला.लहान मुलासारखे बिलगुन त्यांच्या कुशीत शिरुन हमसु हमसु रडु लागले.


क्रमशः
संकलन व मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *