ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 869

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-१४ वे, रूपके गौळणी अभंग ८६९

रांगतु रंगणीं चोरितु लोणी धांवोनी धरिती गौळणी । बांधती चरणीं देती गाऱ्हाणी यशोदे साजणी । दधि घृत भक्षून तमालनीळे नवल केलें साजणी ॥१॥ कृष्ण आळिवा आळिवा । परतोनी मातें दावा ॥धृ॥ कृष्णा कान्हा मधुसूदनाकमिनी मनमोहना । योगिध्याना हरस्मरण गोपी ध्याना मानिती कान्हा बोलती यमुना ॥२॥ नेणवसी नेणवसी । अकळुतु नाकळसी ॥धृ॥ इंद्रनीळा श्रुतीजन किरळा सुरीजन घनसांवळा । कंठी माळा कौस्तुभ गळां प्रीति तुळशी दळा कासे सेला सोनसळा उभा बळीभ्रदा जवळा ॥३॥ कृष्ण सांवळा डोळसु । सहज परमहंसु ॥धृ॥ सदानंदा श्रीमुकुंदा श्रीहरि परमानंदा आनंदकंदा । अभय प्रल्हाद पावक नादा धेनु लुब्धा गोपाळा गोविंदा ॥४॥ कृष्ण आमुचा आमुचा खेळिया गौळियाचा ॥धृ॥ कर्पूरगौरा मनस्थिरा पुराणा गुणगंभीरा विरादिविरा महावीरा । पांडव दळ साहाकारा मथुरा नगरा कौंसासुरा । शिक्षा लाविली चाणुरा अती सुंदरा तूं पेंढाराबापरखुमादेविवरा ॥५॥ जाणितलें जाणितलें माझें मज दिधलें ॥धृ॥

अर्थ:-

भगवान श्रीकृष्ण यशोदेच्या घरी अंगणांत रांगत असत. रांगता रांगता चोरून लोणी खात असत एके वेळी एका गवळणीने चोरून लोणी खांत असतांना श्रीकृष्णाला पाहिले व धावत जाऊन त्याच्या पायाला दोरी बांधून यशोदेपुढे कागाळी करून त्या गवळणी म्हणू लागल्या. यशोदे हा तुझा तमालनील श्रीकृष्ण आमच्या घरी येऊन घरांतील दही दूध तूप सर्व खाऊन टांकून आज मोठे नवल केले. तेंव्हा तूं त्याला असे करण्याबद्दल काही तरी समजून सांग यशोदा. त्या कृष्णाला मजकडे आणून मला दाखवाल तर खरे. असे म्हणून त्या गोपी श्रीकृष्णाला आळवू लागल्या. मधुनामक दैत्यांचा नाश करणाऱ्या, शंकराच्या स्मरणांत योग्य असणाऱ्या, यमुनेवर क्रीडा करणाऱ्या असे तुला म्हणतात हे खरे. तथापि त्यापैकी तूं कोणालाच आकलन होत नाहीस.इंद्रनीलाप्रमाणे कांती असणाऱ्या श्रुतिजनांबरोबर क्रीडा करणाऱ्यां, देवांबरोबर क्रीड़ा करणाऱ्या, मेघाप्रमाणे सांवळा वर्ण असणाऱ्या, कौस्तुभाची माळा गळ्यांत असणाऱ्या, माळा असली तरी तुळशीपत्रांवर प्रीति करणाऱ्यां, पिवळ्या रंगाचा पितांबर नेसणाऱ्या, आणि आपला बंधु बळिभद्र त्याजवळ उभा राहून शोभणारा. सांवळा कृष्ण सुंदर डोळ्यांचा, सहज परमहंस असा आहे. सदानंद, मुकुंद, हरि, परमानंद, आनंदाचा कंद, प्रल्हादाला अग्नीपासून अभय देणारा, गायीचा छंद असणारा असा हा गोविंद गोपाळ आहे. गवळ्यांबरोबर खेळणारा, हा कृष्ण आमचा आहे. असे गोपी म्हणतात. शंकराप्रमाणे शोभणारा,मनाने स्थिर असणारा, पुराणांनी गंभीर गुण वर्णन केलेला, सर्ववीरांचा महावीर असणारा, पांडवाना सहाय्य करणारा, मथुरा नगरांत वास करून, कौसासुराला शिक्षा लावणारा, अतिसुंदर, मोत्यांची पेंड गळ्यांत धारण करणारा, माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठला. मी तुला योग्य प्रकारांने जाणले. त्यामुळे माझे मजला तू स्वरूप प्राप्त करून दिलेस. असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *