ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 897

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-१४ वे, रूपके विरहिणी अभंग ८९७

मायबापें आमुची विठोबा रखुमाई निजाची । त्याचीये गांवींची कोण्ही येतु न्यावया ॥१॥ माझा विसावा ये माहेर वो पंढरपूर ॥धु ॥ ऐसी वाट पहातसे जरू । सासुरा आमुची बहु वाहरू । काम क्रोध मद मत्सरू । मज आटिती दीरू ॥२॥ अहंकार खेदिताहे भावा । दंभ प्रपंच या जावा । येरू न येरा घालिती हेवा । आपुल्या सवा ओढितसे ॥३॥ आवो चिंतेवोही निके वो ढाळे । तुज मज ठायींचे वेगळे । वोढुनी नेसी आपुल्या बळें । तुझ्या सळे नांदतसे ॥४॥ अशा लागलीसे सर्पिणी । ग्रासू पाहातसे पापिणी । रामनामाचिया ध्वनी आइकों नेदी श्रवणीं ॥५॥ माझें सत्त्वबळारथी । धीरू धर्मु हा सांगाती । संती सांगितले निवृत्ति । तरी मी जीवें वांचलिये ॥६॥ ऐसी दगदगल्ये सासुरवासा । विठोरखुमाई माझा कुवासा । निवृत्तिदासु तयाचा । जन्मोजन्मी वोळगणा ॥७॥

अर्थ:-

आमचे स्वतःचे आईबाप विठोबा रखुमाई असून त्याचे गांवचे आम्हाला नेण्यास कोणी येईल काय? माझा विसांवा पंढरपूरी आहे. त्या माहेरांकडून बोलावणे यावे अशी माझी फार आशा आहे. कारण या सासरी फार जाच आहे. काम, क्रोध, मद, मत्सर हे दीर मला फार त्रास देतात. अहंकार हा माझ्या भावभक्तिला फार पीड़ा करतो वाढलेला दंभ ह्या जावा एकमेकी माझ्याशी हेवा करून आपल्या इच्छेप्रमाणे माझ्याशी वागतात. ही चिंता फार वोढाळ आहे. तो मला आपले स्वरूपापासून वेगळे करून आपल्याकडे ओढुन नेते पण तिच्या जाचांत मी नांदते. ही पापीणी आशा सर्पिण मला गिळून टाकण्याला बसली. रामनामाचा ध्वनी मला ऐकू देत नाही. माझे सत्त्व हे बळ व धर्म हा धीर बरोबर असल्यामुळे संत जे निवृत्तिराय त्याने सांगितल्याप्रमाणे मी जीव धरून राहिले आहे. अशा सासुरवासाला मी फार दगदगले. विठोबा आणि रखुमाई हे माझे विश्रांतिस्थान आहे. त्यांची जन्मोजन्मी सेवा करणारा, हा निवृत्तीचा दास माऊली ज्ञानदेव आहे.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *