सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १२ वा ओवी २०१ ते २२५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

201-12
अरिमित्रीं तैसा । अर्जुना जया भावो ऐसा । मानापमानीं सरिसा । होतु जाये ॥201॥
त्याप्रमाणे अर्जुना ! जो शत्रू-मित्र, मान-अपमान यांचे ठिकाणी एकसारखी समबुद्धी ठेवतो
202-12
तिहीं ऋतूं समान । जैसें कां गगन । तैसा एकचि मान । शीतोष्णीं जया ॥202॥
ज्याप्रमाणे आकाश तिन्ही ऋतूंमध्ये एकसारखे समानच असते, त्याप्रमाणे थंडी व ऊन या दोहोंना जो सारखाच लेखतो,
203-12
दक्षिण उत्तर मारुता । मेरु जैसा पंडुसुता । तैसा सुखदुःखप्राप्तां । मध्यस्थु जो ॥203॥
हे अर्जुना ! मेरुपर्वत, ज्याप्रमाणे दक्षिणेकडून किंवा उत्तरेकडून येणार्‍या वार्‍याला सारखेच मानतो, त्याप्रमाणे प्राप्त होणार्‍या सुखदुःखांना जो सारखे लेखून निर्विकार राहतो.
204-12
माधुर्यें चंद्रिका । सरिसी राया रंका । तैसा जो सकळिकां । भूतां समु ॥204॥
ज्याप्रमाणे चांदणे, दरिद्र्याला व राजाला सारखेच आल्हाददायक वाटते, त्याप्रमाणे जो पुरुष सर्व भूतमात्राचे ठिकाणी एक दयाबुद्धीच ठेवतो.
205-12
आघवियां जगा एक । सेव्य जैसें उदक । तैसें जयातें तिन्ही लोक । आकांक्षिती ॥205॥
एक पाणी, जसे सर्व जगाला प्यावेसे वाटते, तसे तिन्ही लोक कृपा व्हावी म्हणून ज्याची इच्छा करतात.


206-12
जो सबाह्यसंग । सांडोनिया लाग । एकाकीं असे आंग । आंगीं सूनी ॥206॥
अंतर्बाह्य संगरूप विषयांचा संबंध सोडल्यामुळे, शरीराच्या ठिकाणीच शरीर घालून जो एकटा आहे.
तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् ।
अनिकेतः स्थिरमतिर्भक्तिमान्मे प्रियो नरः ॥12.19॥

अर्थ निंदा व स्तुती समान मानणारा, मौनी, जे जे काही होईल त्यामधे संतोषवृत्ती ठेवणारा, कोठेच आश्रय धरून न रहाणारा, स्थिर बुद्धी असलेला जो भक्तिमान मनुष्य, तो मला प्रिय आहे.॥12-19॥
(भक्तलक्षणे पुढे चालू)
207-12
जो निंदेतें नेघे । स्तुति न श्लाघे । आकाशा न लगे । लेपु जैसा ॥207॥
ज्याप्रमाणे आकाशाला कशाचाही लेप लागत नाही, त्याप्रमाणे जो निंदा झाली असे समजून खेद मानित नाही व स्तुती झाली म्हणूम हर्षही असे मानित नाही,
208-12
तैसें निंदे आणि स्तुति । मानु करूनि एके पांती । विचरे प्राणवृत्ती । जनीं वनीं ॥208॥
त्याप्रमाणे निंदा आणि स्तुती या दोघांनाही एका पंक्तीस बसवून म्हणजे दोघांनाही सारखेच समजून, प्राणाप्रमाणे लोकात व वनात सारखाच वावरतो,
209-12
साच लटिकें दोन्ही । बोलोनि न बोले जाहला मौनी । जो भोगितां उन्मनी । आरायेना ॥209॥
खरे किंवा खोटे असे दोन्ही प्रकारचे बोलणे सोडून देऊन जो मौन धारण करतो व ज्याला उन्मनी अवस्था भोगताना पुरे म्हणवत नाही.
210-12
जो यथालाभें न तोखे । अलाभें न पारुखे । पाउसेवीण न सुके । समुद्रु जैसा ॥210॥
प्रारब्धानुसार मिळणार्‍या सुखलाभाने देखील ज्याला आनंद होत नाही व पाऊस न पडला तरी समुद्र जसा सुकत नाही, तसा सुखलाभ न झाला असताही जो खिन्न होत नाही,


211-12
आणि वायूसि एके ठायीं । बिढार जैसें नाहीं । तैसा न धरीच कहीं । आश्रयो जो ॥211॥
आणि ज्याप्रमाणे वायू एका ठिकाणी स्थिर राहत नाही, त्याप्रमाणे जो एकाच ठिकाणाचा आश्रय करीत नाही.
212-12
आघवाची आकाशस्थिति । जेवीं वायूसि नित्य वसती । तेवीं जगचि विश्रांती- । स्थान जया ॥212॥
ज्याप्रमाणे वायू अखंड आकाशात, आकाशस्वरूपच होऊन राहतो. त्याप्रमाणे संपूर्ण जगत् ज्याचे राहण्याचे स्थान असते,
213-12
हें विश्वचि माझें घर । ऐसी मती जयाची स्थिर । किंबहुना चराचर । आपण जाहला ॥213॥
या संपूर्ण चराचरात “मी मी ” म्हणून स्फुरणारा मीच एक आहे असे केवळ व्यतिरेकज्ञानच नाही, तर सर्व चराचर रूपाने मीच एक भासतो असे अन्वयज्ञानही ज्याच्या बुद्धीत दृढ झाले आहे.
214-12
मग याहीवरी पार्था । माझ्या भजनीं आस्था । तरी तयातें मी माथां । मुकुट करीं ॥214॥
अर्जुना ! मग मी ‘यावरीही’ – म्हणजे व्यतिरेक व अन्वयज्ञान दृढ झाल्यावरही – माझ्या सगुणस्वरूपाचे प्रेमाने भजन करण्याची ज्याला गोडी व श्रध्दा आहे, त्याला मी आपल्या शिरावरील मुकुटच करतो- म्हणजे आपल्या शिरावर मुकुटाप्रमाणे धारण करतो.
215-12
उत्तमासि मस्तक । खालविजे हें काय कौतुक । परी मानु करिती तिन्ही लोक । पायवणियां ॥215॥
अशा थोर भक्तापुढे माझ्यासारख्या एखाद्याने मस्तक लववावे यात काही आश्चर्य नाही, पण माझ्या या उत्तम भक्ताच्या चरणतीर्थाचा तिन्ही भुवनातील लोक आदर करतात.


216-12
तरी श्रद्धावस्तूसी आदरु । करितां जाणिजे प्रकारु । जरी होय श्रीगुरु । सदाशिवु ॥216॥
जर भगवान शंकर सद्गुरु प्राप्त झाले, तरच श्रध्दावस्तूचा-म्हणजे माझ्यावरील परमप्रेमवस्तूचा- आदर म्हणजे जपणूक -कशाप्रकारे केली पाहिजे, हे जाणता येते.
217-12
परी हे असो आतां । महेशातें वानितां । आत्मस्तुति होतां । संचारु असे ॥217॥
पण आता पुरे. भगवान शंकराच्या थोर प्रेमाचे वर्णन करू लागलो, तर आत्मस्तुतीचा संचार होईल, म्हणजे पर्यायाने आत्मस्तुतीच केल्यासारखे होईल.
218-12
ययालागीं हें नोहे । म्हणितलें रमानाहें । अर्जुना मी वाहें । शिरीं तयातें ॥218॥
म्हणून रमापती श्रीकृष्ण म्हणाले, शंकराच्या प्रेमाची थोरवी गात नाही, पण अर्जुना ! (एवढेच सांगतो की) अशा भक्ताला मी शिरावर धारण करतो.
219-12
जे पुरुषार्थसिद्धि चौथी । घेऊनि आपुलिया हातीं । रिगाला भक्तिपंथीं । जगा देतु ॥219॥
(कारण) असा हा माझा भक्त, सगुण सायुज्यारूपी चौथ्या पुरुषार्थाची सिध्दी आपल्या हाती घेऊन ती, भक्तिमार्गाने जगाला देत निघाला.
220-12
कैवल्याचा अधिकारी । मोक्षाची सोडी बांधी करी । कीं जळाचिये परी । तळवटु घे ॥220॥
कैवल्याचा-म्हणजे जीवब्रह्मैक्यरूप अद्वैतब्रह्मज्ञानाचा – जो अधिकारी असेल, त्याला स्वसामर्थ्याने मोक्ष देतो. इतके सामर्थ्य असूनही पाणी ज्याप्रमाणे नेहमी सखोल जमिनीकडे वाहते, त्याप्रमाणे तो आपण सर्वांपेक्षा कनिष्ठ होऊन सर्वांना आपल्यापेक्षा परमेश्वरस्वरूप समजतो.


221-12
म्हणौनि गा नमस्कारूं । तयातें आम्ही माथां मुगुट करूं । तयाची टांच धरूं । हृदयीं आम्हीं ॥221॥
भगवान म्हणतात, अर्जुना ! म्हणून आम्ही त्यांनाच नमस्कार करू. त्यांना आपल्या शिरावर मुकुट करू व त्यांचे चरण आम्ही आपल्या ह्रदयात धरू.
222-12
तयाचिया गुणांचीं लेणीं । लेववूं अपुलिये वाणी । तयाची कीर्ति श्रवणीं । आम्हीं लेवूं ॥222॥
त्यांच्या गुणांचे अलंकार आम्ही आपल्या वाणीवर घालू- म्हणजे त्यांच्या गुणांचे अखंड वर्णन करू व त्यांची कीर्ती हाच कोणी अलंकार आपल्या कानाचे ठिकाणी घालू-म्हणजे त्यांची कीर्तीच आपल्या कानाने श्रवण करू.
223-12
तो पहावा हे डोहळे । म्हणौनि अचक्षूसी मज डोळे । हातींचेनि लीलाकमळें । पुजूं तयातें ॥223॥
मी नेत्ररहित असताही त्यांना पाहावे या उत्कट इच्छेने नेत्र धारण केले व मी लीलेकरिता घेतलेल्या हातातील कमळाने त्यांची पूजा करीत असतो.
223-12
दोंवरी दोनी । भुजा आलों घेउनि । आलिंगावयालागुनी । तयाचें आंग ॥224॥
त्यांच्या शरीराला अलिंगन देण्याकरीताच दोन भुजांवर आणखी दोन भुजा घेऊन आलो म्हणजे चतुर्भुज झालो. (दोन भुजांनी आलिंगन देऊन पूर्ण सुख भोगता येणार नाही, असे वाटून चतुर्भुज झालो, असा अर्थ)
225-12
तया संगाचेनि सुरवाडें । मज विदेहा देह धरणें घडे । किंबहुना आवडे । निरुपमु ॥225॥
भक्ताच्या संगतीत देखील ब्रह्मसुख असते, म्हणूनच मी विदेही असूनही त्यांची संगती करण्याकरीता देह धारण करतो. फार काय सांगू ! अशा ज्ञानीभक्तांचे मला जे प्रेम असते, ते कशाचीही उपमा देऊन सांगता येण्याजोगे नाही.

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *