176-12
खोलिये पारु नेणिजे । तरी भक्तीं न बुडिजे । रोकडाचि लाहिजे । न मरतां मोक्षु ॥176॥
ज्ञानभक्तीने संतांना जे पावित्र्य येते, या पवित्रतेच्या खोलीला पारच नाही; तरी भक्त त्यात बुडत नाही आणि न मरता — म्हणजे जिवंतपणीच, रोकडाचि — म्हणजे प्रत्यक्ष — त्यांना मोक्षाचा लाभ होतो.
177-12
संताचेनि अंगलगें । पापातें जिणणें गंगे । तेणें संतसंगें । शुचित्व कैसें ॥177॥
पाप्याचे पाप आपण घेऊन, त्याला निष्पाप करणारी गंगा, ज्या संतांच्या अंगस्पर्शाने शेवटी निष्पाप होते; त्या संतांच्या संगाने जो पवित्रपणा येतो, तो किती अगाध म्हणावा !
178-12
म्हणौनि असो जो ऐसा । शुचित्वें तीर्थां कुवासा । जेणें उल्लंघविलें दिशा । मनोमळ ॥178॥
म्हणून हे पुरे. जो सत्पुरुष असा थोर पवित्र असल्यामुळे सर्व तीर्थांना आश्रय झाला, ज्याने आपल्या मनाचे दोष दिशांच्या पलीकडे पळवून लावले,
179-12
आंतु बाहेरी चोखाळु । सूर्य जैसा निर्मळु । आणि तत्त्वार्थींचा पायाळु । देखणा जो ॥179॥
ज्याप्रमाणे सूर्य, आतबाहेर निर्मळ असतो, त्याप्रमाणे जो पुरुष आत म्हणजे अंतःकरणात व बाहेर म्हणजे शरीराच्या ठिकाणी अत्यंत शुचिर्भूत असतो आणि पायाळू माणसाप्रमाणे सर्वत्र तो ब्रह्मतत्वरूपी अर्थच पाहात असतो.
180-12
व्यापक आणि उदास । जैसें कां आकाश । तैसें जयाचें मानस । सर्वत्र गा ॥180॥
ज्याप्रमाणे आकाश सर्वत्र व्यापक असून सर्वांपासून अलिप्त असते, त्याप्रमाणे ज्याचे मन व्यापक असून सर्वत्र अलिप्त असते,
181-12
संसारव्यथे फिटला । जो नैराश्यें विनटला । व्याधाहातोनि सुटला । विहंगु जैसा ॥181॥
तसेच पारध्याच्या हातातून सुटलेल्या पक्ष्याची जशी दुःखातून सुटका होते, त्याप्रमाणे अंतःकरणात तीव्र विषयवैराग्य बाणल्यामुळे जो विषयसुखाची निःशेष आशा सोडून संसार दुःखापासून मुक्त झाला.
182-12
तैसा सतत जो सुखें । कोणीही टवंच न देखे । नेणिजे गतायुषें । लज्जा जेवीं ॥182॥
ज्याप्रमाणे मेलेल्या पुरुषाला मुळीच लज्जा नसते, त्याप्रमाणे आत्म्याचे सतत सुख प्राप्त झाल्यामुळे ज्याला काहीच दुःख भासत नाही.
183-12
आणि कर्मारंभालागीं । जया अहंकृती नाही आंगीं । जैसें निरिंधन आगी । विझोनि जाय ॥183॥
कर्म करण्याकरिता लागणारा देहाहंकारच ज्याच्या ठिकाणी उत्पन्न होत नाही—म्हणजे ज्याच्या ठिकाणी “मी ब्रह्म आहे” ही वृत्ती इतकी दृढ झाली आहे की ज्याला “मी ब्रह्म आहे” चिंतनच करावे लागत नाही. ज्याप्रमाणे अग्नीत लाकडे घातली नाहीत, तर अग्नी जसा विझून जातो,
184-12
तैसा उपशमुचि भागा । जयासि आला पैं गा । जो मोक्षाचिया आंगा । लिहिला असे ॥184॥
त्याप्रमाणे मोक्षाचे अंग म्हणून जो उपशम सांगितला आहे, तो उपशमच पूर्णपणे ज्यांच्या वाटेला आला आहे.
185-12
अर्जुना हा ठावोवरी । जो सोऽहंभावो सरोभरीं । द्वैताच्या पैलतीरीं । निगों सरला ॥185॥
अर्जुना ! हा ठाववरी म्हणजे पूर्ण अहंकृतीरहित होऊन व उपशम साधून जो “मी ब्रह्म आहे” अशा अखंड निदिध्यासनाच्या बळावर द्वैताच्या पलीकडील तीराला म्हणजे अद्वैतरूप तीरावर जावयाला निघाला.
186-12
कीं भक्तिसुखालागीं । आपणपेंचि दोही भागीं । वांटूनियां आंगीं । सेवकै बाणी ॥186॥
किंवा भक्तिसुख भोगण्याकरिता जो आपणच आपल्याला दोन भागात वाटून घेऊन एका अंगाने सेवक किंवा भक्त होतो.
187-12
येरा नाम मी ठेवी । मग भजती वोज बरवी । न भजतया दावी । योगिया जो॥187॥
दुसर्या भागाला मी म्हणजे देव, हे नाव ठेवतो व मग माझ्या सगुण स्वरूपाचे भजन न करणार्या ज्ञान्यादि योग्यांना, अद्वैतातही होणार्या सगुण भक्तीचे श्रेष्ठ स्वरूप दाखवितो.
188-12
तयाचे आम्हां व्यसन । आमुचें तो निजध्यान । किंबहुना समाधान । तो मिळे तैं ॥188॥
असा जो ज्ञानी भक्त असतो, त्याचे आम्हाला वेडच लागते, तोच आमच्या अखंड ध्यानाचा विषय असतो. किंबहुना त्याच्याच भेटीत आम्हाला समाधान होते.
189-12
तयालागीं मज रूपा येणें । तयाचेनि मज येथें असणें । तया लोण कीजे जीवें प्राणें । ऐसा पढिये ॥189॥
अशा प्रेमळ भक्ताकरिता मी सगुणस्वरूप होतो, त्याच्याकरिताच मी या जगात असतो आणि तो मला इतका प्रिय असतो की, त्याच्यावरून आम्ही आपले जीव, प्राण ओवाळून टाकावे असे वाटते,
यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति ।
शुभाशुभपरित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः ॥12.17॥
अर्थ जो हर्ष पावत नाही, द्वेष करत नाही, शोक करत नाही, (अप्राप्त वस्तूची) इच्छा नाही व चांगले व वाईट या दोन्हीविरहित जो भक्तिमान मनुष्य असतो तो मला प्रिय आहे.॥12-17॥
(भक्तलक्षणे पुढे चालू)
190-12
जो आत्मलाभासारिखें । गोमटें कांहींचि न देखे । म्हणौनि भोगविशेखें । हरिखेजेना ॥190॥
ज्याला आत्मप्राप्तीवाचून काहीच गोड वाटत नाही, म्हणूनच विशेष विषयभोग त्याला प्राप्त झाले, तरी आनंद होत नाही.
191-12
आपणचि विश्व जाहला । तरी भेदभावो सहजचि गेला । म्हणौनि द्वेषु ठेला । जया पुरुषा ॥191॥
संपूर्ण विश्वात आत्मस्वरूपाने मीच एक भरलेला आहे, या दृढ ज्ञानाने सहजच ज्याला, आपल्याहून दुसरी वस्तूच दिसत नाही आणि म्हणूनच ज्याला कोठेही द्वेष नसतो.
192-12
पैं आपुलें जें साचें । तें कल्पांतींहीं न वचे । हें जाणोनि गताचें । न शोची जो ॥192॥
मी खरोखर आत्मस्वरूप आहे व ते आत्मस्वरूप कधीही नाश पावत नाही, या दृढ विचाराने जो नाश झालेल्या वस्तूबद्दल कधी दुःख करीत नाही.
193-12
आणि जयापरौतें कांहीं नाहीं । तें आपणपेंचि आपुल्या ठायीं । जाहला यालागीं जो कांहीं । आकांक्षी ना॥193॥
आणि ज्या अद्वैत आत्मवस्तूहून दुसरी वस्तूच नाही, ती आत्मवस्तू मीच आहे, असे कळून आल्यामुळे जो कशाचीही इच्छा करीत नाही.
194-12
वोखटें कां गोमटें । हें काहींचि तया नुमटे । रात्रिदिवस न घटे । सूर्यासि जेवीं ॥194॥
ज्याप्रमाणे सूर्याला रात्री व दिवस यांचा अनुभव येत नाही, त्याप्रमाणे ज्यांच्या अंतःकरणात हे चांगले, हे वाईट असे भावच उत्पन्न होत नाहीत.
195-12
ऐसा बोधुचि केवळु । जो होवोनि असे निखळु । त्याहीवरी भजनशीळु । माझ्या ठायीं ॥195॥
याप्रमाणे कशाचीही जाणीव न होता जो देहासह संपूर्ण केवळ जाणीवरहित चिन्मात्रस्वरूप होऊन राहिला आणि त्यातही माझ्या सगुणस्वरूपाच्या ठिकाणी प्रेमभक्ती करणे हा ज्याचा स्वभावच बनला.
196-12
तरी तया ऐसें दुसरें । आम्हां पढियंतें सोयरें । नाहीं गा साचोकारें । तुझी आण ॥196॥
भगवान म्हणतात, अर्जुना ! अशा ज्ञानभक्तीसारखा खरोखर दुसरा आमचा प्रिय सोयराच नाही, हे मी तुझी शपथ घेऊन सांगतो.
समः शत्रौ च मित्रे च तथामानापमानयोः ।
शीतोष्णसुखदुःखेषु समः सङ्गविवर्जितः ॥12.18॥
अर्थ शत्रू व मित्र, मान व अपमान, शीत व उष्ण, सुख व दु:ख यांचे ठिकाणी समान असणारा, (अंतर्बाह्य) संगरहित,॥12-18॥
(भक्तलक्षणे पुढे चालू)
197-12
पार्था जयाचिया ठायीं । वैषम्याची वार्ता नाहीं । रिपुमित्रां दोहीं । सरिसा पाडु ॥197॥
अर्जुना ! ज्याच्या ठिकाणी आपपर अशा विषमभावांचा स्पर्श नसतो व जो शत्रू-मित्र दोघांनाही सारखेच लेखतो.
198-12
कां घरींचियां उजियेडु करावा । पारखियां आंधारु पाडावा । हें नेणेचि गा पांडवा । दीपु जैसा ॥198॥
अर्जुना ! त्याप्रमाणे, दिवा जे नेहमी घरात राहणारे आहेत त्यांना प्रकाश द्यावा व बाहेरून आलेल्या परक्यांना अंधार द्यावा, असे कधी करीत नाही.
199-12
जो खांडावया घावो घाली । कां लावणी जयानें केली । दोघां एकचि साउली । वृक्षु दे जैसा ॥199॥
किंवा तुकडे करण्याकरिता कुर्हाडीने प्रहार करू इच्छिणार्याला व झाड लावून त्याची वाढ करणार्याला झाड एकसारखीच सावलीच देते.
200-12
नातरी इक्षुदंडु । पाळितया गोडु । गाळितया कडु । नोहेंचि जेवीं ॥200॥
किंवा ज्याप्रमाणे ऊस पाणी घालून वाढविणार्याला गोड व चरक्यात घालून पिळणार्याला कडू असा कधीच होत नाही.