226-12
तेणेंसीं आम्हां मैत्र । एथ कायसें विचित्र? । परी तयाचें चरित्र । ऐकती जे ॥226॥
अशा भक्ताशीं माझे अत्यंत सख्य असते, यात काही आश्चर्य नाही; पण जे कोणी माझ्या भक्तांचे चरित्र श्रवण करतात.
227-12
तेही प्राणापरौते । आवडती हें निरुतें । जे भक्तचरित्रातें । प्रशंसिती ॥227॥
तसेच जे कोणी माझ्या भक्तांच्या चरित्राची स्तुती करतात- म्हणजे गुणकीर्तन करतात- ते देखील मला माझ्या प्राणापेक्षा प्रिय असतात, हे अत्यंत सत्य आहे.
228-12
जो हा अर्जुना साद्यंत । सांगितला प्रस्तुत । भक्तियोगु समस्त- । योगरूप ॥228॥
अर्जुना ! तुला मी आताच जो संपूर्ण भक्तीयोग सांगितला, त्यात माझ्याशी ऐक्य करणारे जेवढे योग आहेत, त्या सर्वांचा अंतर्भाव होतो- म्हणजे भक्तीयोगाने सर्व प्रक्रिया अवगत होतात किंवा साधतात.
229-12
तया मी प्रीति करी । कां मनीं शिरसा धरीं । येवढी थोरी । जया स्थितीये ॥229॥
ज्या भक्तीस्थितीची एवढी थोरवी आहे की, त्या भक्तीप्रेमामुळेच मीही आपल्या भक्तांचे अत्यंत प्रेम करतो किंवा त्याला शिरावर धारण करतो.
ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते ।
श्रद्दधाना मत्परमा भक्तास्तेऽतीव प्रियाः ॥12.20॥
अर्थ श्रद्धायुक्त व मी ज्यांना अत्यंत प्रिय आहे असे जे भक्त, वर सांगितल्याप्रमाणे धर्मसंबंधी अमृताचे सेवन करतात म्हणजे त्याप्रमाणे आचरण करतात ते मला अत्यंत प्रिय आहेत.॥12-20॥
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः ॥12॥
अर्थ
ॐ हे परमसत्य आहे. याप्रमाणे श्रीमद्भगवद्गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील भक्तियोग नावाचा हा बारावा अध्याय समाप्त झाला. ॥12॥
(भक्तियोग = भक्त श्रेष्ठ)
230-12
ते हे गोष्टी रम्य । अमृतधारा धर्म्य । करिती प्रतीतिगम्य । आइकोनि जे ॥230॥
धर्म्य-म्हणजे अवश्य आचरणीय-व चित्ताला मोहक अशी ही अमृताची धारा-म्हणजे अखंड अविनाशी-अशी भक्तीयोगाची कथा ऐकून जे कोणी आपल्या अनुभवाला आणून घेतील.
231-12
तेसीचि श्रद्धेचेनि आदरें । जयांचे ठायीं विस्तरे । जीवीं जयां थारे । जे अनुष्ठिती ॥231॥
त्याचप्रमाणे अत्यंत श्रद्धा व आदर यांच्या योगाने ज्यांच्या ठिकाणी हा भक्तीयोग विस्तार पावला व ज्यांच्या अंतःकरणात तो दृढ होऊन जे त्या भक्तीचे अनुष्ठान करतात.
232-12
परी निरूपली जैसी । तैसीच स्थिति मानसीं । मग सुक्षेत्रीं जैसी । पेरणी केली ॥232॥
पण चांगल्या मशागत केलेल्या क्षेत्रात जशी पेरणी केली जाते, त्याप्रमाणे वर सांगितली तशीच, ज्यांच्या मनाची अत्यंत प्रेमळ स्थिती आहे,
233-12
परी मातें परम करूनि । इयें अर्थीं प्रेम धरूनि । हेंचि सर्वस्व मानूनि । घेती जे पैं ॥233॥
आणि जे माझ्या सगुणस्वरूपालाच आपली परमगती समजतात, ज्यांना माझ्या सगुणस्वरूपाच्या प्राप्तीचे प्रेम असते व जे माझ्या सगुण स्वरूपाला सर्वस्व मानून घेतात.
234-12
पार्था गा जगीं । तेचि भक्त तेच तर योगी । उत्कंठा तयांलागीं । अखंड मज ॥234॥
बा अर्जुना !या जगात तेच खरे भक्त व तेच खरे योगी होत. मला त्यांच्याच भेटीची अत्यंत उत्कंठा असते.
235-12
तें तीर्थ तें क्षेत्र । जगीं तेंचि पवित्र । भक्ति कथेसि मैत्र । जयां पुरुषां ॥235॥
माझ्या भक्तिकथेशी ज्यांचे सख्य झाले, ते पुरुषच खरोखर पवित्र तीर्थ व पवित्र क्षेत्र होत. त्यांच्यासारखे जगांत दुसरे काहीही पवित्र नाही.
236-12
आम्हीं तयांचें करूं ध्यान । ते आमुचें देवतार्चन । ते वांचूनि आन । गोमटें नाहीं ॥236॥
अशा भक्तांचे आम्ही ध्यान करू तेच आमच्या पूजेतील देव आहेत. त्यांच्यावाचून आम्हाला काहीही एक गोड वाटत नाही.
237-12
तयांचें आम्हां व्यसन । ते आमुचें निधिनिधान । किंबहुना समाधान । ते मिळती तैं ॥237॥
आम्हाला त्यांचाच छंद असतो. तेच आमच्या द्रव्याचे साठे होत. एवढेच नाही, तर त्यांची भेट झाली असताच आमच्या मनाचे समाधान होते.
238-12
पैं प्रेमळाची वार्ता । जे अनुवादती पंडुसुता । ते मानूं परमदेवता । आपुली आम्ही ॥238॥
अर्जुना ! पण जे कोणी अशा प्रेमळ भक्तांच्या गोष्टी करतात किंवा कथा गातात, त्यांना देखील आम्ही परम देवता मानतो.
239-12
ऐसे निजजनानंदें । तेणें जगदादिकंदें । बोलिलें मुकुंदें । संजयो म्हणे ॥239॥
संजय म्हणतो धृतराष्ट्रा ! आपल्या भक्तजनांचा ब्रह्मानंद व जगद्रूपी कार्याचे मूळ कारण असा जो भगवान श्रीकृष्ण, तो याप्रमाणे अर्जुनाशी बोलला.
240-12
राया जो निर्मळु । निष्कलंक लोककृपाळु । शरणागतां प्रतिपाळु । शरण्यु जो ॥240॥
राजा धृतराष्ट्रा ! जो अविद्यादोषरहित असा शुद्ध आहे, ज्याची कीर्ती कलंकरहित आहे, जो सर्व लोकांवर कृपा करणारा आहे, जो शरणागतांवर आईप्रमाणे प्रेम करणारा आहे आणि सर्वांना शरण जाण्याला योग्य आहे.
241-12
पैं सुरसहायशीळु । लोकलालनलीळु । प्रणतप्रतिपाळु । हा खेळु जयाचा ॥241॥
देवांचा कैवार घेऊन त्यांना साह्य करण्याचा ज्याचा स्वभाव आहे, त्रैलोक्याचे संगोपन करणे ही ज्याची क्रीडा आहे व शरण आलेल्यांचा प्रतिपाळ करणे हाच ज्याचा खेळ आहे.
242-12
जो धर्मकीर्ति धवलु । आगाध दातृत्वें सरळु । अतुळबळें प्रबळु । बळिबंधनु ॥242॥
धर्माप्रमाणेच वागणारा अशी ज्याची कीर्ती आहे, अगाध दातृत्वामुळे ज्याचे सम वागणे आहे, अमर्याद सामर्थ्याने समर्थ असल्यामुळे जो प्रबळ अशा बळीला बंधन करणारा झाला आहे.
243-12
जो भक्तजनवत्सळु । प्रेमळजन प्रांजळु । सत्यसेतु सकळु । कलानिधी॥243॥
जो आपल्या भक्तजनांवर आईप्रमाणे प्रेम करणारा आहे आणि प्रेमळजनांशी निष्कपट आहे. जो आपल्या सत्यस्वरूपाने जगाचे धारण करणारा आहे व जो संपूर्ण कलांचा निधी आहे.
244-12
तो श्रीकृष्ण वैकुंठींचा । चक्रवर्ती निजांचा । सांगे येरु दैवाचा । आइकतु असे ॥244॥
जो वैकुंठीचा स्वामी असून आपल्या भक्तांचा सार्वभौम राजा आहे तो श्रीकृष्ण सांगत असून भाग्यवान अर्जुन श्रवण करीत आहे.
245-12
आतां ययावरी । निरूपिती परी । संजयो म्हणे अवधारीं । धृतराष्ट्रातें ॥245॥
संजय राजा धृतराष्ट्राला म्हणतो,आता यापुढे भगवान श्रीकृष्ण कायबोलतात ते ऐका.
246-12
तेचि रसाळ कथा । मऱ्हाठिया प्रतिपथा । आणिजेल आतां । आवधारिजो ॥246॥
तीच रसाळ कथा मराठी भाषेच्या रूपांतरात आणली जाईल,आता लक्ष द्या.
247-12
ज्ञानदेव म्हणे तुम्ही । संत वोळगावेति आम्ही । हें पढविलों जी स्वामी । निवृत्तिदेवीं ॥247॥
श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आम्ही तुम्ही संतांचे चरण धरावे, हेच श्री स्वामी निवृत्तिदेवांनी आम्हाला शिकविले.
॥ इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
भक्तियोगोनाम द्वादशोऽध्यायः॥12॥
॥ भग्वद्गीतगीता श्लोक :- 20 ॥ ॥ ज्ञानेश्वरी ओव्या :- 247 ॥