ज्ञानेश्वरी ३ ला अध्याय पारायण प्रत

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

ज्ञानेश्वरी
॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका अध्याय ३ ॥
॥ॐ श्री परमात्मने नमः ॥
अध्याय तिसरा ।
कर्मयोगः ।


ज्यायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन ।
तत् किं कर्मणि घोरे माम् नियोजयसि केशव ॥१॥
मग आइका अर्जुनें म्हणितलें । देवा तुम्ही जें वाक्य बोलिलें । तें निकें म्यां परिसिलें । कमळापती ॥१॥
तेथ कर्म आणि कर्ता । उरेचिना पाहतां । ऐसें मत तुझें श्रीअनंता । निश्चित जरी ॥२॥
तरी मातें केवीं श्रीहरी । म्हणसी पार्था संग्रामु करीं । इये लाजसी ना महाघोरीं । कर्मीं सुतां ॥३॥
हां गा कर्म तूंचि अशेष । निराकरिसी निःशेष । तरी मजकरवीं हें हिंसक । कां करविसी ॥४॥
तरी हेंचि विचारीं ऋषीकेशा । तूं मानु देसी कर्मलेशां । आणि येसणी हे हिंसा । करवीतु आहासी ॥५॥
व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे ।
तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम् ॥२॥
देवा तुवांचि ऐसें बोलावें । तरी आम्हीं नेणती काय करावें । आतां संपले म्हण पां आघवें । विवेकाचें ॥६॥
हां गा उपदेश जरी ऐसा । तरी अपभ्रंशु तो कैसा । आतां पुरला आम्हां धिंवसा । आत्मबोधाचा ॥७॥
वैद्यु पथ्य वारूनि जाये । मग जरी आपणचि विष सुये । तरी रोगिया कैसनि जिये । सांगैं मज ॥८॥
जैसें आंधळें सुईजे आव्हांटा । कां माजवण दीजे मर्कटा । तैसा उपदेशु हा गोमटा । वोढवला आम्हां ॥९॥
मी आधींचि कांहीं नेणें । वरी कवळिलों मोहें येणें । श्रीकृष्णा विवेकु या कारणें । पुसिला तुज ॥१०॥


तंव तुझी एकेक नवाई । एथ उपदेशामाजीं गोवाई । तरी अनुसरलिया काई । ऐसें कीजे ? ॥११॥
आम्हीं तनुमनुजीवें । तुझिया बोला वोटंगावें । आणि तुवांचि ऐसें करावें । तरी सरलें म्हण ॥१२॥
आतां ऐसियापरी बोधिसी । तरी निकें आम्हां करिसी । एथ ज्ञानाची आस कायसी । अर्जुन म्हणे ॥१३॥
तरी ये जाणिवेचें तरी सरलें । परी आणिक एक असे जाहलें । जें थितें हें डहुळलें । मानस माझें ॥१४॥
तेवींचि श्रीकृष्णा हें तुझें । चरित्र कांहीं नेणिजे । जरी चित्त पाहसी माझें । येणे मिषें ॥१५॥
ना तरी झकवीतु आहासी मातें । कीं तत्त्वचि कथिले ध्वनितें । हें अवगमितां निरुतें । जाणवेना ॥१६॥
म्हणौनि आइकें देवा । हा भावार्थु आतां न बोलावा । मज विवेकु सांगावा । मऱ्हाटा जी ॥१७॥
मी अत्यंत जड असें । परी ऐसाही निकें परियेसें । श्रीकृष्णा बोलावें तुवां तैसें । एकनिष्ठ ॥१८॥
देखैं रोगातें जिणावें । औषध तरी देयावें । परी तें अति रुच्य व्हावें । मधुर जैसें ॥१९॥
तैसें सकळार्थभरित । तत्त्व सांगावें उचित । परी बोधें माझें चित्त । जयापरी ॥२०॥


देवा तुज ऐसा निजगुरु । आजि आर्तीधणी कां न करूं । एथ भीड कवणाची धरूं । तूं माय आमुची ॥२१॥
हां गां कामधेनूचें दुभतें । दैवें जाहलें जरी आपैतें । तरीं कामनेची कां तेथें । वानी कीजे ? ॥२२॥
जरी चिंतामणी हाता चढे । तरी वांछेचें कवण सांकडें । कां आपुलेनि सुरवाडें । इच्छावें ना ? ॥२३॥
देखा अमृतसिंधूतें ठाकावें । मग ताहाना जरी फुटावें । तरी सायासु कां करावे । मागील ते ? ॥२४॥
तैसा जन्मांतरीं बहुतीं । उपासितां श्रीलक्ष्मीपती । तूं दैवें आजि हातीं । जाहलासी जरी ॥२५॥
तरी आपुलिया सवेशा । कां न मागावासि परेशा ? । देवा सुकाळु हा मानसा । पाहला असे ॥२६॥
देखैं सकळार्तींचें जियाले । आजि पुण्य यशासि आलें । हें मनोरथ जहाले । विजयी माझे ॥२७॥
जी जी परममंगळधामा । सकळ देवदेवोत्तमा । तूं स्वाधीन आजि आम्हां । म्हणौनियां ॥२८॥
जैसें मातेच्या ठायीं । अपत्या अनवसरू नाहीं । स्तन्यालागूनि पाहीं । जियापरी ॥२९॥
तैसें देवा तूतें । पुसिजतसे आवडे तें । आपुलेनि आर्तें । कृपानिधीं ॥३०॥


तरीं पारत्रिकीं हित । आणि आचरितां तरी उचित । तें सांगैं एक निश्चित । पार्थु म्हणे ॥३१॥
श्रीभगवानुवाच ।
लोकेऽस्मिन द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयानघ ।
ज्ञानयोगेन सांख्यानाम् कर्मयोगेन योगिनाम् ॥३॥
या बोला श्रीअच्युतु । म्हणतसे विस्मितु । अर्जुना हा ध्वनितु । अभिप्रावो ॥३२॥
जे बुद्धियोगु सांगतां । सांख्यमतसंस्था । प्रकटिली स्वभावता । प्रसंगें आम्हीं ॥३३॥
तो उद्देशु तूं नेणसीचि । म्हणौनि क्षोभलासि वायांचि । तरी आतां जाणें म्यांचि । उक्त दोन्ही ॥३४॥
अवधारीं वीरश्रेष्ठा । ये लोकीं या दोन्ही निष्ठा । मजचिपासूनि प्रगटा । अनादिसिद्धा ॥३५॥
एकु ज्ञानयोगु म्हणिजे । जो सांख्यीं अनुष्ठिजे । जेथ ओळखीसवें पाविजें । तद्रूपता ॥३६॥
एक कर्मयोगु जाण । जेथ साधकजन निपुण । होऊनियां निर्वाण । पावती वेळे ॥३७॥
हे मार्गु तरी दोनी । परी एकवटतीं निदानीं । जैसी सिद्धसाध्य भोजनीं । तृप्ती एक ॥३८॥
कां पूर्वापर सरितां । भिन्न दिसती पाहतां । मग सिंधुमिळणीं ऐक्यता । पावती शेखीं ॥३९॥
तैसीं दोनीही मतें । सूचितीं एका कारणातें । परी उपास्ति ते योग्यते । आधीन असे ॥४०॥


देखैं उत्प्लवनासरिसां । पक्षी फळासि झोंबें जैसा । सांगैं नरु केवीं तैसा । पावे वेगा ? ॥४१॥
तो हळूहळू ढाळेंढाळें । केउतेनि एके वेळे । तया मार्गाचेनि बळें । निश्चित ठाकी ॥४२॥
तैसे देख पां विहंगममतें । अधिष्ठूनि ज्ञानातें । सांख्य सद्य मोक्षातें । आकळिती ॥४३॥
येर योगिये कर्माधारें । विहितेंचि निजाचारें । पूर्णता अवसरें । पावते होती ॥४४॥
न कर्मणामनारंभान्नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते ।
न च सन्न्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति ॥४॥
वांचोनि कर्मारंभ उचित । न करितां सिद्धवत । कर्महीना निश्चित । होईजेना ॥४५॥
कीं प्राप्तकर्म सांडिजे । येतुलेनि नैष्कर्म्य होईजे । हें अर्जुना वायां बोलिजे । मूर्खपणें ॥४६॥
सांगैं पैलतीरा जावें । ऐसें व्यसन कां जेथ पावे । तेथ नावेतें त्यजावें । घडे केवीं ? ॥४७॥
ना तरी तृप्ति इच्छिजे । तरी कैसेनि पाकु न कीजे । कीं सिद्धुही न सेविजे । केवीं सांगैं ? ॥४८॥
न हि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत् ।
कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः ॥५॥
जंव निरार्तता नाहीं । तंव व्यापारु असे पाहीं । मग संतुष्टीच्या ठायीं । कुंठें सहजें ॥४९॥
म्हणौनि आईकें पार्था । जयां नैष्कर्म्यपदीं आस्था । तया उचित कर्म सर्वथा । त्याज्य नोहे ॥५०॥


आणि आपुलिये चाडे । आपादिलें हें मांडे । कीं त्यजिलें कर्म सांडे । ऐसें आहे ? ॥५१॥
हें वायांचि सैरा बोलिजे । उकलु तरी देखोनि पाहिजे । परी त्यजिता कर्म न त्यजे । निभ्रांत मानीं ॥५२॥
जंव प्रकृतीचें अधिष्ठान । तंव सांडी मांडी हें अज्ञान । जे चेष्टा ते गुणाधीन । आपैसी असे ॥५३॥
देखैं विहित कर्म जेतुलें । तें सळें जरी वोसंडिलें । तरी स्वभाव काय निमाले । इंद्रियांचे ॥५४॥
सांगै श्रवणीं ऐकावें ठेलें ? । कीं नेत्रींचें तेज गेलें ? । हें नासारंध्र बुझालें । परिमळु नेघे ? ॥५५॥
ना तरी प्राणापानगति । कीं निर्विकल्प जाहली मती । कीं क्षुधातृषादि आर्ति । खुंटलिया ॥५६॥
हे स्वप्नावबोधु ठेले । कीं चरण चालों विसरले । हें असो काय निमाले । जन्ममृत्यु ? ॥५७॥
हें न ठकेचि जरी कांहीं । तरी सांडिलें तें कायी । म्हणौनि कर्मत्यागु नाहीं । प्रकृतिमंता ॥५८॥
कर्म पराधीनपणें । निपजतसे प्रकृतिगुणें । येरी धरीं मोकलीं अंतःकरणें । वाहिजे वायां ॥५९॥
देखैं रथीं आरूढिजे । मग जरी निश्चळा बैसिजे । तरी चळु होऊनि हिंडिजे । परतंत्रा ॥६०॥


कां उचलिलें वायुवशें । चळे शुष्क पत्र जैसें । निचेष्ट आकाशें । परिभ्रमें ॥६१॥
तैसें प्रकृतिआधारें । कर्मेंद्रियविकारें । नैष्कर्म्यही व्यापारे । निरंतर ॥६२॥
म्हणौनि संगू जंव प्रकृतीचा । तंव त्यागु न घडे कर्माचा । ऐसियाहि करूं म्हणती तयांचा । आग्रहोचि उरे ॥६३॥
कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन ।
इन्द्रियार्थान्विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते ॥६॥
जे उचित कर्म सांडिती । मग नैष्कर्म्य होऊं पाहती । परी कर्मेंद्रियप्रवृत्ती । निरोधुनी ॥६४॥
तयां कर्मत्यागु न घडे । जें कर्तव्य मनीं सांपडे । वरी नटती तें फुडें । दरिद्र जाण ॥६५॥
ऐसे ते पार्था । विषयासक्त सर्वथा । ओळखावे तत्त्वता । भ्रांति नाहीं ॥६६॥
आतां देईं अवधान । प्रसंगें तुज सांगेन । या नैराश्याचें चिन्ह । धनुर्धरा ॥६७॥
यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्याऽऽरभतेऽर्जुन ।
कर्मैन्द्रियैः कर्मयोगमसक्तः स विशिष्यते ॥७॥
जो अंतरीं दृढ । परमात्मरूपीं गूढ । बाह्य भागु तरी रूढ । लौकिकु जैसा ॥६८॥
तो इंद्रियां आज्ञा न करी । विषयांचें भय न धरी । प्राप्त कर्म नाव्हेरी । उचित जें जें ॥६९॥
तो कर्मेंद्रियें कर्मीं । राहटतां तरी न नियमी । परी तेथिचेनि उर्मीं । झांकोळेना ॥७०॥


तो कामनामात्रें न घेपे । मोहमळें न लिंपें । जैसें जळीं जळें न शिंपे । पद्मपत्र ॥७१॥
तैसा संसर्गामाजीं असे । सकळांसारिखा दिसे । जैसें तोयसंगें आभासे । भानुबिंब ॥७२॥
तैसा सामान्यत्वें पाहिजे । तरी साधारणुचि देखिजे । येरवीं निर्धारितां नेणिजे । सोय जयाची ॥७३॥
ऐशा चिन्हीं चिन्हितु । देखसी तोचि मुक्तु । आशापाशरहितु । वोळख पां ॥७४॥
अर्जुना तोचि योगी । विशेषिजे जो जगीं । म्हणौनि ऐसा होय यालागीं । म्हणिपे तूतें ॥७५॥
तूं मानसा नियमु करीं । निश्चळु होय अंतरीं । मग कर्मेंद्रियें व्यापारीं । वर्ततु सुखें ॥७६॥
नियतं कुरु कर्म त्वं ज्यायो ह्यकर्मणः ।
शरीरयात्राऽपि च ते न प्रसिद्ध्येदकर्मणः ॥८॥
म्हणौनी नैष्कर्म्य होआवें । तरी एथ तें न संभवे । आणि निषिद्ध केवीं राहाटावें । विचारीं पां ॥७७॥
म्हणौनि जें जें उचित । आणि अवसरेंकरूनि प्राप्त । तें कर्म हेतुरहित । आचरें तूं ॥७८॥
पार्था आणीकही एक । नेणसी तूं हें कवतिक । जें ऐसें कर्ममोचक । आपैसें असे ॥७९॥
देखैं अनुक्रमाधारें । स्वधर्मु जो आचरे । तो मोक्षु तेणें व्यापारें । निश्चित पावे ॥८०॥
यज्ञाथात्कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः ।
तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचार ॥९॥


स्वर्धमु जो बापा । तोचि नित्ययज्ञु जाण पां । म्हणौनि वर्ततां तेथ पापा । संचारु नाहीं ॥८१॥
हा निजधर्मु जैं सांडे । आणि कुकर्मीं रति घडे । तैंचि बंधु पडे । संसारिक ॥८२॥
म्हणौनि स्वधर्मानुष्ठान । तें अखंड यज्ञ याजन । जो करी तया बंधन । कहींच न घडे ॥८३॥
हा लोकु कर्में बांधिला । जो परतंत्रा भूत झाला । तो नित्य यज्ञातें चुकला । म्हणौनियां ॥८४॥
आतां येचिविशीं पार्था । तुज सांगेन एक मी कथा । जैं सृष्ट्यादि संस्था । ब्रह्मेनें केली ॥८५॥
सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः ।
अनेन प्रसविष्यध्वमेष वोऽस्त्विष्टकामधुक् ॥१०॥
तैं नित्ययागसहितें । सृजिलीं भूतें समस्तें । परी नेणतीचि तियें यज्ञातें । सूक्ष्म म्हणौनि ॥८६॥
ते वेळीं प्रजीं विनविला ब्रह्मा । देवा काय आश्रयो एथ आम्हां । तंव म्हणे तो कमळजन्मा । भूतांप्रति ॥८७॥
तुम्हां वर्णविशेषवशें । आम्हीं हा स्वधर्मुचि विहिला असे । यातें उपासा मग आपैसे । पुरती काम ॥८८॥
तुम्हीं व्रतें नियमु न करावे । शरीरातें न पीडावें । दुरी केंही न वचावें । तीर्थासी गा ॥८९॥
योगादिकें साधनें । साकांक्ष आराधनें । मंत्रयंत्रविधानें । झणीं करा ॥९०॥


देवतांतरा न भजावें । हें सर्वथा कांहीं न करावें । तुम्हीं स्वधर्मयज्ञीं यजावें । अनायासें ॥९१॥
अहेतुकें चित्तें । अनुष्ठा पां ययातें । पतिव्रता पतीतें । जियापरी ॥९२॥
तैसा स्वधर्मरूपमखु । हाचि सेव्यु तुम्हां एकु । ऐसें सत्यलोकनायकु । बोलता जाहला ॥९३॥
देखा स्वधर्मातें भजाल । तरी कामधेनु हा होईल । मग प्रजाहो न संडील । तुमतें कदा ॥९४॥
देवांभावयताऽनेन ते देवाभावयन्तु वः ।
परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ ॥११॥
जैं येणेंकरूनि समस्तां । परितोषु होईल देवतां । मग ते तुम्हां ईप्सिता । अर्थातें देती ॥९५॥
या स्वधर्मपूजा पूजितां । देवतागणां समस्तां । योगक्षेमु निश्चिता । करिती तुमचा ॥९६॥
तुम्हीं देवांतें भजाल । देव तुम्हां तुष्टतील । ऐसी परस्परें घडेल । प्रीति जेथ ॥९७॥
तेथ तुम्हीं जें करूं म्हणाल । तें आपैसें सिद्धि जाईल । वांछितही पुरेल । मानसींचें ॥९८॥
वाचासिद्धि पावाल । आज्ञापक होआल । म्हणियें तुमतें मागतील । महाऋद्धि ॥९९॥
जैसें ऋतुपतीचें द्वार । वनश्री निरंतर । वोळगे फळभार । लावण्येसी ॥१००॥
इष्टांभोगान्हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः ।
तैर्दत्तानप्रदायैभ्यो यो भुङ्क्ते स्तेन एव सः ॥१२॥


तैसें सर्व सुखेंसहित । दैवचि मूर्तिमंत । येईल देखा काढत । तुम्हांपाठीं ॥१०१॥
ऐसें समस्त भोगभरित । होआल तुम्ही अनार्त । जरी स्वधर्मेंनिरत । वर्ताल बापा ॥१०२॥
कां जालिया सकळ संपदा । जो अनुसरेल इंद्रियमदा । लुब्ध होऊनियां स्वादा । विषयांचिया ॥१०३॥
तिहीं यज्ञभाविकीं सुरीं । जे हे संपत्ति दिधली पुरी । तयां स्वधर्मीं सर्वेश्वरीं । न भजेल जो ॥१०४॥
अग्निमुखीं हवन । न करील देवता पूजन । प्राप्तवेळे भोजन । ब्राह्मणाचें ॥१०५॥
विमुख होईल गुरुभक्ती । आदर न करील अतिथी । संतोष नेदील ज्ञाती । आपुलिये ॥१०६॥
ऐसा स्वधर्मक्रियारहितु । आथिलेपणें प्रमत्तु । केवळ भोगासक्तु । होईल जो ॥१०७॥
तया मग अपावो थोर आहे । जेणें तें हातींचें सकळ जाये । देखा प्राप्तही न लाहे । भोग भोगूं ॥१०८॥
जैसें गतायुषी शरीरीं । चैतन्य वासु न करी । कां निदैवाच्या घरीं । न राहे लक्ष्मी ॥१०९॥
तैसा स्वधर्मु जरी लोपला । तरी सर्व सुखांचा थारा मोडला । जैसा दीपासवें हरपला । प्रकाशु जाय ॥११०॥


तैसी निजवृत्ति जेथ सांडे । तेथ स्वतंत्रते वस्ती न घडे । आइका प्रजाहो हे फुडें । विरंचि म्हणे ॥१११॥
म्हणौनि स्वधर्मु जो सांडील । तयातें काळु दंडील । चोरु म्हणौनि हरील । सर्वस्व तयाचें ॥११२॥
मग सकळ दोषु भंवते । गिंवसोनि घेति तयातें । रात्रिसमयीं स्मशानातें । भूतें जैसीं ॥११३॥
तैसीं त्रिभुवनींचीं दुःखें । आणि नानाविधें पातकें । दैन्यजात तितुकें । तेथेंचि वसे ॥११४॥
ऐसें होय तया उन्मत्ता । मग न सुटे बापा रुदतां । कल्पांतींही सर्वथा । प्राणिगणहो ॥११५॥
म्हणौनि निजवृत्ती हे न संडावी । इंद्रियें बरळों नेदावीं । ऐसें प्रजांतें शिकवी । चतुराननु ॥११६॥
जैसे जळचरा जळ सांडे । आणि तत्क्षणीं मरण मांडे । हा स्वधर्मु तेणें पाडें । विसंबों नये ॥११७॥
म्हणौनि तुम्हीं समस्तीं । आपुलालिया कर्मीं उचितीं । निरत व्हावें पुढत पुढती । म्हणिपत असे ॥११८॥
यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः ।
भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात् ॥१३॥
देखा विहित क्रियाविधि । निर्हेतुका बुद्धि । जो असतिये समृद्धि । विनियोगु करी ॥११९॥
गुरु गोत्र अग्नि पूजी । अवसरीं भजे द्विजीं । निमित्तादिकीं यजी । पितरोद्देशें ॥१२०॥


या यज्ञक्रिया उचिता । यज्ञेशीं हवन करितां । हुतशेष स्वभावतः । उरे जें जें ॥१२१॥
तें सुखें आपुले घरीं । कुटुंबेंसी भोजन करी । कीं भोग्यचि तें निवारी । कल्मषातें ॥१२२॥
तें यज्ञावशिष्ट भोगी । म्हणौनि सांडिजे तो अघीं । जयापरीं महारोगी । अमृतसिद्धि ॥१२३॥
कीं तत्त्वनिष्ठु जैसा । नागवे भ्रांतिलेशा । तो शेषभोगी तैसा । नाकळे दोषा ॥१२४॥
म्हणौनि स्वधर्में जें अर्जे । तें स्वधर्मेंचि विनियोगिजे । मग उरे तें भोगिजे । संतोषेंसीं ॥१२५॥
हें वांचूनि पार्था । राहाटों नये अन्यथा । ऐसी आद्य हे कथा । श्रीमुरारी सांगे ॥१२६॥
जे देहचि आपणपें मानिती । आणि विषयांतें भोग्य म्हणती । यापरतें न स्मरती । आणिक कांहीं ॥१२७॥
हें यज्ञोपकरण सकळ । नेणतसां ते बरळ । अहंबुद्धि केवळ । भोगूं पाहती ॥१२८॥
इंद्रियरुचीसारिखें । करविती पाक निके । ते पापिये पातकें । सेविती जाण ॥१२९॥
संपत्तिजात आघवें । हें हवनद्रव्य मानावें । मग स्वधर्मयज्ञें अर्पावें । आदिपुरुषीं ॥१३०॥


हें सांडोनियां मूर्ख । आपणपेंयालागीं देख । निपजविती पाक । नानाविध ॥१३१॥
जिहीं यज्ञु सिद्धी जाये । परेशा तोषु होये । तें हें सामान्य अन्न न होये । म्हणौनियां ॥१३२॥
हें न म्हणावें साधारण । अन्न ब्रह्मरूप जाण । जें जीवनहेतु कारण । विश्वा यया ॥१३३॥
अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसंभवः ।
यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः ॥१४॥
कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवं ।
तस्मात्सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम् ॥१५॥
अन्नास्तव भूतें । प्ररोहो पावती समस्तें । मग पर्जन्यु या अन्नातें । सर्वत्र प्रसवे ॥१३४॥
तया पर्जन्या यज्ञीं जन्म । यज्ञातें प्रगटी कर्म । कर्मासि आदि ब्रह्म । वेदरूप ॥१३५॥
मग वेदांतें परात्पर । प्रसवतसे अक्षर । म्हणौनि हे चराचर । ब्रह्मबद्ध ॥१३६॥
परी कर्माचिये मूर्ति । यज्ञीं अधिवासु श्रुति । ऐकें सुभद्रापति । अखंड गा ॥१३७॥
एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयतीह यः ।
अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ स जीवति ॥१६॥
ऐशी हे आदि परंपरा । संक्षेपें तुज धनुर्धरा । सांगितली या अध्वरा । लागूनियां ॥१३८॥
म्हणौनि समूळ हा उचितु । स्वधर्मरूप क्रतु । नानुष्ठी जो मत्तु । लोकीं इये ॥१३९॥
तो पातकांची राशी । जाण भार भूमीसी । जो कुकर्में इंद्रियांसी । उपेगा गेला ॥१४०॥


तें जन्म कर्म सकळ । अर्जुना अति निष्फळ । जैसें कां अभ्रपटल । अकाळींचें ॥१४१॥
कां गळां स्तन अजेचे । तैसें जियालें देखैं तयाचें । जया अनुष्ठान स्वधर्माचें । घडेचिना ॥१४२॥
म्हणौनि ऐकें पांडवा । हा स्वधर्मु कवणें न संडावा । सर्वभावें भजावा । हाचि एकु ॥१४३॥
हां गा शरीर जरी जाहलें । तरी कर्तव्य वोघें आलें । मग उचित कां आपुलें । ओसंडावें ? ॥१४४॥
परिस पां सव्यसाची । मूर्ति लाहोनि देहाची । खंती करिती कर्माची । ते गांवढे गा ॥१४५॥
यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः ।
आत्मन्येव च सन्तुष्टस्तस्य कार्यं न विद्यते ॥१७॥
देखैं असतेनि देहधर्में । एथ तोचि एकु न लिंपे कर्में । जो अखंडित रमे । आपणपांचि ॥१४६॥
जे तो आत्मबोधें तोषला । तरी कृतकार्यु देखैं जाहला । म्हणौनि सहजें सांडवला । कर्मसंगु ॥१४७॥
नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन ॥
न चास्य सर्वभूतेषु कश्चिदार्थव्यपाश्रयः ॥१८॥
तृप्ति जालिया जैसीं । साधनें सरती आपैसीं । देखैं आत्मतुष्टीं तैसीं । कर्में नाहीं ॥१४८॥
जंववरी अर्जुना । तो बोधु भेटेना मना । तंवचि यया साधना । भजावें लागे ॥१४९॥
तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर ।
असक्तो ह्याचरन्कर्म परमाप्नोति पूरुषः ॥१९॥
म्हणौनि तूं नियतु । सकळ कामरहितु । होऊनियां उचितु । स्वधर्में रहाटें ॥१५०॥


जे स्वधर्में निष्कामता । अनुसरले पार्था । ते कैवल्यपद तत्त्वतां । पातले जगीं ॥१५१॥
कर्मणैव हि संसिद्धिमास्थिता जनकादयः ।
लोकसङ्ग्रहमेवापि संपश्यन्कर्तुमर्हसि ॥२०॥
देख पां जनकादिक । कर्मजात अशेख । न सांडितां मोक्षसुख । पावते जाहले ॥१५२॥
याकारणें पार्था । होआवी कर्मीं आस्था । हे आणिकाहि एका अर्था । उपकारैल ॥१५३॥
जे आचरतां आपणपयां । देखी लागेल लोका यया । तरी चुकेल अपाया । प्रसंगेंचि ॥१५४॥
देखैं प्राप्तार्थ जाहले । जे निष्कामता पावले । तयाही कर्तव्य असे उरलें । लोकांलागीं ॥१५५॥
मार्गीं अंधासरिसा । पुढें देखणाही चाले जैसा । अज्ञाना प्रकटावा धर्मु तैसा । आचरोनी ॥१५६॥
हां गा ऐसें जरी न कीजे । तरी अज्ञाना काय उमजे ? । तिहीं कवणे परी जाणिजे । मार्गातें या ? ॥१५७॥
यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः ॥
स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ॥२१॥
एथ वडील जें जें करिती । तया नाम धर्मु ठेविती । तेंचि येर अनुष्ठिती । सामान्य सकळ ॥१५८॥
हें ऐसें असे स्वभावें । म्हणौनि कर्म न संडावें । विशेषें आचरावें । लागे संतीं ॥१५९॥
न मे पार्थाऽस्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किञ्चन ॥नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि ॥२२॥
आतां आणिकांचिया गोठी । कायशा सांगों किरीटी । देखैं मीच इये राहाटी । वर्तत असें ॥१६०॥


काय सांकडें कांहीं मातें । कीं कवणें एकें आर्तें । आचरें मी धर्मातें । म्हणसी जरी ॥१६१॥
तरी पुरतेपणालागीं । आणिकु दुसरा नाहीं जगीं । ऐसी सामुग्री माझ्या अंगीं । जाणसी तूं ॥१६२॥
मृत गुरुपुत्र आणिला । तो तुवां पवाडा देखिला । तोही मी उगला । कर्मीं वर्तें ॥१६३॥
यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः ।
मम वत्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥२३॥
परी स्वधर्मीं वर्तें कैसा । साकांक्षु कां होय जैसा । तयाचि एका उद्देशा । लागोनियां ॥१६४॥
जे भूतजात सकळ । असे आम्हांचि आधीन केवळ । तरी न व्हावें बरळ । म्हणौनियां ॥१६५॥
उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहम् ।
सङ्करस्य च कर्ता स्यामुपहन्यामिमाः प्रजाः ॥२४॥
आम्ही पूर्णकाम होउनी । जरी आत्मस्थिति राहुनी । तरी प्रजा हे कैसेनि । निस्तरेल ? ॥१६६॥
इहीं आमुची वास पाहावी । मग वर्ततीपरी जाणावी । ते लोकस्थिति आघवी । नासिली होईल ॥१६७॥
म्हणौनि समर्थु जो येथें । आथिला सर्वज्ञते । तेणें सविशेषें कर्मातें । त्यजावें ना ॥१६८॥
सक्ताः कर्मण्यविद्वांसो यथा कुर्वन्ति भारत ।
कुर्याद्विद्वांस्तथाऽसक्तश्चिकीर्षुर्लोकसङ्ग्रहम् ॥२५॥
देखैं फळाचिया आशा । आचरे कामकु जैसा । कर्मीं भरु होआवा तैसा । निराशाही ॥१६९॥
जे पुढतपुढतीं पार्था । हे सकळ लोकसंस्था । रक्षणीय सर्वथा । म्हणौनियां ॥१७०॥


मार्गाधारें वर्तावें । विश्व हें मोहरें लावावें । अलौकिक नोहावें । लोकांप्रति ॥१७१॥
न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां कर्मसङ्गिनाम् ।
जोषयेत्सर्वकर्माणि विद्वान्युक्तः समाचरन ॥२६॥
जें सायासें स्तन्य सेवी । तें पक्वान्नें केवीं जेवी । म्हणौनि बाळका जैशीं नेदावीं । धनुर्धरा ॥१७२॥
तैशी कर्मीं जयां अयोग्यता । तयांप्रति नैष्कर्म्यता । न प्रगटावी खेळतां । आदिकरुनी ॥१७३॥
तेथें सत्क्रियाचि लावावी । तेचि एकी प्रशंसावी । नैष्कर्मींही दावावी । आचरोनी ॥१७४॥
तया लोकसंग्रहालागीं । वर्ततां कर्मसंगीं । तो कर्मबंधु आंगीं । वाजैल ना ॥१७५॥
जैसी बहुरुपियांचीं रावो राणी । स्त्रीपुरुषभावो नाहीं मनीं । परी लोकसंपादणी । तैशीच करिती ॥१७६॥
प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः ।
अहङ्कारविमूढात्मा कर्ताऽहमिति मन्यते ॥२७॥
देखैं पुढिलाचें वोझें । जरी आपुला माथां घेईजे । तरी सांगैं कां न दटिजे । धनुर्धरा ? ॥१७७॥
तैसीं शुभाशुभें कर्में । जियें निपजती प्रकृतिधर्में । तियें मूर्ख मतिभ्रमें । मी कर्ता म्हणे ॥१७८॥
ऐसा अहंकारादिरूढ । एकदेशी मूढ । तया हा परमार्थ गूढ । प्रगटावा ना ॥१७९॥
हें असो प्रस्तुत । सांगिजैल तुज हित । तें अर्जुना देऊनि चित्त । अवधारीं पां ॥१८०॥
तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्मविभागयोः ।
गुणा गुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते ॥२८॥


जें तत्त्वज्ञानियांच्या ठायीं । प्रकृतिभावो नाहीं । जेथ कर्मजात पाहीं । निपजत असे ॥१८१॥
ते देहाभिमानु सांडुनी । गुणकर्में वोलांडुनि । साक्षीभूत होउनी । वर्तती देहीं ॥१८२॥
म्हणौनि शरीरी जरी होती । तरी कर्मबंधा नातळती । जैसा कां भूतचेष्टा गभस्ती । घेपवेना ॥१८३॥
प्रकृतेर्गुणसंमूढाः सज्जन्ते गुणकर्मसु ।
तानकृत्स्नविदो मन्दांकृत्स्नविन्न विचालयेत् ॥२९॥
एथ कर्मीं तोचि लिंपे । जो गुणसंभ्रमें घेपे । प्रकृतीचेनि आटोपे । वर्ततु असे ॥१८४॥
इंद्रियें गुणाधारें । राहाटती निजव्यापारें । तें परकर्म बलात्कारें । आपादी जो ॥१८५॥
मयि सर्वाणि कर्माणि सन्यस्याध्यात्मचेतसा ।
निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः ॥३०॥
तरी उचितें कर्में आघवीं । तुवां आचरोनि मज अर्पावीं । परी चित्तवृत्ति न्यासावी । आत्मरूपीं ॥१८६॥
आणि हें कर्म मी कर्ता । कां आचरैन या अर्था । ऐसा अभिमानु झणें चित्ता । रिगों देसीं ॥१८७॥
तुवां शरीरपरा नोहावें । कामनाजात सांडावें । मग अवसरोचित भोगावे । भोग सकळ ॥१८८॥
आतां कोदंड घेऊनि हातीं । आरूढ पां इयें रथीं । देईं आलिंगन वीरवृत्ती । समाधानें ॥१८९॥
जगीं कीर्ति रूढवीं । स्वधर्माचा मानु वाढवीं । इया भारापासोनि सोडवीं । मेदिनी हे ॥१९०॥


आतां पार्था निःशंकु होईं । या संग्रामा चित्त देईं । एथ हें वांचूनि कांहीं । बोलों नये ॥१९१॥
ये मे मतमिदं नित्यमनुतिष्ठन्ति मानवाः ।
श्रद्धावन्तोऽनसूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः ॥३१॥
हें अनुपरोध मत माझें । जिहीं परमादरें स्वीकारिजे । श्रद्धापूर्वक अनुष्ठिजे । धनुर्धरा ॥१९२॥
तेही सकळ कर्मीं वर्ततु । जाण पां कर्मरहितु । म्हणौनि हें निश्चितु । करणीय गा ॥१९३॥
ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् ।
सर्वज्ञानविमूढांस्तान्विद्धि नष्टानचेतसः ॥३२॥
नातरी प्रकृतिमंतु होउनी । इंद्रियां लळा देउनी । जें हें माझें मत अव्हेरुनी । ओसंडिती ॥१९४॥
जे सामान्यत्वें लेखिती । अवज्ञा करूनि देखती । कां हा अर्थवादु म्हणती । वाचाळपणें ॥१९५॥
ते मोहमदिरा भुलले । विषयविखें घारले । अज्ञानपंकीं बुडाले । निभ्रांत मानीं ॥१९६॥
देखैं शवाच्या हातीं दिधलें । जैसें रत्न कां वायां गेलें । नातरी जात्यंधा पाहलें । प्रमाण नोहे ॥१९७॥
कां चंद्राचा उदयो जैसा । उपयोगा न वचे वायसा । मूर्खा विवेकु हा तैसा । रुचेल ना ॥१९८॥
तैसे जे पार्था । विमुख या परमार्था । तयांसी संभाषण सर्वथा । करावेना ॥१९९॥
म्हणौनि ते न मानिती । आणि निंदाही करूं लागती । सांगैं पतंगु काय साहती । प्रकाशातें ? ॥२००॥


पतंगा दीपीं आलिंगन । तेथ त्यासी अचुक मरण । तेंवीं विषयाचरण । आत्मघाता ॥२०१॥
सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि ।
प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति ॥३३॥
म्हणौनि इंद्रियें एकें । जाणतेनि पुरुखें । लाळावीं ना कौतुकें । आदिकरुनी ॥२०२॥
हां गा सर्पेसीं खेळों येईल ? । कीं व्याघ्रसंसर्ग सिद्धि जाईल ? । सांगैं हाळाहाळ जिरेल । सेविलिया काई ? ॥२०३॥
देखैं खेळतां अग्नि लागला । मग तो न सांवरे जैसा उधवला । तैसा इंद्रियां लळा दिधला । भला नोहे ॥२०४॥
एऱ्हवीं तरी अर्जुना । या शरीरा पराधीना । कां नाना भोगरचना । मेळवावी ? ॥२०५॥
आपण सायासेंकरुनि बहुतें । सकळहि समृद्धिजातें । उदोअस्तु या देहातें । प्रतिपाळावें कां ? ॥२०६॥
सर्वस्वें शिणोनि एथें । अर्जवावीं संपत्तिजातें । तेणें स्वधर्मु सांडुनि देहातें । पोखावें काई ॥२०७॥
मग हे तंव पांचमेळावा । शेखीं अनुसरेल पंचत्वा । ते वेळीं केला कें गिंवसावा । शीणु आपुला ॥२०८॥
म्हणौनि केवळ देहभरण । ते जाणें उघडी नागवण । यालागीं एथ अंतःकरण । देयावेंना ॥२०९॥
इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ ।
तयोर्न वशमागच्छेत्तौ ह्यस्य परिपन्थिनौ ॥३४॥
एऱ्हवीं इंद्रियांचिया अर्था । सारिखा विषो पोखितां । संतोषु कीर चित्ता । आपजेल ॥२१०॥


परी तो संवचोराचा सांगातु । जैसा नावेक स्वस्थु । जंव नगराचा प्रांतु । सांडिजेना ॥२११॥
बापा विषाची मधुरता । झणें आवडी उपजे चित्ता । परी तो परिणामु विचारितां । प्राणु हरी ॥२१२॥
देखैं इंद्रियीं कामु असे । तो लावी सुखदुराशे । जैसा गळीं मीनु आमिषें । भुलविजे गा ॥२१३॥
परी तयामाजीं गळु आहे । जो प्राणातें घेऊनि जाये । तोओ जैसा ठाउवा नोहे । झांकलेपणें ॥२१४॥
तैसें अभिलाषें येणें कीजेल । विषयांची आशा धरिजेल । तरी वरपडा होईजेल । क्रोधानळा ॥२१५॥
जैसा कवळोनियां पारधी । घातेचिये संधी । आणी मृगातें बुद्धि । साधावया ॥२१६॥
एथ तैसीची परी आहे । म्हणौनि संगु हा तुज नोहे । पार्था दोन्ही कामक्रोध हे । घातुक जाणें ॥२१७॥
म्हणौनि हा आश्रोचि न करावा । मनेंहि आठवो न धरावा । एकु निजवृत्तीचा वोलावा । नासों नेदी ॥२१८॥
श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात् ।
स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः ॥३५॥
अगा स्वधर्मु हा आपुला । जरी कां कठिणु जाहला । तरी हाचि अनुष्ठिला । भला देखैं ॥२१९॥
येरु आचारु जो परावा । तो देखतां कीर बरवा । परी आचरतेनि आचरावा । आपुलाचि ॥२२०॥


सांन्नें शूद्र घरीं आघवीं । पक्वान्नें आहाति बरवीं । तीं द्वीजें केंवीं सेवावीं । दुर्बळु जरी जाहला ॥२२१॥
हें अनुचित कैसेनि कीजे । अग्राह्य केवीं इच्छिजे । अथवा इच्छिलेंही पाविजे । विचारीं पां ॥२२२॥
तरी लोकांचीं धवळारें । देखोनियां मनोहरें । असतीं आपुलीं तणारें । मोडावीं केवीं ? ॥२२३॥
हें असो वनिता आपुली । कुरूप जरी जाहली । तऱ्ही भोगितां तेचि भली । जियापरी ॥२२४॥
तेवीं आवडे तैसा सांकडु । आचरतां जरी दुवाडु । तऱ्ही स्वधर्मुचि सुरवाडु । परत्रींचा ॥२२५॥
हां गा साकर आणि दूध । हें गौल्य कीर प्रसिद्ध । परी कृमिदोषीं विरुद्ध । घेपे केवीं ? ॥२२६॥
ऐसेनिही जरी सेविजेल । तरी ते अळुकीची उरेल । जे तें परिणामीं पथ्य नव्हेल । धनुर्धरा ॥२२७॥
म्हणौनि आणिकांसी जें विहित । आणि आपणपेयां अनुचित । तें नाचरावें जरी हित । विचारिजे ॥२२८॥
या स्वधर्मातें अनुष्ठितां । वेचु होईल जिविता । तोहि निका वर उभयतां । दिसत असे ॥२२९॥
ऐसें समस्तसुरशिरोमणी । बोलिले जेथ शारङ्गपाणी । तेथ अर्जुन म्हणे विनवणी । असे देवा ॥२३०॥


हें जें तुम्हीं सांगितलें । तें सकळ कीर म्यां परिसिलें । परी आतां पुसेन कांहीं आपुलें । अपेक्षित ॥२३१॥
अर्जुन उवाच ।
अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पूरुषः ।
अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः ॥३६॥
तरी देवा हें ऐसें कैसें । जे ज्ञानियांही स्थिति भ्रंशे । मार्गु सांडुनी अनारिसे । चालत देखों ॥२३२॥
सर्वज्ञुही जे होती । हेयोपादेयही जाणती । तेही परधर्में व्यभिचरिति । कवणें गुणें ? ॥२३३॥
बीजा आणि भूसा । अंधु निवाडू नेणें जैसा । नावेक देखणाही तैसा । बरळे कां पां ? ॥२३४॥
जे असता संगु सांडिती । तेचि संसर्गु करितां न धाती । वनवासीही सेविती । जनपदातें ॥२३५॥
आपण तरी लपती । सर्वस्वें पाप चुकविती । परी बळात्कारें सुइजती । तयाचि माजीं ॥२३६॥
जयाची जीवें घेती विवसी । तेचि जडोनि ठाके जीवेंसीं । चुकवितां ते गिंवसी । तयातेंचि ॥२३७॥
ऐसा बलात्कारु एकु दिसे । तो कवणाचा एथ आग्रहो असे । हें बोलावें हृषीकेशें । पार्थु म्हणे ॥२३८॥
श्रीभगवानुवाच ।
काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः ।
महाशनो महापाप्मा विद्ध्येनमिह वैरिणम् ॥३७॥
तंव हृदयकमळआरामु । जो योगियांचा निष्कामकामु । तो म्हणतसे पुरुषोत्तमु । सांगेन आइक ॥२३९॥
तरी हे काम क्रोधु पाहीं । जयांतें कृपेची सांठवण नाहीं । हें कृतांताच्या ठायीं । मानिजती ॥२४०॥


हे ज्ञाननिधीचे भुजंग । विषयदरीचे वाघ । भजनमार्गींचे मांग । मारक जे ॥२४१॥
हे देहदुर्गींचे धोंड । इंद्रियग्रामींचें कोंड । यांचें व्यामोहादिक दबड । जगावरी ॥२४२॥
हे रजोगुण मानसींचे । समूळ आसुरियेचे । धालेपण ययांचें । अविद्या केलें ॥२४३॥
हे रजाचे कीर जाहले । परी तमासी पढियंते भले । तेणें निजपद यां दिधलें । प्रमादमोहो ॥२४४॥
हे मृत्युच्या नगरीं । मानिजती निकियापरि । जे जीविताचे वैरी । म्हणौनियां ॥२४५॥
जयांसि भुकेलिया आमिषा । हें विश्व न पुरेचि घांसा । कुळवाडियांचिया आशा । चाळीत असे ॥२४६॥
कौतुकें कवळितां मुठीं । जिये चवदा भुवनें थेंकुटी । तिये भ्रांतिही धाकुटी । वाल्हीदुल्ही ॥२४७॥
जे लोकत्रयाचें भातुकें । खेळतांचि खाय कवतिकें । तिच्या दासीपणाचेनि बिकें । तृष्णा जिये ॥२४८॥
हें असो मोहें मानिजे । यांतें अहंकारें घेपे दीजे । जेणें जग आपुलेनि भोजें । नाचवीत असे ॥२४९॥
जेणें सत्याचा भोकसा काढिला । मग अकृत्य तृणकुटा भरिला । तो दंभु रूढविला । जगीं इहीं ॥२५०॥


साध्वी शांती नागविली । मग माया मांगी श्रृंगारिली । तियेकरवीं विटाळविलीं । साधुवृंदें ॥२५१॥
इहीं विवेकाची त्र्याय फेडिली । वैराग्याचि खाल काढिली । जितया मान मोडिली । उपशमाची ॥२५२॥
इहीं संतोषवन खांडिलें । धैर्यदुर्ग पाडिले । आनंदरोप सांडिले । उपडूनियां ॥२५३॥
इहीं बोधाचीं रोपें लुंचिलीं । सुखाची लिपी पुसिली । जिव्हारीं आगी सूदली । तापत्रयाची ॥२५४॥
हे आंगा तंव घडले । जीवींची आथी जडले । परी नातुडती गिंवसिले । ब्रह्मादिकां ॥२५५॥
हे चैतन्याचे शेजारीं । वसती ज्ञानाच्या एका हारीं । म्हणौनि प्रवर्तले महामारी । सांवरती ना ॥२५६॥
हे जळेंविण बुडविती । आगीवीण जाळिती । न बोलतां कवळिती । प्राणियांतें ॥२५७॥
हे शस्त्रेंविण साधिती । दोरेंविण बांधिती । ज्ञानियासी तरी वधिती । पैज घेउनि ॥२५८॥
हे चिखलेंवीण रोवितीं । पाशिकेंवीण गोंविती । हे कवणाजोगें न होती । आंतौटेपणें ॥२५९॥
धूमेनाऽऽव्रियते वह्निर्यथाऽऽदर्शो मलेन च ।
यथोल्बेनाऽऽवृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम् ॥३८॥
जैसी चंदनाची मुळी । गिंवसोनि घेपे व्याळीं । नातरी उल्बाची खोळी । गर्भस्थासी ॥२६०॥


कां प्रभावीण भानु । धूमेवीण हुताशनु । जैसा दर्पण मळहीनु । कहींच नसे ॥२६१॥
तैसें इहींवीण एकलें । आम्हीं ज्ञान नाहीं देखिलें । जैसें कोंडेनि पां गुंतलें । बीज निपजे ॥२६२॥
आवृतं ज्ञानमेतेन ज्ञनिनो नित्यवैरिणा ।
कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च ॥३९॥
तैसें ज्ञान तरी शुद्ध । परी इहीं असे प्ररुद्ध । म्हणौनि तें अगाध । होऊनि ठेले ॥२६३॥
आधीं यांतें जिणावें । मग तें ज्ञान पावावें । तंव पराभवो न संभवे । रागद्वेषां ॥२६४॥
यांतें साधावयालागीं । जें बळ आणिजे आंगीं । तें इंधनें जैसीं आगी । सावावो होय ॥२६५॥
इन्द्रियाणि मनो बुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते ।
एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम् ॥४०॥
तैसे उपाय कीजती जे जे । ते ते यांसीचि होती विरजे । म्हणौनि हटियांतें जिणिजे । इहींचि जगीं ॥२६६॥
ऐसियांही सांकडां बोला । एक उपायो आहे भला । तो करितां जरी आंगवला । तरी सांगेन तुज ॥२६७॥
तस्मात्त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ ।
पाप्मानं प्रजहि ह्येनं ज्ञानविज्ञाननाशनम् ॥४१॥
यांचा पहिला कुरुठा इंद्रियें । एथूनि प्रवृत्ति कर्मातें विये । आधीं निर्दळुनि घाली तियें । सर्वथैव ॥२६८॥
इन्द्रियाणि पराण्याहुरिन्द्रियेभ्यः परं मनः ।
मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धेः परतस्तु सः ॥४२॥
मग मनाची धांव पारुषेल । आणि बुद्धीची सोडवण होईल । इतुकेन थारा मोडेल । या पापियांचा ॥२६९॥
एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना ।
जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम् ॥४३॥
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे सांख्ययोगोनाम तॄतीयोऽध्यायः ॥३॥
हे अंतरींहूनि जरी फिटले । तरी निभ्रांत जाण निवटले । जैसें रश्मिवीण उरलें । मृगजळ नाहीं ॥२७०॥


तैसे रागद्वेष जरी निमाले । तरी ब्रह्मींचें स्वराज्य आलें । मग तो भोगी सुख आपुलें । आपणचि ॥२७१॥
ते गुरुशिष्याचि गोठी । पदपिंडाची गांठी । तेथ स्थिर राहोनि नुठी । कवणे काळीं ॥२७२॥
ऐसें सकळ सिद्धांचा रावो । देवी लक्ष्मीयेचा नाहो । राया ऐकें देवदेवो । बोलता जाहला ॥२७३॥
आतां पुनरपि तो अनंतु । आद्य एकी मातु । सांगैल तेथ पंडुसुतु । प्रश्नु करील ॥२७४॥
तया बोलाचा हन पाडु । कीं रसवृत्तीचा निवाडु । येणें श्रोतयां होईल सुरवाडु । श्रवणसुखाचा ॥२७५॥
ज्ञानदेवो म्हणे निवृत्तीचा । चांग उठावा करूनि उन्मेषाचा । मग संवादु श्रीहरिपार्थाचा । भोगावा बापा ॥२७६॥


श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां तॄतीयोऽध्यायः॥

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *