ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.967

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-१४ वे, रूपके बाळछन्द  अभंग ९६८

अलक्षलक्षी मी लक्षीं । तेथें दिसती दोही पक्षी । वेद शास्त्रा हेचि साक्षी । चंद्रसूर्यासहित ॥ मागेन स्वानुभव अंगुले । पांचां तत्त्वांचें सानुलें । व्यर्थ इंद्रियें भोगिलें । नाही रंगले संतचरणीं ॥१॥ बाळछंदो बाबा बाळछंदो । रामकृष्ण नित्य उदो । हृदयकळिके भाव भेदो । वृत्तिसहित शरीर निंदो । नित्य उदो तुझाची ॥२॥ क्षीरसिंधुही दुहिला । चतुर्दशरत्नी भरला । नेघे तेथील साउला । मज अबोला प्रपंचेसी । दान दे गा उदारश्रेष्ठा । परब्रह्म तूं वैकुंठा । मुक्ति मार्गीचा चोहटा । फुकटा नेघे तया ॥३॥ पृथ्वीतळ राज्यपद । मी नेघें नेणें हें ही पद । रामकृष्ण वाचे गोविंद । हाची छंद तुझ्या पंथे । मंत्रतीर्थयज्ञयाग । या न करी भागाभाग । तूंचि होऊनि सर्वांग । सर्व संग मज देईं ॥४॥ वृत्तिसहित मज लपवीं । माझें मन चरणी ठेवीं । निवृत्ति पदोपदीं गोवीं । तूं गोसावी दीनोद्धरण ॥ सात पांच तीन मेळा । पा नेघे तत्त्वांचा सोहळा । रजतमाचा कंटाळा । हृदयीं जिव्हाळा हरि वसो ॥५॥ श्वेत पीत नेघे वस्त्र । ज्ञानविज्ञान नेघे शास्त्र । स्वर्ग मृत्यु पाताळपात्र । नित्य वक्त्र हरि देई ॥ चंद्रसूर्य महेंद्रपदें । ध्रुवादिकांची आनंदें । तें मी नेघे गा आल्हादे । तुझ्या ब्रीदें करीन घोष ॥६॥ करचरणेंसि इंद्रियवृत्ति । तुझ्या ठायीं तूंचि होती । मी माझी उरों नेदी कीर्ति । हे दान श्रीपती मज द्यावें ॥७॥ शांती दया क्षमा ऋद्धी । हेहि पाहतां मज उपाधी । तुझ्याचिया नामाची समाधी । कृपानिधी मज द्यावी ॥८॥ बापरखुमादेविवरु तुष्टला । दान घे घे म्हणोनि वोळला । अजानवृक्ष पाल्हाईला । मग बोलिला विठ्ठल हरि ॥१०॥ पुंडलिकें केलें रे कोडें । तें तुवां मागीतले रे निवाडे । मी तुज हृदयीं सांपडे । हे त्वां केलें ज्ञानदेवा ॥१०॥ ज्ञानदेवें घेतलें दान । हृदयीं धरुनीयां ध्यान । समाधी बैसला निर्वाण । कथा कीर्तन करितु ॥११॥ बाळछंदो बावीस जन्मे । तोडिली भवाब्धीची कमें । चंद्रार्क तारांगणें । रश्मी दान घेतला हरि ॥१२ ॥

अर्थ:-

एकूण लक्षणेचे तीन प्रकार आहेत. जहत्, अजहत्, आणि जहदजहत् म्हणजे भागत्याग लक्षणा या तिन्हीही लक्षणेचा विषय न होणारा म्हणून त्या परमात्म्याला अलक्ष असे म्हणतात. अशा परमात्म्याच्या ठिकाणी मी लक्ष देऊ गेलो असता, त्यापरमात्म्याच्या ठिकाणी माया उपाधीमुळे जीव-ईश्वर हे भाव हेच दोन पक्षी म्हटलेआहे. म्हणून माझ्या म्हणण्याला चंद्रसूर्यादि देवतासहित, वेदशास्त्राची साक्ष आहे. आतां मी त्या पाडुंरगरायाकडे ब्रह्मानुभव हट्ट धरुन मागून घेणार आहे.आतांपर्यंत पंच महाभूतांचे असलेले हे लहानसे अंगरखे माझ्या अंगावर होते. त्यामुळे निष्कारण इंद्रियाच्याद्वारा विषयांचे सेवन केले. आणि त्यांच्या कृपाप्रसादानें. कृतार्थ होणार

अशा संतांची मात्र मी संगती केली नाही. पांडुरंगा, बाळकाला हाच छंद लागावा. रामकृष्णाच्या स्वरुपाचा नित्य उदय अंतःकरणांत व्हावा, वृत्तिसहित शरीराच्या ठिकाणी तुच्छ बुद्धि व्हावी आणि नित्य उदय तुझ्या नामाचा असावा.

चतुर्दश रत्नानी भरलेल्या क्षीर सिंधुचा विचार केला तर त्यातले एकही रत्नरुपी वस्त्र मला नको कारण मला प्रपंच्याविषयी गोष्ट काढावयाची नाही. हे परब्रह्म उदार श्रीकृष्णा तूं मुक्ति दिलीस तर मला ती फुकट सुद्धा नको. पृथ्वीचे सार्वभौम राज्य नको फक्त रामकृष्ण गोविंद या तुझ्या नामाचा छंद दे. याशिवाय मंत्र, तंत्र, यज्ञ, याग किंवा तीर्थ यात्रा या मी काही करणार नाही. हे सर्व तूंच होऊन मला तुझी संगती दे. वृत्तिसह वर्तमान मन नाहिसे करुन तुझ्या चरणी ठेव आणि पदोपदी निवृत्तीत मन गुंतून ठेव. हे दीनोध्दारणा श्रीकृष्णा तूंच आमचा मालक आहे शास्त्रकारापैकी कोणी सात, कोणी पांच,

कोणी तीन अशी तत्त्वे मानतात. अशा तत्त्वांचा त्याचप्रमाणे रजतमादि गुणांचा मला कांटाळा असून फक्त अंतःकरणांत तुझ्या नामाचा जिव्हाळा असावा. योगी लोकांना योगाभ्यासाने श्वेत पीत वस्त्र धारण केलेले स्वरुप दिसते तसे मला दिसावे अशीही माझी इच्छा नाही. तसेच शास्त्रकार ज्ञान विज्ञानाचा खल करतात तेही मला नको. तसेच स्वर्ग, मृत्यु व पाताळ या त्रैलोक्यांतील ऐश्वर्याचीही मला गरज नाही. फक्त तुझे नामच माझ्या वाणीने सतत यावे हे दान तूं मला दे. चंद्र, सूर्य, इंद्र ध्रुव इत्यादि आनंद देणारी पदे असतील पण ती मला नको. फक्त मी तुझी ब्रीदावळी लक्षात घेऊन तुझ्या नामाचा घोष करीन. माझे हात पाय इत्यादि इंद्रिये तुझ्या सेवेमध्ये लावून तुझ्याशी एकरुप होईन आणि माझ्या ठिकाणचा मी व माझे असा अभिमान जाऊन तुझे गुणानुवादच गात मी राहीन असे दान मला श्रीपतीनी द्यावे.त्याप्रमाणे शांती,दया, क्षमा, ऋद्धि या विषयी विचार करित ती मला उपाधीच वाटते.

याकरिता हे कृपानिधी तुझ्या नामाच्या समाधीत मी नित्य रममाण असावे. एवढी मजवर कृपा करा. अशी माऊलीनी प्रार्थना केली, असतां, पांडुरंग संतुष्ट होऊन मागितलेले दान देण्यास तयार होऊन तूं मागितलेले दान घे घे म्हणाले.ज्याठिकाणी अजानवृक्ष टवटवीत झालेला होता. श्री विठ्ठलाने माऊलीस म्हटले. पुंडलिकानें जे कोडे मजजवळ केले. तेच तूं विचार करुन मागितल्यामुळे मी तुझ्या हृदयांत साठवला जाईल. असे तूं केलेस. हे पांडुरंगाने दिलेले दान माऊलीनी घेऊन त्याचे ध्यान हृदयांत धरुन भगवंताची कथा कीर्तन करीत समाधीला बसले आहेत. याप्रमाणे लहान बालके जसा छंद घेऊन मागणे मागतात. त्या प्रमाणे बावीसाव्या वर्षापर्यंत या मागण्याचा छंद घेऊन मी संसाराची कमें तोडून टाकली व चंद्र सूर्य नक्षत्रे असे पर्यंत श्रीहरिचे नामस्मरण करीत समाधीमध्ये राहिन.अशा तहेचे दान मी विठ्ठलांकडून मागून घेतले. व विठ्ठलांनीही उदार होऊन ते दान मला दिले असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *