ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.333

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.
 प्रकरण :-१० वे, देवापाशी मागणे अभंग ३३३

नामरुपीं प्रीती की ध्यानीं सगुण मूर्ति । हेचि तुझी यश किर्ति जाणोनियां । हृदयीं तुझे रुप मुखीं नामघोष । नैवेद्य प्रसाद जठरीं आम्हां ॥ निर्माल्य मस्तकीं वंदू तुमचे चरण । हाचि अच्चुता तुमचा महिमा रया ॥ अखंड नाम वाचे हेंचि तप साचें । तेंचि स्वरुप दिसे हृदयीं तुझें ॥ तुझे नाम निर्धारितां हेचि गा तप आता । काया वाचा मने न विसंबे तत्त्वतां । म्हणोनि आसनीं पंथी शयनीं जड पडो । भलतैसें परी नाम न संडी अनंता । जिवाचिया जीवना सगुणगुण निधाना । हेंचि प्रेम देई निजभक्तां रया ॥ बापरखमादेविवरा विठ्ठला । आनंद सुखाचिया वोवरा । पाहे तंव भरला दशदिशां । दुसरा न दिसे सोयरा । तेवीं गुण नामकीर्ति तेचि । आम्हा मूर्ति हृदयीं न विसंबे दातारा । येणे निवृत्तीराये खुणा दाऊनी सकळ । आतां जोडलासी माहेरा रया ॥

अर्थ:-

हे श्रीकृष्णा तुझ्या नामरुपाच्या ठिकाणी प्रेम, ध्यानात तुझी सगुण मूर्ति, व स्मरणांत तुझे यश, गुण किर्ती असे करण्यातच मला तुझी निश्चित प्राप्ति होईल. असे जाणुन हदयांत तुझे रुप, मुखांत तुझे नाम पोटात तुझ्या नैवद्याचा प्रसाद मस्तकांवर तुझ्या चरणकमलावर वाहिलेल्या पुष्पांचे निर्माल्य आणि तुझ्या चरणाचे ठिकाणी वंदन करणे हे सगळे योग आम्हां भक्तांना प्राप्त व्हावेत. हे अच्चुता एवढा तुमचा महिमा आहे. माझ्या वाणीने अखंड नामस्मरण होणे हेच माझे तप, आणि त्या तपाच्या योगाने माझ्या हृदयांत तुझे स्वरुप दर्शन होईल. हे भगवंता भावभक्तिपूर्वक निश्चयाने तुमचे नाम घेणे हेच आमचे तप ते करण्याला आम्ही काया, वाचा, मनाने केव्हाही विसंबणार नाही. म्हणून आसनांवर, अंथरुणावर, रस्त्यांत अगर संकटांत कोठेही असो. पण हे श्री अनंता मी तुझे नाम कधीही सोडणार नाही. हे जीवाच्या जीवा, हे सगळ्या गुणांचा ठेवा असलेल्या सगुणा, हे श्रीकृष्णा आपल्या भक्तांना हे नामाविषयीचे प्रेम अखंड देत जा. रखुमादेवीचे पती व माझे पिता श्रीविठ्ठला, आनंदाच्या वोवरीत पाहू जावे तो. सर्व दिशेला भक्तांचे कल्याण करणारा तुझ्याशिवाय दुसरा कोणीही दिसत नाही. तुझे गुण, नाम, किर्ती हीच तुझी मूर्ति असून तिला आम्ही आमच्या हृदयातून केव्हाही विसबंणार नाही. अशा तऱ्हेची आमच्या निवृत्तीरायांनी तुझ्या प्राप्तीची खूण दाखविल्यामुळे हे बापाश्री विठ्ठला तू आम्हांस लाभला आहेस असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *