संत नामदेव महाराज चरित्र प्रकरण १, भाग ४, ५, ६, ७

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत नामदेव महाराज समाधी अभंग पहा

संत शिरोमणी नामदेव महाराज
(जन्म : २६ ऑक्टोबर १२७०;
संजीवन समाधी : ३ जुलै १३५०)

हे महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते. त्यांचे आडनाव रेळेकर असे होते. ते मराठी भाषांमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी व्रज भाषांमध्येही काव्ये रचली. शिखांच्या गुरू ग्रंथसाहिबातले चरित्रकार, आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते.
त्यामुळे पंजाबी मंडळी तसेच संबंधित मंडळी आज त्यांच्या जन्मस्थानाचा, नरसी नामदेव या गावाचा विकास करण्यासाठी धडपडत आहेत. नरसी नामदेव हे गांव महाराष्ट्रातील मराठवाड्यामधील हिंगोली जिल्ह्यातील असून तेथील संत नामदेव महाराज यांच्या मंदिराचा जीर्णोद्धार २०१९ ला झाला.

संत नामदेव माहिती
मूळ नाव:; नामदेव दामा शेट्टी
समाधिमंदिर : पंढरपूर
संप्रदाय: नाथ संप्रदाय, वारकरी, वैष्णव संप्रदाय
गुरू: विसोबा खेचर
शिष्य: चोखामेळा
भाषा: मराठी
साहित्यरचना: शबदकीर्तन, अभंगगाथा, अभंग भक्ति
कविता
व्यवसाय: शिंपी, समाजजागृती
वडील: दामा शेट्टी
आई: गोणाई
भक्तशिरोमणी संत नामदेव हे संत ज्ञानेश्वरांच्या कालखंडात होऊन गेले .

वारकरी संप्रदायाचे प्रचारक नामदेव महाराज नामवेदाचे व नामविद्येचे आद्य प्रणेते असलेले महाराष्ट्रातील हे एक थोर संत होत.
आपल्या कीर्तनकलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारी अशी त्यांची कीर्ती होती.
संत नामदेव प्रत्यक्ष श्रीविठ्ठलाच्या निकटवर्ती असलेला सखा होता, असे मानले जाते.
संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक असून भारतभर त्यांनी त्या बाबतीत भावनिक एकात्मता साधली.
भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी स्वकर्तृत्वाने केले.

दामाशेट्टी हे संत नामदेवांचे वडील व गोणाई त्यांची माता होती. दामाशेटींचा व्यवसाय कपडे शिवणे हा होता. म्हणजे ते शिंपी होते. यांच्या अगोदरच्या सातव्या पिढीतील पुरुष यदुशेट हे सात्त्विक प्रवृत्तीचे भगवद्भक्त होते.

सध्याच्या हिंगोली जिल्ह्यातील नरसी-बामणी (नरसी नामदेव) हे संत नामदेवांचे जन्म गाव होय. नामदेवांचा जन्म प्रभव नाम संवत्सरात, शके ११९२ (इ.स.१२७०) मध्ये कार्तिक शुद्ध एकादशीस, रोहिणी नक्षत्रास, रविवारी झाला. संत नामदेवांना ८० वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांचे बालपण हे पंढरपुरात गेले. त्यांनी लहानपणापासूनच श्रीविठ्ठलाची अनन्यसाधारण भक्ती केली.

संत गोरा कुंभार यांच्याकडे, तेरढोकी येथे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव, मुक्ताबाई, संत नामदेव, चोखामेळा, विसोबा खेचर आदी संतांचा मेळा जमला होता. याच प्रसंगी संत ज्ञानेश्वरांच्या विनंतीवरून गोरोबाकाकांनी उपस्थितांच्या आध्यात्मिक तयारीविषयी आपले मतप्रदर्शन केले होते. या प्रसंगानंतरच संत नामदेवांना विसोबा खेचर हे आध्यात्मिक गुरू म्हणून लाभले.

पत्‍नी राजाई, मोठी बहीण आऊबाई; नारा, विठा, गोंदा, महादा हे त्यांचे चार पुत्र व एक मुलगी लिंबाई असा संत नामदेवांचा परिवार होता. त्यांच्या कुटुंबात एकूण पंधरा माणसे होती. स्वतःला ‘नामयाची दासी’ असे म्हणणार्‍या संत जनाबाई या त्यांच्या परिवारातील एक सदस्य होत्या.

संत नामदेवाची अभंगगाथा (सुमारे २५०० अभंग) प्रसिद्ध आहे. त्यांनी शौरसेनी भाषेत काही अभंग रचना (सुमारे १२५ पदे) केली. त्यातील सुमारे बासष्ट अभंग (नामदेवजीकी मुखबानी) शीख पंथाच्या गुरुग्रंथ साहेबमध्ये गुरुमुखी लिपीत घेतलेले आहेत. संत नामदेवांनी आदि, समाधी व तीर्थावळी किंवा तीर्थावली या गाथंतील तीन अध्यायांतून संत ज्ञानेश्वरांचे चरित्र सांगितले आहे.

कीर्तनांत अनेक चांगल्या ग्रंथांचा उल्लेख असे. यावरून ते बहुश्रुत व अभ्यासू असल्याचे लक्षात येते. ‘नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग’- अशी त्यांची योग्यता होती. ’नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’ हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते.
भागवत धर्माचे एक आद्य प्रचारक म्हणून संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीनंतर सुमारे ५० वर्षे भागवतधर्माचा प्रचार केला.
प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची भावनिक एकात्मता जपण्याचे अवघड काम त्यांनी केले.

पंजाबमधील शीख बांधवांना ते आपले वाटतात. शीख बांधव ‘नामदेव बाबा’ म्हणून त्यांचे गुणगान गातात. पंजाबातील ‘शबदकीर्तन’ व महाराष्ट्रातील ‘वारकरी कीर्तन’ यांत विलक्षण साम्य आहे. घुमान (पंजाब) येथे शीख बांधवांनी त्यांचे मंदिर उभारले आहे. बहोरदास, लढ्विष्णुस्वामी, केशव कलाधारी हे त्यांचे पंजाबी शिष्य होत. राजस्थानातील शीख बांधवांनीही नामदेवाची मंदिरे उभारलेली आहेत. `संत शिरोमणी’ असे यथार्थ संबोधन त्यांच्याबद्दल वापरले जाते.
भगवद्भक्तांच्या व साधु-संतांच्या चरण धुळीचा स्पर्श व्हावा म्हणून पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी ‘पायरीचा दगड’ होण्यात त्यांनी धन्यता मानली. संत नामदेव हे आषाढ वद्य त्रयोदशी, शके १२७२ मध्ये (शनिवारी, दि. ३ जुलै, १३५० रोजी) पंढरपूर येथे पांडुरंगचरणी विलीन झाले. नक्की दिनांकाविषयी एकवाक्यता दिसून येत नाही.5 कालनिर्णय या दिनदर्शिकेत पुण्यतिथी दिनांक २४ जुलै असा दिलेला आढळतो. संत नामदेव हे कीर्तने करत करत भारतभर फिरले.

नामदेव श्रद्धा
नामदेव महाराज खूप लहान असताना, त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितले `आज देवाला प्रसाद तू दाखव. त्या दिवशी नामदेवांनी नुसता नेवैद्य दाखविला नाही तर देवापुढे वाट बघत बसले की केव्हा हा खाईल. त्या अत्यंत निरागस अपेक्षेला मान देऊन प्रत्यक्ष विठ्ठल त्यांच्यासमोर प्रकट झाले व नामदेवांनी दिलेला प्रसाद त्यांनी ग्रहण केला.

कुत्र्याने चपाती पळवली त्याला ती कोरडी खाऊ लागू नये म्हणून संत नामदेव महाराज, तुपाची वाटी घेऊन त्याच्यामागे लागले.

एकदा महाशिवरात्रीच्या निमित्ताने संत नामदेव औंढा येथे नागनाथाच्या दर्शनासाठी गेले असता मंदिरात भजन/कीर्तन न करण्यास पुजाऱ्यांनी त्यांना विनवले. त्यांच्या विनंतीस मान ठेवून, नामदेव मंदिराच्या मागील बाजूस बसून दर्शनासाठी नागनाथाची आळवणी करू लागले. नामदेवाची भक्ती बघून त्यांना दर्शन देण्यासाठी देवाने पूर्वाभिमुख असलेले मंदिर फिरवून पश्चिमाभिमुख केले, ते आजतागायत तसेच आहे.

संत नामदेव महाराज समाधी अभंग पहा

नामदेवांची स्मारके

महाराष्ट्रातील शिंप्यांच्या एका पोटजातीला नामदेव शिंपी म्हणतात.
पुण्यात महर्षीनगर येथील एका शाळेला संत नामदेव शाळा असे नाव दिले आहे.
पुणे विद्यापीठात एक संत नामदेव अध्यासन आहे, आणि संत नामदेव सभागृह आहे.
पंजाबमधील घुमान येथे बाबा नामदेव नावाचे एक पदवी महाविद्यालय आहे. (स्थापना १७-७-२०१६). घुमान गावी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते.
हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव या गावी संत नामदेवांचे एक मोठे स्मारक आहे.
(यथावत् अग्र प्रेषित )
स्नेह प्रार्थी,
राष्ट्रीय कीर्तनकार, भागवताचार्य,
हभप योगेश्वर उपासनी महाराज,

*॥श्री_नामदेव_महाराज_चरिञ॥🌼*

*☘️प्रकरण-१.जन्म,बालपण,विवाह☘️* *🍃भाग-४ नामदेवांचे वैराग्य🍃*

     चंद्रभागेच्या वाळवंटात त्यांना अनाथ जनाबाई भेटल्या तिचे त्यांनी मुलीप्रमाणे पालनपोषण, वस्त्रदान केले. पुढे त्या अभंगरचना करू लागल्या. त्यांना प्रत्यक्ष विकुल परमात्मा दळण कांडण करू लागत. एवढी त्यांची भक्ती फळाला आली होती. संत नामदेवासारख्या साधूंचा परिसस्पर्श त्यांना झाला होता. त्या निरक्षर असूनही अतिशय विद्वत्ताप्रचुर त्यांची अभंग रचना आहे. हा एक अलौकीक चमत्कारच आहे.

     त्या अनाथपणाचे दुःख विठ्ठलभक्तीने विसरल्या. त्यांनी बनवलेल्या गोवऱ्यामधून विठ्ठल विठ्ठल असा नामघोष ऐकू येत असे. त्यांचे जात्यावरचे अभंग प्रसिद्ध आहेत. खरेतर विठ्ठलरुक्मिणी हेच त्यांचे आई वडील बनले. नामदेव महाराजांना त्यांनी गुरू मानले. त्यांनी एका अभंगात उल्लेख केला, “बाई मी लिहीणे शिकले ही सदगुरुरायापाशी”. संताच्या सज्जनांच्या सेवेपरती मोठी गोष्ट कोणतीच नाही.

*’तुका म्हणे संतसेवा । हेचि देवा उत्तम’ ।।*

       पुत्रपुत्री कालमानाप्रमाणे वाटू लागले. घरात खाणारी तोंडे वाढली. त्यात नामदेव महाराज सतत ईश्वरचिंतनात मग्न राहू सच लागले. गोणाईची इच्छा होती की नामदेव महाराजांनी आपला परंपरागत कपडे शिवण्याचा व्यवसाय करावा. राजाईलाही तेच वाटे. परंतु नामदेव महाराजांना ईश्वररचिंतनाशिवाय कशाचीच शुद्ध नव्हती. द्रव्या शिवाय प्रपंच कसा चालेल ? गोणाईची नाराजी पाहून नामदेव महाराज आपल्या मातेस म्हणाले, “नामा म्हणे माते ऐक वो वचना | मी गेलो दर्शना नागनाथा || आवंढ्या देऊळी देव जाहला संसार | पारूषला धीर या देहाचा ।। तैहुनि तुज मज तुटला संबंध । विठ्ठलाचा छंदु घेतला जीवी । लौकीक व्यवहार नाठवची व्या काही । कल्पना ते देही असेचिना || टाळ दिंडी घेऊनी नाचतो रंगणी पणे । तेणे माझ्या मनी सुख वाटे ।। या देहघरसंसाराचा आलासे कंटाळा म्हणौनि गोपाळा शरण आलो ।।”

      मुलगा आपले ऐकत नाही हे पाहून गोणाईने विठ्ठलालाच सांकडे घातले. ‘माझा नामा जर नांवरूपा आला । तव म्हणो लागला घरदार ।। तंव कैसे विघ्न उठीले गे माये । नामा पंढरीराये भुलविला ॥सांग बा विठ्ठला म्या काय केले । नामया का भुलविले कवन्या गुणे ॥ (अभंग १२६३-१-३) ह्यानंतर गोणाई हिनपणाने विठ्ठलाला विनवतात ‘तु अनाथा गोसावी दीनाचा कैवारी । ते ब्रीद श्रीहरि काय झाले || बिघडले पाडस करी एके ठायी । विनविते गोणाई केशिराजा ।।’ संताची मनस्थिती संतच जाणतात. खरेतर या संताचा संसार आप्तजनांनीच चालवावा. त्यांनाही अनायासे पुण्य लाभेल. परंतु साधु सज्जनांची समाजात मातीमोल कीमत होते प्रापंचिकाना काय समजणार? संत हे निर्लेप असतात. त्यांना या लौकीकातील पदार्थांशी काही घेणेदेणे नसते.#क्रमश…..
|#मूळ_पद्यलेखक
श्री संत वासुदेवजी महाराज (ज्ञानेश्वरदास)
#संक्षिप्त_गद्यानुवाद
सौ. इंद्रायणी ज्ञानेशप्रसाद पाटील

संत_शिरोमणी

॥#श्रीनामदेवमहाराज_चरिञ॥

प्रकरण-१.जन्म,बालपण,विवाह, #भाग-५ नामदेवांचे ऐश्वर्य

नामदेव महाराजांचे ऐश्वर्य केवढे होते, हे पुढील प्रसंगावरून दिसून येते तरी ते किती निरीच्छ होते, याची वाचकांना कल्पना येईल. नामदेव महाराजांच्या संसारात आर्थिक चणचण भासू लागली. त्यांचा एक शेजारी होता. ते भागवत कथा करत. त्यांनी देवीला प्रसन्न करून घेतले. वरदानरूपाने त्यांना देवीने परिस दिला. म्हणून त्यांना लोक परिसा भागवत म्हणू लागले. परिसामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होती. ह्या परिसा भागवताच्या पत्नीचे नामदेव महाराजांची पत्नी राजाईशी घरोब्याचे संबंध होते. ती फार कोमल हृदयाची, शालीन, पतिव्रता स्त्री होती. तिला राजाईची दया आली. तिने एक दिवस आपल्याजवळील परिस राजाईला परतीच्या बोलीवर दिला. राजाईने घरात लोखंड पाहिले परंतु तेही लवकर सापडेना. भिंतीला एक लोखंडाचा खिळा दिसला. त्यालाच तो परिस लावताबरोबर त्याचे सोने झाले. राजाईने ते सोने गावातील सोनाराकडे विकून काही वाण सामान, मुलाबाळांन कपडे आणले. मुले आनंदली सुग्रास पक्कानांचा स्वयंपाक केला. मुले जेवून तृप्त झाली. थोड्यावेळाने नामदेव महाराज देवळातून घरी जेवायला आले. त्यांना राजाईने पंचपक्वानांचे ताट वाढले. नामदेव महाराजांना आश्चर्य वाटले. हा काय प्रकार आहे असे विचारले असता राजाईने सर्व प्रकार श्रुत केला. नामदेव महाराजांना खुप दुःख वाटले ? त्यांनी तसाच अन्नदेवतेला नमस्कार केला तो परिस राजाईकडून घेतला व चंद्रभागेत नेऊन टाकला. ईश्वरचिंतनात मन झाले. इकडे परिसा भागवत घरी आले. त्यांनी नित्यनेमाप्रमाणे परिस दाखवा म्हणून पत्नीस सांगीतले असता तिने परिस तर नामदेव पत्नी राजाईस दिला असे सांगीतले. परिसा भागवत पत्नीस घेवून नामदेव महाराजांच्या घरी आले आणि परिस मागु लागले. राजाईने त्यांना परिस चंद्रभागेत फेकला असे सांगीतले. परिसा भागवतांना हे खरे वाटेना, ते भांडू लागले. सर्व गावातील लोक जमा झाले. परिसा भागवतांनी नामदेव महाराजांना विनंती केली की माझा परिस परत द्या,

परिसा भागवतांची कळकळीची विनती ऐकून गांवातील सर्व लोकांदेखत चंद्रभागेतील वाळूचे खडे घेवून नामदेव परिसा भागवताजवळ आले. ह्यातील कोणताही एक खडा तुमचा परिस . म्हणून ठेवा असे सांगीतले. परिसा भागवताला खरे वाटेना. सर्व लोकांदेखत लोखंडाला त्यातील एक खडा लावला असता लोखंडाचे सोने झाले. सर्व गांव विस्मयचकित झाले. परिसा भागवत खजिल झाले. त्यांनी नामदेव महाराजांच्या चरणी आपले मस्तक ठेवले. नामदेव महाराजांचे सामर्थ्य त्यांना कळले. ते पुढे नामदेव महाराजांचे भक्त बनले. नामदेव महाराजांच्या समाधी प्रसंगापर्यंत ते सोबतच होते.

क्रमश….

मूळ_पद्यलेखक

श्री संत वासुदेवजी महाराज (ज्ञानेश्वरदास)

संक्षिप्त_गद्यानुवाद

सौ. इंद्रायणी ज्ञानेशप्रसाद पाटील

*🌼॥#श्री_नामदेव_महाराज_चरिञ॥🌼*

*☘️प्रकरण-१.जन्म,बालपण,विवाह,☘️* *🌿भाग-६ नामदेवांची विरक्ति🌿*

      एवढे अंगी सामर्थ्य असूनही त्यांनी कधी लोभ केला नाही. हे पाहून विठुराय त्यांच्यावर आणखीच प्रसन्न झाले. त्यांचा प्रपंच प्रत्यक्ष पांडुरंगानीच सांभाळला. पुढे मुलांचे विवाह झाले. कन्येचाही विवाह करून दिला. सर्व सांसारिक जबाबदारी नामेदव महाराजांनी व्यवस्थित पार पाडली. पुढे आईसहित पत्नीसुद्धा विठुरायाची भक्ती करू लागली. पुत्रपुत्रीही मागे नव्हते. सगळा आनंदी आनंद झाला.

       एकदा वडीलांनी त्यांना कापड विकण्यासाठी बाजारात पाठविले. नामदेव महाराज रस्त्यात एका दगडावर बसून नामस्मरण करू लागले. संध्याकाळ झाली. मग त्यांना आपण कशासाठी निघालो हे आठवले. त्यांनी त्या दगडावर कपड्याचे गाठोडे ठेवले व दुसरा दगड तिथे आणून ठेवला. मनाशीच समजूत करून घेतली की एका दगडाला कपडे विकले. दुसरा दगड जामीन . म्हणून सोबत घेतला. त्याला कपाटात ठेवून दिले. घरी वडील आले. राजाईने सासऱ्यांना सांगीतले, नामदेव महाराज घरी दगड घेवून आले. व्यवहार कसा झाला द्रव्य कोठे आहे विचारले असता विठ्ठलाला प्रार्थना केली माझी लाज आता राखा. कपाटा उघडून पाहीले असता धोड्यांचे सोने झाले. सगळीकडे ही वार्ता पसरली ज्याच्या शेतातील धोंडा होता तो मागायला आला. तो हट्टाने दगड घेवून गेला तर त्याचा पुन्हा दगड झाला.

संत नामदेव महाराज समाधी अभंग पहा

       राजाई चंद्रभागेत बुडाल्यानंतर प्रत्यक्ष पांडूरंगाने त्याना वाचवले. दारिद्याला कंटाळून तीने सर्प शिजवला. झाकण उघडले असता त्या भांड्यात सोने दिसले. जावई भेटीला घरी आले. जावयांना पाहुणचार, कपडेलत्ते करावे तर घरात काहीच नाही तेव्हा प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा सामानाची गोणी नामदेव महाराजांच्या घरी घेवून गेले. हे सामान केशवशेठाने पाठवले असे सांगीतले. गोणी उपडून पाहीले असता त्यात सुवर्ण दिसले. नामदेव महाराजांना हे कळले तेव्हा त्यांनी ते सर्व सोने ब्राम्हणांना वाटून दिले. राजाईन मडकेभर काढून ठेवले होते. त्यांची राख झाली. राजाईने हा वृत्तांत नामदेव महाराजांना सांगीतला. तेव्हा त्यांनी त्या मडक्यात पाहीले असता राखेचे पुन्हा सुवर्ण झाले. तेही ब्राह्मणांना वाटून दिले. हे पाहूना राजाई चरणासी लागली. नामदेव महाराजांना राजाई म्हणाली, “मला क्षमा करा. मी अज्ञानी आहे. तुमचा महिमा मला कळला नाही मला याचे रहस्य सांगा. तुमच्या हृदयात जे ईश्वरभक्तीचे बीज आहे त्यामुळे तुमचे चित्त नेहमी सुखी, समाधानी, आनंदी असते. इच्छा तृष्णा सर्व नष्ट झाल्या. मी तुमची वारंवासार निर्भत्सना केली. मला त्या विठुरायाच्या चरणी नेऊन घाला. तुमची हे गती आपल्या अज्ञान मुलांना कळणार नाही. त्यांना खायला अन्न नाही. घालायला वस्ञ नाही. मुले बापडी काय करणार”.

       विठुरायापुढे राजाई त्यांचे चरण धरून रडू लागली विठ्ठलाला दया आली. त्यांनी नामदेवास आज्ञा केली की हिचा मुलांचा काळजीपूर्वक सांभाळ करावा. हे ऐकून नामदेव महाराज देवावर नाराज झाले. देवा तुम्ही मला पुन्हा या प्रपंचात लोटू इच्छिता मी पंढरी सोडून जाईन तेव्हा देवाने नामदेव महाराजांची परोपरी समजुत काढून त्यांना परत आणले.#क्रमश…..
|#मूळ_पद्यलेखक
श्री संत वासुदेवजी महाराज (ज्ञानेश्वरदास)
#संक्षिप्त_गद्यानुवाद
सौ. इंद्रायणी ज्ञानेशप्रसाद पाटील

संत नामदेव महाराज समाधी अभंग पहा

*🌼॥#श्री_नामदेव_महाराज_चरिञ॥🌼*

*☘️प्रकरण-१.जन्म,बालपण,विवाह☘️* *🍃भाग-७ नामदेवांना आत्मबोध🍃*

      नामदेव महाराजांचा निरागस, बालसुलभ स्वभाव व पुर्वजांची पुण्याई मुळेच गुरूविना कुठलेही साधन सिद्ध केलेले नसतांना प्रत्यक्ष विटेवरच्या पांडुरंगाने सगुण साकार रूपात दर्शन दिले. लहानश्या नामदेवाचा हट्ट पाहून देवाला मोठे नवल वाटले. त्यांनी बाळ नामदेवाहातुन दुध व नैवेद्य ग्रहण केले. त्यामुळे त्यांचा असा समज झाला की आपणच देवाचे लाडके भक्त आहोत. हा समज मुक्ताई भेटीनंतर नष्ट झाला.

        नामदेव महाराजांच्या जीवनातील कलाटणी देणारी गोष्ठ म्हणजे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर माऊली, सोपानदेव, मुक्ताई इत्यादि संतांची भेट. पैठणला ब्रह्मवृंदासमोर रेडा ज्ञानेश्वर माऊलींनी बोलविला. ‘प्रत्यक्ष पैठणी भटी केला वाद । रेड्यामुखी वेद बोलवीला ।। त्यानंतर नेवासे येथे शिवालयात ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभवाची निर्मिती केली. ज्ञानेश्वर माऊली आदी भावंडांचे अलौकीक ज्ञान पाहून चांगदेवांनी कोरे पत्र पाठवले. तेंव्हा त्यावरच बोधपर पासष्ट ओव्या माऊलीनी लिहून पाठवल्या. तेच चांगदेव पासष्टी होय चांगदेवांना अर्थ कळेना म्हणून चांगदेव माऊलीस शरण आले. ज्ञानेश्वर माऊलींच्या आज्ञेवरून मुक्ताईने त्यांना आत्मबोध केला..#क्रमश…..
|#मूळ_पद्यलेखक
श्री संत वासुदेवजी महाराज (ज्ञानेश्वरदास)
#संक्षिप्त_गद्यानुवाद
सौ. इंद्रायणी ज्ञानेशप्रसाद पाटील

*🌼॥#श्री_नामदेव_महाराज_चरिञ॥🌼*

संत नामदेव महाराज समाधी अभंग पहा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *