451-9
तो प्रल्हादु गा मजसाठीं । घेतां बहुतें सदा किरीटी । कां जें मियां द्यावें ते गोष्टी । तयाचिया जोडे ॥451॥
हे किरीटी, ज्या प्रल्हादाला माझ्याकरितां पुष्कळांनी नेहमी छळले, तो, एका भक्तीने, मजपासून प्राप्त होणाऱ्या गोष्टी दुसऱ्यास प्राप्त करून देण्यास समर्थ झाला.
452-9
एऱ्हवीं दैत्यकुळ साचोकारें । परि इंद्रिही सरी न लाहे उपरें । म्हणोनि भक्ति गा एथ सरे । जाति अप्रमाण ॥452॥
बाकी वास्तविक पाहतां त्याने दैत्यकुळांत जन्म घेतलेला, पण त्याच्यापेक्षा अधिक मोठेपणा इंद्रालाही प्राप्त झालेला नाही; म्हणून माझी प्राप्ति करून घेण्याला एक भक्ति पूरे आहे; जात वैगेरेची काही एक चाड नाही
453-9
राजाज्ञेचीं अक्षरें आहाती । तियें चामा एका जया पडती । तया चामासाठीं जोडती । सकळ वस्तु ॥453॥
राजाज्ञेचीं अक्षरे एका कातड्याचे तुकड्यावर जरी पडली; तरी त्या कातड्यापासून सर्व वस्तु प्राप्त होतात.
454-9
वांचूनि सोनें रुपें प्रमाण नोहे । एथ राजाज्ञाचि समर्थ आहे । तेंचि चाम एक जैं लाहे । तेणें विकती आघवीं ॥454॥
त्या अक्षरांवाचून सोन्यारूप्याला किंमत नाही, तर येथे राजाज्ञा हीच मुख्य होय, व त्याच राजशिक्क्याच्याकातड्याने सर्व वस्तु विकत मिळतात.
455-9
तैसें उत्तमत्व तैंचि तरे । तैंचि सर्वज्ञता सरे । जैं मनोबुद्धि भरे । माझेनि प्रेमें ॥455॥
त्याचप्रमाणे, जेंव्हा मन व बुद्धि ही माझ्याच प्रेमाने युक्त होतात, तेव्हांच मोठेपणा व सर्वज्ञपणा यांचा डौल शोभतो.
456-9
म्हणोनि कुळ जाति वर्ण । हें आघवेंचि गा अकारण । एथ अर्जुना माझेपण । सार्थक एक ॥456॥
म्हणून कुळ, जात, वर्ण हे निष्कारण आहेत. तर अर्जुना, फक्त माझी भक्ति केली असता सार्थक होते.
457-9
तेंचि भलतेणें भावें । मन मजाआंतु येतें होआवें । आलें तरी आघवें । मागील वावो ॥457॥
ती माझी भक्ति वाटेल त्यानें मनोभावाने केली असता, तो पुर्वी कोणत्याही वर्णातला असला तरी चिंता नाहीं.
458-9
जैसे तवंचि वहाळ वोहळ । जंव न पवती गंगाजळ । मग होऊनि ठाकती केवळ । गंगारुप ॥458॥
ओढे जोपर्यंत गंगेस मिळाले नाहीत तोपर्यंतच त्यांस ओहोळ, वहाळ वैगेरे म्हणतात, पण ते गंगेस मिळाल्यावर जसे गंगारूपच होतात,
459-9
कां खैर चंदन काष्ठें । हे विवंचना तंवचि घटे । जंव न घापती एकवटें । अग्नीमाजीं ॥459॥
किंवा लांकडे जोपर्यंत अग्नीत घातली नाहीत तोपर्यंतच त्यांस खैर, चंदन अशी नावे असतात.
460-9
तैसे क्षत्री वैश्य स्त्रिया । कां शूद्र अंत्यादि इया । जाती तंवचि वेगळालिया । जंव न पवती मातें ॥460॥
त्याचप्रमाणे, जोपर्यंत मद्रूपता प्राप्त झाली नाही, तोपर्यंतच क्षत्रिय, वैश्य, स्त्री, शुद्र, अंत्यज इत्यादि जाति वेगळाल्या असतात.
461-9
मग जाती व्यक्ती पडे बिंदुलें । जेव्हां भाव होती मज मीनले । जैसे लवणकण घातले । सागरामाजीं ॥461॥
मनोभावानें मला शरण आल्यावर जाति, व्यक्ति वगैरे भेद नाहीसा होतो. ज्याप्रमाणे समुद्रांत मीठ घातल्यावरएकरूप होऊन जाते,
462-9
तंववरी नदानदींचीं नांवें । तंवचि पूर्वपश्चिमेचे यावे । जंव न येती आघवे । समुद्रामाजीं ॥462॥
जोपर्यंत समुद्राला येऊन मिळाले नाहीत, तोपर्यंत नद, नदी, पूर्ववाहिनी, पश्चिमपाहिनी वगैरे भेद असतो;
463-9
हेंचि कवणें एकें मिसें । चित्त माझां ठायीं प्रवेशे । येतुलें हो मग आपैसें । मी होणे असे ॥463॥
त्याचप्रमाणे, कोणत्याही निमीत्ताने माझ्याकडे चित्त लागले म्हणजे पुरे; मग सहजच मद्रूपत्व प्राप्त होते
464-9.
अगा वरी फोडावयाचि लागीं । लोहो मिळो कां परिसाचां आंगीं । कां जे मिळतिये प्रसंगीं । सोनेंचि होईल ॥464॥
अरे, परिसाला फोडण्याकरितां जरी लोखंडानें स्पर्श केला, तरी त्याचें लागलीच सोनें होते.
465-9
पाहें पां वालभाचेनि व्याजें । तिया व्रजांगनांचीं निजें । मज मीनलिया काय माझें । स्वरुप नव्हतीचि ॥465॥
हे पहा, गोपींनीं प्रीतीच्या मिषाने माझे ठिकाणीं आपले चित्त ठेवले तरी त्या मद्रूप झाल्या नाहींत का?
466-9
नातरी भयाचेनि मिसें । मातें न पविजेचि काय कंसें । कीं अखंड वैरवशें । चैद्यादिकीं ॥466॥
किंवा भीतीच्या योगाने कंस मद्रूप झाला नाही का? किंवा माझ्याशी अखंड वैर केल्याने शिशुपालादिक मद्रूप झाले नाहींत का?
467-9
अगा सोयरेपणेंचि पांडवा । माझें सायुज्य यादवां । कीं ममत्वें वासुदेवा- । दिकां सकळां ॥467॥
अरे, तसेच पांडव व यादव यांस सोयरिकीच्या नात्याने व वासुदेवादिक यांना ममत्वाने माझे सायुज्य मिळाले नाही का?
468-9
नारदा ध्रुवा अक्रूरा । शुका हन सनत्कुमारा । यां भक्ती मी धनुर्धरा । प्राप्यु जैसा ॥468॥
हे धनुर्धरा, नारद, धृव, अक्रूर, शुक्र आणि सनतकुमार यांना जसा मी भक्तीने प्राप्त झालो आहे,.
469-9
तैसाचि गोपीसी कामें । तया कंसा भयसंभ्रमें । येरा घातकेयां मनोधर्में । शिशुपालादिकां ॥469॥
तसाच गोपींना विषयबुद्धीने, कंसाला भीतीने, व शिशुपालादिकांनावैरबुद्धीने मी प्राप्त झालो आहे,.
470-9
अगा मी एकुलाणीचें खागें । मज येवों ये भलतेनि मार्गे । भक्ती कां विषयें विरागें । अथवा वैरें ॥470॥
अरे, मीनिर्वाणीचे स्थान आहे, म्हणून मला वाटेल त्या मार्गाने – भक्तीने, विषयबुद्धीने, विरक्ततेने अथवा वैराने- कोणीही प्राप्त झाला असतां हरकत नाही.
471-9
म्हणोनि पार्था पाहीं । प्रवेशावया माझां ठायीं । उपायांची नाहीं । केणि एथ ॥471॥
म्हणून पार्था, हे पहा की, मला येऊन मिळण्याकरितां येथे उपायांची उणीव नाही.
472-9
आणि भलतिया जाती जन्मावें । मग भजिजे कां विरोधावें । परि भक्त कां वैरिया व्हावें । माझियाचि ॥472॥
आणि वाटेल त्या जातींत जन्महोवो आणि माझी भक्ति करो अथवा वैर करो; परंतु भक्त किंवा वैरी जे व्हावयाचे, ते माझेच व्हावे.
473-9
अगा कवणें एके बोलें । माझेपण जऱ्ही जाहालें । तरी मी होणें आलें । हाता निरुतें ॥473॥
अरे कोणत्याही निमीत्ताने जर मला कोणी शरण आला, तर मद्रूप होणे हे अगदीं त्याच्या हातचे आहे.
474-9
यापरि पापयोनीही अर्जुना । कां वैश्य शूद्र अंगना । मातें भजतां सदना । माझिया येती ॥474॥
यास्तव हे अर्जुना, पापयोनीत जन्म घेतलेले, किंवा वैश्य, शुद्र, स्त्रिया यांनी माझी भक्ति केली असतां ते माझ्याजवळ येतात.
किं पुनर्ब्राह्मणा:पुण्या भक्ता राजर्षयस्तथा ।
अनित्यमसुखं लोकमिमं प्राप्य भजस्व माम्॥9.33॥
475-9
मग वर्णांमाजीं छत्रचामर । स्वर्ग जयांचें अग्रहार । मंत्रविद्येसि माहेर । ब्राह्मण जे ॥475॥
मग, स्वर्गलोक म्हणजे ज्यांचे केवळ इनामगावच; आणि जे मंत्रविद्येचें माहेरघरच; जे सर्व वर्णामध्ये श्रेष्ठ ब्राह्मण
