सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ७ वा ओवी १५१ ते १७५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

151-7
परी तैसें ते न करिती प्राणिये । वायां आपुलां हितीं वाणिये । पै पोहताति पाणियें । तळहातिंचेनि ॥151 ॥
पण प्राणी तसें करीत नाहीत, आणि फुकट आपल्या हिताचे नुकसान करुन घेऊन (इतर देवतांच्या पूजनाने अल्प फलप्राप्ती करून घेऊन) तळहातावरच्या पाण्यांत पोहल्याप्रमाणे करतात !
152-7
नाना अमृताचां सागरीं बुडिजे । मग तोंडा कां वज्रमिठी पाडिजे । आणि मनीं तरी आठविजे । थिल्लरोदकातें ॥152 ॥
किंवा अमृताच्या समुद्रांत बुडाला असतां मग तोंड दाबून का धरावे? आणि मनामध्ये डबक्यांतील पाण्याची आठवण कां करावी?
153-7
हें ऐसें काइसेया करावें । जें अमृतींही रिगोनि मरावें । तें सुखें अमृत होऊनि कां नसावें । अमृतामाजीं ॥153 ॥
अमृतांत शिरून देखील मरावयाचे, हे असे तरी कां करावे? अमृतांत सुखाने अमृतरूप होऊन कां राहूं नये?
154-7
तैसा फळहेतूचा पांजरा । सांडूनियां धनुर्धरा । कां प्रतीतिपाखीं चिदंबरा । गोसाविया नोहावें ॥154 ॥
त्याचप्रमाणे धनुर्धरा, फलाशारूप पिंजरा टाकुन देऊन अनुभवरूप पंखांनी (संचार करुन) चिदाकाशाचे (भगवत्स्वरुपाने) धनी कां न व्हावे?
155-7
जेथ उंचावतेनि पवाडें । सुखाचा पैसारु जोडे । आपुलेनि सुरवाडें । उडों ये ऐसा ॥155 ॥
ते चिदाकाश,आपण कितीही उंच उडण्याचे मनांत आणले तरी सुखाने उडण्यास फैलावलेले आहे


156-7
तया उमपा माप कां सुवावें । मज अव्यक्ता व्यक्त कां मानावें । सिद्ध असतां कां निमावें । साधनवरी ॥156॥.
त्या मला, न मोजतां येणाऱ्याला, मापांत कां घालावे? मज निराकाराला साकार कां मानावे? मी सिद्ध असतां माझ्या प्राप्तीकरतां साधनाने कां शिणावे?
157-7
परी हा बोल आघवा । जरी विचारिजतसे पांडवा । तरी विशेषें या जीवा । न चोजवे गा ॥157॥
पण अर्जुना, खरे विचारशील की नाही, तर बहुतकरुन हे बोलणे कोणाला आवडत नाही.
नाहं प्रकाशः सर्वस्य योगमायासमावृत्तः ।
मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम् ॥ 7.25 ॥

158-7
कां जे योगमायापडळें । हे जाले आहाती आंधळे । म्हणोनि प्रकाशाचेनिही देहबळें । न देखती माते ॥158 ॥
कां की योगमायेच्या पडद्याने ते आंधळे झालेले असतात; म्हणून देहबुद्धीच्या बळाने, प्रकाशरूप जो मी त्या मला ते पहात नाहीत.
159-7
ये-हवीं मी नसें ऐसें । काही वस्तुजात असे । पाहें पां कवण जळ रसें- । रहित आहे ॥159 ॥
येऱ्हवी, मी जीत नाही अशी एक तरी वस्तु आहे कां? पहा की, कोणतेही पाणी रसविरहीत आहे कां?
160-7
पवन कवणातें न शिवेचि । आकाश कें न समायेचि । हें असो एक मीचि । विश्वीं असे ॥160 ॥
वारा कोणाला स्पर्श करीत नाही? आकाश कोठे सामावत नाही? हे असो; अवघ्या विश्वांत मीच एकटा भरलेला आहे.
वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन ।
भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन ॥7.26 ॥


161-7
येथें भूते जियें अतीतलीं । तियें मीचि होऊन ठेलीं । आणि वर्तत आहाति जेतुलीं । तींही मीचि ॥161 ।
ह्या जगात जितके प्राणी होऊन गेले, त्यांचे ठिकाणी मीच होतो, आणी हल्ली आहेत त्यांतही मीच आहे.
162-7
भविष्यमाणें जियें हीं । तींही मजवेगळीं नाहीं । हा बोलचि ये-हवीं कांहीं । होय ना जाय ॥162 ॥
कींवा पुढे होणार आहेत, तेही मनापासुन भिन्न नाहीत, परंतु हे फक्त बोलणे आहे. बाकी कांही होत नाही, आणी कांही जात नाही.
163-7
दोराचिया सापासी । डोंबा बडि ना गव्हाळा ऐसी । संख्या न करवे कोण्हासी । तेविं भूतांसि मिथ्यत्वें ॥163 ॥
ज्याप्रमाणे दोरीच्या सापाविषयी तो काळा, कवड्या,गव्हळा वैगेरे कांहीच कल्पना करतां येत नाही, त्याप्रमाणे, प्राणिमात्र मिथ्या असल्यामुळे तत्संबंधी कोणतीच कल्पना करतां येत नाही;
164-7
ऐसा मी पंडुसुता । अनस्यूत सदा असतां । यां संसार जो भूतां । तो आनें बोलें ॥164 ॥
हे पंडुसुता, अशा प्रकारे मी सदा अखंड आहे;प्राणिमात्राच्या मागे जो संसार लागला आहे, त्याचे कारण निराळे आहे.
165-7
आता थोडी ऐसी । गोठी सांगिजेल परियेसीं । जैं अहंकारतनूंसी । वालभ पडिलें ॥165 ॥
म्हणून त्याविषयी थोडीशी गोष्ट सांगतो, ती ऐक : अभिमान व तनु (शरीर) या दोहोंची प्रीती जडली.
इच्छाद्वेषसमुत्थेन द्वंद्वमोहेन भारत ।
सर्वभूतानि संमोहं सर्गे यान्ति परंतप ॥7.27॥


166-7
तै इच्छा हे कुमारी जाली । मग ते कामाचिया तारुण्या आली । तेथ द्वेषेंसी मांडिली । वराडिक ॥166 ॥
त्या दोघांच्या प्रीतीपासुन इच्छारूप कन्या उत्पन्न झाली, व ती आपल्या पूर्ण तारुण्यांत आल्यावर तिचे द्वेषाशी लग्न लागले.
167-7
तया दोघांस्तव जन्मला । ऐसा द्वंद्वमोह जाला । मग तो आजेयानें वाढविला । अहंकारें ॥167 ॥
त्या दोघांपासून (सुखदुःखरूप) द्वंदमोह हा पुत्र झाला. नंतर त्याच्या अहंकार आजोबानें त्याला वाढविले.
168-7
जो धृतीसि सदां प्रतिकूळु । नियमाही नागवे सळु । आशारसें दोंदिलु । जाला सांतां ॥168 ॥
तो द्वंदमोह नेहमी धैर्याला व इंद्रियदमनालाही सदा प्रतिकूळ आणी आशारूप दुग्धाने पुष्ट झालेला आहे.
169-7
असंतुष्टीचिया मदिरा । मत्त होवोनि धनुर्धरा । विषयांचां वोवरां । विकृतीसी असे ॥169 ॥
हे धनुर्धरा, असंतोषरूप मद्याने उत्पन्न झाल्यामुळे तो विषयांच्या उपभोगाला विटत नाही.
170-7
तेणें भावशुद्धीचिया वाटे । विखुरले विकल्पाचे कांटे । मग चिरिले अव्हांटे । अप्रवृत्तीचे ॥170 ॥
त्याने शुद्ध भक्तीच्या वाटेवर विकल्पाचे काटे पसरुन मग कुमार्गाच्या आडवाटा काढिल्या आहेत.


171-7
तेणें भूतें भांबावलीं । म्हणोनि संसाराचिया आडवामाजीं पडिलीं । मग महादु:खाचां घेतलीं । दांडेवरी ॥171 ॥
त्या योगाने प्राणिमात्र भ्रम पावून संसाररूप अरण्यांत पडतात, व त्यांना महादुःखाचे सपाटे सोसावे लागतात.
येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणाम् ।
ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः ॥ 7.28 ॥

172-7
ऐसे विकल्पाचे वांयाणे । कांटे देखोनि सणाणें । जे मतिभ्रमाचें पासवणें । घेतीचिना ॥172॥
याप्रमाणे विकल्पाचे तीक्ष्ण परंतु निष्फल काटे पाहुन, ज्यापासून मतिभ्रम उत्पन्न होतो त्यांना जे मानीत नाहीत;
173-7
उजू एकनिष्ठतेचां पाउलीं । रगडूनि विकल्पाचिया भालीं । महापातकांची सांडिली । अटवी जिहीं ॥173 ॥
भक्तीच्या एकनिष्ठेच्या पावलांनी जे नीट जातांना विकल्पाचे काटे चिरडून टाकतात, ते महापातकांचे अरण्य टाकुन सरळ मार्गाने जातात.
174-7
मग पुण्याचे धांवा घेतले । आणि माजी जवळीक पातले । किंबहुना ते चुकले । वाटवधेयां ॥174 ॥
नंतर, पुण्याच्या मार्गाने लौकर चालून माझे सान्नीध्य पावतात आणी अशा रीतीने वाटमाऱ्यांच्या (कामक्रोधादिकांच्या) हातून सुटतात!
जरामरणमोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये ।
ते ब्रह्म तद्विदु: कृत्स्नमध्यात्मं कर्म चाखिलम् ॥7.29 ।

175-7
ये-हवीं तरी पार्था । जन्ममरणाची निमे कथा । ऐसिया प्रयत्नातें आस्था । विये जयाची ॥175॥
येऱ्हवी, पार्था, जन्ममरणाच्या फेऱ्यांतून सुटावे असे जे साधन आहे, त्याच्या प्राप्तीची ज्यांना इच्छा उत्पन्न होते,

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *