176-11
म्हणौनि तो देवांचा रावो । म्हणे पार्थाते तुज दृष्टि देवों । जया विश्वरूपाचा ठावो । देखसी तूं ॥176॥
म्हणून तो देवांचाहि देव भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला, ज्या दृष्टिने माझ्या विश्वरूपाचा ठाव घेशील, अशी दृष्टि तुला देतो.
177-11
ऐसी श्रीमुखौनि अक्षरें । निघती ना जंव एकसरें । तंव अविद्येचे आंधारें । जावोंचि लागे ॥177॥
श्रीकृष्णाच्या मुखांतून अशी अक्षरें निघाल्याबरोबर एकदम अविद्यारूपी अंधकार नाहीसा झाला.
(सर्वांच्या अंतःकरणांत ज्या परमेश्वराचा अखंड वास आहे व ज्याच्या प्राप्तीचा प्रयत्न करावयाचा असतो, तोच परमात्मा अर्जुनाला बाहेर सद्गुरुरूपाने प्राप्त झाला, तर त्या सत्यसंकल्प परमेश्वराने दिव्यदृष्टि देतो असा संकल्प केल्याबरोबर अविद्या अंधकार नाहीसा व्हावा यात आश्चर्य नाही. तोच अंतर्यामी परमात्मा आत्मज्ञानाच्या रूपाने प्रगट होतो व भक्ताच्या अंतःकरणांतील अविद्या अंधकार नाहीसा करतो. अविद्या अंधःकार नाहीसा होऊन ज्ञानदृष्टीने पाहिले जाणारें विश्वरूपहि अर्थातच खोटें असणें शक्य नाही.)
178-11
तीं अक्षरें नव्हती देखा । ब्रह्मसाम्राज्यदीपिका । अर्जुनालागीं चित्कळिका । उजळलिया श्रीकृष्णें ॥178॥
श्रीज्ञानेश्वर माऊली म्हणतात, भगवंताचे मुखांतून “मी तुला दिव्यदृष्टि देतो” ही जी अक्षरें निघाली ती अक्षरें नव्हती, ती ब्रह्मस्वरूपाचे साम्राज्य दाखविणारी ज्योती होती. ती ज्ञानज्योती अर्जुनाकरितां भगवंतांनी उजळली होती.
(भगवंतानी अर्जुनाला जी दिव्य दृष्टि दिली, ती “चित्कळिका” म्हणजे चैतन्याची ज्योती होती आणि ती “ब्रह्मसाम्राज्यदीपिका” म्हणजे परब्रह्माचा संपूर्ण नामरूपात्मक आविष्कार सच्चिदानंदस्वरूप आहे असा प्रत्यय आणून देणारी होती, हें श्री ज्ञानेश्वरमाऊलींनीच येथें स्पष्ट केलें आहे.)
179-11
मग दिव्यचक्षुप्रकाशु प्रगटला । तया ज्ञानदृष्टी फांटा फुटला । ययापरी दाविता जाहला । ऐश्वर्य आपुलें ॥179॥
मग (भगवंतांनी म्हटल्याबरोबर) अज्ञानांधःकार नाहीसा होऊन चैतन्याचा प्रकाश झाल्यामुळे, त्याला सर्वत्र एक अस्फुट अद्वैत श्रीकृष्णवस्तुच आहे, अशी ज्ञानदृष्टि प्राप्त झाली. या प्रमाणे भगवंतांनी अर्जुनाला विश्वरूप ऐश्वर्य दाखविलें.
180-11
हे अवतार जे सकळ । ते जिये समुद्रींचे कां कल्लोळ । विश्व हें मृगजळ । जया रश्मीस्तव दिसे ॥180॥
संपूर्ण अवतार हे त्या समुद्राचे तरंग असून जग त्याच्या वृत्तिरूप किरणामुळे दिसणारे मृगजळ आहे.
(भगवंताचा सगुण साकार विग्रह व सगुण साकार जगत् या दोहोंमध्ये असा फरक आहे, हें या ओवींतून माऊलिंनी दाखविले आहे. सर्व कैवल्यद्वैतवादी आचार्य व श्रीज्ञानेश्वर महाराजादि संत यांनी सच्चिदानंदपरब्रह्माहून भिन्न भासणारे जीव, जगत्,परमात्मा,अवतार यांचें परब्रह्माशीं ऐक्य आहे हें सांगण्यांकरितां, परब्रह्माचे ठिकाणी हे निवर्तरूप आहे असे मानलें आहे.)
181-11
जिये अनादिभूमिके निटे । चराचर हें चित्र उमटे । आपणपें श्रीवैकुंठें । दाविलें तया ॥181॥
सच्चिदानंदनामरूपाने नटलेल्या ज्या विश्वरूप अनादि भूमिकेवर हें चराचरविश्वाचें चित्र उमटतें, तें विश्वरूप आपणच आहों असे भगवंतांनी अर्जुनाला दाखविले.
182-11
मागां बाळपणीं येणें श्रीपती । जैं एक वेळ खादली होती माती । तैं कोपोनियां हातीं । यशोदां धरिला । 182
मागें एकदां जेव्हा भगवंतांनी बाळपणी माती खाल्ली होती, तेव्हा यशोदेने रागावून त्यांना हाताप धरलें.
183-11
मग भेणें भेणें जैसें । मुखीं झाडा द्यावयाचेनि मिसें । चवदाही भुवनें सावकाशें । दाविलीं तिये ॥183॥
तेव्हा मग भगवान श्रीकृष्णाने ‘भ्यालो’असे दाखवून ‘मी माती खाल्ली नाही’ हे दाखविण्याकरिता. तोंड उघडले असतां, आपल्या तोंडात चौदाहि भुवनाची सृष्टि यशोदेला दाखविली
184-11
ना तरी मधुवनीं ध्रुवासि केलें । जैसें कपोल शंखें शिवतलें । आणि वेदांचियेही मतीं ठेलें । तें लागला बोलों ॥184॥
किंवा मधुवनांत तपःश्चर्या करीत असलेल्या व भगवंताची स्तुति करू इच्छिणार्या ध्रुवाचे गालाला आपल्या हातांतील शंखाचा स्पर्श केल्याबरोबर जे वेदालाहि अगम्य, तें तो बोलूं लागला.
185-11
तैसा अनुग्रहो पैं राया । श्रीहरी केला धनंजया । आतां कवणेकडेही माया । ऐसी भाष नेणेंचि तो ॥185॥
संजय म्हणतो. राजा धृतराष्ट्रा ! भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनावर तशीच कृपा केली. त्यामुळे माया व तिचा कार्यपसारा या शब्दांचे देखील त्याला ज्ञान होत नव्हते.
186-11
एकसरें ऐश्वर्यतेजें पाहलें । तया चमत्काराचें एकार्णव जाहलें । चित्त समाजीं बुडोनि ठेलें । विस्मयाचिया ॥186॥
एकसारखें जिकडे तिकडे ऐश्वर्यतेजच प्रकाशमान झालेलें दिसूं लागलें. तो आश्चर्याचा सर्वत्र समुद्रच पसरलेला आहे. असे पाहूं लागला आणि त्याचे चित्त त्या आश्चर्याच्या समुदायांत बुडून गेले.
187-11
जैसा आब्रह्म पूर्णोदकीं । पव्हे मार्कंडेय एकाकीं । तैसा विश्वरूप कौतुकीं । पार्थु लोळे ॥187॥
ब्रह्मलोकांपर्यंत संपूर्ण ब्रह्मांड जलमय झाले असतां, ज्याप्रमाणे एकटे मार्कंडेय ऋषीच त्या जलांत पोहत असतात, त्याप्रमाणे विश्वरूपाच्या दर्शनाने झालेल्या विस्मयसमुद्रावर अर्जुनहि लोळू लागला.
188-11
म्हणे केवढें गगन एथ होतें । तें कवणें नेलें पां केउतें । तीं चराचर महाभूतें । काय जाहलीं? ॥188॥
अर्जुन म्हणतो. (मी विश्वरूप पाहण्यापूर्वी) येथें केवढे मोठे आकाश होतें, तें आता कोणी कोठे नेले समजत नाही आणि त्या आकाशांत दिसणारी भूतसृष्टिही काय झाली कोणाला माहित
189-11
दिशांचे ठावही हारपले । आधोर्ध्व काय नेणों जाहले । चेइलिया स्वप्न तैसे गेले । लोकाकार ॥189॥
दिशांचा ठावठिकाण राहिला निही. खाली-वर या दिशाहि काय झालं समजत नाही?ज्याप्रमाणे जागे झाल्यावर संपूर्ण स्वप्न मावळतें, तसे संपूर्ण लोकालोकांचा प्रत्यय नाहीसा झाला.
190-11
नाना सूर्यतेजप्रतापें । सचंद्र तारांगण जैसें लोपे । तैसीं गिळिलीं विश्वरूपें । प्रपंचरचना ॥190॥
किंवा सूर्य उगवल्याबरोबर, त्याच्या प्रखर तेजाने, ज्याप्रमाणे चंद्रासह सर्व नक्षत्रे त्याच्यात लोपून जातात, त्याप्रमाणे विश्वरूप दर्शनाने सर्व प्रपंचभाव नाहीसा झाला.
191-11
तेव्हां मनासी मनपण न स्फुरे । बुद्धि आपणपें न सांवरें । इंद्रियांचे रश्मी माघारे । हृदयवरी भरले ॥191॥
(अशी विश्वरूपाने सर्व प्रपंचरचना गिळलेली पाहून) अर्जुनाच्या मनाचें मनपण स्फुरत नव्हतें- म्हणजे मनाचा बाह्यविषयाविषयीं होणारा संकल्पविकल्पात्मक व्यापार बंद पडला. बुध्दि निश्चयाचा व्यापार करीनाशी झाली व इंद्रियांच्या प्रवृत्ति माघार्या होऊन ह्रदयाच्या ठिकाणी एकवटल्या
192-11
तेथ ताटस्थ्या ताटस्थ्य पडिलें । टकासी टक लागले । जैसें मोहनास्त्र घातलें । विचारजातां ॥192॥
जणूंकाय मोहनास्र घालून संपूर्ण विचार बंद पडावे, त्याप्रमाणे ताटस्थहि तटस्थ राहिले- म्हणजे साक्षित्वहिं आठवेनासें झालें – एकसारखे टक लावून विश्वरूपाकडे पाहणें हेंहि विसरला.
193-11
तैसा विस्मितु पाहे कोडें । तंव पुढां होतें चतुर्भुज रूपडें । तेंचि नानारूप चहूंकडे । मांडोनि ठेलें ॥193॥
असा आश्चर्यकारक होऊन कौतुकाने तो पाहू लागला, तेंव्हि त्याला असे दिसलें की आपल्यासमोर भगवान श्रीकृष्णाचीं तीच सर्वत्र अनेक नामरूपात्मक झाली.
194-11
जैसें वर्षाकाळींचे मेघौडे । कां महाप्रळयींचें तेज वाढे । तैसें आपणावीण कवणीकडे । नेदीचि उरों ॥194॥
ज्याप्रमाणे वर्षाऋतुंत जिकडे तिकडे मेघच मेघ दिसतात किंवा प्रलयांत वाढलेलें तेज जिकडे तिकडे दिसतें, त्याप्रमाणे भगवंतानी आपल्यावांचून कोठेंच कांही उरूं दिलें नाही सर्वत्र नामरूपाने एक परमात्मा श्रीकृष्णच अनुभवाला येत होता, असा अर्थ.
195-11
प्रथम स्वरूपसमाधान । पावोनि ठेला अर्जुन । सवेचि उघडी लोचन । तंव विश्वरूप देखें ॥195॥
प्रथम अर्जुन आपल्या सच्चिदानंद आत्मस्वरूपाच्या प्राप्तीने पूर्ण समाधान पावला व मग लगेच डोळे उघडून पाहतो तों त्याला विश्वरूप दिसूं लागलें.
196-11
इहींचि दोहीं डोळां । पाहावें विश्वरूपा सकळा । तो श्रीकृष्णें सोहळा । पुरविला ऐसा ॥196॥
याच दोन्ही डोळ्यांनी मी संपूर्ण विश्व पाहावें, अशी जी अर्जुनाची इच्छा होती, ती भगवान श्रीकृष्णांनी, पुढें सांगितल्याप्रमाणे पूर्ण केली.
अनेकवक्त्रनयनमनेकाद्भुतदर्शनम् ।
अनेकदिव्याभरणं दिव्यानेकोद्यतायुधम्॥11.10॥
अर्थ ज्यामधे अनेक मुखे व नयन होते, ज्यामधे अनेक आश्चर्यकारक देखावे होते, अनेक दिव्य अलंकारांनी युक्त, अनेक दिव्य आयुधे धारण केलेले (विश्वरूप दर्शनाचा अर्जुनाच्या मनावरील प्रथदर्शनी परिणाम, मुखे, हात, दागिने डोळे पहातो – 195)
197-11
मग तेथ सैंघ देखे वदनें । जैसी रमानायकाचीं राजभुवनें । नाना प्रगटलीं निधानें । लावण्यश्रियेचीं ॥197॥
वैकुंठासारखे किंवा सौंदर्यलक्ष्मीचे ठेवेच पसरल्याप्रमाणे भगवंताचीं तोडे जिकडे तिकडे दिसत होती.
198-11
कीं आनंदाची वनें सासिन्नलीं । जैसी सौंदर्या राणीव जोडली । तैसीं मनोहरें देखिलीं । हरीचीं वक्त्रें ॥198॥
किंवा आनंदाची वनेंच भरास आलीं अथवा संपूर्ण सौंदर्याचें राज्य दिसावें- म्हणजे निःसीम सौंदर्यवान अशी ती, भगवान विश्वरूपाचीं अत्यंत मनोहर मुखें अर्जुनाने पाहिलीं.
199-11
तयांही माजीं एकैकें । सावियाचि भयानकें । काळरात्रीचीं कटकें । उठवलीं जैसीं ॥199॥
तेथेंच पुनः कांही मुखें काळरात्रीच्या सैन्याने उठाव केल्याप्रमाणे खरोखर अत्यंत भयानक अशी होतीं.
200-11
कीं मृत्यूसीचि मुखें जाहलीं । हो कां जें भयाचीं दुर्गें पन्नासिलीं । कीं महाकुंडें उघडलीं । प्रळयानळाचीं ॥200॥
किंवा मृत्युलाच मुखे प्राप्त झाली किंवा भयंकर भीतिचे किल्लेच पसरलेले आहेत किंवा प्रलयकालाच्या अग्नीची कुंडे उघडी केली जावीं.