सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा ओवी १५१ ते १७५ पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, ,

151-11
तरी इयेही विषयींचें कांहीं । एथ सर्वथा सांकडें नाहीं । सुखें आवडे तें माझिया देहीं । देखसी तूं ॥151॥
तर त्याबद्दल हि काही संकट वाटण्याचे कारण नाही, या माझ्या शरीरात जे तुला आवडेल ते सुखाने पाहून घे.
152-11
ऐसें विश्वमूर्ती तेणें । बोलिलें कारुण्यपूर्णें । तंव देखत आहे कीं नाहीं न म्हणे । निवांतुचि येरु ॥152॥
या प्रमाणे ते विश्वरूप श्रीकृष्ण पूर्ण प्रेमाने बोलल्यावर, अर्जुन आपले रूप पहात आहे किंवा नाही म्हणून पाहू लागले, तर तो स्वस्थ बसलेला त्यांच्या दृष्टीस पडला.
153-11
एथ कां पां हा उगला? । म्हणौनि श्रीकृष्णें जंव पाहिला । तंव आर्तीचें लेणें लेइला । तैसाचि आहे ॥153॥
पहात असताना भगवंताच्या लक्षात आले की, अर्जुन विश्वरूप पाहण्याच्या आहेत जसा गुंगलेला होता तसाच दृष्टीस पडला.
न तु मां शक्यसे द्रष्टुमनेनैव स्वचक्षुषा ।
दिव्यं ददामि ते चक्षुः पश्य मे योगमैश्वरम्॥11.8॥

अर्थ केवळ या तुझ्या दृष्टीने मला पहाण्यास तू समर्थ नाहीस. याकरता मी तुला दिव्य दृष्टि देतो. आता माझे ईश्वरी सामर्थ्य पहा.॥11-8॥
(ज्ञानदृष्टि पुढे चालू)
154-11
मग म्हणें उत्कंठे वोहट न पडे । अझुनी सुखाची सोय न सांपडे । परी दाविलें तें फुडें । नाकळेचि यया ॥154॥
मग मनात म्हणतात, याची उत्कंठा अजून कमी झालेली नाही व याला विश्वरूपदर्शनाने आनंदही झालेला नाही, कारण त्याला दाखवलेले विश्वरूप दिसलेच नाही.
155-11
हे बोलोनि देवो हांसिले । हांसोनि देखणियातें म्हणितलें । आम्हीं विश्वरूप तरी दाविलें । परी न देखसीच तूं ॥155
असे म्हणून देव हसले आणि अर्जुनाला म्हणाले, “आम्ही तुला विश्वरूप दाखविले, परंतु तू तर तें पहातच नाहीस.”


156-11
यया बोला येरें विचक्षणें । म्हणितलें हां जी कवणासी तें उणें? । तुम्ही बकाकरवीं चांदिणें । चरऊं पहा मा ॥156॥
वया भगवंताच्या बोलण्याला त्या बुध्दिमान अर्जुनाने असें उत्तर दिलें की, अहो देवा ! हा उणेपणाचा दोष कुणाकडे आहे? तुम्ही बगळ्याकडून चंद्राच्या प्रकाशांतील अमृतकण चरवूं पाहतां काय?
157-11
हां हो उटोनियां आरसा । आंधळिया दाऊं बैसा । बहिरियापुढें हृषीकेश गाणीव करा ॥157॥
अहो ह्रषीकेशा ! तुम्ही आरसा स्वच्छ करून तो आंधळ्याला दाखवूं पाहतिं किंवा बहिर्‍यापुढें गायन करतां !
158-11
मकरंदकणाचा चारा । जाणतां घालूनि दर्दुरा । वायां धाडा शारङ्गधरा । कोपा कवणा ॥158॥
फुलांतील मधाचा चारा जाणूनबुजून बेडकाला घालून वायां घालवितां ! मग हे शारंगधरा ! कोणावर रागावतां?
159-11
जें अतींद्रिय म्हणौनि व्यवस्थिलें । केवळ ज्ञानदृष्टीचिया भागा फिटलें । तें तुम्हीं चर्मचक्षूंपुढें सूदलें । मी कैसेनि देखें ॥159
जें विश्वरूप इंद्रियाने दिसण्याजोगें नाही, केवळ ज्ञानदृष्टीच्या आटोक्यांतील आहे, असें शास्राचे म्हणने आहे, ते विश्वरूप तुम्ही माझ्या चर्मचक्षुंपुढें मांडलें, मग मी कसा पाहणार?
160-11
परी हें तुमचें उणें न बोलावें । मीचि साहें तेंचि बरवें । एथ आथि म्हणितलें देवें । मानूं बापा ॥160
पण तुमचा दोष काढू नये. तो मी आपल्याकडे घेणें बरें. या अर्जूनाच्या बोलण्यावर भगवान म्हणतात, बा अर्जुना ! तुझें म्हणणें मला मान्य आहे.


161-11
साच विश्वरूप जरी आम्ही दावावें । तरी आधीं देखावया सामर्थ्य कीं द्यावें । परी बोलत बोलत प्रेमभावें । धसाळ गेलों ॥161॥
खरेंच आहे, जर आम्ही तुला विश्वरूप दाखवायचें, तर आगोदर विश्वरूप पाहण्याचें सामर्थ्य तुला द्यायला पाहिजे; पण अर्जुना ! प्रेमाच्या अवेशात विचार सुचला नाही.
162-11
काय जाहलें न वाहतां भुई पेरिजे । तरी तो वेलु विलया जाइजे । तरी आतां माझें निजरूप देखिजे । तें दृष्टी देवों तुज ॥162॥
कांही झालें तरी मशागत न करतां जमिनींत पेरलेला वेल नाश पावतो, असो. आतां ज्या दृष्टीने तुला माझे विश्वरूप पाहतां येईल, ती दृष्टि देतों.
163-11
मग तिया दृष्टी पांडवा । आमुचा ऐश्वर्ययोगु आघवा । देखोनियां अनुभवा । माजिवडा करीं ॥163॥
मग त्या दृष्टीच्या सहाय्याने माझा संपूर्ण ऐश्वर्ययोग पाहून तो अनुभवांत दृढ कर.
164-11
ऐसें तेणें वेदांतवेद्यें । सकळ लोक आद्यें । बोलिलें आराध्यें । जगाचेनि ॥164॥
वेदान्तविचाराने कळणारा, सर्व सृष्टीच्या पूर्वी कारणरूपाने असणारा व सर्व जगाचें आराध्य दैवत असा जो परमात्मा, तो याप्रमाणे बोलला.
संजय उवाच
। एवमुक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरिः ।
दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वरम्॥11.9॥

अर्थ संजय म्हणाला, हे राजा धृतराष्ट्रा, महायोगैश्वर्यसंपन्न हरि याप्रमाणे बोलून नंतर अर्जुनाला आपले ऐश्वर्ययुक्त उत्कृष्ट रूप दाखवता झाला.॥11-9॥
(संजय म्हणाला अर्जुन दैववान 165-)
165-11
पैं कौरवकुलचक्रवर्ती । मज हाचि विस्मयो पुढतपुढती । जे श्रियेहूनि त्रिजगतीं । सदैव असे कवणी?॥165
संजय म्हणतो, हे कौरवांच्या कुळांत उत्पन्न झालेल्या सार्वभौमराजा धृतराष्ट्रा ! मला वारंवार याचेंच आश्चर्य वाटतें की, या त्रैलोक्यांत श्रीलक्ष्मीपेक्षा भाग्यवान दुसरी कोणती स्री आहे?


166-11
ना तरी खुणेचें वानावयालागीं । श्रुतीवांचूनि दावा पां जगीं । ना सेवकपण तरी आंगीं । शेषाच्याचि आथी ॥166॥
किंवा आत्मस्वरूपाची खुणेने ओळख पटवून देणारा वेदाशिवाय जगांत दुसरा कोण आहे? किंवा खरें सेवकपण भगवंताची अखंड शय्या होऊन राहणार्‍या शेषाच्याच ठिकाणी आहे.
167-11
हां हो जयाचेनि सोसें । शिणत आठही पहार योगी जैसे । अनुसरलें गरुडा{ऐ}सें । कवण आहे ?॥167॥
ज्याचा ध्यास लागून योग्याप्रमाणे आठहि प्रहर अविश्रान्त सेवा करणारा गरूडासारखा दुसरा कोण आहे?
168-11
परी तें आघवेंचि एकीकडे ठेलें । सापें कृष्णसुख एकंदरें जाहलें । जिये दिवूनि जन्मले । पांडव हे ॥168॥
पण ते सर्व बाजूला राहिले आणि सांप्रत पांडव जन्मले त्या दिवसापासून यांचेच ठिकाणीं भगवान श्रीकृष्णाचे संपूर्ण सुख एकवटून राहिलें.
169-11
परी पांचांही आंतु अर्जुना । श्रीकृष्ण सावियाचि जाहला अधीना । कामुक कां जैसा अंगना । आपैता कीजे ॥169॥
जसा कामासक्त पुरुष स्रियेच्या स्वाधीन होतो, तसा श्रीकृष्ण हा, त्या पांचांहि पांडवांमध्ये खरोखर अर्जुनाच्या सर्वस्वीं स्वाधीन झाला.
170-11
पढविलें पाखरूं ऐसें न बोले । यापरी क्रीडामृगही तैसा न चले । कैसें दैव एथें सुरवाडलें । तें जाणों न ये ॥170॥
तसा शिकविलेला पक्षीही शिकवणार्‍यांचें स्वाधीन होऊन बोलणार नाही किंवा करमणुकीकरतिं पाळलेले हरिणहि असे स्वाधीन होऊन चालणार नाही. अर्जुनाचे थोर भाग्य कसें उदयाला आलें तें समजत नाही.


171-11
आजि हें परब्रह्म सगळेच । भोगावया सदैव याचेचि डोळे । कैसे वाचेनि हन लळे । पाळीत असे ॥171॥
श्रीकृष्णरूपाने प्रगट झालेलें संपुर्ण परब्रह्म सर्वदा भोगण्यांकरितां याचेच डोळे होते. अर्जुनाच्या बोलण्याचे भगवान कसे लळे पाहतो, पहा !
172-11
हा कोपे कीं निवांतु साहे । हा रुसे तरी बुझावीत जाये । नवल पिसें लागलें आहे । पार्थाचें देवा ॥172॥
अर्जुन रागावला तर भगवान मुकाट्याने सहन करतत, अर्जुन रुसला तर स्वतः भगवान त्याला समजवितात, असे काही अर्जुनाचें विलक्षण वेड श्रीभगवंताला लागले आहे.
173-11
एऱ्हवीं विषय जिणोनि जन्मले । जे शुकादिक दादुले । ते विषयोचि वानितां जाहले । भाट ययाचें ॥173॥
संपूर्ण विषयवासना जिंकून जन्माला आले, असे जे समर्थ शुकादिक मुनी, ते देखील या भगवंताच्या विषयभोगादि लीलांचे वर्णन करणारे भाट झाले.
174-11
हा योगियांचें समाधिधन । कीं होऊनि ठेले पार्थाआधीन । यालागीं विस्मयो माझें मन । करीतसे राया ॥174॥
खरोखर योगियांचा समाधिरूप ठेवा होय, पण तोच अर्जुनाच्या स्वाधिन होऊन राहिला; म्हणून राजा धृतराष्ट्रा ! माझ्या मनाला याचेंच वारंवार आश्चर्य वाटतें.
(योगी जो निर्गुण, निराकार स्वरूपाचे ठिकाणी अत्यंत कष्टाने चित्त स्थिर करून, समाधि साधतात, तेंच स्वरूप, भक्ताच्या परमप्रेमामुळे सगुण साकार होऊन, भक्ताच्याच सर्वस्वीं स्वाधीन होऊन राहते. असे परमप्रेमरूपभक्तीचें आश्चर्यकारक कौतुक आहे, असा भाव माऊलींनी सूचित केला आहे.)
175-11
तेवींचि संजय म्हणे कायसा । विस्मयो एथें कौरवेशा । श्रीकृष्णें स्वीकारिजे तया ऐसा । भाग्योदय होय ॥175॥
पुनः संजय आपणच म्हणतो, हे कौरवांच्या स्वामी धृतराष्ट्रा ! येथें आश्चर्य करण्याचें कारणच नाही. भगवान श्रीकृष्णांनी आपला म्हणून ज्याचा अंगीकार केला, त्याचा भाग्योदय होत असतो.

, ,
✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading