सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा ओवी १०१ ते १२५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , ,

101-6
ऐसेनि प्रतीती हे गवसे । ऐसा अनुभव जयातें असे । तोचि समबुध्दी हें अनारिसें । नव्हे जाणें ॥101॥
अशा अतिव्यापक ज्ञानाने हे सारे विश्व व्यापलेले आहे, असा ज्याला ब्रम्हानुभव आहे, तो सर्वत्र समप्रमाणात चैत्यन्य पाहणारा योगारूढ आहे, असे जाणावे. या माझ्या बोलण्यात खोटे असे काही नाही.
102-6
जयाचें नांव तीर्थरावो । दर्शनें प्रशस्तीसि ठावो । जयाचेनि संगें ब्रह्मभावो । भ्रांतासी ॥102॥
ज्याचे नाव तीर्थराज आहे, ज्याचे दर्शन घेतले असता अंतःकरणात प्रसन्नतेच्या, समाधानाच्या लहरी निर्माण होतात, तसेच ज्याच्या संगतीमुळे, अहंकाराने भ्रमित झालेल्या माणसाची भ्रांती संपून जाते व ब्रम्हरूप होतो,
103-6
जयाचेनि बोलें धर्मु जिये । दिठी महासिध्दितें विये । देखें स्वर्गसुखादि इयें । खेळु जयाचा ॥103॥
ज्याच्या सहज बोलण्यातून धर्म प्रकट होत असतो, ज्याच्या कृपादृष्टीने महासिद्धी प्रकट होतात, ती स्वर्गातील सुखे ज्याच्या सहज लीला आहेत,
104-6
विपायें जरी आठवला चित्ता । तरी दे आपुली योग्यता । हें असो तयातें प्रशंसितां । लाभु आथि ॥104॥
अशा महापुरुषांचे नावाचं मनात जरी सहज स्मरण केले तरी तो आपली योग्यता देतो; हे राहू दे. त्याच्या बद्दल अधिक काय सांगावे? त्याची स्तुती केल्यास निश्चितच (पारमार्थिक) लाभ होतो.
योगी युञ्जीत सततमात्मानं रहसि स्थितः ।
एकाकी यतचित्तात्मा निराशीरपरिग्रहः॥6.10॥

भावार्थ :- ज्याचे मन व इंद्रिय यांच्यासह शरीर जिंकले आहे, जो संपूर्ण वासनारहित आहे, ज्याने कसलाही संग्रह केला नाही, त्या योगी पुरुषाने एकांत स्थानी एकटेच बसून चित्ताला आत्मतत्वात स्थिर केलेले आहे.
(आत्मानुभवात तल्लीन असतो)
105-6
पुढती अस्तवेना ऐसें । जया पाहलें अद्वैतदिवसें । मग आपणपांचि आपण असे । अखंडित ॥105॥
ज्याचा कधी अस्त होत नाही, असा अद्वैताचा दिवस ज्याच्या हृदयात उजडला आहे, तो पुरुष सदैव आपणच आपल्या ठिकाणी रममाण असतो.


106-6
ऐसिया दृष्टी जो विवेकी । पार्था तो एकाकी । सहजें अपरिग्रही जो तिहीं लोकी । तोचि म्हणऊनि ॥106॥
अशा व्यापक दृष्टीने जो विचारी बनलेला असतो, तो कोठेही सदैव एकटाच आहे, तो परिग्रह न करणारा आहे; कारण तोच तिन्ही लोकात ब्रम्हरुपाने भरलेला आहे.
107-6
ऐसियें असाधारणें । निष्पन्नाचीं लक्षणें । आपुलेनि बहुवसपणें । श्रीकृष्ण बोले ॥107॥
(ज्ञानेश्वर माऊली म्हणतात) अशी ही सिद्ध पुरुषाची असाधारण लक्षणे भगवान श्रीकृष्णांनी आपल्या सर्वज्ञतेने सांगितली आहेत.
108-6
जो ज्ञानियांचा बापु । देखणेयांचे दिठीचा दीपु । जया दादुलयाचा संकल्पु । विश्व रची ॥108॥
जो ज्ञानी लोकांचा पिता आहे व सर्व पाहणाऱ्यांचा दृष्टीने प्रकाशक आहे आणि ज्या सामर्थ्याच्या केवळ संकल्पाने विशाल विश्वाची रचना होते,
109-6
प्रणवाचिये पेठे । जाहलें शब्दब्रह्म माजिठें । तें जयाचिया यशा धाकुटें । वेढूं न पुरे ॥109॥
ओंकाराच्या पेठेमध्ये तयार झालेले जे शब्दब्रम्ह म्हणजे वेद हे मर्यादित असल्यामुळे ज्याच्या अनंत यशाला लपेटु शकले नाहीत, त्या यशाचे संपूर्ण वर्णन करू शकत नाहीत.
110-6
जयाचेनि आंगीकें तेजें । आवो रविशशीचिये वणिजे । म्हणौनि जग हें वेसजे- । वीण असे तया ॥110॥
ज्याच्या स्वयंभू प्रकाशावर चंद्र-सूर्याचे कार्य चालते. सूर्य – चंद्राला जर परमेश्वराचा प्रकाश नसता, तर त्यांना हे जग दिसले नसते. संपूर्ण जगच परमेश्वराच्या प्रकाशावर आधारित आहे.


111-6
हां गा नांवचि एक जयाचें । पाहतां गगनही दिसे टांचे । गुण एकेक काय तयाचे । आकळशील तूं ॥111॥
ज्ञानोबा माऊली स्वतःच्या मनाला म्हणतात, हे मना ! ज्या एका नामाचा विचार केला असता ते इतके व्यापक आहे की, त्याच्या पुढे विशाल आकाशदेखील ठेंगणे दिसते, त्या भगवंताचे एक – एक गुण तू कसे बरे जाणशील??
112-6
म्हणोनि असो हें वानणें । सांगों नेणों कवणांची लक्षणें । दावावीं मिषें येणें । कां बोलिलों तें ॥112॥
म्हणून आता ही स्तुती पुरे. कारण अशा लक्षणांनी युक्त जो भगवान श्रीकृष्ण, तो स्वतः ज्या साधूचे वर्णन करतो, त्यांची लक्षणे आम्ही सांगू शकत नाही; परंतु ती सांगावीत म्हणून सांगितली. (कारण संतांची लक्षणे सांगण्याच्या निमित्ताने देवाने कोणाची लक्षणे सांगितली हे आम्हाला सांगता येत नाही.)
113-6
ऐकें द्वैताचा ठावोचि फेडी । ते ब्रह्मविद्या कीजेल उघडी । तरी अर्जुना पढिये हे गोडी । नासेल हन ॥113॥
(पण मला असे वाटते) ऐका. द्वैताचा ठावठिकाणा नाहीसा करणारे असे जे आत्मज्ञान, ते उघड उघड व्यक्त केले तर. अर्जुन मला आवडतो ही प्रेमाची गोडी खरोखर नाहीशी होईल.
114-6
म्हणोनि तें तैसे बोलणें । नव्हे सपातळ आड लावणें । केलें मनचि वेगळवाणें । भोगावया ॥114॥
म्हणून भगवंत तसे बोलले नाहीत; परंतु मध्ये त्यांनी अगदी पातळ असा पडदा ठेवला. अर्जुनाचे मन त्याच्या व आपल्या प्रेमाचा उपभोग घेण्याकरता भगवंतांनी वेगळे ठेवले.
115-6
जया सोहंभाव अटकु । मोक्षसुखालागोनि रंकु । तयाचिये दिठीचा झणें कळंकु । लागेल तुझिया प्रेमा ॥115॥
जे मी ब्रम्ह आहे अशा बोधात अडकलेले आहेत आणि जे मोक्षसुखासाठी दीन झालेले आहेत, त्यांच्या दृष्टीचा कलंक तुझ्या प्रेमाला कदाचित लागेल.


116-6
विपायें अंहभाव ययाचा जाईल । मी तेंचि हो जरी होईल । तरी मग काय कीजेल । एकलेया ॥116॥
आत्मज्ञानाच्या उपदेशाने अर्जुनाचा संपूर्ण अहंकार जर अकस्मात नाहीसा झाला आणि तो जर मीच होईल, तर मी एकट्याने काय बरें करावे??
117-6
दिठीचि पाहतां निविजे । कां तोंड भरोनि बोलिजे । नातरी दाटुनि खेंव दीजे । ऐसें कोण आहे ॥117॥
ज्याला डोळ्यांनी पाहताच समाधान लाभावे किंवा तोंड भरून बोलावे अथवा दृढ आलिंगन द्यावे, असा अर्जुनाशिवाय जगात दुसरा कोण बरे आहे??
118-6
आपुलिया मना बरवी । असमाई गोठी जीवीं । ते कवणेंसि चावळावी । जरी ऐक्य जाहलें ॥118॥
जर अर्जुनाचे आणि माझे ऐक्य झाले, तर आपल्या मनाला योग्य वाटणारी आणि अंतःकरणात न सामावणारी अशी गोष्ट कोणाला बरे सांगावी??
119-6
इया काकुळती जनार्दनें । अन्योपदेशाचेनि हातासनें । बोलामाजि मन मनें । आलिंगुं सरले ॥119॥
अशा काकुळतीने भगवंतांनी योगारूढ पुरुषाची लक्षणे सांगण्याच्या हातोटीने बोलण्यामध्ये द्वैत ठेऊन आपल्या मनाने अर्जुनाच्या मनास आलिंगन दिले.
120-6
हें परिसतां जरी कानडें । तरी जाण पां पार्थ उघडें । कृष्ण सुखाचेंचि रुपडें । वोतलें गा ॥120॥
हे ऐकण्यास जरी अवघड वाटत असले, तरीपण निश्चितपणे असे समज की, अर्जुन हा खरोखर भगवान श्रीकृष्णाच्या सुखाची ओतीव मूर्ती आहे.


121-6
हें असो वयसेचिये शेवटीं । जैसें एकचि विये वांझोटी । मग ते मोहाची त्रिपुटी । नाचों लागे ॥121॥
हे राहू दे, ज्याप्रमाणे वय झाल्यावर एखाद्या वांझ स्त्रीला जर बाळ झाले असता त्या स्त्रीच्या रूपाने मग मूर्तिमंत मोहच वावरतो.(तशी देवाची स्थिती झाली)
122-6
तैसें जाहले अनंता । ऐंसे तरी मी न म्हणतां । जरी तयाचा न देखतां । अतिशयो एथ ॥122॥
त्याचे अर्जुनाविषयी अतिशय प्रेम दिसून आले नसते, देवाच्या प्रेमाचा अतिरेक जर मी पहिला नसता तर मी असे (वांझोट्या बाईंसारखे) देवाला झाले, असे म्हंटले नसते.
123-6
पाहा पां नवल कैसें चोज । कें उपदेशु केउतें झुंज । परी पुढें वालभाचे भोज । नाचत असे ॥123॥
आश्चर्य पहा की, भगवंताचे अर्जुनाच्या ठिकाणी प्रेम कसे आहे !! कसला युद्धप्रसंग व कसल्या ठिकाणी हा उपदेश ! (माऊली म्हणतात युद्धाच्या प्रसंग अत्यन्त विक्षेपाची जागा असल्यामुळे आत्मज्ञानाच्या उपदेश करण्याला अगदी अयोग्य, परंतु अर्जुनाच्या प्रेमामुळे भगवंतांनी वेळेच्या योग्यतेकडे लक्ष न देता आत्मज्ञानाच्या उपदेश केला) परंतु निश्चयेकरुन भगवान श्रीकृष्ण ही अर्जुनाच्या प्रेमाची मूर्तीच अगर चित्रच नाचत आहे.
124-6
आवडी आणि लाजवी । व्यसन आणि शिणवी । पिसें आणि न भुलवी । तरी तेंचि काइ ॥124॥
आवड आहे; पण लाज निर्माण करते, तर ती आवड कसली?? तसेच ते व्यसन आहे आणि त्याने कष्ट होत असतील, तर ते व्यसन कसले? ते चक्क वेड आहे, परंतु भ्रम निर्माण करत नाही, तर ते वेड कसले??
125-6
म्हणउनि भावार्थु तो ऐसा । अर्जुन मैत्रियेचा कुवासा । कीं सुखे श्रृंगारलिया मानसा । दर्पणु तो ॥125॥
म्हणून याचा भावार्थ असा की, अर्जुन हा भगवंताच्या मित्रत्वाचे आश्रयस्थान आहे किंवा सुखाने शृंगारलेल्या मनाचे प्रतिबिंब पाहण्याचा तो एक आरसा आहे.

, , , , , ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *