ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.926

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-१४ वे, रूपके अंबुला अभंग ९२६

स्वरुपाचेनी भाने बिंब हे ग्रासिलें । परी खुण न बोले काय करूं । रुपाचा दर्पण रुपेंवीण पाहिला ॥ द्रष्टाहि निमाला नवल कायी ॥१॥ जिकडे जाय तिकडे दर्शन सांगाती । उदो न अस्तु हीं नाहीं द्वैतस्थिती ॥२॥ पूर्वबिंब शून्य हे शब्दचि निमाले ॥ अनाम्याचेनी भले होतें सुखें । त्यासी रुप नांव ठाव संकल्ये आणिला । अरुपाच्या बोला नाम ठेला ॥३॥ बापरखुमादेविवरु विठ्ठलुचि एक ॥ भोगी समसुख ऐक्यपणे ॥ अदृश्य अंबुला जागतां निवविजे ॥ परी सेज स्वभावीं दुजें नाहीं रया ॥४॥

अर्थ:-

आरसा ही उपाधि घेतल्यामुळे आरसारुपी उपाधिमध्ये प्रतितीला येणाऱ्या मुखाला प्रतिबिंब असे म्हणतात. म्हणजे प्रतिबिंबत्व येते) व त्या प्रतिबिंबाच्या सापेक्ष मूळच्या मुखांच्या ठिकाणी बिंबत्व धर्म येतो. याचा अर्थ मूळच्या मुखांच्या ठिकाणी बाजूला आरशाच्या उपाधिमुळे, बिंबत्व प्रतिबिंबत्व हे धर्म येतात. पण आरसारुपी उपाधि केल्यानंतर बिंबत्व प्रतिबिंबत्व हे धर्म नाहीसे होऊन मूळचे मुखच एक राहाते. या बिंब प्रतिबिंबवादांच्या रितीप्रमाणे माया उपाधिमुळे मायेत पडलेले जे प्रतिबिंब त्याला जीव असे म्हणतात. व त्याच्यासापेक्ष मुळ परमात्म्याला ईश्वर असे म्हणतात. तात्त्विक विचाराने पाहिले ईश्वरांच्या ठिकाणी आलेल्या बिंबधर्म व जीवाचे ठिकाणी प्रतिबिंबं धर्म हे दोन्ही खोटे आहेत. म्हणजे विचाराने नाहीसे होणारे आहेत. असा ज्याचा निश्चय झाला आहे. त्याच्या स्थितीचे वर्णन ज्ञानेश्वर महाराज अभंगात करीत आहे. परमात्म स्वरूपाचे ज्याला भान झाले आहे. त्याच्यादृष्टीने परमात्म्यावर आलेला बिबभाव ‘ग्रासला जातो’ म्हणजे बिबभाव नाही असेच ठरून शुद्ध परमात्मस्वरूपच अवशेष राहणार ते कसे आहे असे विचारले तर त्याचे स्वरूप दाखविणारे एकही चिन्ह नाही. याला काय करावे? रूपादि सर्व विषयांना दर्पण म्हणजे प्रकाशक जो परमात्मा त्यास रूपांवाचून मी पाहिला. कारण त्याला रूपादि गुणांचा यत्किंचितही संबंध नाही. असे श्रुति प्रतिपादन करते. व अनुभव तसाच आहे. जसा परमात्मा मी पाहिला असे म्हणण्याने, परमात्म्याचा मी दृष्टा झालो असे ओघानेच म्हणावे लागते पण ज्या परमात्म्याचे दर्शनाचे सामर्थ्य असे आहे की परमार्थ दर्शनात दर्शन घेणाराच मूळ वेगळा उरत नाही. हे परमार्थ दर्शनांत नवल आहे. बाकीच्या कोणत्याही विषय दर्शनात जीव आपल्याहुन भिन्न पदार्थाला दृश्य करून त्याचा पाहणारा आपण द्रष्टारूपाने शिल्लक राहतो. पण परमात्मदर्शनांत जीव स्वरूपे करून परमात्मस्वरूप असल्यामुळे तो परमात्मरूपच होतो. परमात्म्याशिवाय दुसरा कोणताही पदार्थ नसल्यामुळे लोकदृष्ट्या देशकाळाची अपेक्षा घेऊन बोलावयाचे झाले तर जिकडे पाहावे तिकडे व जेंव्हा पाहावे तेंव्हा सर्वत्र परमात्मदर्शनच आहे. कारण त्या ज्ञानरूप परमात्म्याला उदय अस्त किंवा कोणत्याच प्रकारची द्वैतस्थिती केंव्हाच नाही. पूर्व प्रक्रियेमध्ये ईश्वराला बिंब व मायेला अस्तित्व नसल्यामुळे शून्य इत्यादि शब्दाची योजना केली होती परंतु आतां परमात्मस्वरूपाच्या अद्वैत स्थितिमध्ये हे शब्दच मावळून गेले अशा अनाम, अरूप, परमात्म्याच्या ठिकाणी स्वरूपावस्थान झालेल्या जीवाला अविनाश सुखाचा लाभ होतो. कारण त्या परमात्मस्वरूपाला नाम, रूप, ठाव, म्हणजे ठिकाणी संकल्पाने आलेला होता. वास्तविक रितीने अरूप परमात्म्याचे ठिकाणी नामाचा प्रवेशच नाही. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे अद्वितीय श्रीविठ्ठल त्यांच्याशी ऐक्य पावलेला ज्ञानी ऐक्यभावाचे समसुख भोगतो. याप्रमाणे अदृश्य जो परमात्मा त्याच्या स्वरूपाची जागृति असता सर्व द्वैतभाव निवविजे’ म्हणजे दिसत असतांना बाधित होते. दिसत असताना असे म्हटले तर परमात्मस्वरूपांच्या ठिकाणी पुन्हां द्वैत प्रतिती येईलच अशी कोणी शंका केली तर ते द्वैत दिसले तरी मिथ्या असल्यामुळे स्वभावे करून परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी परमार्थतः द्वैत सिद्धि होणे शक्यच नाही. असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *