ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.781

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-९ वे, श्रीविठ्ठलप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७८१

दीप दीगांतरीं दीपीं पाहतां । परेहूनि परता तो देखिला वो माय ॥१॥ पाहीन मी आतां निरंजन स्वरूपता । त्यानें मज तत्त्वतां वोजविले वो माय ॥२॥ देहाचा दिवा उजळूनि ज्ञानज्योती । परपुरूषीं निवृत्ति झाली वो माय ॥३॥ कवळूनि भेटी प्राणेंसी देईन मिठीं । मी निःशब्देसी गोष्टी सांगेन वो माय ॥४॥ निजभावें निरोपिला सच्चिदानंदपदीं । मग मज परमानंदी गोष्टी जोडली वो माय ॥५॥ ऐसें मीं अनुसरलें याने आपंगिलें । रखुमादेविवरू विठ्ठले वो माय ॥६॥

अर्थ:-

ज्याच्या योगाने हे सर्व जगत भासते व जो ज्ञानरूप परावाणीच्या पलीकडे आहे तो परमात्मा आज मी पाहीला. तो सर्व भेदशून्य आहे. त्यानेच आपल्या स्वरूपाविषयी मला जागे केल्यामुळे आता मी त्यास पाहीन. देहामध्ये असणारी ज्या ज्ञानाची ज्योती त्या ज्योतीने परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी माझी आत्मस्वरूपाविषयी निवृत्ति झाली. सगुण रूपाने त्याला कवळून मिठी मारीन आणि स्वरूपता जो निःशब्द त्याच्याशी गोष्टी बोलत बसेन. स्वतःच्या शुद्ध भावाने मला श्रीगुरूनी सच्चिदानंद पदाच्या ठिकाणी त्या स्वरूपाचा बोध केला. त्यामुळे त्याविषयी गोष्ट बोलण्याची योग्यता प्राप्त झाली. रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांना मी अनन्य भक्तिभावाने शरण गेले. त्यामुळे त्यांनी माझा सांभाळ केला असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *