ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.711

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-७ वे, संतमहिमा अभंग ७११

आनंदले वैष्णव गर्जती नामें । चौदाही भुवने भरलीं परब्रहें ॥१॥ नरहरि हरि हरि नारायणा । सनकसनंद मुनिजनवंदना ॥२॥ गातां वाता नाचतां प्रेमें उल्हासें । चराचरीचे दोष नासिलें अनायासें ॥३॥ हरि मनीं हरि चित्तीं हरि अंक शरीरीं । तयातें देखोनी हरि चाऱ्ही बाह्या पसरी ॥४॥ अंघ्रिरेणु ज्याचा उद्धरितो पतिता । प्राकृत वाणी केवीं वर्णूं हरिभक्तां ॥५॥ तीर्थी पावन धर्म जिहीं केला धडौती । कैवल्यकल्पद्रुम ते त्रिजगतीं ॥६॥ मत्स्य कूर्मादिक ज्याचे महिमेसी आले । धन्य वैष्णव तेज रवि शशीसी पाहालें ॥७॥ बापरखुमादेविवरा पढियंती जया तनु । तया संताचरणी स्थिर हो का मनु ॥८॥

अर्थ:-
ज्याला सनक सनंदन वगैरे मुनी वंदन करतात. तो जो चवदाही भुवनांमध्ये परिपूर्ण भरला आहे. अशा परमात्म्याच्या हरि, नारायण,नरहरि, वगैरे नामाचा घोष वैष्णव आनंदाने करतात.या त्यांच्या प्रेमाच्या व आनंदाच्या गाण्यांने, नाचण्यांने, चराचरीचे दोष सहज नाहीसे होतात.वैष्णवांच्या मनांत हरि, चित्तात हरि, अंगावर माळा मुद्रादि हरिचीच चिन्हे धारण केली आहे. अशा लोकांना पाहून त्यांना अलिंगन देण्याकरता देव चारी हात पसरतो. ज्या हरिभक्तांच्या पायांच्या धुलीकणाने पापी लोक उद्धरून जातात.अशा भक्तांचे वर्णन मला प्राकृत वाणीने कसे करता येईल. ज्यांनी तीर्थात स्नान केलें असतां तीर्थेदेखील पावन होतात. ज्यांच्या योगाने धर्माला पूर्णपणा प्राप्त होतो. एवढेच नव्हे तर ते या त्रिभुवनांतील मोक्ष देणारे कल्पवृक्षच होत. ज्यांच्या रक्षणाकरिता परमात्म्याला मत्स्य कूर्म वगैरे अवतार घ्यावे लागले.त्याच्या तेजाची स्तुती काय करावी. त्यांनी चंद्र सूर्यालाही लाजविले.ज्या संताच्या विभूति माझे पिता व रखुमाईचे पती श्रीविठ्ठल यांना आवडतात.त्यांच्या पायी माझे चित्त स्थिर होवो असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *