ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.610

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६१०

करीं वो अद्वैत माला केलें इसन्यों संहिवर सिद्धपुरासी गयो । बोलु नाहीं तया दादुला भवसागरीं न सरत कीयो ॥१॥ मान्हा वहाडिणी नवजणी सांगातिणी सवें बारा सोळा । अनुहात तुरे वाजोनी गगनीं जगी जया सोहळा । मान्हा पतीपर्यंत त्यालें देखि वो जग जाया अंधळा ॥२॥ बाप दिन्हो ज्या घरी त्या लेवो नाहीं । जाति ना कुळ त्यान्हा पालऊ धरी गयो तंव वो सूक्ष्म ना स्थूळ ॥३॥ बिहती बिहती मी गयो तंव त्यान्हें माले धरी वो हातीं । पाठिमोरा वरु वोलख्या त्यान्हें मी बसें पाठी ॥४॥ निरंजनी मंडप घाल्यावो । लग्नेविण जाया पाणिग्रहण ब्रह्माक्षरी । बोलीनें तंव त्यान्हें नेत्री दिन्ही वो खूण ॥५॥ पांचजणी सावधान म्हणीयावो । आशा सवती अडधरे । जननिक करंडिये देये समाविन त्यान्हें माल्हे दिन्हे चिर ॥६॥ याचि सखिया मान्हीया येरी वो चौघीजन्हे । मिले सुमले येकी करोलीले । जासो यापरी चालविजे सुघरवासु ॥७॥ जान्हे सेजे मी पहुडन्यावो तंव तो नपूंसक वो । जाया इंद्रियांवीण जान्हा विस्तारू तो पुरुष जगीं कैसा वो जाया ॥८॥ सोहं वो घरदारी नांदतां मी वो लाधन्यो येक पुत नाराज । तोही योगिया चालवाव्या इसने मिवो जाया वांझ ॥९॥ पांच तान्हीं वो पांच पारिठी पांच वो सत्य मान्हांपोटी । अझुनी मी करणकुमारी वो परपुरषंसी नाही जया भेटी ॥१०॥ मज चौधे दीर भावे राखती चौधी वो नंणदा आटिती । तेणे मजे लागलें पिसें । बाईये वो तत्त्वमसी डोळां लेती ॥११॥ ज्याने माझे मन सुखी जाया निरालंबी निरंतरी । राणे रखुमाई भ्रतार श्रीकृष्ण तो म्यां दिठा वो अंतरीं ॥१२॥ दशदिशा दाही देहीं जाण दसवो अकरावें मन । बारा सोळा मान्हा सखिया येचिवो मानी निजसज्जन ॥१३॥ करीं वो कांकण शिरी बासिंग दाखडाव्या पंढरपूरासी गयो । बापरखुमादेविवरु विठ्ठलु त्याचे चरणी समरस गयो ॥१४ ॥

अर्थ:-

एक विरहिणी परमात्म्याबद्दल आपल्या सखीजवळ बागलाणी भाषेत अनुवाद करीत आहे. हे सखे, मी हातात अद्वैताची माला घेऊन या परमात्म्याशी मी स्वयंवर केले. आणि सिद्ध माझे आत्मस्वरुप त्याचे ठिकाणी गेले. त्या नवऱ्याजवळ मी बोलले नाही. त्याला फक्त पाहिते मात्र तो त्यानी मला भवसागरापासून दूर केले. माझ्याबरोबर नवविधा भक्तिरूपी वहाडिणी होत्या त्याच्याबरोबर बारा सोळा वहाडिणी होत्या त्यानी अनुहताचे वाद्य वाजवून जगांत माझ्या पतीचा म्हणजे परमात्म स्वरुपाचा मोठा सोहळा केला. तो मला दाखविला. आणि जग दिसेनासे झाले.बापाने ज्या घरी मला दिले. त्याला पहावयास जावे तर त्याला जात, कुळ वगैरे काही नाही. अशाचा मी पदर धरिला. तर तो स्थूलही नाही, सूक्ष्मही नाही, भीत भीत त्याच्याकडे गेले, तो त्यानी मला हाती धरले. नंतर मी त्याला ओळखल्यावर मी त्याचे जवळ जाऊन बसले. माझे लग्नाचा मण्डप निरंजन जो परमात्मा त्याच्या स्वरुपामध्ये घातला होता. आणि लग्ना शिवाय माझे पाणी ग्रहण आणि ब्रह्मस्वरुपाचे वर्णन केले. तोच त्याने नेत्राने मला खूण केली. माझ्या आणि परमात्मस्वरुपां मध्ये अडचण करणाऱ्या म्हणजे अंतरपाट धरणाऱ्या आशा तृष्णादि सवती त्या मला सावधान म्हणण्याकरिता आल्या. त्यांनी मला करंडीमध्ये अटकविल्याप्रमाणे मला देहाभिमान धरवून मला नेसावयास वस्त्र दिले. नवऱ्या मुलाकडील त्याच्या चार सख्या एकत्र मिळाल्या त्यापैकी एका करवलीने मला त्या नवऱ्याचे घरी चालवले. त्या नवऱ्याचे घरी मी जाऊन त्याचे शेजारी निजले. तो नपूसंक आहे असे मला समजले. इंद्रियावाचून ज्याचा विस्तार आहे, असा पुरुष स्त्रीचा भ्रतार कसा होईल. ज्या घरांत सर्वत्र सोहंचा नाद त्या घरांत मी नाखुषीने नादंत असता एक बोधरुपी पुत्र झाला. तोही योगाच्या मागनि पतीरुपच झाल्यामुळे मी पुन्हा वांझ आहे ती आहेच. पुन्हा माझे पोटी तान्ही, पारठी, अपंचीकृत. पंचीकृत अशी मुले झाली.तरी मी पण अजून करणकुमारीच आहे. म्हणजे अजूनही मी लहान मुलगीच आहे. कारण मला अजून परपुरुषासी म्हणजे परमात्मस्वरुपाशी भेट झाली नाही. माझे दीर म्हणजे चार वेद रक्षण करणारे आहेत. चार नंणदा म्हणजे चारी वाणी आटून जातात. असे झाल्यामुळे मी अगदी वेडी होऊन गेले. तत्त्वमसि हे अंजन डोळ्यांत घातल्यामुळे माझे मन परमात्मस्वरुपाच्या ठिकाणी निरंतर सुखी झाले. माझे पिता व रखुमादेवीचा भ्रतार राजराजेश्वर जो श्रीकृष्ण तो मी आपल्या अंतःकरणांत पाहिला. तो दशदिशा म्हणजे सर्वव्यापी असणारा असा, माझी दहा इंद्रिय व अकरावे मन त्याचप्रमाणे चंद्र सूर्याच्या बारा सोळा जोड्या त्याच माझ्या सज्जन सख्या, हातात कंकणे घालुन व डोक्याला मुंडावळ म्हणजे बासिंग बांधून त्या मला पंढरपूरास घेऊन गेल्या. त्यांनी मला मााझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल,तो दाखविला आणि त्याचे चरणाचे ठिकाणी मी समरस होऊन गेले.असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *