संत तुकाराम म. चरित्र ८

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत तुकाराम भाग-८

तुकोबांनी वैराग्य धारण केल्याने देहुचे महत्व वाढले. जनता देहुक्षेत्री महारांजांच्या दर्शनास येऊ लागली. त्यावेळी शिवाजी महारांजाचे वास्तव्य पुणे प्रांतांत होते. राष्टममाता जिजाबाईंनी शिवाजी राजेंना राष्टप्रेमाबरोबरच धर्मप्रेमाचे धडे दिले होते. त्यांना देहुचे महात्म्य अनेकवेळा सांगण्यांत आल्याने ते वरचेवर तुकाराम महाराजांच्या दर्शनाला येऊन उपदेशाचा फायदा घेत.

अशा श्रेष्ठ संताची कांही तरी सेवा घडावी म्हणुन सोन्याच्या मोहरा घेऊन करंजईच्या बेटावर एका दगडी शिळेवर  नामस्मरणांत तल्लीन असलेल्या तुकोबासमोर ठेवले. त्यांचे भजन आटोपल्यावर समोर ताटभर सोन्याच्या मोहरा पाहुन त्यांना अतिशय दुःख ते पुनः त्या ताटाकडे व शिळेकडे न पाहतां निघून गेले. भजन करण्याची पवित्र शिळा द्रव्याच्या स्पर्शाने विटाळली परत त्या शिळेला त्यांनी स्पर्शही केला नाही.

तुकाराम महाराज भजनासाठी कोठेही रानांत बसत. त्यांना खाण्यापिण्याचीही शुध्द नसायची. त्यांची पत्नी जीजाई त्यांच्या आधी कांही न खाता पिता उपाशीपोटी त्यांचे जेवण घेऊन त्यांना शोधत दिवसभर रानांत भटकत असे. त्यासाठी तीने संसाराकडे दुर्लक्ष केले. पोरांबाळांच्या होणार्‍या अव्यवस्थेची पर्वा केली नाही. संसाराचा गाडा हाकण्यास तीला कोणाचीही मदत नव्हती. सुरुवातीला त्यांची चोहोकडुन झालेली उपेक्षा स्वतःच्या देहाची बेपर्वाही अशा वेळी जर जिजाईने दुर्लक्ष केले असते तर महाराज कदाचित संत होऊ शकले नसते. अशावेळी या मातेने पतिव्रता धर्माच्या ज्योतीवर महाराजांस त्यांच्या  भावी मार्गाने जाण्यास खरी मदत केली.

जिजाई बद्दल बर्‍याच आख्यायिका प्रसिध्द आहेत की, ती खाष्ट, खट्याळ, रागीट, कर्कश, तोंडाने फटकळ होती, पण हे खरे वाटत नाही. कारण खतपत्रे तुकोबांनी नदीत बुडवण्यासारखी दुसरी मोठी चुक असुं शकेल ? पण त्या माऊलीने शब्दानेही त्यांना दुखवले नाही की, राग धरला नाही. दुष्काळ संपल्यावर तुकोबांनी पुर्ण लक्ष संसारातुन काढल्यामुळे जिजाबाईची किती ओढातान झाली असेल? तरी ती पतिनिष्ठ स्री नवर्‍याची प्रत्येक आज्ञा तंतोतंत पाळीत असे.

घरांत गाडग्यामडक्याचा संसार, मुलंबाळं ऊघडी, अशी  तुकोबांच्या संसाराची उडालेली दुर्दशा पाहुन शिवाजी महाराजांनी मदत पाठविली परंतु एवढी विपन्न अवस्था असुनही तुकोबांच्या आज्ञेने तीने सर्व परत पाठविले. फाटक्या संसाराला त्या परधनाचा विटाळ होऊ दिला नाही. संसारात प्रतिदिनी निर्माण होणारी संकटे, मुलांबाळांची आबाळ, तुकोबांची काळजी, त्यांच्या आज्ञा व्रतासारख्या पाळणे अशा अनेक त्रासांमुळे एखादेवेळी सात्विक संताप होणे अशक्य नाही! पण ती खाष्ट, कर्कश, फटकळ, वगैरे विशेषणें लावणे म्हणजे तिच्यावर अन्याय केल्यासारखे नाही का ?

महाराजांच्या हस्तलेखातील  वही ( चोपडी)  पारगांवकरांनी मागीतल्यावर त्यांना नकार मिळाल्यामुळे त्यांच्या घरच्यांवर त्यावेळच्या कलेक्टरांकरवी दबाव आणला होता, पण ही वही आमच्या घराण्याचा सन्मान, प्रसाद असुन आमच्या पुर्वजांनी जिवापाड जपलं आहे, ही वही या घरांतुन जाणे म्हणजे घराण्याचे सर्वस्व गेल्यासारखे होईल असे म्हणुन तुकोबांच्या वंशजाने कलेक्टरलाही जुमानले नाही.

तुकाराम महाराज यांचे एकंदर अवतार कार्य, महाराष्टासाठी केलेली धार्मिक, सामाजिक जागृती अशा अशा अनेक कार्यामुळे महाराष्ट त्यांचा निरंतर ञृणी राहील. अशा या थोर महात्म्याच्या धर्मपत्निविषयी साधी कृतज्ञताही कोणी दाखविली नाही यासारखे दुर्दैव कोणते ?

क्रमशः संकलन-मिनाक्षी देशमुख

संत तुकाराम महाराज संपूर्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *