ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 866

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-१४ वे, रूपके गौळणी अभंग ८६६

आचारचक्री निवणे मांडिलें कैसा डेरिया उपचार केला । तिन्ही संयोग गोमटें घुसळण रविबजो मेरु वो । तेणें आणिलें समयातें तेथें गुरुवचन लाधलें निरुतें वो ॥१॥ विद्यापात्रं गौळणी मंथन करुं ब्रह्मज्ञानी वो । चाल निज निज पंथें कैंसे नवनीत आणिलेसें हाता वो ॥धु ॥ गुरुउपदेशें रवि घरी अर्धऊर्ध्व मांजिरी पांचै प्राण मंथन केलें निरुतें वो । इडा पिंगळा कुंडळणीयां ब्रह्मसूत्र दोरु तो आणिया वो । उभी राहोनी गगनीं अनुहातें अंबर गर्जे वो ॥२॥ मन एकतत्त्वी करी वो चित्त दृढ धरी वो । तयामाजीं न विसंबे कांहीं वो । ऐसा गोरसु चोखटु मोलेंवीण येतसे फुकुटु । यासी न वेंचे कांहीं चित्त बैसे समरसें ठाई वो ॥३॥ गौळणी गोमटी हाती कसवटी क्षीरा नीरा निवाडा करीं वो । मेघडंबर न विसंबे तेथें घुसळितां थेंबु जो नुसळे वो । जन पडलेंसे धंदा गोरसा गोडी नेणती अंधे वो ॥४॥ काया हे नगरी गौळणी गोरसु । पुकारी नवही दारवंटे सांडुनी वो । दशवेद्वारी पातली कैसी विनटली गोविंदी वो । दंभ विकराजाला अधर्म धर्म लोपला वो । अवघी काया झांकुळली बापरखुमादेवीवरा विठ्ठली वो ॥५॥

अर्थ:-

जगताचा उद्भार होणे हे मूळ कर्म, त्याचा जो सतत आचार ते आचारचक्र, त्याच्या वर ती चुंबळ करुन जगतरुपी डेऱ्याचा उपचार केला. किंवा आचार चक्र ज्यांच्यावर फिरत आहे. तो परमात्मा त्याच्यावर आचारचक्राची चुंबळ व त्याच्यावर जगतरुपी डेरा ह्या तिन्हीचा उत्तम संयोग झाल्यावर त्याला घुसळण्याकरिता मेरु पर्वतास रवि केले. त्या घुसळण्यांच्या व्यवहारांत आत्मविद्या देणारे गुरुवचन सहज प्राप्त झाले. विद्येला उपकारक अशा गुरुशास्त्रादि पात्रांची, प्राप्ती झाली, असता ब्रह्मज्ञानाची इच्छा असणारी मुमुक्षुरुपी गौळणी विचाररुपी मंथन करु लागल्या असता ब्रह्मज्ञानरुप नवनीत त्यांच्या हाती आले. दुसऱ्या पक्षी गुरु उपदेशाची रवि. विचारुपी डेऱ्याच्या मधोमध करुन पाचही प्राणांचे चांगले प्राण निरोध केला. इडा, पिंगळा आणि कुंडलिनी ही त्रिवेणी ब्रह्मसूत्राची दोरी करुन उभ्या राहून घुसळू लागल्या. तो अनुहतध्वनीने चिदाकाश घुम घुम आवाजाने गर्जू लागले. असा ब्रह्मप्राप्तीचा एक उपाय आहे. याकरिता हे मुमुक्षु तूं एक परमात्मतत्त्वांच्या ठिकाणी मन किंवा चित्त दृढ कर. यांत यत्किंचित अंतर पडू देऊ नकोस. असे केलेस तर परमतत्त्वरुपी स्वच्छ गोरस कांही एक खर्च न होता फुकट हाती लागून चित्त सामरस्यांत स्थीर होईल. अशा त-हेचा चांगली मुमुक्षु गवळण हातांत क्षीरनीराची कसवटी घेऊन, प्रपंच परमार्थ यांचा निवाडा करते. त्या चैतन्यरुप आकांशात न विसंबता सारखे घुसळण केले तर त्यातील एक थेंबही बाहेर पडत नाही. पण काय करावे. सर्व जग प्रपंचाच्या धुंदीमुळे आंधळे होऊन या गोरसाची गोडी जाणत नाही. पण मुमुक्षुचे भाग्य असे की या शरीररुपी नगरांतच इंद्रियरुपी नऊ द्वारे बंद करुन ज्ञान प्रगट झाले. त्या. दहाव्या द्वारांत प्राप्त होऊन गोविंदरुप बनून निर्धास्त रितीने ते ब्रह्मरुपी गोरस कोणाला हवा असेल तर घ्या. असा पुकारा करते. काय ऐश्वर्य सांगावे दंभादि विकार हा अधर्म आणि कर्मोपासना व आचारादि धर्म है लोपून जावून सर्व शरीर माझे पिता व रखुमादेवीचे पती जे विठ्ठल त्यांनी परमात्मरुप झाले. असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *