ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.633

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६३३

न चुकतां चुकलें संसार वाटे भांबावलें । अवचितें पडलें ज्ञानपेठे वो माये ॥१॥ माझा निवृत्ति तूं सखा लाधला विकरा । गिऱ्हाईक पुरा विठ्ठल गे माये कांहीं नाहीं उरले प्रेम वो माये ॥२॥ हा पुरोनियां उरला निजानंदु सांवळा । रखुमादेविवरू जोडला कष्टी वो माये ॥३॥

अर्थ:-

प्रतिबिंब हे बिंबानुरूपच असते या नियमाने बिंब जर शुद्ध ब्रह्म आहे. तर बुद्धीत त्याचा आभास शुद्ध सच्चिदानंदरूपच असणार न चुकता. असे असता चुकले म्हणजे त्या आभासाचे बुद्धिसी तादात्म्य झाल्यामुळे तो आभास आपणास सुखी, दुःखी पुण्यवान, संसारी असे समजतो.हेच त्याचे न चुकता चुकणे आहे व संसार वाटे भांबावणे आहे. असे असताही प्रत्येक जीवास मी सतत सुखी असावे असे वाटत असते. सततसुखी होण्यास जीवाने आपल्या मुख्य स्वरूपास ओळखणे हेच साधन आहे.पण आत्मस्वरूप ओळखण्याची इच्छा उत्पन्न होणे हे अनेक जन्मामध्ये ईश्वर सेवा केल्यावाचून शक्य नाही. अशी ज्याची ईश्वरसेवा झाली असेल तो सहजच या अध्यात्म विचारामध्ये प्रवेश करतो. अशा संसाराच्या अडचणीत मी असता दैवयोगाने सहज किंवा एकाएकी ह्या आत्मज्ञानाच्या बाजारपेठेत आलो. मुमुक्षु रूपी गिऱ्हाईकास परमात्मज्ञानाची विक्री करणारा म्हणजे ज्ञान देणारा दुकानदार माझा सखा श्रीगुरू निवृत्तिराय प्राप्त झाला. जरूरीचा माल ज्या पेठेत असतो त्या पेठेत ते गिऱ्हाईक नेमके जात असते. या ज्ञानाच्या विक्रीचे निवृत्तिरायांचे दुकान कोठे आहे म्हणून विचाराल तर ते पंढरीस आहे. म्हणूनच तेथे मोक्षार्थी भाग्यवान गिऱ्हाईक जमते. आता त्या दुकानात ज्ञानाची विक्री झाल्यानंतर म्हणजे मुमुक्षुस ज्ञानप्राप्ती झाल्यावर भक्तिप्रेमा शिवाय दुसरे काही खरेदी करावयाचे रहात नाही. आता त्या भक्तिला देव कोणता पाहिजे असे म्हणाल तर तो जगांत व्यापून आनंदरूप शामसंदर वर्णाचा रखुमादेवीचे पती जो श्रीविठ्ठल तो विटेवर पाय व कटेवर कर ठेऊन उभा आहे परंतु त्याच्या प्राप्तीला फार कष्ट करावे लागतात. व त्या कष्टाने तो मला प्राप्त झाला असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *