ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.627

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६२७

गगन डोळां भासलें तें बाहुलीनें कवळिलें । कांहीं एक उगवलें रूप अरूपी वो माये ॥१॥ पूर्ण पीठिका टाकुनी मायास्तंभ उभउनी । निजानंदी माळा घालुनी तंव तो वरिला वो माये ॥२॥ हो कामीं कामरंजनु गुणहि निर्गुण । पहातां परिपूर्ण तरी तो सहज वो माये ॥३॥ हा पुरोनी उरला नयनीं ओसंडला । बापरखुमादेविवरा विठ्ठला तरी तो वरिला वो माये ॥४॥

अर्थ:-

डोळ्यांतल्या बाहुलीला गगन भासले. ती भासली म्हणून मिथ्या आहे. म्हणून वस्तुतः सृष्टि नाहीच, असे ठरल्यानंतर आता फक्त तिचे सत्य अधिष्ठान म्हणजे सच्चिदानंद आत्माच राहिला आत्मा रूपरहित आहे.अशा ज्ञानाचा उदय होण्यापूर्वी जगत सत्य मानून जे काही कर्म उपासना वगैरे पीठिका म्हणजे सांप्रदाय व त्या सृष्टीचे मूळ कारण जी माया. तिचे आधारावर सर्व जगत् व्यवहार चालत असतात त्या मूळ माया स्तंभाचे म्हणजे मूळ कारणाचे उल्लंघन करून जो स्वकियानंद परमात्मा शिल्लक राहिला.त्याला माळ घालून त्यास वरले म्हणजे त्याचे स्वरूपाशी ऐक्य पावले.त्याला माळ घातल्याबरोबर त्याच्यावर लोकदृष्टीने स्त्रियांना कामातूर करणारा म्हणून तो कामी असा आरोप व मजवर कामिनी असा आरोप आला. त्या प्रमाणे तो निर्गुण असतांना त्याच्यावर गुणाचाही आरोप आला. पण वास्तविक पाहिले असता तो व मी असा औपाधिक भेद जाऊन त्याचे माझे, सहज असलेले पूर्ण ऐक्यच झाले आहे.ते माझे पिता रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल, सर्व जगांत भरून पूर्णत्वाने शिल्लक उरला आहे. तोच माझ्या डोळ्यात राहिल्याने मी त्यास वरले म्हणजे त्याच्याशी आपले एकत्वाने ज्ञान करून घेतले असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *