सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा ओवी २६ ते ५० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , , ,

26-14
हें असो आतां वांजटा । तो ज्ञानार्थ करूनि गोमटा । ग्रंथु दावीं उत्कंठा । भंगो नेदीं ॥26॥
हे वायफळ बोलणे आता राहू दे. गीतेतील ज्ञानरूपी विषय चांगला स्पष्ट करून गीताग्रंथ सांग. श्रोत्यांची ऐकण्याविषयीची उत्कट इच्छा मोडू नकोस.
27-14
हो कां जी स्वामी । हेंचि पाहत होतों आम्हीं । जे श्रीमुखें म्हणा तुम्ही । ग्रंथु सांग ॥27॥
स्वामी महाराज, अशी का आपली इच्छा आहे? मी याचीच वाट पहात होतो की प्रभूंनी आपल्या मुखाने ‘ग्रंथ सांग’ असे म्हणावे.
28-14
सहजें दुर्वेचा डिरु । आंगेंचि तंव अमरु । वरी आला पूरु । पीयूषाचा ॥28॥
हरळीची मुळी स्वभावत: तर अंगाने अमर आहेच, तशात जर तिच्यावर आणखी अमृताचा पूर आला तर मग तिच्या अमरपणाविषायी शंका धरणे नको.
29-14
तरी आतां येणें प्रसादें । विन्यासें विदग्धें । मूळशास्त्रपदें । वाखाणीन ॥29॥
तर आता या श्रीगुरूंच्या प्रसादाने मूळ जी गीताशास्त्रातील पदे, ती विस्ताराने चातुर्यपूर्वक वर्णन करीन.
30-14
परी जीवा आंतुलीकडे । जैसी संदेहाची डोणी बुडे । ना श्रवणीं तरी चाडे । वाढी दिसे ॥30॥
पण असे वर्णन करीन की जेणे करून जीवाच्या आत असलेली संशयरूप होडी बुडून जाईल. (संशय नाहीसे होतील) एवढेच नाही तर श्रवणाची इच्छा वाढलेली दिसेल.

31-14
तैसी बोली साचारी । अवतरो माझी माधुरी । माले मागूनि घरीं । गुरुकृपेच्या ॥31॥
माझ्या वाणीतुन उत्तम प्रकारचे अमृतमधुर शब्द प्रगट व्हावेत. एवढे माझे सद्गुरुच्यां चरणकमलाशी मागणे आहे.
32-14
तरी मागां त्रयोदशीं । अध्यायीं गोठी ऐसी । श्रीकृष्ण अर्जुनेंसी । चावळले ॥32॥
चौदाव्या अध्यायाची प्रस्तावना
तर मागे तेराव्या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनास अशी गोष्ट सांगितली आहे.
33-14
जे क्षेत्रक्षेत्रज्ञयोगें । होईजे येणें जगें । आत्मा गुणसंगें । संसारिया ॥33॥
की हे जग क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या संयोगापासुन जग उत्पन्न होते आणि आत्मा हा गुणांच्या संबंधाने संसारी झाला आहे.
34-14
आणि हाचि प्रकृतिगतु । सुखदुःख भोगीं हेतु । अथवा गुणातीतु । केवळु हा ॥34॥
आणि हाच (आत्मा) प्रकृतीच्या तावडीत गेल्यामुळे सुखदु:ख भोगण्यास कारण होतो. त्यास सुखदु:खाचा भोग होतो. एरवी खरोखर पाहिले तर हा केवल गुणातीतच आहे.
35-14
तरी कैसा पां असंगा संगु । कोण तो क्षेत्रक्षेत्रज्ञयोगु । सुखदुःखादि भोगु । केवीं तया? ॥35॥
तर असंगाला संग कसा व क्षेत्र-क्षेत्रज्ञ यामधील संबंध तो कोणता? व त्याला सुखदु:खादि भोग कशा प्रकारे भोगावी लागतात?

36-14
गुण ते कैसे किती । बांधती कवणे रीती । नातरी गुणातीतीं । चिन्हें काई? ॥36॥
गुण ते कसे व किती आहेत व ते आत्म्याला कोणत्या प्रकाराने बद्ध करतात? अथवा गुणातीताची लक्षणे काय आहेत?
37-14
एवं इया आघवेया । अर्था रूप करावया । विषो एथ चौदाविया । अध्यायासी ॥37॥
या प्रमाणे यावरील सर्व गोष्टींचा अर्थ स्पष्ट सांगणे हा चौदाव्या अध्यायाचा प्रतिपाद्य विषय आहे,
38-14
तरी तो आतां ऐसा । प्रस्तुत परियेसा । अभिप्रायो विश्वेशा । वैकुंठाचा ॥38॥
तरी आता जगाच्या या वैकुठनिवासी विक्ष्वेक्ष्वरांचा अभिप्राय काय आहे. तो तुम्ही या प्रस्तुत चौदाव्या अध्यायात ऐका
39-14.
तो म्हणे गा अर्जुना । अवधानाची सर्व सेना । मेळऊनि इया ज्ञाना । झोंबावें हो ! ॥39॥
श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, श्रवण करण्याची जी साधन सामुग्री एकत्र जुळवून आणून ज्ञानाशी एकरुप व्हावे.
40-14
आम्हीं मागां तुज बहुतीं । दाविलें हें उपपत्ती । तरी अझुनी प्रतीती- । कुशीं न रिघे ॥40॥
आम्ही मागे तुला पुष्कळ प्रकारच्या युक्तिवादांनी हा विचार,ज्ञान समजावुन सांगितले आहे. परंतु अजूनही तुझ्या अंतकरणात ह्याचा अनुभव आलेला दिसत नाही

41-14
श्रीभगवानुवाच ।
परं भूयः प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमम् ।
यद्ज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः॥14.1॥

श्लोकार्थ -::- श्रीकृष्ण म्हणाले, ज्याला (श्रुतींनी) ‘पर’ म्हणून म्हटले आहे, जे सर्व ज्ञानांमधे उत्तम आहे व जे जाणून सर्व मुनी या देहबंधनापासून मुक्त होऊन अत्यंत श्रेष्ठ सिद्धी पावले, असे हे ज्ञान मी तुला पुन्हा सांगतो.
म्हणौनि गा पुढती । सांगिजैल तुजप्रती । पर म्हण म्हणौनि श्रुतीं । डाहारिलें जें ॥41॥
या करता श्रुतीने पर (सर्वांच्या पलीकडे) म्हणून जे ज्ञान वारंवार प्रसिद्ध केले आहे ते ज्ञान तुला पुन्हा सांगण्यात येईल.
42-14
एऱ्हवीं ज्ञान हें आपुलें । परी पर ऐसेनि जालें । जे आवडोनि घेतलें । भवस्वर्गादिक॥42॥
सहज विचार करून पाहिले तर ज्ञान हे आपले रूपच आहे. परंतु संसार, मृत्यू लोक, स्वर्गलोक वगैरे आवडून घेतल्यामुळे ते ज्ञान आपले स्वरूप असून पर म्हणजे परके असे झाले आहे.
43-14
अगा याचि कारणें । हें उत्तम सर्वांपरी मी म्हणें । जे वन्हि हें तृणें । येरें ज्ञानें ॥43॥
ह्या ज्ञानापुढे, अग्नी व इतर ज्ञाने ही गवत आहेत. म्हणून अर्जुना, हे ज्ञान सर्व ज्ञानांपेक्षा उत्तम आहे. असे मी म्हणतो.
44-14
जियें भवस्वर्गातें जाणती । यागचि चांग म्हणती । पारखी फुडी आथी । भेदीं जया ॥44॥
जी इतर ज्ञाने संसाराला व स्वर्गाला विषय करतात व यज्ञच चांगले असे म्हणतात व द्वैतभावाची ज्यांना ओळख असते,
45-14
तियें आघवींचि ज्ञानें । केलीं येणें स्वप्नें । जैशा वातोर्मी गगनें । गिळिजती अंतीं ॥45॥
ती सर्व इतर ज्ञाने या ज्ञानाने स्वप्नासारखी मिथ्या केली आहेत. ज्याप्रमाणे वार्‍याच्या लाटा अखेरीस आकाशा कडून गिळल्या जातात,

46-14
कां उदितें रश्मिराजें । लोपिलीं चंद्रादि तेजें । नाना प्रळयांबुमाजें । नदी नद ॥46॥
अथवा सूर्य उगवला असता जशी चंद्रादिक तेजे लोपतात अथवा प्रलयकाळच्या पाण्याच्या महापुराने जसे नदी व नद नाहीसे होतात.
47-14
तैसें येणें पाहलेया । ज्ञानजात जाय लया । म्हणौनियां धनंजया । उत्तम हें ॥47॥
अर्जुना त्याप्रमाणे हे ज्ञान उदय पावले असता इतर सर्व ज्ञाने लयास जातात. म्हणून अर्जुना हे ज्ञान उत्तम आहे.
48-14
अनादि जे मुक्तता । आपुली असे पंडुसुता । तो मोक्षु हातां येता । होय जेणें ॥48॥
अर्जुना, आपली जी अनादि मुक्तता आहे, ती मुक्तता या ज्ञानाने हस्तगत होते.
49-14
जयाचिया प्रतीती । विचारवीरीं समस्तीं । नेदिजेचि संसृती । माथां उधऊं ॥49॥
ज्याच्या अनुभावाने सर्व विचारशूर पुरुष संसाराला डोके वर काढूच देत नाहीत.
50-14
मनें मन घालूनि मागें । विश्रांति जालिया आंगें । ते देहीं देहाजोगे । होतीचि ना ॥50॥
ते विचारशूर पुरुष आपली विषयांकडे असलेली मनाची प्रवृत्ती मनानेच मागे हटावून, अंगाने विश्रांती स्वत: ब्रह्मरूप झाल्यावर जरी देतात असतात तरी पण ते देहाजोगे होत नाहीत. देहाएवढेच आपल्याला समजत नाहीत.

, , , , , , ,

Sartha Dnyaneshwari Chapter 14th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay ChaudavaSampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 14 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *