51-14
मग तें देहाचें बेळें । वोलांडूनि एकेचि वेळे । संवतुकी कांटाळें । माझें जालें ॥51॥
मग दुबेळके (स्थूल व सूक्ष्म देह) एकाच वेळेला ओलांडून (निरास करून) ते पुरुष वजनात माझ्या बरोबरीचे झाले.
52-14
इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागताः ।
सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च ॥14.2॥
श्लोकार्थ -: या ज्ञानाचा आश्रय करून माझ्या साधर्म्याप्रत प्राप्त झालेले (मजशी समानधर्मा होणारे) पुरुष सृष्टि-निर्माण काली जन्म पावत नाहीत आणि प्रलयकाली मरण अथवा दु:ख पावत नाहीत.(ज्ञानाचा महिमा)
जे माझिया नित्यत । तेणें नित्य ते पंडुसुता । परिपूर्ण पूर्णता । माझियाची ॥52॥
अर्जुना जी माझी नित्यता आहे, त्या नित्यतेने ते पुरुष नित्य आहेत व माझ्याच परिपूर्णतेने ते परिपूर्ण आहेत.
53-14
मी जैसा अनंतानंदु । जैसाचि सत्यसिंधु । तैसेचि ते भेदु । उरेचि ना ॥53॥
मी जसा अमर्याद व अनंत आहे व मी जसा सत्याचा समुद्र आहे, तसेच ते आहेत. त्यांच्यात व माझ्यात भेद शिल्लकच रहात नाही.
54-14
जें मी जेवढें जैसें । तेंचि ते जाले तैसें । घटभंगीं घटाकाशें । आकाश जेवीं ॥54॥
कारण की मी जसा व जेवढा आहे तसेच व तेवढे ते ज्ञानाच्या योगाने झालेले असतात. कसे तर ज्याप्रमाणे घट फुटल्यावर घटाकाश महाकाश होते.
55-14
नातरीं दीपमूळकीं । दीपशिखा अनेकीं । मीनलिया अवलोकीं । होय जैसें ॥55॥
अथवा दिव्याच्या मूळ ज्योतीत दुसर्या अनेक ज्योती मिळाल्या असता जसे होते जशा त्या सर्व ज्योती एकरूप होऊन जातात त्याप्रमाणे समज.
56-14
अर्जुना तयापरी । सरली द्वैताची वारी । नांदे नामार्थ एकाहारीं । मीतूंविण ॥56॥
अर्जुना, त्याप्रमाणे त्या पुरुषाच्या ठिकाणी द्वैताची येरझार संपली व आता तो व मी असे दोघे देव व भक्त या दोघांच्या नामांचा अर्थ जे स्वरूप, त्या स्वरूपाचे ठिकाणी एका पंक्तीला ऐक्याने मी व तू अशा द्वैतभावाशिवाय नांदत आहेत.
57-14
येणेंचि पैं कारणें । जैं पहिलें सृष्टीचें जुंपणें । तेंही तया होणें । पडेचिना ॥57॥
या कारणामुळे जेव्हा मूळ सृष्टी उत्पन्न होते, तेव्हाही त्यास जन्मास यावे लागत नाही.
58-14
सृष्टीचिये सर्वादी । जयां देहाची नाहीं बांधी । ते कैचें प्रळयावधी । निमतील पां? ॥58॥
सर्व सृष्टीच्या आरंभी ज्यांना देहाचा आकार घ्यावा लागत नाही ते आत्मज्ञानी पुरुष प्रलय काळाच्या वेळेस कसे मरतील?
59-14
म्हणौनि जन्मक्षयां । अतीत ते धनंजया । मी जालें ज्ञाना इया । अनुसरोनी ॥59॥
अर्जुना, म्हणून ते पुरुष या ज्ञानाचा मार्ग स्वीकारून जन्मक्षयातीत असे मद्रूप झाले.
60-14
ऐसी ज्ञानाची वाढी । वानिली देवें आवडी । तेवींचि पार्थाही गोडी । लावावया ॥60॥
असा ज्ञानाचा महिमा वर्णन करणे देवास प्रिय असल्यामुळे व त्याचप्रमाणे अर्जुनालाही गोडी लावण्याकरता देवांनी या प्रमाणे ज्ञानाचा महिमा वर्णन केला.
61-14
तंव तया जालें आन । सर्वांगीं निघाले कान । सणई अवधान । आतला पां ॥61॥
(श्रीकृष्णाच्या बोलण्याचा अर्जुनावर परिणाम = श्रवण)
असा ज्ञानाचा महिमा भगवंतांनी वर्णन केल्यावर अर्जुनाची वेगळीच स्थिती झाली. ती ही की त्याच्या सर्वांगाला कान फुटले. फार काय सांगावे? तो अवधानाने संपूर्ण व्यापला गेला. (अवधानाची मूर्तीच बनला).
62-14
आतां देवाचिया ऐसें । जाकळीजत असे वोरसें । जें निरूपण आकाशें । वेंटाळेना ॥62॥
अर्जुन सर्व अंगाने अवधानरूप झाला तेव्हा देवासारख्या सर्वज्ञाकडून केले जाणारे अफाट व्याख्यानही त्याचेकडून आकलन केले जात होते आणि (आपण जे सांगतो त्याचा उपयोग होत आहे असे देवाने जाणले). म्हणून देवाचे व्याख्यान आकाशाच्याही कवळीत येणार नाही एवढे विस्तृत होऊ लागले.
63-14
मग म्हणे गा प्रज्ञाकांता । उजवली आजि वक्तृत्वता । जे बोलायेवढा श्रोता । जोडलासी ॥63॥
मग श्रीकृष्ण म्हणाले, हे बुद्धीरूप स्त्रीच्या पती अर्जुना, आमचे एवढे व्याख्यान तेवढेच ज्याचे अवधान असा तू श्रोता मिळाल्यामुळे आज आमची वक्तृत्वरूपी कन्या विवाहित झाली. (कारण तिला तुझ्यासारखे योग्य स्थळ मिळाले).
64-14
तरि एकु मी अनेकीं । गोंविजे देहपाशकीं । त्रिगुणीं लुब्धकीं । कवणेपरी ॥64॥
तरी मी एक असून त्रिगुणरूपी पारध्याकडून अनेक देहपाशात कोणत्या प्रकाराने अडकला जातो.
65-14
कैसा क्षेत्रयोगें । वियें इयें जगें । तें परिस सांगें । कवणेपरी॥65॥
मी क्षेत्राच्या योगाने ही जगे कोणत्या प्रकाराने व कसा प्रसवतो ते सांगतो ऐक.
66-14
पैं क्षेत्र येणें व्याजें । यालागीं हें बोलिजे । जे मत्संगबीजें । भूतीं पिके ॥66॥
माझ्या संगरूपी बीजाने या अज्ञानात प्राणीरूपी पीक येते, याच कारणामुळे याचा (अज्ञानाचा) क्षेत्र नावाने उल्लेख केला जातो.
67-14
मम योनिर्महद्ब्रह्म तस्मिन्गर्भं दधामहम्यम् ।
संभवः सर्वभूतानां ततो भवति भारत ॥14.3॥
श्लोकार्थ -: -:(महद्ब्रह्म) ही माझे (सृष्टिरूप) गर्भ ठेवण्याचे ठिकाण आहे, तिच्यामधे मी गर्भ ठेवतो. हे भारता त्यापासून सर्व भूतांची उत्पत्ती होते.
(सृष्ट्युत्पत्ती पुढे चालू = अज्ञान कशाला म्हणायचे?
एऱ्हवीं तरी महद्ब्रह्म । यालागीं हें ऐसें नाम । जे महदादिविश्राम । शालिका हें ॥67॥
सहज विचार करून पाहिले तर महतत्वादिक तत्वांना हे विश्रांतिस्थान असल्यामुळे या अज्ञानाला महद्ब्रह्म असे नाव आहे.
68-14
विकारां बहुवस थोरी । अर्जुना हेंचि करी । म्हणौनि अवधारीं । महद्ब्रह्म ॥68॥
अर्जुना, हेच विकारांना पुष्कळसे वाढवते म्हणून हे महद्ब्रह्म आहे असे समज.
69-14
अव्यक्तवादमतीं । अव्यक्त ऐसी वदंती । सांख्याचिया प्रतीती । प्रकृति हेचि ॥69॥
अव्यक्तवादि लोकांच्या मताप्रमाणे याला अव्यक्त असे म्हणतात व सांख्यांच्या अनुभवाप्रमाणे यालाच प्रकृती असे म्हणतात.
70-14
वेदांतीं इयेतें माया । ऐसें म्हणिजे प्राज्ञराया । असो किती बोलों वायां । अज्ञान हें ॥70॥
हे बुद्धिमंतांच्या राजा अर्जुना, वेदांती याला माया असे म्हणतात. उगीच पाल्हाळ किती करायचा? तर हे बोलणे राहू दे. (थोडक्यात सांगायचे म्हणजे) हे अज्ञान आहे.
71-14
आपला आपणपेयां । विसरु जो धनंजया । तेंचि रूप यया । अज्ञानासी ॥71॥
अर्जुना आपला आपल्याला जो विसर पडला म्हणजे आपण आपले स्वकीय आत्मस्वरूप विसरणे तेच या अज्ञानाचे रूप आहे.
72-14
आणिकही एक असे । जें विचारावेळे न दिसे । वातीं पाहतां जैसें । अंधारें कां ॥72॥
या अज्ञानाचा आणखी एक स्वभाव असा आहे की ज्याप्रमाणे दिव्याने अंधार पाहू गेले असता तो दिसत नाही, त्याप्रमाणे (अज्ञान) विचाराच्या वेळी दिसत नाही.
73-14
हालविलिया जाय । निश्चळीं तरी होय । दुधीं जैसी साय । दुधाची ते ॥73॥
ज्याप्रमाणे दुधाची साय दूध निश्चल असताना दिसते व दूध ढवळले असता दिसेनाशी होते
74-14
पैं जागरु ना स्वप्न । ना स्वरूप अवस्थान । ते सुषुप्ति कां घन । जैसी होय॥74॥
ज्यामधे जागेपणा नाही व स्वप्न नाही अथवा स्वरूपस्थिती नाही अशी गाढ सुषुप्ती असते.
75-14
कां न वियतां वायूतें । वांझें आकाश रितें । तया ऐसें निरुतें । अज्ञान गा ॥75॥
अथवा अर्जुना, वायू उत्पन्न होण्यापूर्वी आकाश जसे निष्फळ रिकामे असते, त्यासारखे खरोखर अज्ञान आहे. (जेथे यथार्थस्वरूपाचे ज्ञान नाही अथवा विपरीत देहादिकांचे भाव नाही, अशी जी स्फुरणविरहित अवस्था, त्यासच अज्ञान म्हणावयाचे.
Sartha Dnyaneshwari Chapter 14th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay ChaudavaSampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 14 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा संपूर्ण
