सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ३५१ ते ३७५ पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, ,

351-13
तैसें जयाचिया ठायीं । न साहणें काहींचि नाहीं । आणि साहतु असे ऐसेंही । स्मरण नुरे ॥351॥
त्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी सहन न करणे हे कधीच नसते आणि आपण सहन करीत आहोत अशी आठवणही ज्याचे ठिकाणी रहात नाही,
352-13
आंगा जें पातलें । तें करूनि घाली आपुलें । येथ साहतेनि नवलें । घेपिजेना ॥352॥
जे जे काही सुखदु:खादि भोग शरीराला प्राप्त होतात ते सर्व आपले स्वरूपच आहे असे तो समजतो व म्हणून आपण अलौकिक असे काही सहन करतो असा अभिमानाचा पगडा त्याचेवर बसत नाही.
353-13
हे अनाक्रोश क्षमा । जयापाशीं प्रियोत्तमा । जाण तेणें महिमा । ज्ञानासि गा ॥353॥
हे प्रियोत्तमा अर्जुना, दात, ओठ न चावता स्वभावत:च असलेली ही क्षमा ज्याच्या ठिकाणी असते त्या पुरुषाच्या योगाने ज्ञानास मोठेपण प्राप्त होते असे समज.
354-13
तो पुरुषु पांडवा । ज्ञानाचा वोलावा । आतां परिस आर्जवा । रूप करूं ॥354॥
अर्जुना तो पुरुष ज्ञानाचे जीवन आहे. आता आर्जवाचे स्वरूप तुला सांगतो ऐक.
355-13
तरी आर्जव तें ऐसें । प्राणाचें सौजन्य जैसें । आवडे तयाही दोषें । एकचि गा ॥355॥
अर्जुना, तर ज्यास आर्जव म्हणून म्हणतात ते असे आहे की ज्याप्रमाणे प्राणाचे प्रेम कोणासंबंधीही असेना का? ते सर्वांवर एकसारखेच असते.

356-13
कां तोंड पाहूनि प्रकाशु । न करी जेवीं चंडांशु । जगा एकचि अवकाशु । आकाश जैसें ॥356॥
अथवा सूर्य जसा तोंड पाहून प्रकाश करीत नाही किंवा आकाश जसे सर्व जगाला सारखीच जागा देतो.
357-13
तैसें जयाचें मन । माणुसाप्रति आन आन । नव्हे आणि वर्तन । ऐसें पैं तें ॥357॥
त्याप्रमाणे ज्याचे मन निरनिराळ्या माणसांशी निरनिराळे नसते आणि ज्याची वागणूकही अशा प्रकारची असते
358-13
जे जगेंचि सनोळख । जगेंसीं जुनाट सोयरिक । आपपर हें भाख । जाणणें नाहीं ॥358॥
की सर्व जगच त्याच्या ओळखीचे आहे, त्याचे जगाशी फार जुने नाते आहे आणि आपले व परके ही भाषा तो जाणत नाही
359-13
भलतेणेंसीं मेळु । पाणिया ऐसा ढाळु । कवणेविखीं आडळु । नेघे चित्त ॥359॥
त्याचे वाटेल त्याच्याशीही पटते आणि पाण्याच्या सारखी ज्याची वागण्याची रीत असते आणि कोणाही विषयी त्याचे चित्त विकल्प घेत नाही.
360-13
वारियाची धांव । तैसे सरळ भाव । शंका आणि हांव । नाहीं जया ॥360॥
वार्‍याचे वहाणे जसे सरळ असते तसे ज्याच्या मनातील विचार सरळ असतात आणि ज्याला संशय व लोभ नसतात,

361-13
मायेपुढें बाळका । रिगतां न पडे शंका । तैसें मन देतां लोकां । नालोची जो ॥361॥
आईपुढे येण्यास मुलास जशी शंका वाटत नाही, त्याप्रमाणे आपल्या मनातील विचार लोकांना सांगताना तो मागेपुढे पहात नाही.
362-13
फांकलिया इंदीवरा । परिवारु नाहीं धनुर्धरा । तैसा कोनकोंपरा । नेणेचि जो ॥362॥
ज्याप्रमाणे उमलेल्या कमलाला आपला सुवास जसा मर्यादित जागेत दाबून ठेवता येत नाही, त्याप्रमाणे ज्याचा जीव कोनाकोपरा जाणतच नाही. (म्हणजे ज्याच्या अंत:करणाला गुप्त जागा माहीत नसते.
363-13
चोखाळपण रत्नाचें । रत्नावरी किरणाचें । तैसें पुढां मन जयाचें । करणें पाठीं ॥363॥
रत्नाचा निर्मळपण असतो, (पण) त्याच्यापेक्षा त्याच्या किरणांचा निर्मळपणा अधिक पुढे असतो, त्याप्रमाणे ज्याचे मन पुढे असते व करणे पाठीमागून असते.
364-13
आलोचूं जो नेणे । अनुभवचि जोगावणें । धरी मोकळी अंतःकरणें । नव्हेचि जया ॥364॥
जो कोणत्याही बाबतीत आगाऊ विचार करण्याचे जाणतच नाही व जो आत्मानुभावात तृप्त असतो, जो आपल्या मनाने कशाशी चिकटतही नाही व कशाचा मुद्दाम त्यागही करत नाही.
365-13
दिठी नोहे मिणधी । बोलणें नाहीं संदिग्धी । कवणेंसीं हीनबुद्धी । राहाटीजे ना ॥365॥
ज्याची दृष्टी कपटी (अथवा ओशाळी) नसते व ज्याचे बोलणे संशययुक्त नसते आणि कोणाशीही हलकट बुद्धीने वागत नाही.


366-13
दाही इंद्रियें प्रांजळें । निष्प्रपंचें निर्मळें । पांचही पालव मोकळे । आठही पाहर ॥13-366॥
ज्याची दहाही इंद्रिये सरळ, निष्कपट आणि शुद्ध असतात.
367-13
अमृताची धार । तैसें उजूं अंतर । किंबहुना जो माहेर । या चिन्हांचें ॥367॥
अमृताच्या धारेप्रमाणे त्याचे अंत:करण सरळ असते. फार काय सांगावे? जो या चिन्हाचे माहेर असतो.
368-13
तो पुरुष सुभटा । आर्जवाचा आंगवटा । जाण तेथेंचि घरटा । ज्ञानें केला ॥368॥
अर्जुना, तो पुरुष आर्जवाची मूर्तीच आहे व तो पुरुष ज्ञानाने आपले रहावयाचे ठिकाण केले आहे असे समज.
369-13
आतां ययावरी । गुरुभक्तीची परी । सांगों गा अवधारीं । चतुरनाथा ॥369॥
आचार्योपासना
आता यानंतर गुरुभक्तीचा प्रकार सांगू. हे चतुरांच्या राजा तो तू ऐक.
370-13
आघवियाचि दैवां । जन्मभूमि हे सेवा । जे ब्रह्म करी जीवा । शोच्यातेंहि ॥370॥
ही गुरुसेवा सर्व भाग्यांची उत्पन्न होण्याची जमीन आहे व जी सेवा शोकग्रस्त जीवाला ब्रह्म करते.

371-13
हें आचार्योपास्ती । प्रकटिजैल तुजप्रती । बैसों दे एकपांती । अवधानाची ॥371॥
ती गुरुभक्ती आता तुला स्पष्ट सांगितली जाईल. मात्र तू तिकडे एकसारखे लक्ष दे.
372-13
तरी सकळ जळसमृद्धी । घेऊनि गंगा निघाली उदधी । कीं श्रुति हे महापदीं । पैठी जाहाली ॥372॥
तरी सर्व जलसंपत्ती घेऊन गंगा ही जशी समुद्रात प्रवेश करते अथवा वेद जसे ब्रह्मपदात प्रविष्ट होतात,
373-13
नाना वेंटाळूनि जीवितें । गुणागुण उखितें । प्राणनाथा उचितें । दिधलें प्रिया ॥373॥
अथवा आपल्या जीवासह व आपल्या अंगच्या गुणावगुणांसह सरसकट आपल्या स्वत:ला पतिव्रतेने उत्तम प्रकाराने आपल्या पतीस दिले,
374-13
तैसें सबाह्य आपुलें । जेणें गुरुकुळीं वोपिलें । आपणपें केलें । भक्तीचें घर ॥374॥
त्याप्रमाणे ज्याने आपले अंतर मनादिक व बाह्य इंद्रियादिक गुरुकुळाला अर्पण केले व आपल्याला गुरुभक्तीचे घर केले आहे,
375-13
गुरुगृह जये देशीं । तो देशुचि वसे मानसीं । विरहिणी कां जैसी । वल्लभातें ॥375॥
ज्याप्रमाणे विरहिणीचे चित्तात प्रियकर असतो, त्याप्रमाणे ज्या देशात गुरूचे घर असते, तो देश ज्याच्या मनामधे असतो.

, ,
✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading