चारधाम पदभ्रमण यात्रा बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, व हेमकुंड साहेब भाग – ३

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

पुष्प – ३

ऋषिकेश होऊन पुढे निघालो. पहाटे पावणे चार वाजता रामानंद आश्रम सोडला. गल्लीबोळातून चालत असताना, १-२ श्वान अंगावर धावून आले. मी शांतपणे चालत राहिलो. मी निरुपद्रवी आहे हे लक्षात आल्यावर ते शांत झाले. वाटेत एक-दोन रिक्षाचालक ग्राहकांची वाट पहात बसले होते. गुगल बाबा की जय. तो दाखवत असलेल्या रस्त्यावरून गंगा किनार्‍यावरुन चाललो होतो. दूरवर कुठेतरी श्वानांचा आवाज येत होता. किनाऱ्यावरून चालताना उजव्या हाताला गंगामैयाचा खळखळ आवाज शांततेत जाणवणारा. तर डाव्या हाताला आश्रम, हॉटेल, लॉजेस. उजव्या हाताला जानकी सेतू, पादचारी आणि दुचाकींसाठी बांधलेला. अंधारात त्याच्यावरील दिवे लक्ष वेधून घेत होते. बसण्यासाठी बांधलेल्या तसेच गंगा किनारी काही यात्रेकरू उघड्यावर झोपले होते. पहाटेच्या वेळी रस्त्यावर मी एकटाच.

रामानंद आश्रम मनाला भावला. दिखाऊपणा नाही, भपका नाही‌. तेथे राहण्याचा योग आला. वेळ आली राहिलो, आनंद घेतला, निघालो… आपल्या सर्वांना नदी, नाले, झरे, वारा यांच्यासारखे वाहते राहता यायला पाहिजे. वाहणारे पाणी स्वच्छ राहते. मनाला भावते. रोगराई होत नाही. बंद खोलीतील हवा कुबट होते. तसेच माणसाने सुद्धा सतत वाहते राहायला पाहिजे. याचा अर्थ संसार सोडून संन्यासी व्हावे असे नाही. तर घराबाहेर पडून प्रवास
करण्याऐवजी शरिराचे चोचले पुरवणाऱ्या ठिकाणी थांबून, अडकून पडू नये. नाहीतर एक प्रपंच सोडायचा आणि दुसरा तयार करायचा असे होते. हे लक्षात येत नाही, हे खरे.
चरैवेति चरैवेति…
चालत राहा… चालत राहा…

चालताना वाटेत पेड पार्किंग बाहेर बसलेल्या दोघांना नरेंद्र नगर चा रस्ता विचारला. त्यांनी दाखवलेल्या दिशेने चालू लागलो. त्यातला एक जण म्हणाला बाबूजी नरेंद्रनगर तो यहा से बहुत दूर है टॅक्सी करनी पडेगी. मी ठिक आहे असे म्हणालो आणि पाऊल उचलले. पुढे चढाचा रस्ता लागला. गुगल बाबांनी जिथे वळायला सांगितले होते तिथे रस्त्यावर पाणी जाण्यासाठी चारी बांधली होती आणि त्याच्या मागे जंगलात जाणारी पायवाट दिसत होती. गुगल बंद केले व तसाच पुढे चालत राहिलो. रस्त्यावर विचारायला कोणी नव्हते. पुढे गेल्यावर हायवेवर पाटी लागली नरेंद्र नगर. डाव्या हाताला वळलो. आपले लक्ष नरेंद्रनगर होते. इथून पुढे चढाचा रस्ता… घाट… घाट आणि घाट. हिमालयात जाण्याच्या दृष्टीने एक एक पाऊल टाकायला सुरुवात केली. समोरून मागून वाहने चालली होती. अर्धा तास चालल्यानंतर एका ठिकाणी तीन रस्ते येऊन मिळाले होते. तेथे पोलिसांनी पुढे जाणारा रस्ता बंद केला होता. चौकशी केल्यावर पुढे दरड कोसळल्यामुळे रस्ता बंद होता व राडारोडा उचलून रस्ता क्लिअर करण्याचे काम चालू होते. त्यामुळे रस्ता बंद केल्याचे त्यांनी सांगितले. थांबलेल्या वाहनातील, रात्रभर प्रवास करून आलेले प्रवासी बराच वेळ वाहन थांबून ठेवल्यामुळे त्रस्त होऊन गाडीतून खाली उतरून येरझाऱ्या मारत होते. पोलीस चेक पोस्ट शेजारीच काली मातेचे मंदिर होते. सकाळच्या शांततेत कोणीतरी घंटा वाजवली त्याचा आवाज निरव शांततेत छान घुमला. मी चालत चाललो आहे, असे सांगितल्याने मला पुढे जाण्याची परवानगी पोलिसांनी दिली.पोलिसांची आज्ञा शिरसावंद्य मानून मी पुढे निघालो.

माझ्यासोबत एका हातात काठी व एका हातात पाण्याचा कॅन घेऊन एक जेष्ठ नागरिक पुढे चालले होते. झप झप चालून त्यांना गाठले आणि चौकशी केली. त्यावर त्यांनी मी व्यायामाला चाललो असून त्यांचे नाव केपीएस नेगी असे त्यांनी सांगितले . हातातला कॅन, लावलेल्या झाडाला पाणी घालण्यासाठी घेऊन जात आहे असे ते म्हणाले नेगी हे आडनाव ऐकल्यावर मला पूर्वी भारतीय हॉकी संघात असलेल्या मीर रंजन नेगी या गोलकीपर ची आठवण झाली. चालताना ते हातातील काठी रेलींगवर आपटत आवाज करत चालले होते. याचे कारण विचारले असता रात्री रस्त्यावर हत्ती येतात‌. त्यांना पळवण्यासाठी मी काठीचा रेलींगवर आवाज करतो असे त्यांनी सांगितले. ऐकून माझी दातखीळ बसली.
काठीच्या आवाजाने बाकी जंगली पशु पळून जातात. पण हत्ती मात्र जाम हलत नाही. तो ठाम उभा राहतो व प्रसंगी अंगावर धावून येतो अशी पुष्टीही त्यांनी जोडली. हे गृहस्थ दहा मिनिटात परत जाणार होते. पुढे अंधारात घाट रस्त्यावर जंगलातून मला एकट्यानेच प्रवास करायचा होता. सगळाच उत्तराखंडाच्या घाट रस्ता जंगलाचा आणि प्राणी असलेला असा आहे.
हा प्रसंग माझ्यावर आला असता तर सामान टाकून पळून जाण्याशिवाय माझ्या हातात दुसरे काही नव्हते. बघू या. गुरुदेव दत्त म्हणालो, जे येईल त्याला सामोरे जाण्याचे ठरवले आणि मी रेलींगवर काठी आपटत पुढे निघालो‌.

नरेंद्र नगर, हिंडोलाखाल, दुवाधार, आगराखाल, फकोट, बेमुंडा, खाडी, नांगणी, चंबा ही रस्त्यातील काही गावांची नावं. गूगल बाबांनी दाखवलेल्या दोन गावाच्या मधील अंतर आणि प्रत्यक्षात अंतर यात फरक असल्याचे लक्षात आले. चंबाला नाष्टा केला चहा पिताना टपरीवाल्याशी बोलताना तो म्हणाला की, येथून गंगोत्री दोनशे किलोमीटर आहे. नवीन धरण बांधल्यामुळे आधीचा रस्ता पाण्याखाली गेला. त्यामुळे गंगोत्रीला जाताना तीस ते पस्तीस किलोमीटरचा फेरा पडतोय व त्यामुळे अंतर वाढले आहे अशी माहिती त्यांनी टपरी चालकाने मला पुरवली.

उत्तराखंड म्हणजे डोंगरी भाग. गंगोत्रीला जाताना जास्त चढ उतार कमी. या राज्यात अनेक डोंगर रांगा आहेत. येथील सर्वात मोठे शिखर नंदादेवी. आपण सुरुवात करतो छोट्या डोंगरातून पुढे हळूहळू गगनचुंबी सुळके स्वागतासाठी उभे असतात. त्यानंतर हळूहळू दिसू लागतात बर्फाच्छादित डोंगर आणि त्यांच्या अंगावर वाढलेले सूचिपर्णी वृक्ष.

या भागात बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन ( BRO ) आणि स्थानिक प्रशासन यांचे रस्ता बांधणी व देखभाल आणि दुरुस्ती यांचे काम ३६५ दिवस चालूच असते. कोसळलेल्या दरडी उचलणे, रस्ता मोकळा करणे, वाहून गेलेला रस्ता पुन्हा नीट करणे, पूल दुरुस्त करणे, कोसळण्याची शक्यता असलेल्या दरडी उतरवणे अशी अनेक कामे ते अविश्रांत करत असतात. सर्व रस्त्यावर जागोजागी पाट्या लावलेल्या दिसून येतात येथे थांबू नका, वाहन उभे करू नका, दरड कोसळण्याची शक्यता इत्यादी… वाटेत एका ट्रकचा मागचा ॲक्सल तुटून , मागील दोन चाके वेगळी झाली होती.

प्रतिकूल परिस्थितीत जगण्याची धडपड चालू आहे. जसे जसे आपण पहाडी भागात आत जातो तसे तसे सर्व गोष्टींचे परिमाण बदलत जातात उपलब्ध साधन संपत्ती, सुविधा या कमी होत जातात. या भागात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्यात जमा आहे. सर्व भार खाजगी वाहतूक व्यवस्थेवर सोपवलेले दिसतो. सहाजिकच नफेखोरीसाठी जास्त प्रवासी भरून वाहने निघणे यावर कंत्राटदारांचा भर असतो. पंचवीस क्षमतेच्या बसमध्ये ४५ लोक भरले जातात. हात दाखवल्यावर वाहन उभे राहते. भाजीपाला, दूध, फळे, किराणामाल दूरवरून आणावा लागतो.
१०० किलोमीटरच्या परिसरात एखादे कॉलेज. इंजीनियरिंग कॉलेज राज्याच्या मुख्यालयामध्ये म्हणजे डेहराडूनला. आरोग्य सेवांची व्यवस्था तर विचारूच नका. जिल्हा आरोग्य केंद्रांमध्ये एक पुरुष व एक महिला डॉक्टर. तेच सर्व आजारांवर उपचार करणार. बाळंतपणात गुंतागुंत निर्माण झाल्यास पेशंटला सुरक्षित रुग्णालयात हलवे पर्यंत रुग्ण दगावणावरच. एकट्या पुणे शहरात ७० हून अधिक इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत असे समजते. आपला आदिवासी भाग व येथील दुर्गम डोंगरी भाग यात फार फरक नाही. स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे झाली तरी पण आदिवासी आणि डोंगरी लोक अजून दुर्लक्षितच आहेत असे खेदाने नमूद करावेसे वाटते. दोन वर्षांच्या कोव्हिडच्या कालावधीत इथे काय परिस्थिती झाली आहे याचा आपण अंदाज तरी बांधला आहे का ?

गुरुदेव दत्त…
🙏

क्रमशः …

©️ लेखक व वाटसरू
उदय
नागनाथ
मोबाईल नंबर ९४२२०८१०८०
udaynaganath
@dd819

,

बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, जमुनोत्री पायी यात्रा वर्णन

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *