चारधाम पदभ्रमण यात्रा बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, व हेमकुंड साहेब भाग – ६

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

पुष्प – ६

एक वळण घेऊन आपण भोजबासात पोहोचतो आणि आपल्यासमोर येते… खाली विस्तीर्ण पटांगण… त्याच्या एका बाजूला लाल बाबांचा मोठा आश्रम आणि पलीकडील बाजूस गढवाल मण्डल विकास निगम यांचे रेस्ट हाऊस… पोलिस काॅर्टर्स….आणि वन खात्याची चौकी आणि शासकीय रेस्ट हाऊस…आणि
त्याच्या पलीकडे अथांग आकाश हिमालयातील शिखरे व मधूनच वाहताना दिसणारी गंगा नदी… खाली उतरण्यापूर्वी आम्ही तिथे तयार केलेल्या शेडमध्ये बसलो. भोजबासाच्या पार्श्वभूमीवर फोटो काढून घेतले. मागून कमल आम्हाला जॉईन झाला. तो पाच मिनिटे बसला, काही सिमेंट गोण्या लादलेली खेचरे आमच्या समोरून खाली उतरू लागली. त्यांच्या पाठोपाठ आम्ही हळूहळू खाली उतरलो.

अंधार पडायच्या आत, तंबू उभारणे, सामान बाहेर काढणे, संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करणे गरजेचे होते. कमल जाऊन वनखात्याच्या संबंधित कर्मचाऱ्यांशी बोलून आला. त्याचे नाव राकेश रतोडी त्यांनी सांगितलेल्या जागी आम्ही तंबू उभा केला, सामान बाहेर काढले आणि कमलने चहाची तयारी सुरू केली. संध्याकाळी जेवणाला काय घेणार विचारले, सर्वानुमते खिचडी खायची ठरले. उरलेले सामान तंबूमध्ये ठेवले. त्यातल्या आता दोन गोष्टी महत्त्वाच्या सांगायच्या राहिल्या. पहिली म्हणजे आम्हाला तंबू देणाऱ्यानी सांगितले होते की, चार माणसांचा तंबू देतो. प्रत्यक्षात त्याने आम्हाला तीन माणसांसाठी असलेला तंबू दिला. आणि तंबू उभारल्यानंतर लक्षात आले की यामध्ये फक्त दोनच माणसे झोपू शकतात. गडबडीमध्ये सगळे नियोजन करण्यामुळे असे घडले. दुसरी गोष्ट म्हणजे त्या तंबूचे बाहेरचे दोन राॅडपैकी एक राॅड नादुरुस्त होता. बाहेरच्या कव्हरची चेन लागत नव्हती. बाहेरची चेन लागत नसल्यामुळे आत मध्ये भुरभुर वारे शिरत होते. ही सगळी परिस्थिती बघता तंबूत राहणे अवघड आहे हे लक्षात आले. तेवढ्यात श्री राकेश रतोडी तेथे आले आणि सर्व काही ठीक आहे का चौकशी करत होते. त्यांना आमची अडचण सांगितल्यावर , समोर पोलिसांची राहण्याची खोली रिकामी आहे तिथे तुम्ही राहू शकता, फक्त साफसफाई करून घ्या असे सांगितले. आम्ही खोली साफ करायला घेतली. आणि आत मध्ये निवासासाठी व्यवस्था केली. चहा बनवला होता. मस्त चहा, बिस्कीटांवर ताव मारला आणि आम्ही फेरफटका मारायला बाहेर पडलो.

या सगळ्यात एक सांगायचे राहिले मला वाटेत एक मुलगा भेटला होता. त्याने चौकशी केली की तुम्ही कुठे चालला आहात ? मी गंगोत्री, गोमुखला चाललो असल्याचे सांगितल्यावर, तुम्ही एकटे असाल तर आपण दोघांनी गोमुखचा ट्रेक करायचा का, म्हणून विचारले. मी हो म्हटलं. तो विद्यार्थी असल्याने बजेट ट्रेक करीत चालला होता. तो वैद्यकीय शाखेचा विद्यार्थी होता आणि सुट्टीच्या कालावधीत ट्रेक करण्यासाठी बाहेर पडला होता. आम्ही बरोबर प्रवास करायचे ठरवले. आम्ही एकत्र गोमुखला पोहोचलो होतो. त्याचे नाव शशांक शेखर आणि तो पाटण्यामधील इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथे वैद्यकीय शिक्षण घेत आहे.

मधल्या पटांगणात काही तंबू भरण्याचे काम सुरू झालेले दिसले. उत्सुकतेने चौकशी करण्यासाठी शशांक तिकडे गेला. तर मी आश्रमामध्ये गेलो. अजून भाजी, किराणामाल, तेल, चहाचे साहित्य, केरोसीन इत्यादी वस्तू न पोहोचल्यामुळे आश्रम अभ्यागतांच्या सेवेसाठी अजून तयार झालेला नव्हता. बेड लावणे चालू होते. जनरेटर तपासणी, वायरिंग दुरूस्ती इ कामे आश्रमात सुरू होती. दोन दिवसात सर्व सामान पोहोचेल असे तेथील व्यवस्थापक राजवीर यांनी मला सांगितले. गप्पा मारत असतानाच त्यांनी मला गरम गरम पाणी आणि मसाला घातलेला छान ब्लॅक टी आणून दिला. आश्रम आणि येथील व्यवस्थेविषयी राजवीर आणि तेथील उपस्थित त्यांच्या सहकाऱ्यांशी छान गप्पा झाल्या. खाली मैदानात आलेल्या लोकांची चौकशी करून आणि जर्मन गिर्यारोहकांशी बोलून शशांक आश्रमात आमच्या गप्पांमध्ये रुजू झाला. जर्मनीहून आलेले तीन गिर्यारोहक भागीरथी शिखर सर करण्यासाठी आले होते. त्यांचेसाठी तंबू उभा करण्याचे काम त्यांनी आणलेले लोक करीत होते. त्या तिघा गिर्यारोहकांमध्ये एक मुलगी होती आणि आश्चर्य वाटण्याची गोष्ट म्हणजे ते तिघेही कोणताही गाईड न घेता भागीरथी- दोन हे शिखर सर करणार होते, अशी माहिती शशांकने मला पुरवली. दिवसभर चालून थकलो होतो. त्यामुळे जाऊन विश्रांती घ्यावी असे ठरवले. आश्रमातील सेवेकऱ्यांची परवानगी घेऊन आम्ही तंबू लावलेल्या ठिकाणी प्रयाण केले.

शशांकला उघड्यावर तंबूत राहण्याचा आनंद व अनुभव घ्यायचा होता. तर मी आणि कमलने खोलीत झोपण्याचे ठरवले. त्या दिवशी सायंकाळी काय मेनू करू असे कमलने विचारले त्यावर गरमागरम खिचडी डाळ घालून कर असे आम्ही त्याला सांगितले. हळूहळू सूर्य मावळला जोराचा वारा सुटला होता. अंधार पडायच्या आत जेवून घेऊ असे ठरवून आम्ही सव्वा सात वाजता गरमागरम डाळ खिचडीचे जेवण केले. हळूहळू. आकाशामध्ये तारे चमकू लागले. थोड्याच वेळात सर्व आकाश चांदण्यांनी भरून गेले आणि आसमंत अंधाराने… दोन दिवसांवर अमावस्या असल्यामुळे आकाशात चंद्रप्रकाश नव्हता. साडेसात वाजता अंधार पडल्यावर फक्त आकाशात चांदण्या, बाकी सगळीकडे अंधार. सगळे आजूबाजूचे डोंगर, भगीरथीची सर्व शिखरे दिसेनाशी झाली. दिवसभर चालून थकल्यामुळे आम्ही निद्रादेवीच्या अधीन होण्याचे ठरवले. झोपण्यासाठी मी स्लीपिंग बॅग उघडली. आत मध्ये शिरलो परंतु माझी उंची आणि माझ्या छातीची रुंदी यामुळे मला ती स्लीपिंग का पुरत नव्हती. त्याची चेन लागत नव्हती. एकूण अडचणच होती. रात्रभर मी त्या स्लीपिंग बॅग मध्ये झोपण्याचा प्रयत्न करीत होतो. पण यशस्वी होऊ शकलो नाही. डोक्यावर थर्मल कॅप, अंगात झिरो डिग्री चे जर्किन, पायात मोजे यामुळे त्या थंडीत मला फार त्रास झाला नाही. पण झोप मात्र लागू शकली नाही. रात्रभर तळमळत काढली.

संजीव कुमार सेमवाल ज्या रेंजर साहेबांशी बोलणार होते, ते श्री पनवार साहेब योगायोगाने आज भोजबासात मुक्कामी होते. सोबत त्यांचे वरिष्ठ व जिल्हा वनाधिकारी श्री पांडे साहेब पण होते. दुसऱ्या दिवशी ते तपोवनला जाणार होते. तुमच्याबरोबर आम्ही पण येतो अशी विनंती त्यांना केली असता, उद्या सकाळी आठ वाजता तयार व्हा, साहेबांशी बोलू आणि आमच्याबरोबर चला असे आश्वासन त्यांनी दिले.
परंतु श्री पांडे साहेब यांनी आम्हाला, तुमचे परमिट गोमुख पर्यंत आहे. त्यामुळे तुम्हाला मी नियमबाह्य रीतीने माझ्याबरोबर तपोवनला नेणार नाही असे सांगितले. सकाळी घाईगडबडीत उठून आवरून मॅगीचा नाश्ता करून रस्त्यात करण्यासाठी चहाचे साहित्य, बिस्किटे घेऊन आम्ही तयार होऊन तयार होतो. त्यांच्या नकारानंतर आम्ही मुकाट्याने परत आलो.
ते सर्व ट्राॅलीतून नदी ओलांडून व तपोवनला गेले आम्ही आम्ही गोमुख म्हणजे गंगेचे उगमस्थान असलेल्या ग्लेशीयरकडे प्रयाण केले.

गोमुख ला जाताना आपल्याला उत्तर दिशेने, गंगा नदीच्या डाव्या हाताने जावे लागते. गोमुख परमिट धारकांना नदी ओलांडायची परवानगी नाही. तर तपोवनला जाणाऱ्यांना ट्रॉलीतून नदी ओलांडण्याची परवानगी आहे. ही ट्राॅली हा एक भयानक प्रकार आहे. त्या ट्राॅलीत बसायचे. पलिकडच्या काठावर जाण्यासाठी ट्राॅलीला लावलेल्या दोऱ्या ज्या काठावर जायचे आहे तेथून कोणीतरी ओढाव्या लागतात.दोरी ओढायला पुरेशी माणसं नसतील तर बोंबच.
आम्ही हळू हळू चालत गोमुखच्या दिशेने निघालो. भोजबासा ते गोमुख हे चार किलोमीटरचे अंतर आहे. रस्त्यात एक लोटेसे पण सुंदर तळे लागले. हिरव्या रंगात सजले होते. त्या तळ्याच्या पृष्ठभागावर पातळ्या बर्फ तयार झाला होता. वाटेत येताना चहा पिण्यासाठी म्हणून चहा साखर दूध बरोबर घेतले. तो चहा आम्ही येथील पाण्यात तयार केला. थंडगार पाणी प्यायलो व पुढे निघालो. वाटेत एक भला मोठा खडक लागला. त्यावर १८७१ मध्ये ग्लेशियर येथे होते असे लिहिले आहे. याचा अर्थ त्या खडकापासूनचे सध्या असलेल्या ग्लेशियर चे अंतर पाहता आपण १५१ वर्षात सुमारे दोन किलोमीटर ग्लेशियरचा -हास केला आहे..
दुर्दैवी आहे हे…

दोन अडीच किलोमीटर चालल्यानंतर असे लक्षात आले की पुढे जाण्याचा रस्ता शिल्लक नाही. याचे कारण शोधले असता असे लक्षात आले की दरड कोसळून पुढे जवळजवळ दीड किलोमीटर एवढा रस्ता दरडीखाली गाडला गेला आहे. तरीही आम्ही पुढे अर्धा-पाऊण तास दगडांवरून उड्या मारत काठाकाठाने पुढे जात होतो. एका ठिकाणी मात्र एक काळा खडक ४५ अंशाच्या कोनात नदीच्या काठावर उभा होता व तो पार करायचा होता. मला तो पार करणे शक्य नसल्यामुळे, मी शशांक आणि कमलला सांगितले तुम्ही दोघे जण पुढे जा. मी वाटेत चहाचे साहित्य ठेवलेल्या ठिकाणी जाऊन थांबतो. ते पुढे गेले व मी साहित्य ठेवलेल्या ठिकाणी येऊन बसलो. मी तेथे येऊन बसलो असताना डोक्यावरून साधारणश बादलीच्या आकाराचा एक दगड डोंगरावरून सुटला आणि गडगडत माझ्या दिशेने खाली येऊ लागला. साहित्य ठेवलेल्या दगडाच्या आडोशाला व खेटून मी उभा राहिलो. तो दगड अतिवेगाने खाली येऊन मी लपलेल्या दगडावर आपटून दणकन नदीत जाऊन पडला. असे प्रसंग येऊ शकतात त्यांची प्रचिती आली होती.

शशांक आणि कमल दोघांनाही फार पुढे जाता आले नाही. त्याचे कारण, गंगा नदी पुढे अगदीच डोंगराला खेटून आता वाहत आहे आणि पाण्यातून पलीकडे जाणे हे शक्य नाही. कारण अति थंड पाण्यामुळे पाय बधिर होतात आणि पुढे पाऊल टाकले शक्य होत नाही. त्यामुळे पाण्यातून नदी क्रॉस करण्याचे धाडस सहसा कोणी करत नाही. दोन दिवसांपूर्वी एक सन्यासी नदी ओलांडताना नदी पडला व जवळपास ३० फूट वाहात गेला.
येथील अजून एक वैशिष्ट्य म्हणजे रात्रभर ग्लेशियर वितळत नाहीत, त्यामुळे त्याचे पाणी नदीत येऊन मिळसत नाही. या कारणामुळे पहाटे अगदी लवकर नदीला पाणी नसते. त्यावेळी आपण गंगा नदी ओलांडू शकतो. पण एकदा दिवस उजाडला की ग्लेशियर वितळायला सुरुवात होते आणि नदीचे पाणी वाढते. तसेच दुपारी २ नंतर जोरदार वारा सुटतो, धूळ उडते. वाऱ्यामुळे डोंगरावरील दगड, मोठे बोल्डर्स धडाधडा खाली येऊ लागतात. त्यामुळे पहाटे अगदी लवकर उठून ट्रेकला निघणे आणि दुपारी दोन च्या आत परत येणे असा अलिखित संकेत येथे आहे आणि तो कटाक्षाने पाळला जातो. तसेच दुपारी दोन नंतर येथील हवामान अचानक बदलते. ढग येतात, वारा सुटतो, पाऊसही पडतो त्यामुळे या सगळ्यात अडकायचे नसेल आणि आपला ट्रेक सुखरूप पार पडत असेल तर सकाळी लवकर निघून दुपारी दोन च्या आत परत मुक्कामी येणे श्रेयस्कर ठरते.

आम्हाला गोमुखच्या जवळ जाऊन पाहता आले नाही. त्यामुळे मन थोडे खट्टू झाले होते. परंतु आमच्याकडे उद्याचा दिवस होता आणि उद्या सकाळी निघून गोमुख तपोवन करून आम्हाला संध्याकाळपर्यंत गंगोत्रीला पोहोचणे शक्य होते

वनखात्याचे अधिकारी साडेसहाला गंगोत्री कडे परत निघाले. राकेश रतोडी यांना पटवून आम्ही ट्रॉलीतून पलीकडे जाऊन व गोमुखाच्या दिशेने कूच केले. दीड तासात आम्ही गोमुखला पोहोचलो. अगदी जवळून गोमुख पाहता आले. त्याच्या खालून येणारी गंगानदी डोळ्याने अनुभवली. बराच वेळ थांबून फोटो काढले. गोमुख हे ग्लेशियर हिंदुस्थानातले सर्वात मोठे ग्लेशियर असून त्याची गोमुख पासून मागे लांबी २५ किलोमीटर आहे असे सांगितले जाते. आम्ही गेलो तेव्हा ग्लेशियरवर धूर धुळीचा थर बसून ते काळसर झालेले होते. प्रत्यक्षात हिवाळ्यामध्ये अतिशय पांढरेशुभ्र असे ग्लेशियर असते आणि त्याच्यातून गंगा नदीचे पाणी झुळझुळ पाणी बाहेर येताना दिसते, असे मला आश्रमातील एका महात्म्यांनी सांगितले आणि त्यांच्या मोबाईल मधील व्हिडिओ देखील दाखवला. तेथून आम्ही तपोवन च्या दिशेने कूच केले. शेवटचा ५०० मीटरचा अतिशय अवघड असा हा टप्पा पार करणे फार जिकिरीचे आहे. तपोवनला पोचताना शेवटचा पाचशे मीटरच्या टप्पा अगदी छातीवरचा चढ आहे आणि तो टप्पा अगदी कस लावणारा असा ठरतो. तपोवनच्या पठारावर एका बाजूला शिवलिंग हे शिखर, समोर विस्तीर्ण पठार आणि समोर डाव्या हाताला आपल्याला भागिरथी एक दोन तीन शिखरे दिसतात. तेथे मौनीबाबा नावाच्या एका साधूची दगडातली कुटीआहे. गरज पडली तर मौनी बाबा त्यांच्या आश्रमात राहण्याची व्यवस्था करतात. चि मिहीर २०१६ मध्ये त्यांच्याच कुटीमध्ये राहिला होता. माझी योगायोगाने मौनी बाबांची गंगोत्रीला भेट झाली. भेटीत चि मिहिरच्या तपोवन भेटीचा मी त्यांना उल्लेख केला. त्यावर त्यांनी मिहीर म्हणजे तो रव्याचे लाडू घेऊन आला होता तो ना ? अशी आठवणही सांगितली. मला त्या मौनीबाबांच्या स्मरणशक्तीचे कौतुक वाटले. त्यांच्याबरोबर मी फोटो काढला‌… एक आठवण.

स्लीपिंग बॅग मध्ये झोप न येण्याचा अनुभव लक्षात घेता दुसऱ्या दिवशी रात्री मी लालबाबा यांच्या आश्रमात डाॅर्मेट्रीत राहण्याचा निर्णय घेतला.

सूर्यदयानंतर किरणे पडल्यानंतर शिवलिंग शिखर सोन्यासारखे चमकते ते बघण्यासाठी पहाटे लवकर उठून साडेचार वाजता गोमुख च्या दिशेने जाण्याचे मी कमलला सांगितले होते. त्याप्रमाणे पहाटे उठून आम्ही अंधारात सुमारे एक तासभर चालून योग्य जागा निवडून, सुर्यास्ताची वाट बघत बसून राहिलो. हळूहळू उजाडले सूर्याची किरणे सगळीकडे पसरू लागली. शिवलिंग शिखरावर पडलेली किरणे आणि त्या किरणांमुळे सोन्यासारखे चमकणारे शिवलिंग शिखर बघून डोळ्याचे पारणे फिटले. सकाळी त्या वेळी पाच वाजता मायनस सात डिग्री तापमान होते.
हळहळू शिखरापासून पायथ्यापर्यंत संपूर्ण शिवलिंग डोंगर हा सोन्यासारखा चमकू चमकू लागला. याच साठी केला होता अट्टाहास…
पाच मिनिटांचा व्हिडीओ काढताना माझी बोटे गारठून गेली होती. व्हिडिओ काढून झाल्यानंतर आपल्याला हाताला बोटे आहेत का नाहीत हे समजत नव्हते. परंतु एवढी यातायात करून, पोहोचून , थांबून जे पाहिजे होते ते पाहून झाले, व्हिडिओ शूटिंग केले, फोटो काढले… त्यामुळे मला आत्यंतिक समाधान वाटले. हळूहळू आजूबाजूचे सगळे डोंगर सूर्याच्या किरणांनी चमकू लागले. परंतु सर्वात आधी सूर्याची किरणे अंगावर लेवून चमकण्याचा मान शिवलिंग शिखराचा… त्याच्यावर सोन्याची सूर्याची किरणे पडणे व ते अलौकिक दृश्य बघणे यासारखा आनंद नाही…

शेवटच्या दिवशी सकाळी नाष्टा केला. चहा प्यायलो. तंबू आवरला, सगळे सामान भरले. तेल, कांदे, टोमॅटो, काही मसाले, मीठ हे काही सामान लालबाबा आश्रमात दिले आणि बारा वाजता लालबाबा आश्रमातील सर्व सेवेकरी, व्यवस्थापक, वनसेवक राकेश रतोडी तसेच बंगालचे एक साधू बाबा श्री उमाशंकर यांचा निरोप घेतला आणि निघालो. पहिला टप्पा पूर्ण केला. मागे वळून खालचा आश्रम, पटांगण समोरचा परिसर, डोंगर , बाजूने वाहणारी गंगा नदी, दूरवरचा गोमुखचा भाग सगळे डोळे भरून पाहून घेतले आणि गंगोत्रीच्या दिशेने पाऊल टाकले. यापेक्षा अधिक काळ थांबणे शक्य नव्हते आणि उद्दिष्टपूर्ती नंतर थांबण्याचे कारणही नव्हते…

हरिद्वारहून ऋषिकेशला पोहोचल्यानंतर माझा पाय दुखू लागला होता. उजव्या पायात टाचेच्या वरती आणि मध्य भागाच्या अलीकडे दुखत होते. हे मी गंगोत्रीहून चालत गोमुखला निघालो असताना शशांकला सांगितले. त्याच्यावर त्याने माझ्याकडून एक उपाय करून घेतला. आम्ही भोजबासाला पोहोचल्यानंतर दहा सेकंद गंगा पाण्यात पाय ठेवायचा, बाहेर काढायचा पुन्हा थोड्या वेळाने पाण्यात पाय ठेवायचा पुन्हा बाहेर काढायचा आणि नंतर १५ सेकंद पुन्हा पाण्यात ठेवायचा असे त्याने माझ्याकडून करून घेतले. हे केल्यावर पाय बधीर झाला आहे का असे विचारल्यावर, मी हो म्हणालो. मग त्याने पाय पुसून पटकन मोजे घालायला सांगितले. तसेच रात्री झोपताना त्याच्याकडे असलेले मूव्ह मलम मला देऊन ते लावा आणि साॅक्स घालून झोपा असे सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळी चालत जाताना माझा पाय बिलकुल दुखला नाही. दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा तेच केलेन. फक्त झोपताना थोडे मलम जास्त लावले आणि पाय दुखणे जवळजवळ कमी झाले.

भोजबासाहून गंगोत्रीला निघताना येथील मुक्कामाची मी हळूहळू उजळणी करत पुढे निघालो होतो. प्रथम उंचावरून दिसलेले भोजबासा…रात्रीची थंडी… काळोखात लुप्त झालेले सर्व डोंगर… आकाशात चमकणाऱ्या चांदण्या… सोसाट्याचा वारा… कडाक्याची थंडी… गंगा नदीचे थंडगार पाणी…नदी क्रॉस करण्याची ती ट्रॉली… गोमुख पर्यंतचा प्रवास गोमुख ग्लेशियरमधून पाणी पडून त्यातून निर्माण होणारी गंगा नदी..‌‌ सूर्योदयाला चमकणारे तपोवनचे शिवलिंग शिखर… लालबाबा आश्रम… तीन दिवसाचा हा मुक्काम, येथील निसर्गाशी निर्माण झालेली जवळीक, निसर्गातील सहवास ही एक मोठी आठवण माझ्या मनात कोरली गेली होती.

२०१६ साली जेव्हा चि मिहिर येथे आला होता, तेव्हा त्याचा पोर्टर कुमार साही होता. गोमुख पाहून, बराच वेळ व्यतीत करून कुमार त्याला ग्लेशियरवरून तपोवनला घेऊन गेला होता. त्यामुळे त्याच्या पाठीशी गाठीशी एक वेगळाच अनुभव व आठवण होती. आता मात्र कोणालाही ग्लेशियरवरून तपोवनला जाता येत नाही. गंगा नदी ट्राॅलीतून ओलांडून मग तपोवनला जाता येते. तसेही ग्लेशियरवर कोणीही अनुभवी व्यक्तीशिवाय जाणे, म्हणजे जीवाशी खेळ आहे. चुकून वितळून ठिसूळ झालेल्या ग्लेशियरवर पाय ठेवला तर मृत्यूच. ती व्यक्ती ग्लेशियरखाली थंडगार पाण्यात किंवा खोल भागात पडते. तेथून बाहेर काढणे अशक्यप्राय. त्यामुळे शहाण्या माणसाने अनुभवी गाईड शिवाय हिमालयात, ग्लेशियरवर कोणतेही धाडस करू नये.

परतीच्या प्रवासाला निघताना सकाळीच नाश्ता झाला होता. वाटे फक्त एकदा थांबून चहा करायचा होता. आता आम्हाला पुन्हा १३३०० फुटांवरून १०००० फुटांवर जायचे होते. अपवाद वगळता सगळा मार्ग हा उताराचा होता. कमल म्हणाला, तुम्ही पुढे व्हा मी हळूहळू मागून येतो‌. फक्त वाटेत दरड कोसळत नाही याची काळजी घ्या आणि चालत राहा. कुठेही, शक्यतो दरड कोसळण्याच्या ठिकाणी थांबू नका आणि दोघेजण सोबत चालत राहा. त्याचा आदेश शिरसावंद्य मानून शशांक आणि मी पुढे निघालो. भोजबासात शेजारून वाहणारी गंगा नदी आता हळूहळू खाली जाऊ लागली. आम्ही दोघे पटपट गंगोत्री च्या दिशेने चाललो होतो. मजूर नेहमीप्रमाणे रस्त्यात काम करीत होते. वाटेत जाता येताना आम्हाला दोन पूल लागले होते. डोंगरावरून येणाऱ्या एका मोठ्या प्रवाहाच्या दोन्ही काठावर दगडांचे काॅलम करून त्याभोवती तार लावून त्यावर लाकडाचे दोन मजबूत वासे ठेवून लाकडी फळ्यांचा पूल बनवला होता.
एकावेळी एकच व्यक्ती त्यावरून जाऊ शकते.
रौद्र निसर्गापुढे टिकून राहण्यासाठी मानव आणि त्याची साधने आटोकाट प्रयत्न करीत असतातहे जाणवले.

एक दिल्लीचा मुलगा आणि त्याच्यासोबत त्याचा फ्रान्सचा मित्र आम्हाला वाटेत भेटले. आमच्याकडून त्यांनी जुजबी माहिती घेतली. त्यांना शुभेच्छा देऊन आम्ही निघालो. थोडे पुढे गेल्यानंतर आम्हाला मुंबईचा एक वकील मुलगा आणि त्याच्यासोबत पोर्टर भेटले. त्याच्या पोर्टरने आम्हाला स्वतःहून, खाली नदीच्या पात्रालगत मोठ्या दगडावर एक अस्वल मादी आणि तिचे तिचे पिल्लू दाखवले. आश्चर्याने बघू लागलो तर, खरोखरच मादी आणि तिचे पिल्लू इकडे तिकडे फिरताना दिसत होते. मी विचारले की तुम्हाला कसे दिसले ? नेहमी येण्यामुळे आम्हाला प्राणी कुठे असतात व दिसतात याची माहिती असते. त्यामुळे आमच्या आम्हाला त्यांना शोधण्यासाठी विशेष कष्ट पडत नाही. आमच्या डोळ्याला मादी आणि पिल्लू दिसत होते, पण कॅमेऱ्याच्या लेन्सच्या मर्यादेमुळे अस्वल व पिल्लाला कॅमेरात बंदिस्त करता आले नाही. पोर्टर आणि वकील महोदयांना नमस्कार करून आम्ही निघालो. हळूहळू पुढे जात असताना, दरड कोसळण्याचा ठराविक टप्पा आलेला होता. वरती बघत आम्ही वेगाने पुढे चाललो होतो. आम्हाला काही वेळाने कमलने गाठले. तो म्हणाला, मला वाटले तुम्ही रस्ता चुकलात की काय ? त्यामुळे काळजीत होतो.
पुढे चालताना त्याने एका ठिकाणी. डोंगरावर बघायला सांगितले. वरती ब्लू शिप ( हिंदीमध्ये भरल ) काही पहाडी मेंढ्या दगडावर उभ्या होत्या. काही इकडे तिकडे फिरत होत्या. त्यांच्या फिरण्यामुळे डोंगरावरचे छोटे छोटे दगड सुटतात. छोटे दगड सुटले की आधार गेल्यामुळे मोठमोठे बोल्डर्स खाली येतात. त्यामुळे या मेंढ्यांना फार वेळ पाहात बसू नये. पटकन पाहावे आणि पुढे निघून जावे. कारण कुठला बाका प्रसंग पुढे उभा राहिल हे सांगता येत नाही अशी माहिती कमलने पुरवली. अर्ध्या मिनिटांपेक्षा कमी वेळ उभे राहून त्यांना बघितले‌. त्यांचे फोटो काढले आणि पाय उचलले. चीरबासाला तीन वाजता पोहोचलो. कमलने चहा केला. चहा आणि गुड डे बिस्कीटे खाल्ली. कमलने आवरताना आम्हाला पुढे व्हायला सांगितले. हवामान बदलू लागले होते. सूर्य ढगाआड गेला होता. आकाशामध्ये काळे ढग जमायला लागले होते. अंधारून यायला सुरवात झाली होती. पावसाची लक्षणे तयार झाली होती.परंतु गार वारा वाहात होता. पावसासाठी पोषक असे दमट वातावरण तयार झाले नव्हते. आम्ही पटापटा पुढे निघालो. सुमारे अर्धा तास गंगोत्रीला पोहोचायला लागेल, एवढे अंतर बाकी असताना बारीक थेंब अंगावर पडू लागले. पाऊस येणार हे नक्की झाले. मी आणखीन वेगाने चालू लागलो. शशांक तर केव्हाच माझ्यापुढे निघून गेला होता‌. गंगोत्रीच्या वनखात्याच्या चेकपोस्टच्या अलीकडे पंधरा मिनिटे शिल्लक असताना, पावसाने मला गाठले. टपोरे थेंब अंगावर पडू लागले. अंगावर मी बरसाती म्हणजे पाॅंछू चढवला आणि चालू लागलो. वनखात्याच्या राम मंदिरापाशील चेकपोस्टपाशी पोहोचलो तेव्हा दुपारचे ४.३० वाजले होते. शशांकने तोपर्यंत जादा मुक्कामाचे पैसे भरणे, डिपॉझिट परत घेणे, सह्या करणे, आधार कार्ड परत घेणे हे सगळे सोपस्कार पार पडले होते‌ आमच्या जवळच्या स्लीपिंग बॅग परत केल्या. लेक्चर्स सुरू झाल्यामुळे शशांकला पाटण्याला परतण्याची घाई होती. त्यामुळे शशांक पुढे निघाला. मी कमलची वाट पाहत चेकपोस्टपाशी थांबलो. पंधरा मिनिटात कमल पोहोचला. त्यानी स्लीपिंग बॅग परत केली. तेथून बाहेर पडल्यावर मी भगीरथी सदन कडे निघालो तर कमल त्याच्या घराकडे. भागीरथी सदनमध्ये पोहोचेपर्यंत पावसाने थोडा वेग घेतला होता. पाय बोलू लागले होते. आज जवळपास २६ किमी चालणे झाले होते. लाॅजवर पोहोचल्यावर मी गरम गरम चहा घेतला आणि विश्रांतीसाठी रूम कडे वळालो.

गुरुदेव दत्त…
🙏

क्रमशः …

©️ लेखक व वाटसरू
उदय नागनाथ

मोबाईल नंबर ९४२२०८१०८०
udaynaganath@dd819

,

बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, जमुनोत्री पायी यात्रा वर्णन

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *