चारधाम पदभ्रमण यात्रा बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, व हेमकुंड साहेब भाग – ७

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
                     *पुष्प - ७*

गोमुख ट्रेक नंतर गंगोत्रीत असताना चि मिहिर कडून गंगोत्रीच्या जवळील सात ताल विषयी माहिती मिळाली होती. स्थानिक माणसांकडे चौकशी केली असता, गंगोत्री पासून जवळ २९ किलोमीटरवर धराली नावाचे गाव आहे. तेथून सात तालच्या ट्रेकला जाता येते असे त्यांनी सांगितले. मागे मी म्हटल्याप्रमाणे मला हर्सिलला पैसेही काढायला जायचे होते. त्या वेळेलाच या ट्रेकचे नियोजन केले.

सकाळी लवकर आवरून तयार झालो आणि गंगोत्रीच्या स्वागत कमानी पाशी पोहोचलो. स्वागत कमानी पासून आत गावात येणार्‍या रस्त्याच्या सिमेंटिंगचे काम चालू होते. त्यामुळे स्थानिक प्रशासन कमानीपासून पुढे आत मध्ये वाहनए सोडत नव्हते. स्वागत कमानी पर्यंतच टॅक्सी आणि बसेस येत होत्या. उद्या अक्षय्य तृतीयेला, सकाळी कपाट उघडणे, म्हणजे मंदिर उघडण्याचा मोठा सोहळा. त्यासाठी भरपूर यात्रेकरू, पर्यटक व साधू संत आले होते व अजूनही येण्याची शक्यता होतीच. आलेल्या लोकांनी त्यांची वाहने रस्त्यावर दुतर्फा लावलेली होती. डबल पार्किंग, तिरक्या कशाही पद्धतीने गाड्या लावलेल्या होत्या. बेशिस्त आपल्या अंगात मुरली आहे. सुटणारी बस,टॅक्सी पाहात मी पुढे चालत राहिलो. एक ट्रक निघायच्या तयारीत दिसला म्हणून त्याच्या जवळ जाऊन चालकास मला धरालीला तुम्ही सोडू शकाल का असे विचारले. त्यावर ट्रकमधील चालक असा म्हणाला की ही पोलिसांची गाडी आहे आणि आम्हाला पोलिस सोडून इतर कोणालाही गाडीतून नेण्यास परवानगी नाही. त्यावर त्याला पुन्हा विनंती केली की फक्त वीस किलोमीटर जायचं आहे, तर कृपया सोडलं तर बर होईल. दोन मिनिटे त्याने विचार केला आणि मला ट्रकच्या हौद्यात बसायला परवानगी दिली.
गंगोत्री पासून धराली साधारण १९ किलोमीटर अंतरावर आहे. निघताना चालकाने आत बांधलेल्या सीटपैकी एक सीट उघडून त्यावर बसायला सांगितले. थोड्या प्रवासासाठी , सीट उघडा, परत बांधा हा उद्योग व शिवाय सीटवर खूप धूळ होती. म्हणून मी ‌हौद्यातील सामान्यांवर बसून प्रवास केला. धरालीला मला सोडून निघून गेला. खाली उतरल्यानंतर चालकाने मला पैसे न मिळाल्यास ऑनलाइन/ डिजिटल पेमेंट करण्याचा सल्ला दिला. प्रवासाचे पैसे देऊ केले, ते ही घेण्यास चालकाने नकार दिला…

सात तालच्या ट्रेकचे कमलने जाण्यायेण्याचे पैसे वेगळता गाईड म्हणून मला बाराशे रुपये सांगितले होते. धरालीला पोलिसांच्या गाडीतून उतरल्यानंतर समोरच दोन मजूर बसलेले दिसले. त्यांच्याकडे सात तालच्या ट्रेकसाठी कोणी गाईड मिळेल का, आणि किती पैसे घेईल अशी विचारणा केली. त्यातला एक जण मी येतो म्हणाला, मी येतो. १२०० रु दर आहे, पण तुम्ही योग्य ते द्या. गंगोत्रीला आणि येथे गाडीचा रेट तेवढाच होता.

धरालीला उतरलो तेव्हा मस्त भूक लागली होती. मी हिल स्टार हॉटेलमध्ये नाष्ट्यासाठी शिरलो. अप्रतिम पनीर पराठा खाण्यासाठी मिळाला. तयार करणाऱ्याचे कौतुक करून उत्तम पराठा केल्याचे आवर्जून सांगितले. चहा घेताना सात तालच्या रस्त्याची चौकशी केली. त्यावर हाॅटेल मालकाने डाव्या हाताला १०० मीटरवर पाटी आहे. तिथून तुम्ही चढायला सुरुवात करा, असे सांगितले. काठीची आवश्यकता पडणार नाही हे सुद्धा सांगितले.

साधारण साडेदहा वाजता मी चढायला सुरुवात केली. सुरुवातीला चढताना मी एकटाच होतो. पंधरा वीस मिनिटानंतर मुंबईहून आलेले एक कुटुंब भेटले. ते चार पाच जण होते. कोण, कुठून कसे, आलात चौकशी झाली आणि नमस्कार करून पुढे निघालो. त्याच्यानंतर पुढे एक कुटुंब होते चालले होते. त्यांना मागे टाकून मी पावले उचलली

पुढे मी एकटाच होतो अक्षरशः खडा चढ होता. घामाघूम झालो होतो. जवळच्या बाटलीतील पाणी पीत माझी मार्गक्रमणा चालू होती. पुढे मला एक सद्गृहस्थ भेटले. साततालच्या डोंगर भागातच ते राहात असावेत. त्यांना सात तालचा रस्ता विचारला, त्यांचे मार्ग दर्शन घेऊन पुढे निघालो. दहा मिनिटांनी मनिंदर नावाचं एक गावकरी मला भेटले. त्यांच्या बरोबर दहा मिनिटे चालल्यानंतर त्यांचे घर आले. थांबून त्यांनी मला मोलाची माहिती दिली की तुम्ही परत येत आल्यावर परत येताना या रस्त्याने येऊ नका वरती ते लाल पत्रे लावले आहेत ती शाळा आहे. उतरताना तेथून डाव्या हाताला सरळ सरळ पुढे गेलात तर तुम्ही हायवेला जाल आणि तिथून थोड्या अंतरावर आहे हर्शिल आहे त्यांचे आभार मानून मी चालायला सुरुवात केली.

डोंगराच्या कडेने दगड लावून, कुठे दुतर्फा फक्त दगड ठेवून रस्ता केला होता.
चालताना घंटांची किणकिण ऐकू आली. इकडे तिकडे पाहिले तर प्रथमच मला गाई चरताना दिसल्या. इतक्या दिवसाच्या प्रवासात प्रथमच डोंगरावर गायी चरताना दिसल्या. शांत, निरव वातावरणात गाईंच्या गळ्यातल्या घंटांचा छान आवाज येत होता. त्यांच्या बरोबरची वासरे मला पाहून बुजत होती आणि पटकन एखाद्या टेकाडावर चढायचा प्रयत्न करत होती. त्यामुळे त्यामुळे त्यांच्या कळपात गडबड उडत होती. मधूनच एखादी गाय वासराला बोलावण्यासाठी हंबरत होती. तेवढाच काय तो शांतता भंग…

विविध वृक्ष रस्त्याच्या जंगलात वाढलेले होते. काही खुरटी झुडपेही होती.हत्यातली काही काटेरी होती. जर्किन फाटू नये म्हणून त्यांच्यापासून जपून चालावे लागत होते. कधी डाव्या तर कधी उजव्या बाजूने ओहोळ झुळझुळ आवाज करीत गंगा नदीच्या दिशेने चालले होते. या जंगलात देवदारचे भलेमोठे जाड बुंधा असलेले उंच वृक्ष होते. काही देवदार वृक्षांची खोडे इतकी मोठी होती की मी दोन बाहू पसरून त्यांना कवेत घ्यायचा प्रयत्न केला तरी ते मावत नव्हते. चालताना प्रचंड घाम आला होता. आतला ड्राय फिट शर्ट ओला झाला होता. परंतु थंडी आणि गार वाऱ्यामुळे मला जर्किन आणि कानटोपी काढता येत नव्हती.

सुमारे बारा वाजता पहिले तळे ( ताल ) लागला. त्याच्या बाहेर त्याचे नाव लिहिले होते…मृदंगा ताल. छान नाव. भरपूर पाणी व ते तलाव भरल्यामुळे झिरपून ओहोळ तयार होऊन बाहेर पडत होते. दम लागल्यामुळे जरा बसलो. फोटो काढले व पुढील तळ्याकडे निघिलो.

दडिग्या ताल…पुढील तलावाचे नाव. आश्चर्य म्हणजे हा तलाव मात्र कोरडा ठक्क पडला होता. घामाने खूप ओला झाल्यामुळे या तलावापाशी पोहोचल्यानंतर तातडीने जर्किन काढले, तपला ड्राय फीट काढला आणि तो तलावाच्या नावाच्या पाटीवर वाळत टाकला. दहा मिनिटे एका दगडावर शांतपणे बसून राहिलो. परिसरात व्यक्ती म्हणून मी एकटाच आणि सोबत प्रकृती म्हणजे निसर्ग.

निळे आकाश…त्याच्यावर कापसासारखे ढग… त्याच्याखाली बर्फ पांघरलेले डोंगर, पुढे गर्द हिरव्या रंगांची झाडे, त्याखाली पोपटी रंगांची झाडे, त्यानंतर जमिनीवर हिरवळ आणि माती…पुढे स्वच्छ पाण्याचे तळे आणि…त्यात आकाशाचे पडलेले प्रतिबिंब… खरेतर हा चित्र काढण्याचा विषय…परंतु मी मी शाळेत असताना चित्रकलेत जेमतेम पास होत असल्यामुळे हिमालयाच्या कॅनव्हासवर हे निसर्ग चित्र रेखाटण्याचे धाडस करण्याचा विचारही मनात आणला नाही.

दुसऱ्याला लागूनच तिसरा तलाव होता. भिंत सामायिक. चौथा आणि पाचवा तलाव पाहण्यासाठी कूच केले. तीनही तलावात स्वच्छ पाणी होते. पाचव्या तलावाच्या उजव्या हाताला एक धबधबा होता त्या धबधब्यातून आलेले पाणी पाचव्या तलावात पडत होते. तेथे थांबून फोटो काढले. थोडावेळ बसलो. तेथील तेथील शांतता मनात हृदयात भरून घेतली. पहिल्या तलावापाशी उतरत उतरत पोहोचलो तेथे वाळत टाकलेला स्वीट शर्ट अंगात घातला. जॅकेट चढवले कान टोपी घातली आणि उतरायला सुरुवात केली. एकूणच वेळ सत्कारणी लागला छान तळी पाहायला मिळाली आणि निसर्ग अनुभवास मिळाला. परत हे पाहण्याचा योग येईल का नाही माहिती नाही. हळूहळू उतरायला सुरुवात केली. मघाच्या पेक्षा आता जास्त गायी डोंगरावर चरताना दिसल्या. उतरत उतरत मी लाल पत्रे घातलेल्या शाळेपाशी पोहोचलो. तेथून डाव्या हाताला वळून हर्सिल च्या दिशेने उतरायला सुरुवात केली. हा पुर्ण जंगलाचा रस्ता होता वाटेत तुरळक घरे दिसत होती. वाटेत एका ठिकाणी चार पाच घरे दिसली. तेथे थांबून हाक मारून रस्ता बरोबर आहे ना, विचारायचा प्रयत्न केला. पण कोणीच उत्तर दिले नाही. पुढे एका लाकडाच्या बाल्कनीत आज्जीबसल्या होत्या. त्यांना गावाचे नाव सांगून आणि हात करून रस्ता विचारला असता, त्यांनी माझ्या मागील बाजूस सरळ जावे असे सांगितले. पुढे वाटेतएक महिला भेटल्या. त्यांनीही याच रस्त्याने सरळ जा असे सांगितले. या भागात जंगलात देवदाराचे प्रचंड मोठे आणि जाडजूड बुंधा असलेले वृक्ष होते. मसाल्यासारखा सुगंध अधून-मधून येथे जाणवत होता. मी बराच शोधायचा प्रयत्न केला, पण हा सुगंध कशाचा आहे हे समजले नाही.

मी उतरत असताना समोरून तीन चार खेचरे चढत येताना दिसली. अनोळखी माणसांना पाहून प्राणी बिचकतात आणि त्यांना त्यातून दुखापत होण्याची शक्यता असते. त्यामुळे ते माझ्या निकट आल्यानंतर मी एका बाजूला शांत उभा राहिलो. मला ओलांडून खेचरे डोंगरावर निघून गेली. येथे खेचरे चांगली तगडी होती. अर्थात अति उंच भागात, सामान वाहून नेण्यासाठी ती धष्टपुष्ट हवीच होती. आपल्याकडे गाढवांचा उपयोग माती, राडारोडा वाहण्यासाठी किंवा काही वेळा जुजबी सामान वाहण्यासाठी केला जातो.

मी हळूहळू उतरत हमरस्त्यावर पोहोचलो आणि डाव्या हाताला वळून हर्सिलच्या दिशेने बँकेतून एटीएममधून पैसे काढायचे होते त्यासाठी निघालो . हर्सिलला सैन्याचे चेक पोस्ट होते. तेथे एक रुबाबदार, तगडा, बलदंड असा डोळ्याला चांगला गाॅगल घातलेला जवान, हातात स्वयंचलित अशी गन घेऊन उभा होता. त्याला बघताच प्रसन्न वाटले. तेथे ठेवलेल्या फिल्टर मधील पाणी पिऊ का विचारले. परवानगी नंतर पाणी पिऊन त्या जवानाने दाखवलेल्या रस्त्याने हर्सिल गावात कूच केले.

हर्सिलला जाऊन पैसे काढून परत त्या चेकपोस्ट पाशी येऊन वाहन मिळण्याची वाट पाहत होतो. त्यावेळी एक मारुती एट हंड्रेड गाडी आली. त्यांना हात करून लिफ्ट मागितली. ते गंगोत्रीला चालले होते. त्यांनी मला लिफ्ट दिली. गंगोत्रीच्या दिशेने गाडी निघाली. रस्त्यावर ठिकठिकाणी भक्त, साधू संत शिऱ्याचा प्रसाद प्रत्येकाला वाटत असतात. या भागातील हा एक सण, उत्सव व मोठा सोहळा असतो. कपाट उघडण्याच्या सोहळ्यासाठी उत्तराखंड चे मुख्यमंत्री श्री हरिषसिंह धामी येणार होते. वाटेत घाट चढताना पुढे गंगामैयाची डोली दिसली. त्यावेळी गाडी कडेला लावून आता येथून पुढे मी डोलीवर बरोबर चालत जाणार आहे. तुम्ही पुढे व्हा, असे लिफ्ट दिलेल्या सद्गृहस्थांनी मला सांगितले. उतरा आणि चालू लागला याऐवजी पुढे व्हा हे शब्दप्रयोग शिकण्यासारखे आहेत. खाली उतरून मी पण डोलीच्या सोबत थोडे अंतर चाललो. फोटो , व्हिडिओ काढला. अनेक लोक त्या डोलीला खांदा देत, गंगामैयाचा जय जय कार करीत डोली पुढे चालली होती. ढोल वाजत होते. पोलीस, सैनिक बंदोबस्तासाठी हजर होते. बोलीचे दर्शन घेऊन पटपट पुढे होऊन मी घाट चढू लागलो. डोली हळूहळू घाट चढूत येत होती.

गंगोत्रीच्या मंदिरात गंगामैयाची पाषाणाची मूर्ती आहे. भाऊबिजे नंतर येथे कोणी थांबत नाही. बर्फवृष्टीमुळे येथे सगळे बंद असते. भाऊबीज ते अक्षय्यतृतीया या काळामध्ये पाषाणाच्या मूर्तीवरील मुखवटा डोलीने जवळच असलेल्या मुखवा या गावी मंदिरात असतो. या शीतकाळात पाषाणाची मूर्ती गंगोत्रीच्या मंदिरात असते. मंदिर मोकळे नसते. गंगोत्रीच्या परीसराच्या रक्षणासाठी गंगा मैय्या येथेच असते. प्रातिनिधिक स्वरूपात मुखवटा मुखवाया गावी नेला जातो. अक्षय्य तृतीयेच्या आदल्यादिवशी वाजत-गाजत हा मुखवटा डोलीतून पुन्हा गंगोत्रीच्या मंदिरात आणला जातो आणि पुढे भाऊबीजेचे पर्यंत देवी येथे विराजमान असते. त्यादिवशी रात्री भैरव घाटी येथे डोलीचा मुक्काम होता व अक्षय तृतीयेला सकाळी दहा वाजेपर्यंत डोली गंगोत्रीला पोचणार होती.

पुढे जाऊन मी एका दगडावर बसलो आणि आणि घाटातून येणाऱ्या वाहनांना हात दाखवत होतो. त्यावेळी एक वाहन थांबले. त्यामध्ये दिल्लीतील एक जेष्ठ नागरिक आणि त्यांची नात गंगोत्री व पुढे गोमुखला चालले होते. त्यांनी मला लिफ्ट दिली. त्यांच्या गाडीत बसून गंगोत्रीला उतरलो. निवासासाठी कोठे उतरता येईल असे त्यांनी मला गाडीत विचारले होते. उतरल्यावर त्यांना मी राहत असलेल्या भागीरथी सदन मध्ये घेऊन गेलो. पसंत पडल्यास राहा, नाहीतर अन्यत्र शोधा असे म्हणालो. एक रात्र काढून पुढे निघायचे असल्यामुळे भागिरथी सदनमध्ये त्यांनी एक रात्र मुक्काम केला व दुसऱ्या दिवशी लवकर उठून परमिट काढून ते गोमुखी ला रवाना झाले.
मला उद्याच्या कपाट उघडण्याच्या सोहळ्यासाठी तयार होऊन, तो सोहळा पाहून पुढे प्रयाण करायचे होते.

सकाळी सात ताल, नंतर पैसे काढणे, पुढे डोलीचा घाटातील प्रवास व दर्शन, दोन – चार नवीन लोकांची ओळख…दिवस चांगला व्यतित झाला.

गुरुदेव दत्त…
🙏

क्रमशः …

©️ लेखक व वाटसरू
उदय नागनाथ

मोबाईल नंबर ९४२२०८१०८०
udaynaganath@gmail.com*

,

बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, जमुनोत्री पायी यात्रा वर्णन

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *