चारधाम पदभ्रमण यात्रा बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, व हेमकुंड साहेब भाग – ८

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
      *पुष्प - ८*

सायंकाळी तपोवनचे एक साधू मौनीबाबा उर्फ नागरबाबा भेटले. ते पुढील सहा महिन्यांचे सामान घेऊन तपोवनला दुसऱ्या दिवशी सकाळी निघणार होते. त्यांना सुमारे ३०-४० पोर्टर त्यांचे सामान वाहून नेण्यासाठी लागतात. खेचरावरून सामान नेता येते, पण ते भोजबासा पर्यंत. कारण भोजबासाला गंगा नदी पार करावी लागते. खेचर अति थंड पाण्यातून पलिकडे जाऊ शकत नाहीत.
पुढे जायला पोर्टरच लागणार. भोजबासात पोर्टर उपलब्ध नसतात. ते येथूनच न्यावे लागतात.
मौनी बाबा यांच्याकडे तंबू, भोजन सामान नसलेले बरेच ट्रेकर्स ऐनवेळी मुक्कामी थांबतात. त्यांच्यासाठी त्यांच्याकडे ते व्यवस्था करतात.२०१६ साली चि मिहिर येथे मुक्कामी थांबला होता तेव्हा दर रु ३००/- प्रति दिन होता. नंतर तो रु ७०० झाला आता ते रु १००० घेतात असे मला तपोवन मध्ये राहणाऱ्या एका स्वामींनी सांगितले. सहा वर्षांत तिप्पट वाढ !!! असो.

चार धाम यात्रेत कपाट उघडणे हा एक मोठा सोहळा असतो. शीतकाळात मुख्य मंदिरापासून दूर मुक्कामासाठी गेलेले देव डोलीतून वाजतगाजत मंदिरात विराजमान होतात.
गंगोत्री व यमुनोत्रीची कपाट उघडण्याची तारीख ३ मे होती. केदारनाथचे कपाट ६ मे ला उघडले आणि बद्रीनाथची ८ मे ला उघडणार होते.

स्थानिक नागरिक, देशी विदेशी पर्यटक, यात्रेकरू, साधू संत, स्थानिक प्रशासन सगळे उत्साहाने या सोहळ्यात सहभागी होतात. भारतीय सैन्यही या सोहळ्याला हातभार लावते.

डोली येणारा रस्त्याची साफसफाई केली जाते. वाटेवरच्या गावातील नागरिक, आश्रम जंगी स्वागत करतात. त्या त्या वेळी चहा, नाष्टा, लंगर यांचे आयोजन केलेले असते. मंदिराचे पुजारी तसेच भक्त पितांबर, सुती झब्बा, अंगावर उपरणे अशा वेशात डोलीला खांदा देतात.

कपाट उघडण्याच्या आदल्या रात्री डोलीचा मुक्काम भैरवघाटीत असतो. सकाळी लवकर प्रस्थान ठेवून डोली सकाळी ९ वाजेपर्यंत गंगोत्रीला पोहोचते. मी सकाळी लवकर उठून आंघोळीसाठी गरम पाणी हवे म्हणून चौकशी केली. तर बऱ्याच जणांना मंदिरात जायचे होते.
मालकांच्या नातवाचे उष्टावण होते. तिकडे याला अन्नप्राशन संस्कार म्हणतात. त्यासाठी त्यांच्या घरातील बरेच सदस्य आले होते. त्यांचे आवरून झाल्यावर मला पाणी मिळणार होते. मला काही घाई नव्हती. कपाट उघडण्याचा सोहळा पाहून धरालीला निघायचे होते.

बस अड्ड्यापाशी जाऊन उभा राहिलो. उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री कपाट उघडण्याच्या सोहळ्यासाठी येणार होते. ११ वाजता ते आले.
उत्तरेकडील बऱ्याच राज्यांचे प्रशासन धार्मिक आधारावर चालते. त्यामुळे राजकीय नेते अशा महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थिती लावतात.

गंगोत्री मंदिराच्या बाहेर तुफान गर्दी झाली होती. पायऱ्यांवर, आजूबाजूच्या दुकानांवर, गच्चीवर… जेथून कपाट उघडण्याचा सोहळा दिसतोय तेथे लोक उभे होते.एका बाजूला सैन्याचा बॅंड वाजता होता. लोक हा सोहळा डोळ्यात साठवून ठेवत होते. मुख्यमंत्री, सपत्नीक घाटावर पूजा करून आले.
दुपारी ११.१५ कपाट उघडले. दरवाजाच्या बाहेर डोलीतून आलेली मूर्ती ठेवलेली होती. ती मूर्ती आत नेली. गंगा मैय्याचा एकच जयजयकार झाला. फोटोसाठी क्लिकक्लिकाट झाला. बॅंडवाले फोटोसाठी वाजवायचे थांबले. आजूबाजूच्या गावातील लोक, स्थानिक देवी डोलीतून घेऊन येत होते. नमस्कार केला. फोटो काढले व भागीरथी सदनकडे निघालो. मंदिरात समोरील मोकळ्या जागेत सैन्यदलाने लंगरचे आयोजन केले होते. मांडव, सतरंज्या घालून मोठमोठ्या पातेल्यामध्ये स्वयंपाक तयार करून आणला होता. स्पीकरवर धार्मिक गाणी लावली होती. सैन्यदलात त्या भागातील कमांडरने कपाट उघडण्याच्या सोहळ्यासाठी उपस्थिती लावली होती. उत्तराखंडच्या डोंगराळ भागात प्रवास करताना ठराविक अंतरावर आपल्याला इंडो तिबेट बाॅर्डर फोर्स, सैन्य दल यांची ठाणी दिसतात. महाकाय ट्रक्स, तोफा, रसद पुरवण्यासाठी वाहने, ॲम्ब्युलन्स, सैनिकांच्या बराकी, मेंटेनन्स गॅरेज आपल्याला या भागाच्या संवेदनशीलतेचे दर्शन घडवतात. सर्व वाहने हिरव्या रंगात रंगवलेली. नितिन गडकरी यांनी याच भागातून कैलास मानसरोवर यात्रेसाठी रस्ता तयार करणार असल्याचे जाहीर केले आहे. यावरून चीनची सीमा आपल्या किती जवळ असावी, हे लक्षात घ्यावे.

सकाळी मंदिरात येताना सॅक भरून ठेवली होतीच. राहण्याचे, खाण्याचे पैसे दिले. आता थोडेसे लाॅजची व्यवस्था व दर याविषयी. आशुतोष सेमवाल, हे मंदिरात पौरोहित्य करतात. त्यांनी कपाट उघडणल्यानंतर गंगेच्या घाटावर पूजा करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मी गंगोत्रीला आलो तेव्हा, सगळी लॉजेस ओस पडली होती. ट्रेक हळूहळू सुरू होणार होते. मला खोलीचा दर रु १२००/- प्रति दिन सांगितला होता. तो जास्त आहे, कमी करा असे मी बोललो होतो. मालक नोकरावर, नोकर मालकावर ढकलत होते. आशुतोष सेमवाल तर म्हणाले होते, जो आपकी इच्छा हो, दे देना. निघताना मला त्यांनी प्रति दिन रु १०००/- भरायला सांगितले. ते जास्तच होते. मी येथील मुक्कामात आजूबाजूला चौकशी करून आलो होतो. तेथे मला रु ६००/- प्रति दिन एका माणसासाठी सांगितले होते. माझ्या बरोबर असलेल्या शशांक शेखरला २६ तारखेला फक्त रु २०० मध्ये एक रात्र राहण्यासाठी चांगल्या लाॅजमध्ये खोली मिळाली होती. तीन तारखेपासून मी रूम सोडणार होतो. त्या दिवशी पासून सर्व गंगोत्रीत गर्दी होणार होती. चार दिवसांचे राहण्याचे रु ३०००/- व खाण्याचे झालेले बील देऊन मी लाॅज सोडले. अगोदर दर न ठरवल्यामुळे जास्त पैसे मोजावे लागले होतेच. त्यामुळे पूजेचा खर्च आणि लागणारा वेळ व पुढे निघण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन मी पूजा करण्याचा विचार रहित केला आणि धरालीकडे ( १९ किमी ) निघालो. बस डेपोपाशी आम्हाला गोमुख चे परमिट दिलेले श्री राजवीर साहेब, फाॅरेस्टर भेटले. थोडा वेळ गप्पा मारल्या, मदतीबद्दल आभार मानले, फोटो काढला.
गंगोत्री हून निघाल्यापासून बराच अंतर गंगोत्रीला येणाऱ्या वाहनांची रांग लागली होती. मुख्यमंत्री परत जाणार असल्यामुळे वाहने थांबवून ठेवली होती. वाटेत एका ठिकाणी वरून गडगडत आलेला एक मोठा खडक कलंडून थांबलेला दिसला. त्याच्या खाली उभी असलेली जीप काडेपेटीतल्या सारखी जाणवली.

वाटेत भैरवगडला थांबलो. रोटी, भाजी, दाल, राईस जेवण करून कूच केले. रात्री मुक्काम धरालीला.

वाटेत एक पूल लागला. त्याच्यावर लंका पूल लिहिलेले होते. खाली खूप खोलवरून गंगा नदी वाहात होती. पुलाशेजारीच गरतांग गली असा बोर्ड लावलेला होता. फार पूर्वी नेलांग व्हॅली वर गरतांग गल्ली नावाचा पूल बांधलेला होता. सुरूवातीस वनखात्याचे चेकपोस्ट होते व शेवटी एक लाकडी पूल आहे. पूर्वीच्या काळी तिबेटशी यावरून व्यापार चालायचा. ६४ लाख रुपये खर्चून शासनाने या पुलाचे पुनरूज्जीवन केले आहे. सुमारे एक-दीड तासाची उभी चढण चढल्यानंतर आपण या ठिकाणी पोहोचतो.

लंका पुलाचा फोटो आपण नीट बघितला तर त्या पुलाशेजारी दोन्ही काठावर लाकडाचे दोन ओंडके उभे केलेले दिसतात. त्यावर वायर रोप लावलेले होते. १९८५ पर्यंत त्यावरील रोप वे च्या सहाय्याने माणसांची ये-जा चालायची.१९८५ मध्ये हा लोखंडी पूल बांधल्यावर, त्या लाकडी पुलावरची वाहतूक बंद झाली. दुर्दैवाने आपण ते जतन केले नाही, त्यामुळे पर्यटकांच्या दृष्टीने ते एक आकर्षण ठरले असते हे निश्चित…कल्पना करा २०२२ साली केबलवरून माणसे खोल दरीवरून नदी ओलांडतायत… १९८५ साली बांधलेला पूल कोसळला. पुन्हा नवीन पूल बांधला. हा पूल आशियातील सर्वात उंचीवरील वाहतुकीसाठी वापरला जाणारा पूल आहे.

गुरुदेव दत्त…
🙏

क्रमशः …

©️ लेखक व वाटसरू
उदय नागनाथ

मोबाईल नंबर ९४२२०८१०८०
udaynaganath@dd819

,

बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, जमुनोत्री पायी यात्रा वर्णन

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *