चारधाम पदभ्रमण यात्रा बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, व हेमकुंड साहेब भाग – ४

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

पुष्प – ४

चिन्यालीसॉर हे येथील एका गावाचे नाव आहे. कशावरून पडले असावे हे नाव ? १९६१ च्या युद्धात चिनी सैन्य या गावापर्यंत येऊन धडकले होते. चिनी लोकांनी या गावाला आपले शहर म्हणून जाहीर केले होते. चिनी लोक येथे आले आणि त्यांनी हे आपले शहर म्हणून जाहीर केले, त्यावरून चिनी आली सॉर ( शहर ) असे हे नाव तयार झाले. गमतीदार पण गंभीर गोष्ट आहे. १९६१ च्या युद्धात भारतात सीमेच्या आत चीनचे सैन्य कुठेपर्यंत येऊन पोचले होते हे आपल्याला सर्वांना अजून माहिती नसेल आणि निश्चित सांगता ही येणार नाही.
नगुरी नावाचे एक गाव त्यापुढे लागले. एव्हरेस्ट सर करणार्‍या पहिल्या भारतीय महिला श्रीमती बचेंद्री पाल सिंह यांचे हे गाव. रस्त्यावरून त्यांचे घर पाहायला मिळाले. सध्या त्या दिल्लीत राहतात. वाटेत पुढे लंका नावाचे गाव दिसले कौन बनेगा करोडपती कार्यक्रमात या नावाचे भारतात कुठे गाव आहे असा प्रश्न विचारला गेला होता अशी माहिती प्रवासादरम्यान समजली. बरीच गावे आणि त्याच्या मागची पार्श्वभूमी इतिहास माहिती आपल्याला प्रवासादरम्यान होते आणि ज्ञानात भर पडते असे निश्चितपणे म्हणता येईल. पुढे अबली आणि सबली या नावाची दोन गावे एकापुढे एक फर्लांगभर अंतरावर होती. धरासू बेंड नावाचे असेच एक गाव. मूळ नाव धरासू. या गावात एक फाटा आहे. फाट्यामुळे धारासुबेंड असे नाव तयार झाले. धारासू बेंड पासून एक रस्ता डाव्या हातानी यमुनोत्रीला जातो तर दुसरा रस्ता उजव्या हाताने गंगोत्रीला जातो.
मला गंगोत्री हून परत धरासू बेंड येथे येऊन यमुनोत्रीला जायचे होते.

प्रवास करत असताना आजूबाजूचे डोंघर उतारावरील सुरुची झाडे जणू खोचल्यासारखी दिसतात, नागमोडी रस्ते, खाली वाहणारी गंगा नदी, वाटेत दिसणारा शेळ्यांचा कळप, त्यासोबत धनगर, छोटी मोठी मंदिरे मागे पडत असतात. प्रवासात कुठेच राहायची सोय नजीक होण्याची चिन्हे नसतील तर या मेंढपाळ किंवा शेळ्यांच्या पालावर धनगर किंवा मेंढपाळ लोक यात्रेकरूंना आपल्या झोपडीत सामावून घेतात असा सार्वत्रिक अनुभव आहे…

उत्तरकाशी हे एक जिल्ह्याचे ठिकाण आहे. येथे सर्व जिल्हास्तरीय शासकीय कार्यालये आहेत. एक महाविद्यालय आहे, ज्या महाविद्यालयात बीए व बीएस्सी चे शिक्षण विद्यार्थी घेतात. उत्तर उत्तराखंड मधील बहुतेक सर्व गावातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी उत्तर काशीला यावे लागते किंवा डेहराडूनला तरी जावे लागते. उत्तर काशीला ही इंजिनिअरिंग महाविद्यालय नाही. इंजीनियरिंग शिक्षण घेण्यासाठी डेहराडूनला जावे लागते.

बाहेरून प्रवास करीत दुपारी चार नंतर उत्तर काशीमध्ये पोहोचलेल्या प्रवाशांना पुढील प्रवासासाठी वाहन उपलब्ध होत नाही. खाजगीच नव्हे तर शासकीय परिवहन वाहन सुद्धा उपलब्ध होत नाहीत. जीप सारख्या गाड्या पूर्ण प्रवासी भरल्याशिवाय निघत नाहीत. शिवाय त्यांचा आकारही जास्त आहे.
दुपारी चार नंतर उत्तर काशीमध्ये पोहोचलेल्या प्रवाशांना जबरदस्तीने येथे मुक्काम करावा लागतो. मुक्काम करावा लागल्यामुळे प्रवाशांचे वेळेबरोबर पैसेही विनाकारण खर्च होतात. नागरिकांचे वेळ आणि पैसा यांचा अपव्यय कसा होतो याचे हे एक वाईट उदाहरण आहे जबरदस्तीने मुक्काम करावा लागल्यामुळे येथील लॉजेस आणि काही धर्मशाळा यांचे फावले आहे हे निश्चित. उत्तर काशी तील किंवा अन्यत्र असलेले बस स्टॅन्ड हा सुद्धा अभ्यासाचा विषय ठरावा. हजार-दोन हजार फुटांच्या जागेत १-२ मिनीबस रिव्हर्स लावलेल्या असतात. दोन्ही बसच्या मधून जात मागे असलेल्या काउंटरवर एक बुकिंग क्लार्क सर्व प्रकारच्या गावाची तिकिटे आपणास देतो. आपल्याला कुठलाही सीट नंबर मिळत नाही फक्त तिकीट घ्यायचे आणि बसच्या वेळी येऊन हजर राहायचे आणि तरीसुद्धा बस सुटेल याची खात्री नाही. शासनाच्या परिवहन परिवहन व्यवस्थेतील गाड्या सुद्धा अचानक रद्द होतात. म्हणजे सकाळी येणारी किंवा सुटणाऱ्या गाडीची वाट पाहत असलेल्या प्रवाशांना गाडी रद्द झाल्याचे समजतही नाही. शासनालाच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे महत्त्व कळत नाही तर खासगी कंत्राटदारांना ते कुठून कळणार ? असा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उत्तराखंडात बोजवारा उडाल्याचे आपल्याला पाहायला मिळतो. आपल्याकडे दर पंधरा मिनिटाला सुटणाऱ्या गाड्या. त्याच्यामध्ये साधी, लक्झरी, लक्झरी, वातानुकूलित, स्लीपर कोच इ प्रकार आहेत. आपल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था या कार्यक्षम व तत्पर सेवा देतात. येथे मात्र प्रवाशांना राम भरोसे सोडून दिलेले आहे.

उत्तरकाशीहून पुढे यमुनोत्री गंगोत्री केदारनाथ बद्रीनाथ येथे थेट प्रवास करणार असाल तर येथे असलेल्या एटीएम मधून पैसे काढून प्रवाशांनी पुढे जावे. कारण पुढे एटीएम नसतील किंवा असली तर पैसे असतील याची खात्री नाही. प्रवास करताना पैशाची तजवीज असेल तर उत्तम पण एटीएम वर अवलंबून असू तर याची चौकशी करीत पुढे जाणे उत्तम.
माझा मुलगा चि मिहीर २०१६ साली गंगोत्रीला गोमुख, तपोवन ट्रेकसाठी गेला होता. पुण्याहून निघताना तो एटीएम कार्ड घेऊन गेला होता. गंगोत्रीला गेल्यावर एटीएममधून पैसे काढू आणि पुढे ते वापरू अशा भरोशावर तो होता. त्यावेळी गंगोत्रीला एटीएम नव्हते. त्यामुळे तेथे पोहोचल्यावर तो उतरला होता त्या लॉजच्या मालकांनी त्याला मागे पंचवीस किलोमीटरवर आयटीबीपी चा एक कॅम्प आहे, तेथून एटीएम मधून पैसे काढून आणायला सांगितले. पर्याय दुसरा असा होता की त्या लॉजच्या मालकांच्या खात्यात आम्ही पैसे भरणे आणि त्यांनी ते चि मिहिरला काढून देणे. आम्ही दुसरा पर्याय निवडला. मी पुण्यात त्यांच्या खात्यात पैसे भरले. त्यांनी तेवढे पैसे चि मिहिरला दिले. अजूनही येथील फारशी परिस्थिती बदललेली नाही. आजही गंगोत्री मध्ये बँक नाही, एटीएम नाही. तुमच्याकडे पैसे संपत आले किंवा संपले की तुम्हाला पंचवीस किलोमीटर मागे असलेल्या हर्शिल या गावी जाऊन तेथून एटीएम मधून पैसे काढावे लागतात. तिथे फक्त पंजाब नॅशनल बँकेची एक शाखा आहे व तेथे एटीएम मधून पैसे मिळू शकतात. मलाही पैशाची गरज पडल्यामुळे मी हर्शीलला गेलो. त्यावेळी दुपारी दोन वाजले होते. त्यांची जेवणाची सुट्टी झाल्यामुळे ते परत येईपर्यंत थांबावे लागले आल्यावर एटीएम मधून पैसे काढले. माझे नशीब थोर म्हणून त्या एटीएम मध्ये पैसे होते आणि मला पैसे मिळाले नसते तर मला आणखीन पुढे १८ किलोमीटरवर भटवाडी येथे जाऊन पैसे काढावे लागले असते. तिथेही मिळाले नसते तर मला उत्तरकाशीला म्हणजे शंभर किलोमीटर मागे जावे लागले असते. डिजिटल व्यवहारात भारताने प्रगती केली असली तरी डोंगराळ भागांमध्ये सिग्नल नसणे कनेक्टिविटी नसणे त्यामुळे पैसे डिजिटल व्यवहारा मार्फत अदा करण्यात अडचणी येतात तसेच काही ठिकाणी तुम्हाला रोख पैसे द्यावे लागतात.

उत्तरकाशीला पेट्रोल डिझेल पंप आहेत. पुढे उत्तर दिशेला कुठेही पेट्रोल डिझेल पंप नाहीत.
उत्तरकाशी पासून पुढे उत्तरेकडील प्रभागातील लोकांना इंधन भरण्यासाठी उत्तरकाशीला यावे लागते. बहुतांश लोकांना अनधिकृत इंधन वितरण व्यवस्था व्यवस्थेवर अवलंबून रहावे लागते. शासकीय यंत्रणेची त्यांच्याबरोबर असलेल्या हात मिळवणी यावर सगळे बिनबोभाट चालू आहे. वीज नसणे, त्यामुळे डिझेलचा जनरेटर वापरावा
जनरेटरसाठी डिझेल लागतेव ही दैनंदिन गरज झाली आहे. कामासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अकार्यक्षम असल्यामुळे स्वतःचे वाहन वापरणे अपरिहार्य. अनेक गोष्टींमुळे पेट्रोल-डिझेलची गरज असताना सुद्धा येथे दुर्गम भागात पेट्रोल आणि डिझेल पंपाची व्यवस्था शासनाने केलेली नाही येथील सैन्याचे जे कॅम्प आहेत, त्यामध्ये त्यांचे स्वतःचे पेट्रोल आणि डिझेल पंप आहेत. त्याच्यातून ते त्यांच्या वाहनांमध्ये पेट्रोल-डिझेल भरतात. पण सर्वसामान्य जनतेला मात्र काळा बाजारातून डिझेल पेट्रोल विकत घ्यावे लागते. स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली तरी जीवनावश्यक अशा पेट्रोल-डिझेलची व्यवस्था शासन करू शकलेले नाही. दुर्गम भागातील मंदिरात दर्शनाला येण्यासाठी मंत्री महोदयांना हेलिकॉप्टरची सुविधा मिळते. परंतु सामान्य जनतेला साधे पेट्रोल-डिझेल मिळू शकत नाही याला काय म्हणावे ?

उत्तरकाशीला धार्मिक महत्त्व आहे. काशीतील काशी विश्वेश्वराचे एक पीठ येथे आहे‌. येथे विश्वेश्वराचे एक मोठे मंदिर आहे. त्यामुळे या परिसरातील व चार धाम यात्रा करणारे भाविक व यात्रिक येथे गर्दी करतात. मंदिर स्वच्छ असून खूप मोठा परिसर आहे… गर्दी नसलेला. चारधाम यात्रा सुरु झाली कि येथे गर्दी होते. हे वाटेवरचे एक महत्त्वाचे धार्मिक क्षेत्र असल्यामुळे चारधाम यात्रेला सुरुवात करताना भाविक, यात्रेकरू
उत्तरकाशीला काशी विश्वेश्वराचे दर्शन करून पुढे प्रस्थान ठेवतात. ऋषिकेश ते उत्तर काशी हा साधारण तीनशे किलोमीटरचा नऊ तासांचा प्रवास आहे. दरडी कोसळणे, रस्ते बंद होणे यामुळे थोडा अधिक वेळही लागू शकतो ऋषिकेशहून सकाळी आठ वाजता निघालेले प्रवासी सायंकाळी येथे मुक्कामी थांबतात. त्यामुळे येथे आश्रम, धर्मशाळा, लॉजेस खूप आहेत. किफायत दारापासून महागड्या दरांची लॉजेस येथे आहेत. मी काशीविश्वेश्वर मंदिरात गेलो, तेव्हा आतील मुख्य प्रवेशद्वारासमोर काही महिला भजन करीत होत्या. एक पुजारी-पंड्या हातात जपमाळ घेऊन (कापडाने झाकलेली) जप करत होते. मधूनच कोणी पिंडीवरच्या शाळुंकीला किंवा पिंडीला स्पर्श करायचा प्रयत्न केल्यास त्याला दरडावत होते. त्यांचे जप करण्यापेक्षा इतर गोष्टींवर जास्त लक्ष होते असे मला वाटले. एक पुजारी तीर्थप्रसाद देण्यासाठी उभे होते. त्यांची परवानगी घेऊन गर्भगृहातील पिंडीचा फोटो काढला. पिंड खूप छान सजवलेली होती. पिंडीवर संततधार चालू होती. तीर्थप्रसाद घेऊन मंदिरातून बाहेर पडलो.

उत्तरकाशीत रात्री पतियाळा हॉटेलमध्ये भोजन केले. भाजी, रोटी आणि लस्सी घेतली रात्रीतच पोट बिघडले. बहुतेक लस्सी करताना दह्यात घातलेले पाणी किंवा हाताळणीमुळे लस्सी दूषित झाली असावी. शेवटी अँटिबायोटिक्सची गोळी घ्यावी लागली. इथून पुढे कानाला खडा दूध दुग्धजन्य पदार्थ वर्ज्य…

गुरुदेव दत्त…
🙏

क्रमशः …

©️ लेखक व वाटसरू
उदय नागनाथ
मोबाईल नंबर ९४२२०८१०८०
udaynaganath@gmail.com

,
✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading