ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.907

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-१४ वे, रूपके विरहिणी अभंग ९०७

जागृती पुसे साजणी । कवण बोलिलें अंगणीं । निरखितां वो नयनीं । वृंदावनी देखियला ॥१॥ मनीं वेधु वो तयाचा । पंढरीरायाचा ॥२॥ स्वप्न सांगे सुषुप्ति । असे ममता हे चित्तीं । विठ्ठल होईल प्रतीती । मग गर्जती तुर्ये ॥३॥ मज बोलों नये ऐसें केलें । मन उन्मनी बोधले । बापरखुमादेविवरू विठ्ठलें । थितें नेलें मी माझें ॥४॥

अर्थ:-

स्वरूप स्थितीला पोहोचलेली एक गौळण म्हणते मी जागृत अवस्थेमध्ये परमात्म्याचे चिंतन करून श्रीकृष्णपरमात्मा कोठे आहे म्हणून माझ्या सखीला विचारू लागले तेवढ्यांत अंगणांत कोणी तरी बोलत आहे असे माझ्या कानांवर आले. ते पाहण्याकरितां ती अंगणांत आली व तिने श्रीकृष्णास पाहिले. मात्र तो वृंदावनात आणि पंढरीस असणारा असे तिने ओळखले. आणि त्या पंढरीच्या राजाचा म्हणजे श्रीपांडुरंगाचा वेध तिच्या मनास लागला.आणि मन पांडुरंगच होऊन गेले, आणि ज्या भक्ताचे अंतःकरणांत खरा खरा पांडुरंगाचा जागृतीत वेध लागला असेल त्याचे स्वप्नांत तरी दुसरे काय येणार? श्रीपांडुरंगच येणार असा ज्याला अनुभव आला आहे. त्यास श्रीतुकोबारांयानी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी । जागृति स्वप्नी पांडुरंग’ तो या अभंगात सांगितला आहे. त्याचप्रमाणे गौळणीची जी जागृतीत स्थिती तीच स्वप्नांत होऊन ती स्वप्नावस्था सुषुप्ति अवस्थेत सांगते की माझ्या चित्तात त्या शामसुंदर श्रीकृष्णाविषयी फार प्रेम आहे. तेच प्रेम तुझ्यांत लीनरूपाने असणार अशी स्थिति झाली म्हणजे चतुर्थ तुर्या अवस्थेत म्हणजे समाधीअवस्थेत श्रीविठ्ठलाच्या पारमार्थिक स्वरूपाची प्रतीति होईल. याप्रमाणे त्या गौळणीची स्थिती झाली. म्हणून ती गर्जना करून बोलू लागली. कांही बोलू नये ऐसे मला केले.मन आपले चांचल्य सोडून परमात्मरूप झाले, अशी स्थिति मला प्राप्त झाली आहे. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्याने माझ्या ठिकाणचा वास्तविक नसलेला मी व माझेपणाचा भाव नाहीसा करून टाकला. असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *