ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.638

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६३८

जाणोनी नेणपण अंगी बाणलें । नेणोनियां जाणपण सहज नेणवलें वो माय ॥१॥ आत्मज्ञानाची गति जाली वो निवांत । प्रबोधतत्त्व मी पावलों वो माय ॥२॥ पाचारिलें अवस्था स्वभावें जाहल्या । म्हणोनी विसरला देहभाव माय ॥३॥ गरुमुखें ज्यैं जोडे तैं फिटे सांकडें । रखुमादेविवर कोडें कवतिकें वो माय ॥४॥

अर्थ:-

ब्रह्मज्ञानाचा उदय झाल्या बरोबर अज्ञान नाहीसे होऊन जाते. कारण ज्ञानाचा अज्ञानाशी विरोध आहे. पण ज्या अज्ञानाच्या नाशा करिता त्याचा उदय झाला, ते कार्य संपल्या नंतर म्हणजे काष्टाचा दाह केल्यानंतर तो विशेष अग्नी आपल्या मूळच्या स्वरुपात लय पावतो त्याप्रमाणे आचार्यद्वारा महावाक्या पासून उत्पन्न झालेले अहं ब्रह्मास्मि’ असे ज्ञान ब्रह्मस्वरुपांत लय पावते. मग त्या ज्ञानी पुरुषाची जाणणे व नेणणे. या दोन्ही भावातिरिक्त कांही जाणावयाचे नाही. अशा स्वरुपाच्या नेणतेपणाची स्थिती शिल्लक राहते. अशी आत्मज्ञानाची गति निवांत असते या ज्ञान रुपत्वाचा मला अनुभव आला. अशा सहज शांत स्थितीत पूर्वीच्या जागृतादि अवस्थाना हाक सारुन पाहू लागले तर ज्या देहांत ब्रह्मज्ञानाने अशी शांति प्राप्त झाली आहे. त्या देहाला त्या अवस्था विसरुन जातात. श्री गुरुकृपेने जर आत्मज्ञान झाले. तर जन्ममरणाचे संकट दूर होते. रखुमादेवी पती श्रीविठ्ठल, त्याने आम्हाला सद्गुरुची भेट करुन देऊन सहज लीलेने भवसागरांतून तारुन नेले. असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *