ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.614

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
  प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६१४

दुरी ना जवळी त्रिभुवन मंडळीं । तें मनाचा मुळी बैसलेंसे ॥१॥ पाहतां न दिसे भानुप्रकाशें । येहवी ते असे मशकी रया ॥२॥ बोलों जातां जेणे जिव्हाचि खादली । पाहातां पाहाता नेली चर्मदष्टी ॥३॥ दांतेवीण जेणें स्थूलदेह खादले । शस्त्रेंविण छेदिले लिंगदेह ॥४॥ त्वंपदी सिद्ध निवृत्ति लाधलें । गुरुलक्षी हरपलें द्वैतभान ॥५॥ निवृत्तिदासा तुम्हीं बहुत न बोला । रखुमादेविवरा ध्याइजेसु उगला ॥६॥

अर्थ:-

जे त्रैलोक्य मंडळामध्ये व्यापक असून ज्याला जवळ किंवा दूर असे म्हणता येत नाही. ते ब्रह्म मनाचे अधिष्ठान आहे. त्यालाच आत्मा, साक्षी, कूटस्थ अशी नावे आहेत. तें आत्मस्वरुप सूर्याच्या प्रकाशाने दिसत नाही असे असले तरी सर्व कृमि किटकातही ते भरलेले आहे. ज्याच्या स्वरुपाचे वर्णन केले तर वाणीच बंद पडते. चर्मचक्षूने पाहू गेले तर दिसत नाही. दांता वाचुन ज्याने स्थूलदेह खाल्ला शस्त्रावांचून लिंग देहाचा छेद केला. असे जे सर्व धर्मरहित सिद्ध त्वंपद ते गुरुंनी लक्षणेने दाखविलेल्या तत्पदलक्षाच्या ठिकाणी लय पावते, असे माझे जे श्रीगुरु निवृत्तिनाथ त्यांनी मला जीव ब्रह्मैक्यज्ञानाने कृतार्थ केले ज्ञानेश्वर महाराज आपले मनाशी म्हणतात. हे निवृत्तिदासा तुम्ही बहुत बोलू नका. मुकाट्याने रखुमादेवीचे पती जे विठ्ठल त्यांचे ध्यान करा. असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *