ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 833

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
  प्रकरण :-११ वे, बुद्धीरूपी सखीशी संवाद अभंग ८३३

प्राणाची पैं सखी पुसे आत्मयासी । ईश्वरी ध्यानाची वृत्ति गेली ॥१॥ पांगुळल्या वृत्ति हारपली भावना । निमाली कल्पना ब्रह्मीं रया ॥२॥ हे सुख साचार सांगे कां विचार । आत्मयाचें घर गुरुखुणें ॥३॥ चेतवितें कोठे गुंफलें सगुण । निर्गुणी पैं गुण समरस ॥४॥ तें सुख अपार निळीये वेधलें । कृष्णरुप हे देखिलें सर्वांरुपी ॥५॥ या ध्यानी गुंफलें मनामाजी वेख । द्वैतभानसुख नाठवे मज ॥६॥ अद्वैत घरकुलें गुणाचें पैं रुप । मनामाजीं स्वरुप बिंबले रया ॥७॥ विस्मृति गुणांची स्मृति पैं भजना । दृष्टादृष्ट जनां ब्रह्मरुप ॥८॥ याचेनी सुलभें नाठवे संसारु । ब्रह्मची आकारु दिसत असे ॥९॥ वेगी सांग ठसा कोण हे रुपडें । कृष्णचि चहूंकडे बिंबलासें ॥१०॥ बापरखुमादेविवरु विठ्ठल सखी । कृष्णरुपीं सुखी तनु जाली ॥११॥

अर्थ:-

प्राणाची मैत्रिण जी बुद्धी तिला आत्मविचार प्रगट झाला म्हणजे ईश्वरानुग्रहांकरिता पूर्वी जी ध्यानाची वृत्ति असते ती नाहीसी झाली. व त्यामुळे द्वैतविषयक भावना किंवा कल्पना ह्या सर्व ईश्वराधिष्ठान परमात्म्याच्या ठिकाणी लय पावतात. त्या आत्म्याचा सत्य सुखाचा विचार गुरुंनी दाखविला तर फलद्रूप होणारी जी वृत्ति सगुणांत गुंतून राहिली असते तीच निर्गुणांत एकरुप होते. हे ऐक्याचे अपार सुख शामसुंदर श्रीकृष्णांच्या ठिकाणी प्रेम लागल्यामुळे सर्व रुपाच्या ठिकाणी त्याच्या सुखाचा अनुभव येतो. या श्रीकृष्णवेषरुपाचा मनामध्ये आकार गुंफुन राहिला आहे. त्याच स्थितित द्वैताच्या सुखांची आठवणही होत नाही. अद्वैत स्वरुपांत घरकुल करुन असलेले शामसुंदररुप बिंबून राहिले आहे. गुणांची विस्मृति असली तरी पूर्वसंस्काराने भजन चालतेच. त्यांतही दृष्टादृष्ट सर्व जगाला ब्रह्मरुपत्व दिसते. या सगुणस्वरुपांच्या भजनाने संसार आठवत नाही. पण सर्व संसार ब्रह्मरुपच दिसतो. याचा ठसा कुठे नाही. याचे रुप सांग, सर्वत्र हा श्रीकृष्णच प्रतिबिंबित झालेला दिसतो. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांच्या कृपेने माझे सर्व शरीरच सुखी होऊन गेले. असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *