ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 852

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-१४ वे, रूपके गाईच्या रूपकाने हरीचे वर्णन अभंग ८५२

आगरीचे क्षीर सागरीं पैल । डोंगरीं दुभते गाय रे ॥ दोहो जाणे त्यांचे दुभतें । जेवित्याची मेली माय रे ॥१॥ कान्हो पाहालें रे कान्हो पाहालें रे नवल विपरीत कैसें । जाणत्या नेणत्या झांसा पैं चतुरा लागलें पिसें ॥२॥ पाणीयाने विस्तव पेटविला । वारियाने लाविली वाती । आपेआप दीप प्रकाशला । तेथें न दिसे दिवसराती रे ॥३॥ खोकरी आधन ठेविलें । तेथें न दिसे माझी भाक । इंधनावीण पेटविलें । तेथें चुली नाहीं राख ॥४॥ जाणत्या नेणत्या झांसा पैल चतुरा बोलिजे ह्याळीं । निवृत्तिप्रसादें ज्ञानदेव बोलें ढिवर पडिले जाळीं ॥५॥

अर्थ:-

सर्वांत श्रेष्ठ मानल्या जाणाऱ्या क्षीरसागराच्या पलीकडे मायारूपी डोंगरावर एक परमात्मरूपी गाय आहे. त्या गाईचे दोहन करणारा अत्यंत तीव्र मुमुक्षु आहे. तो मुमुक्षु श्रीगुरूंच्या सहाय्याने त्या गाईचे दूध काढतो. ही दूध काढण्याची हातोटी ज्या मुमुक्षुला साधली असेल त्यालाच तिच्या दूधाचा म्हणजे परमानंदाचा लाभ होतो. शिवाय ते दूध प्यायल्यामुळे अनिर्वचनीय मिथ्या जगताची उत्पत्ति करणारी माया नष्ट होऊन जाते. हे काय विचित्र नवल आहे हे कळले. त्या गायीने शहाण्यांना, वेड्याला त्याच्याही पलीकडच्या चतुरांना आपला ध्यास लावून पिसे लावलेले आहे. काय मायेचा चमत्कार पहा. जणू पाण्यानेच विस्तव पेटवावा, वाऱ्याने दिवा लावावा, असा प्रकार केला आहे. आत्मप्रकाशाकडे पाहिले तर त्यांचे ठिकाणी दिवस रात्र नसून तो स्वयंप्रकाशाने प्रकाशीत आहे. अशा परमात्म्यांवर जगत निर्माण केले. म्हणजे जसे काय मोडक्या चुलीवर आदण ठेवावे असे केले. किवा लाकडावाचून विस्तव पेटावा असे केलं. तात्त्विक दृष्टीने पाहिल तर मूळांत चूल ही नाही व राख ही नाही म्हणजे जगत व जगत्कारणही काहीच नाही. अशा तऱ्हेचा माया व ब्रह्माचा विचार मोठमोठ्या शहाण्यांनाही कळला नाही. शहाणे वेडे सर्वच या विचाराच्या घोटाळ्यात पडले आहे. ताप्तर्य या परमात्मरूप गायीचा विचार आतापर्यंत यथार्थत्वाने कोणालाही कळला नाही. हा प्रकार म्हणजे मांसे जाळ्यांत सापडण्याऐवजी कोळीच जाळ्यांत सापडल्याप्रमाणे आहे. मी हे गाईचे वर्णन निवृत्तीनाथांच्या कृपेने केले.माऊली ज्ञानदेव सांगतात

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *