
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा
प्रपंचाची वस्ति व्यर्थ काह्या काज अभंग क्र.२२१
प्रपंचाची वस्ति व्यर्थ काह्या काज । आम्हा बोलतां लाज येतसये ॥१॥
काय करूं हरि कैसा हा गवसे । चंद्र सूर्य अवसे एकसूत्र ॥२॥
तैसें करूं मन निरंतर ध्यान । उन्मनि साधन आम्हां पुरे ॥३॥
निवृत्ति परिपाठ हरिनाम हेचि वाट । प्रपंच फुकट दिसे आम्हां ॥४॥
अर्थ: मायेच्या पटला मुळे भासमान होणारा अज्ञानी प्रपंचात काय म्हणुन राहयचे हे बुध्दीरुप सखी त्या विषयी बोलताना ही लाज वाटते. जसे चंद्र सुर्य आवसेला एकसुत्र होतात तसे त्या ब्रह्मरुपाला मिळवण्यासाठी जीव ला त्याच्याशी एकरुप व्हावे लागेल. त्यासाठी उन्मनी अवस्थेत त्याचे चिंतन मनन करणे हेच साधन आहे निवृत्तीनाथ म्हणतात माझा हरिनामाचा परिपाठ असल्यामुळे तो प्रपंच फुकाचा वाटतो.
सजीव साजीरी तिगुण गोजीरी अभंग क्र.२२२
सजीव साजीरी तिगुण गोजीरी । नांदे माजघरी आत्माराजु ॥१॥
सदाचार आम्हा नित्य हरिप्रेमा । नेणो मनोधर्मा प्रपंचाचिया ॥२॥
नित्य पै सोवळा अखंड पै निर्मळा । झणि बारा सोळा म्हणाल तया ॥३॥
निवृत्ति देवी कलिका पै अमूप । विश्वी विश्वरूप दावीतसे ॥४॥
अर्थ: सजीव साजरी असणारी सृष्टी आहे व त्या सृष्टीच्या हृदयात तो आत्माराम नांदत आहे.आम्ही सदाचाराने राहतो म्हणुन आमच्या हृदयमंदिरात त्याचा नित्य प्रेमवास आहे. त्या वाचुन आम्हाला प्रपंचाचा दुसरा कोणताही धर्म नाही.तो नित्य सोवळा व निर्मळ असुन सुर्याच्या बारा व चंद्राच्या सोळा कलांपेक्षा तो निर्मऴ आहे. निवृत्तिनाथ म्हणतात तो त्याच्या विश्वात्मक रुपातुन ज्ञानकलेचा अनुभव देतो.
देहाच्या देउळी राऊळ निद्रिस्त अभंग क्र.२२३
देहाच्या देउळी राऊळ निद्रिस्त । मायेचे अनुचित भुलि वेशी ॥१॥
चेतवला आत्मा अचेत पै हरि । कर्म भरोवरि खुंटले रया ॥२॥
भ्रांत माया सदा पै वैरिणी । मारुनी जीवनी जीव ठेवी ॥३॥
निवृत्ति अमर आत्माचि साचार । माया देवी घर ब्रह्म केले ॥४॥
अर्थ:देहात अंशात्मक रुपात असणारा परमात्मा मायेचा संग झाल्यामुळे निवांत निजला आहे. त्या मायेच्या आधिन असलेल्या अंशात्मक चैतन्याला तो हरिच जागृत करतो व तो एकदा जागृत झाला की कर्मबंधनातुन आपोआप सुटका होते.हि माया जीवाला जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकवते जीवाचा द्वेष करते पण त्याला मरु ही देत नाही व सुटकाही करु देत नाही सुटकेच्या साधना पासुन ती जीवाला लांब ठेवते.निवृत्तिनाथ म्हणतात, ती माया त्या परमात्माच्या घरात शिरुन त्याच्या बरोबर एकरुप होते तेच ऐक्य साधत मी अमर झालो.
सृष्टीच्या संमता सूरतरुतरु अभंग क्र.२२४
सृष्टीच्या संमता सूरतरुतरु । बोलिला विस्तारु धर्मशास्त्री ॥१॥
नेघो हे तरु प्रपंच परिवारु । प्रत्यक्ष ईश्वरु पुरे आम्हा ॥२॥
निवृत्ति निवांत हरीच सेवीत । दोअक्षरी उचित इंद्रियासी ॥३॥
अर्थ: धर्मशास्त्रात सांगितल्या प्रमाणे ही सृष्टी त्या परमात्माने मायेला स्वतःतुन उत्पन्न करुन रचली. तो निर्गुण अकर्ता मायेच्या रुपाने सगुण सृष्टीचा आदिबीज झाला व त्यातुन ह्या संसारवृक्षाची सुरवात झाली. पण मी ह्या संसार वृक्षाचा विचार करत नाही आम्ही फक्त त्या बीजरुप हरिला हृदयी धरतो. निवृत्तिनाथ म्हणतात, मी सर्व इंद्रियासहित हरि ह्या दोन अक्षरांचा निवांत जप करत आहेत.
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६