संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा १ ते ५

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा

अविट अमोला घेता पै निमोला अभंग क्र.१

अविट अमोला घेता पै निमोला । तो प्रत्यक्ष देखिला भीमा तटी ॥
अव्यक्त साकार अकारिला अंकूर । क्षरला चराचर भक्ति काजे ॥
अनुमान विटे सर्वा घटी माजिठे । ते परब्रम इटे भक्ति साह्य ॥
निवृत्ति घनवट पिकलिसे पेठ । पुंडलिके प्रगट केले असे ॥

अर्थ: जो विटत नाही, संपत नाही, जो कधी पुर्णत्वाला जात नाही, असा तो पांडुरंग पुर्वीच प्राप्त असल्यामुळे त्याला मी भीमा तटी सगुण रुपात पाहिला तो निर्गुण अव्यक्त रुप सोडुन सगुण होऊन आकारले आहे. असा हा परमात्मा भक्तांच्या भक्तीभावाने जगतात पाझरला आहे. जरी तो विटेवर उभा असला तरी सर्वांच्या ठिकाणी तो आहे. व तो भक्ताच्या हृदयात राहुन साह्य करतो. निवृत्तिनाथ म्हणतात असे हे परब्रह्म पुंडलिकाने पंढरपूर पेठेत उभे आहे.

प्राणिया उध्दार सर्व हा श्रीधर अभंग क्र.२

प्राणिया उध्दार सर्व हा श्रीधर । ब्रह्म हे साचार कृष्ण मूर्ती ॥
ते रुपभीवरे पांडुरंग खरे । पुंडलिक निर्धारे उभे असे ॥
युगे अठ्ठावीस उभा ऋषीकेश । पुंडलिक सौरस पुरवित ॥
निवृत्तिचे गुज पांडुरंगा बीज । विश्वजन काज पुरे कोडे ॥

अर्थ: जगाची उत्पत्ती करणारी माता ज्याच्या ह्रदय स्थानी आहे असा श्रीधर सर्व प्राणीमात्रांचा उध्दार करतो.व तो ब्रह्मस्वरुपाने कृष्ण रुपात साकारला आहे. तोच कृष्ण पांडुरंग स्वरुपात पुंडलिकाच्या निर्धारामुळे उभा आहे. तो गेली 28 युगे पुंडलिकाचा मायबापांच्या सेवेचा निर्धार पुर्ण करण्यासाठी तिकडे उभा आहे. निवृत्तिनाथ म्हणतात तो परमात्मा विश्वजनांचे कोड पुर्ण करण्यासाठी पांडुरंग बीज स्वरुपात उभा आहे.

रुपाचे रुपस विठ्ठल नाम वेष अभंग क्र.३

रुपाचे रुपस विठ्ठल नाम वेष । पंढरी निवास आत्माराम ॥
पुंडलिक भाग्य वोळले संपूर्ण । दिन निशी कीर्तन विठ्ठल हरी ॥
त्रैलोक्य उध्दरे ऐसी पव्हे त्वरे । कीर्तन निर्धारे तरणोपाय ॥
पुण्य केले चोख तारिले अशेख । जनी वनी एक रुप वसे ॥
वेदादिक मती ज्या रुपा गुंतती । तो आणुनि श्रीपती उभा केला ॥
निवृत्तिचा सखा विठ्ठल रुप देखा । निरालंब शिखा गगनोदरी ॥

अर्थ: जगातील सर्व रुप ज्याच्या रुपामध्ये आहे असा श्री विठ्ठल तो आत्मस्वरुप परमात्मा पंढरीत राहतो. पुंडलिकाच्या भाग्याने तो साकार झाला म्हणुन रात्रंदिवस कीर्तन करण्याचा लाभ मिळाला. हेच ते कीर्तन त्रयलोकांना तारुन नेते. कीर्तनामुळे सर्व तरुन जातात व त्यांना जनी वनी तोच परमात्मा दिसु लागतो. त्या वेदांची मती ही ह्यांच्या रुपात गुंतुन पडते.तो लक्ष्मीपती पुंडलिकाने आणुन उभा केला आहे. निवृत्तिनाथ म्हणतात तो माझा सखा श्री विठ्ठल त्याचे निराकार ब्रह्म स्वरुप ज्योती स्वरुपाने गगनाच्या पोटात व्यापक स्वरुपात आहे.

पाहता साधन विठ्ठल कीर्तन अभंग क्र.४

पाहता साधन विठ्ठल कीर्तन । भक्त संजिवन आत्माराम ॥
विठ्ठल सधर भिवराते नीर । नाम निरंतर केशवाचे ॥
शिव सुरवर चिंतिती सुस्वर । कीर्तन विचार पंढरीसी ॥
निवृत्ति कीर्तन दिननिशी ध्यान । मनाचे उन्मन इये रुपी ॥

अर्थ: ईश्वर प्राप्तीची अनेक साधने आहेत पण कीर्तन ह्या साधनामुळे भक्त आत्मारामाला प्राप्त करुन अमर होऊ शकतात. भक्त त्यासाठी चंद्रभागेत स्नान करुन बाह्य सुर्चिभूतता व तेच जल जठरात घेऊन आतील सुर्चिभूतता करुन सतत विठ्ठल नामाचे संकीर्तन करतात. आदिनाथ महादेव सर्व देवांना सोबत घेऊन सुस्वरे पंढरी क्षेत्रात कीर्तन करत असतात. निवृत्तीनाथ म्हणतात मी रात्रंदिवस संकीर्तन करुन माझे मन उन्मनी अवस्थेत विठ्ठल स्वरुपाला प्राप्त होते.

मन कामना हरी मने बोहरी अभंग क्र.५

मन कामना हरी मने बोहरी । चिंतिता श्रीहरी सुखानंद ॥
ते पुंडलिक तपे वोळले स्वरुप । जनाची पै पापे निर्दाळिली ॥
वेणुनाद तीर्थ चंद्रभागा समर्थ । विठ्ठल दैवत रहिवास ॥
निवृत्ती साकार विठ्ठल आचार । भिवराते नीर अमृतमय ॥

अर्थ: हरिच्या चिंतनाने सुखानंद प्राप्त होतो त्या मुळे मनाचे त्यातील इच्छांसकट हरण होऊन मन त्या स्वरुपाला प्राप्त होते इच्छा उरतच नाहीत. हे पुंडलिकाचे उपकार आहेत ज्यामुळे जनांच्या पापाचे निर्दाळण करण्यासाठी परब्रह्म स्वरुपाला प्राप्त झाले. जेथे वेणुनाद झाला असे चंद्रभागा तीर्थ त्याच्या रहिवासामुळे समर्थ झाले. निवृत्तीनाथ म्हणतात की भिवरेच्या अमृतमय तीर्थामुळे ते विठ्ठल रुप मला सगुण साकार रुपात मिळाले.

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *