संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा १११ ते ११५

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा

कारण परिसणा कामधाम नेम अभंग क्र.१११

कारण परिसणा कामधाम नेम ।
सर्वआत्माराम नेमियेला ॥
ते रूप सुंदर सर्वागोचर ।
कृष्ण परिकर गोपवेषे ॥
वेदादिक कंद ऊँकार उद्बोध ।
साकार प्रसिद्ध सर्वाघटी ॥
निवृत्ति म्हणे धाम कृष्ण हा परम ।
सौख्यरूपे सम वर्ततसे ॥

अर्थ: माझ्या सर्व इच्छा, सर्व कर्म, सर्व नित्यनेम हा तोच झाला असुन त्याच्याच मुळे मला आत्मभान स्वरुपात भगवंत जाणवला आहे. तेच कृष्णरुप सर्वांग सुंदर देखणे असुन गोकुळात अवतरुन सर्वाना प्राप्य आहे.सर्व वेदांचे सार जसे ॐकार प्रणवात एकवटले आहे. तसेच तो ॐकार त्या ब्रह्मस्वरुपातुन प्रतित होतो.निवृत्तिनाथ म्हणतात, तो भगवंत सर्व धामामध्ये संपुर्ण भरला असुन तो स्वानंद स्वरुपात सौख्य प्रदान करत असतो.

जेथे रूप रेखा नाही गुण देखा अभंग क्र.११२

जेथे रूप रेखा नाही गुण देखा ।
चिदाकाश एका आपतत्व ॥
ते रूप गोजिरे कृष्ण रूपे सांग ।
यशोदेचा पांग हरियेला ॥
जेथे रजतम नाही ते निःसीम ।
अपशम दम पूर्णघन ॥
निवृत्ति सार पा ब्रह्मसुख घन ।
सर्व जनार्दन गोपवेषे ॥

अर्थ: त्या जीवनयुक्त पाण्याला जसे आकार, रुप, रेखा नसते तसे ते निर्गुण ब्रह्मस्वरुप चिदाकाशाला व्यापुन जगतात प्रतित होत आहे.त्याच ब्रह्मस्वरुपाने गोजिरे कृष्णरुप घेऊन यशोदेचे पुत्रत्व स्विकारल्या मुळे तिचे सर्व पांग फिटले आहेत. त्याच रुपाला सत्व रज तम ह्या गुणांचा वाराही लागलेला नसुन तितिक्षा ही नसलेले ते परिपुर्ण स्वरुप आहे. निवृत्तिनाथम्हणतात, सर्वांचे सार घेऊन ते ब्रह्म जनार्दन कृष्ण होऊन गोपवेशात आला आहे.

गोत वित्त चित्त गोतासी अचुक अभंग क्र.११३

गोत वित्त चित्त गोतासी अचुक । चाळक पंचक तत्वसार ॥
ते जप सादृश्य कृष्णनाम सोपे । नंद यशोदाखोपे बाळलीला ॥
निरसूनि गुण उगविली खूण । गोकुळीं श्रीकृष्ण खेळे कैसा ॥
निवृत्तिचें सार कृष्णनामे पार । सर्व हा आचार हरिहरी ॥

अर्थ: जो आपल्या मनाचा, वित्ताचा चालक आहे.आपले गोत कोण असावेत हे ठरवतो तोच पंचकोष व पंचभुतांचा चालक आहे.त्याच परमात्मा श्रीकृष्णाचे नाम येवढे सोपे आहे जेवढ्या त्याच्या बाळलिला नंद यशोदेच्या घरात सहज वाटतात. तिन्ही गुणाचा निरास करुन हे परमात्म स्वरुप गोकुळात उगवले आहे ते गोकुळात अनेक खेळ करुन दाखवत आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, ह्या कृष्णनामाने पार होणाचे सार असे आहे की आपला सर्व आचार हरिरुप करणे मग पार होणे सोपे आहे.

विश्वाचा चाळक सूत्रधारी एक अभंग क्र.११४

विश्वाचा चाळक सूत्रधारी एक । विज्ञान व्यापक ज्ञानगम्य ॥
ते रूप साजिरे कृष्ण घनःश्याम । योगिया परम रूप ज्याचे ॥
शिवशिवोत्तम नाम आत्माराम । जनवनसम गोपवेषे ॥
निवृत्ति चाळक सर्वत्र व्यापक । आपरूपे एक सर्वत्र असे ॥

अर्थ: जगाच्या सर्व सत्तांचे सुत्र हातात असलेला तो विश्वंभर ह्या जगात पुर्ण रुपाने भरले त्याचे ज्ञान झाले की सर्व ज्ञान आपोआप होते. तेच परमात्म स्वरुप सुंदर मेघासारखा श्यामल कृष्णरुप होऊन साकारले आहे तेच रुप योगी ज्या परम स्वरुपाचे ध्यान करतात ते तेच रुप आहे. जे परमतत्व सर्वोत्तम शिवतत्व आहे जे सर्व जन वनात अंशात्मक स्वरुपात आहे तेच शिवतत्व पुर्ण स्वरुपात कृष्णात भरले आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, जे जीवन स्वरुपात सर्वत्र व्यापक स्वरुपात भरलेले आहे व जे जगाचे चालक आहे तसेच मला जाणवले आहे.

जाणोनि नेणते नेणत्या मागते अभंग क्र.११५

जाणोनि नेणते नेणत्या मागते । आपण पुरते नित्यपूर्ण ॥
ते स्वरूप कृष्ण गौळियाच्या भाग्ये । नंदासि सौभाग्य भागा आले ॥
जाणते पूर्णता पूर्णता समता । आपण चित्सत्ता गोपवेषे ॥
निवृत्ति परिमाण सर्वपूर्णघन । दिननिशी घन कृष्ण भाग्ययोगे ॥

अर्थ: सर्व ज्ञानाचा जनिता असलेल्या त्या भगवान कृष्णांने नेणतेपणा स्विकारला व ते गुरु संदिपनांकडे शिकायला गेले. तेच कृष्ण स्वरुप गोळ्यांच्या पुर्वपुण्याईने व नंदाच्या सौभाग्यामुळे गोकुळात आले. सर्व ज्ञानाची पुर्णता व सर्व ज्ञानांची समता ज्याच्यात आहे तो कृष्ण गोपाल वेश धारण करुन गोकुळात आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, जो सर्व परिणाम तोकडे करत जगतात भरला आहे त्या कृष्णरुप महाधनाचा लाभ मला दिननिशी होत आहे.

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *