संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा १०६ ते ११०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा

जयामाजी दीक्षा हारपोनि जाये अभंग क्र.१०६

जयामाजी दीक्षा हारपोनि जाये । द्वैत हेंही ठाये दुजेपणे ॥
ते रूप रोकडे दिसे चहूंकडे । गोपाळ सवंगडे खेळताती ॥
उपरति योगिया तितिक्षा हारपे । मायाकार लोपे कृष्णध्याने ॥
निवृत्ति तत्पर सर्व हा श्रीधर । मनाचा विचार हारपला ॥

अर्थ: त्या अद्वैत स्वरुपात द्वैताला द्वैत होण्यासाठी तसुभर जागा नाही.त्याच रुपात मंत्र देणारा गुरु व मंत्र घेणारा शिष्य ह्यांचा लय होऊन ते त्या ब्रह्मस्वरुपात लीन होतात. ते रुप सगुण साकार होऊन गोपाळांबरोबर खेळत आहे. त्याच स्वरुपात योग्यांना वैराग्य ज्ञान व तितिक्षा ह्यांचा लय करता येतो व माया ही त्याच ठिकाणी ब्रह्मरुप पावते.निवृत्तिनाथ म्हणतात, त्या रुपाच्या सर्वत्र प्रगट होण्याने मन त्या श्रीधर रुपात मग्न होते

रसज्ञ रसाचार रसामाजी वसे अभंग क्र.१०७

रसज्ञ रसाचार रसामाजी वसे । जीवन हे सोसे असोस होय ॥
ते रूप स्वरूपाचे रूपीच वोळले । कंदर्पें घोळिले नंदाघरी ॥
नाही त्या आकार अवघाची वैकुंठ । अद्वैत घनदाट ब्रह्ममय ॥
निवृत्ति नितंब कृष्ण तो स्वयंभ । श्रीमूर्तीचे बिंब दिसे सर्व ॥

अर्थ: जसे रसज्ञ आपल्याला आवडता रस अनेक पदार्थातुन ओळखुन नेमक्या पदार्थात घेतात त्या प्रमाणे पृथ्वीवर पाणी अपार आहे पण प्रत्येक जीव त्याला आवश्यक पाणीच घेतो. मदनाला वाटले आपला ही शिरकाव गोकुळात कृष्णा बरोबर होईल पण कृष्णाने त्याला पार घुमवुन बेजार केले. त्या रुप नसलेल्या ब्रह्माने गोकुळच नाही तर सर्व चराचर धनदाट पध्दतीने व्यापुन टाकले आहे. निवृत्तिनाथ म्हणतात तो कृष्ण प्रकाशमान असुन त्याच्या शरिराचा वरचा भाग स्वर्गलोक मधील भाग मृत्युलोक व कंबरेखाली पाताळ लोक स्वरुपात जरी असला तरी मला तो एकत्वाने ब्रह्मरुपातच दिसतो.

अनंत रचना हारपती ब्रम्हांडे अभंग क्र.१०८

अनंत रचना हारपती ब्रम्हांडे । हेळाचि वितंडे मोडीतसे ॥
ते रूप राजस वसुदेव भोगी । देवक्रीयेलागीं वोळलासे ॥
विचित्र रचना ब्रम्हांड कुसरी । निरालंब हरि गोकुळीं वसे ॥
निवृत्ति संपदा गाताती गोविंदा । भोगिती मुकुंदा निजबोधे ॥

अर्थ: अनंत जगाची रचना तो करतो व त्याच्याच ठिकाणी त्या जगताचा लय होतो. त्याच रुपाने देवकीच्या उदरातुन जन्म घेतला व वसुदेवाने पिता होण्याचे सुख.त्याच रुपाने आधी विविध रुपात जगताची निर्मीती केली व नंतर कृष्ण बनुन तो गोकुळात अवतरला. निवृत्तिनाथ म्हणतात, मी माझ्या बौध्दिक संपदेने त्या गोविंदाचे वर्णन गाऊन त्याच्या मुकुंद स्वरुपात आत्मबोधाचा आनंद घेत आहे.

व्याप्तरूपे थोर व्यापक अरूप अभंग क्र.१०९

व्याप्तरूपे थोर व्यापक अरूप । दुसरे स्वरूप नाही जेथे ॥
ते अव्यक्त साबडे कृष्णाचे रुपडे । गोपाळ बागडे तन्मयता ॥
उन्मनि माजिटे भोगिती ते मुनी । मूर्तिची पर्वणी हृदयीं वसे ॥
निवृत्ति कारण कृष्ण हा परिपूर्ण । यशोदा पूर्णघन वोळलासे ॥

अर्थ: ज्या निर्गुणरुपाने सर्व जगत व्यापले आहे त्यारुपाच्या जागी दुसरे कोणतीही रुप नाही. त्याच रुपाने भाबडे सगुण कृष्णरुप धारण केले असुन ते गोपाळांत बागडत आहे. उन्मनी ह्या स्वरुप ज्ञानाच्या प्रकाराने मुनी त्या रुपाचा आनंद उपभोगुन ती कृष्णमूर्ती हृदयात स्थापित करतात. निवृत्तिनाथ म्हणतात, आपल्या कर्मामुळे हे कृष्ण हे रुप परिपूर्ण झाले आहे व ते रुप यशोदेचा पुत्र होऊन आल्या मुळे तिला महाधन प्राप्त झाले आहे.

आद्यरूपसार जेथुनि ऊँकार अभंग क्र.११०

आद्यरूपसार जेथुनि ऊँकार । तो प्रणव साचार हारपला ॥
ते रूप समर्थ रामकृष्णनाथ । गोपिका कृतार्थ नाम घेता ॥
ब्रम्हांड घडले अनंत घटमठ । आपोआप धीट मुनिजना ॥
निवृत्तीचे सार सर्व हा परिकर । कृष्णचि साकार बिंबिलेसे ॥

अर्थ: वेदाना ह्या ब्रह्मस्वरुपाची निर्मिती कळली नाही त्या रुपातुन ॐकार प्रगट झाला व तो ॐकार प्रणव त्या ब्रह्मरुपातच हारपला. त्याच ब्रह्मस्वरुपाने रामकृष्ण हे सगुण रुप घेतले व त्याच रामकृष्ण नामाचा घोष करुन गोपिका कृतार्थ झाल्या.त्याच ब्रह्मस्वरुपाने अनंत जगताची निर्मिती केली व त्याच्या पासुन झालेल्या ऋषीनी धीट होऊन मठांची निर्मिती केली. निवृत्तिनाथ म्हणतात, ह्या सर्वाचे सार असलेले कृष्णरुप म्हणजेच परिपूर्ण ब्रह्मस्वरुप आहे व त्याच्या तेजाने जगत प्रकाशमान झाले आहे.

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *