संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा ११६ ते १२०

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा

मृगजळाभास लहरी अपार अभंग क्र.११६

मृगजळाभास लहरी अपार । हा प्रपंच पसारा उदरी जया ॥
ते रूप वैकुंठ कृष्णरूपे खेळे । गोपाळांचे लळे यमुनातटी ॥
जाळूनि इंधन उजळल्या दीप्ती । आनंतस्वरूपी एक दिसे ॥
निवृत्ति सागर ज्ञानार्क आगर । कृष्णचि साचार बिंबलासे ॥

अर्थ: मृगजळाच्या अमर्याद लाटां प्रमाणे हे मायेच्या पटलात बध्द असलेले ह्या जगताचा पुर्ण पसारा त्याच्या उदरात आहे. तेच रुप कृष्ण रुप घेऊन गोपाळांच्या लळ्यामुळे यमुनातटी वैकुठातुन येऊन कृष्णरुप धरुन खेळत आहे. अग्नीत इंधन टाकल्यावर जशा दशदिशा प्रदीप्त होतात पण तो अनंत स्वरुपातील प्रकाश मात्र एकत्वाने जाणवत असतो. निवृत्तिनाथ म्हणतात, तोच परमात्मा ज्ञानार्काचा सागर बनुन त्या सागराला उदरात धरुन तोच परमात्मा कृष्ण रुपाने साचार होऊन बिंबला आहे.

गोत वित्त धन मनाचे उन्मन अभंग क्र.११७

गोत वित्त धन मनाचे उन्मन । निमोनि संपूर्ण तयामाजी ॥
जीवन पावन रसाचे निधान । रसरूपे धन रसनेचे ॥
भोग्य भोग भोक्ता आपण तत्त्वता । त्याहुनी परता तयामाजी ॥
निवृत्ति आगर कृष्ण हा सागर । सर्वरूपे श्रीधर दिसतसे ॥

अर्थ: संपत्ती ऐश्वर्य नात्यासारख्यातुन मन बाजुला करुन परमेश्वराच्या सगुणरूपाचा आनंदाने मन शांत झाले आहे.पाण्यातुनच आलेले अनेक चवा जशी जिभाला कळते हेच कळणे म्हणजे जिव्हेचे महाधन आहे जसा भोग्य, भोग, व भोक्ता ह्या त्रिपुटीत आपण तत्वतः बसतो जीव म्हणुन पण हा त्या पासुन वेगळा आहे. निवृत्तीनाथ म्हणतात,हे कृष्णरुप समुद्रा पेक्षा विशाल असुन आशा अनेक समुद्राचे चे ते आगर असुन मला त्या सर्व रुपात तो श्रीधर दिसतो.

निरकृत्य कृत्य विश्वाते पोखिते अभंग क्र.११८

निरकृत्य कृत्य विश्वाते पोखिते । आपण उखिते सर्वाकार ॥
तोचि हा सावळा डोळ डोळस सुंदर । रुक्मिणीभ्रमर कृष्ण माझा ॥
निश्चळ अचळ नाही चळवळ । दीन काळ फळ हारपती ॥
निवृत्ति सोपान खेचर हारपे । तदाकार लोपे इये ब्रह्मी ॥

अर्थ: निर्गुण निराकार परमात्मा विविध आकाराने नटलेल्या जगाचा निर्मिता आहे. स्वतःच अनेक आकार धारण करुन ह्या जगाचे पोषण ही करतो. श्री रुक्मिणीच्या भोवती हा राहणारा कृष्णभ्रमर जरी सावळा असला तरी सर्वांग सुंदर आहे. अकर्ता निर्गुण परमात्मा हालचाल करत नाही तरी ही त्याच्यामुळे रोज दिवसरात्र होत असतात हे आश्चर्य आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, नावाने वेगळे असणारे सोपान, खेचर जरी भिन्न वाटत असेल तरी त्यांच्यातील ब्रह्मस्वरुप एकच असल्याने त्यांच्यातील एकत्व मी पाहात आहे.

मथनी मथन मधुरता आपण अभंग क्र.११९

मथनी मथन मधुरता आपण । विश्वी विश्व पूर्ण सदोदित ॥
ते हे चतुर्भुज मुगुटवर्धन । सुंदर श्रीकृष्ण खेळतसे ॥
दुमदुम पाणि दुमिळित ध्यानी । दृढता निशाणी काष्ठी लागे ॥
ध्रुवाद्य अढळ ब्रह्म हे अचळ । शोखिमायाजाळ निःसंदेहे ॥
क्लेशादि कल्पना क्लेशनिवारणा । आपरूपे भिन्न होऊ नेदी ॥
निवृत्ति कठिण गयनिप्रसाद । सर्वत्र गोविंद नंदाघरी ॥

अर्थ: मंथन करुन दह्यातुन जसे लोणी व ताक काढले जाते नवनीत शुध्द व ताक असार मानले जाते तसे ह्या परमात्म्याच्यामुळे विश्वातुन चैतन्य सार व जड असार वेगळे निघते हे पूर्णस्वरुपात ह्या विश्वात आहे. तोच परमात्मा चतुर्भुज रुप टाकुन उंच मुकुट धारण करून श्रीकृष्ण बनुन खेळत आहे. पातळ पाणी स्तब्ध होऊन मुळाला मिळाल्यावर झाडाचे लाकुड कठीण स्वरुपाला प्राप्त होते. जसे सर्व वाद्यात शिरस्थान विणेचे अढळ आहे तसेच ब्रह्माचे स्थान अढळ आहे. व तेच ब्रह्म मायाजाळाचे शोषण करुन ब्रह्मस्वरुप दाखवते. त्या ब्रह्मस्वरुपाचे दर्शन झाल्यावर पुर्वजन्मीचे दुःख क्लेष हे त्या जीवाजवळ फिरकु ही शकत नाहीत म्हंणजेच तो जीव व ते ब्रह्म यांचे एकरुपत्व होते.निवृत्तिनाथ म्हणतात, गहिनीनाथांच्या प्रसादाने तो सर्वासाठी कठिण असलेला नंदाघरचा परमात्मा मला सोपा झाला.

मन निवटले ज्ञान सांडवले अभंग क्र.१२०

मन निवटले ज्ञान सांडवले । ठाणदिवी केले ध्यानलागीं ॥
उमटल्या ध्वनी कृष्णनामठसे । सर्व ऋषिकेश भरला दिसे ॥
दिशा दुम ध्यान हारपली सोय । अवघा कृष्ण होय ध्यानीमनी ॥
निवृत्तिमाजि घर मनाचा सुघडु । कृष्णचि उपवडु दिसतसे ॥

अर्थ: जसा लामण दिवा लावल्यावर प्रकाश पसरतो तसा परमात्मज्ञानाचा दीप मनात लाऊन विज्ञान म्हणजे संसार ज्ञान टाकुन मनात त्या स्वरुपाचे ध्यान लावले. त्यातुन जो अनुहत ध्वनी श्रीकृष्ण नामाचा प्राप्त झाला व हे जगत त्या हृषीकेषाने विनटले आहे हे जाणवले. तो अवघा कृष्ण ध्यानीमनी असल्यामुळे मायिक विश्वातील जड व दिशा या यांचे ज्ञान हरपुन गेले.निवृत्तिनाथ म्हणतात माझे असे ध्यान लागल्यामुळे सर्व मनात तो सर्वत्र भरल्याने सर्व जागी ते कृष्णरुप मला दिसत आहे.

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading