ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 876

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-१४ वे, रूपके विरहिणी अभंग ८७६

तुजवीण येकली रे कृष्णा न गमे राती । तंव तुवां नवल केलें वेणू घेउनी हातीं । आलिये तेचि सोय तुझी ओळखिली गती ॥१॥ नवल हें वालभरे कैसें जोडलें जिवा । दुसरें दुरी ठेलें प्रीति केला रिघावा ॥धृ॥ पारू रे पारू रे कान्हा झणे करीसी अव्हेरू । तूं तंव हृदयींचा होसी चैतन्य चोरू । बापरखुमादेविवरा विठो करी का अंगीकारू ॥२॥

अर्थ:-

श्रीकृष्णा तुझ्यावांचून रात्री मला एकटीला करमत नव्हते केव्हा तुझे दर्शन होईल अशी फार उत्कंठा होती. इतक्यांत तूं असा चमत्कार केलास की हातांत वेणू घेऊन तूं वाजवू लागलास. अशा वेळी सर्व घरदार टांकून ज्या तुझ्याकडे यमुना तीरी आल्या त्यांनी तुझ्या प्राप्तीची सोयं ओळखली. तुजवरील असलेल्या प्रेमाचा काय चमत्कार सांगावा? घर, दार, मुले, बाळे सर्व दूर करून अंतःकरणांत ज्यांनी तुझी प्राप्ती करून घेतली म्हणजे परमानंदरूप जो तूं तो तूच अंतःकरणांत प्रवेश केलास. पारु रे पारू म्हणजे त्रिगुणात्मक कार्याच्या पलीकडे असलेल्या श्रीकृष्णा आम्ही त्रिगुणात्मक कार्याशी तद्रुप असल्यामुळे कदाचित तूं आमचा अव्हेर करशील परंतु तूं आमचे चित्ताचा चोरणारा असल्यामुळे(अर्थात् देहतादात्म्य नष्ट करणारा असल्यामुळे) आमचे हृदयांत वास करणारा होऊन माझे पिता व रखुमादेवीचे पती असलेल्या श्रीविठ्ठला तूं आमचा अंगीकार कर. असे माऊली सांगतात

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *