ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.969

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

अभंग ९६९

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-१४ वे, रूपके कापडी अभंग ९६९

आम्ही कापडी रे आम्ही कापडी रे । पापें बारा वाटा पळती बापडी रे ॥१॥ पंढरपुरीचे आम्ही कापडी रे । उत्तरपंथीचे आम्ही कापडी रे ॥२॥ आजी पाहालें रे आजी पाहालें रे । संतसंगति सुख जालें रे ॥३॥ समता कावडी रे समता कावडी रे । माजी नामांमृत भरिलें आवडी रे ॥४॥ येणें न घडे रे जाणे न घडे रे । निजसुख कोंदले पाहातां चहूंकडे रे ॥५॥ नलगे दंडणे रे नलगे मुंडणे रे । नाम म्हणोनी कर्माकर्म खंडणे रे ॥६॥ दुःख फिटलें रे दुःख फिटलें रे । बापरखुमादेविवर विठ्ठलें रे ॥७॥

अर्थ:-

आम्ही कापडी म्हणजे यात्रेकरू आहोत. आमच्याकडे बघून पातकें बारा वाटेला पळून जातात.आम्ही पंढरपूरचे यात्रेकरू असून आमचा रस्ता उत्तरपंथाचा म्हणजे ज्ञानाचा आहे. अशी आम्ही यात्रा करित असल्यामुळे आमच्या ठिकाणी ज्ञानरूपी सूर्याचा उदय झाला. आणि आम्हाला ब्रह्मसुख लाभले. याला कारण संतांची संगती हे होय. सर्वत्र ब्रह्मस्वरूप भरलेले आहे. अशा तऱ्हेच्या कावडी आम्ही खांद्यावर घेतल्या आहेत. त्या कावडीमध्ये प्रेमभरीत नामामृत भरले आहे. त्यामुळे जन्माला येणे अगर मरणे याची आम्हाला आवश्यकता उरली नाही. एक ब्रह्मसुखच भरले आहे. असा आमचा निश्चय झाला. याकरिता आम्हाला दंडण, मुंडण वगैरे काही करावे लागत नाही. एकनिष्ठपणाने आम्ही नामस्मरण करित असल्यामुळे आमच्या ठिकाणी कर्म अकर्म इत्यादिकांचे खंडण होऊन गेले. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांच्या नामस्मरणामुळेआमच्या ठिकाणच्या सर्व दुःखाची निवृत्ति होऊन गेली. असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *