सार्थ ज्ञानेश्वरी:॥अथ एकादशोऽध्यायः- अध्याय अकरावा ॥ विश्वरूपदर्शनयोगः॥
अध्याय अकरावा
1-11
आतां यावरी एकादशीं । कथा आहे दोहीं रसीं । येथ पार्था विश्वरूपेंसीं । होईल भेटी ॥1॥
यानंतर आता जेथे अर्जुनाला विश्वरूपाचे दर्शन होणार आहे, त्या अकराव्या अध्यायातील कथाभागात दोन रस मुख्यतः व्यक्त झालेले आहेत
2-11.
जेथ शांताचिया घरा । अद्भुत आला आहे पाहुणेरा । आणि येरांही रसां पांतिकरां । जाहला मानु ॥2॥
याप्रमाणे या अध्यायात शांतरसाच्या घरी, अद्भूतरस हा पाहूणचाराला आला आहे, असे दिसेल आणि इतरहि रसांना त्यांच्यापक्तीस पाहूणचाराचा मान मिळणार आहे.
3-11
अहो वधुवरांचिये मिळणीं । जैशी वराडियां लुगडीं लेणीं । तैसे देशियेच्या सुखासनीं । मिरविले रस ॥3॥
अहो ! ज्याप्रमाणे मुलामुलीच्या लग्नात आलेले पाहुणे वस्रालंकारांनी सुशोभित होऊन मिरवतात, त्याप्रमाणे या मराठी भाषेच्या पालखीत बसून हे सर्व रस मिरवतील.
4-11
परी शांताद्भुत बरवे । जे डोळियांच्या अंजुळीं घ्यावें । जैसे हरिहर प्रेमभावें । आले खेंवा ॥4॥
पण ज्याप्रमाणे हरिहरांना प्रेमाने अलिंगन द्यावे, त्याप्रमाणे शांत व अद्भूत हे दोन रस मात्र डोळ्यांच्या ओंजळीने म्हणजे स्पष्टपणे घेता येतील.
5-11
ना तरी अंवसेच्या दिवशीं । भेटलीं बिंबें दोनी जैशीं । तेवीं एकवळा रसीं । केला एथ ॥5॥
किंवा अमावास्येच्या दिवशी, ज्याप्रमाणे सूर्यबिंब व चंद्रबिंब ही दोन्ही बिंबे मिळून जातात, त्याप्रमाणे या अध्यायात दोन रस एकत्र मिळालेले आहेत
6-11.
मीनले गंगेयमुनेचे ओघ । तैसें रसां जाहलें प्रयाग । म्हणौनि सुस्नात होत जग । आघवें एथ ॥6॥
किंवा ज्याप्रमाणे गंगायमुना यांचे प्रवाह प्रयागाचे ठिकाणी एकत्र झाले, त्याप्रमाणे हा अध्याय शांत व अद्भूत या रसांचे प्रयागस्थळ झाले आहे; म्हणून सर्व जग प्रयागक्षेत्राप्रमाणे येथे स्नान करून पवित्र होईल.
7-11
माजीं गीता सरस्वती गुप्त । आणि दोनी रस ते ओघ मूर्त । यालागीं त्रिवेणी हे उचित । फावली बापा ॥7॥
ज्याप्रमाणे प्रयागाचे ठिकाणी गंगा यमुना यांच्या संगमांत गुप्तपणे सरस्वतीचा संगम होऊन, प्रयाग हे त्रिवेणी संगमाचे स्थान झाले आहे, त्याप्रमाणे या अध्यायांतहि शांत व अद्भूत या दोन रसांचे प्रगट प्रवाह असून त्यामध्ये भगवंताची गीतारूप रसाळवाणीरूपी सरस्वति नदीचा गुप्त प्रवाह असल्यामुळे, बापहो ! हा अध्याय म्हणजे योग्य त्रिवेणी संगमच झाला आहे.
8-11
एथ श्रवणाचेनि द्वारें । तीर्थीं रिघतां सोपारें । ज्ञानदेवो म्हणे दातारें । माझेनि केलें ॥8॥
श्रीज्ञानेश्वरमहाराज म्हणतात, स्वामी निवृत्तिनाथांनी मला निमित्त करून या त्रिवेणीक्षेत्रात जाण्याकरितां श्रवणाचा सोपा मार्ग करून दिला.
9-11
तीरें संस्कृताचीं गहनें । तोडोनि मऱ्हाठियां शब्दसोपानें । रचिली धर्मनिधानें । श्रीइनिवृत्तिदेवें ॥9॥
संपूर्ण धर्माची ठेव अशा निवृत्तिनाथांनी या संगमाच्या तीरावरील मूळची संस्क त भाषेचीं दुर्गम अरण्यें तोडून मराठी शब्दरूपी पायर्या बांधल्या.
10-11
म्हणौनि भलतेणें एथ सद्भावें नाहावें । प्रयागमाधव विश्वरूप पहावें । येतुलेनि संसारासि द्यावें । तिळोदक ॥10॥
म्हणून कोणीहि येथे सद्भाव धरून स्नान करावें व या प्रयागांतील माधव जें विश्वरूप त्याचें दर्शन घ्यावें. एवढ्यानेच त्यांना संसाराचा निरास करतां येईल.
11-11
हे असो ऐसें सावयव । एथ सासिन्नले आथी रसभाव । तेथ श्रवणसुखाची राणीव । जोडली जगा ॥11॥
असे हे सावयव रूपकाचें निरूपण पुरे. या अध्यायांत रसभाव भरास आलेले आहेत आणि येथे सर्व जगाला श्रवणाच्या आनंदाचे राज्यच प्राप्त होईल. (श्रवणापासून परमसुख प्राप्त होईल असा अर्थ.)
12-11
जेथ शांताद्भुत रोकडे । आणि येरां रसां पडप जोडे । हें अल्पचि परी उघडें । कैवल्य एथ ॥12॥
जेथे केवळ शांतरस व अद्भूतरस हे स्पष्ट आहेत आणि बाकींच्या रसांनाही शोभा म्हणजे मान प्राप्त झाला आहे. हे थोडे असले तरी उघड मोक्ष करून देणारे आहेत.
13-11
तो हा अकरावा अध्यायो । जो देवाचा आपणपें विसंवता ठावो । परी अर्जुन सदैवांचा रावो । जो एथही पातला ॥13॥
तो हा अकरावा अध्याय म्हणजे स्वतः भगवान श्रीकृष्णाच्या विश्रांतिच्या ठिकानांचे निरूपण करणारा होय. पण अर्जुन मात्र सर्व भाग्यवानांमध्ये थोर भाग्यवान आहे, कारण तो येथेहि प्राप्त झाला. (जो देवाचा अपणपें विसंबता ठावो – भगवंताचा सगुण साकार चतुर्भुजादि मूर्त्याविष्कार या विश्वरूपापासूनच होतो व तेथेच पुनः अंतर्धान पावतो असा अर्थ)
14-11
एथ अर्जुनचि काय म्हणों पातला । आजि आवडतयाही सुकाळु जाहला । जे गीतार्थु हा आला । मऱ्हाठिये ॥14॥
एकट्या अर्जुनालाच हा लाभ प्राप्त झाला असे का म्हणावें? गीतार्थ हा आता मराठी भाषेत आला असल्यामुळे, वाटेल त्याला सहज प्राप्त होण्याजोगा झाला आहे.
15-11
याचिलागीं माझें । विनविलें आइकिजे । तरी अवधान दीजे । सज्जनीं तुम्ही ॥15॥
म्हणूनच तुम्ही संतजनांनी एकाग्र चित्त द्यावें व माझी विनंति ऐकावी.
16-11
तेवींचि तुम्हां संतांचिये सभे । ऐसी सलगी कीर करूं न लभे । परी मानावें जी तुम्ही लोभें । अपत्या मज ॥16॥
त्याचप्रमाणे तुमच्यासारख्या संत समाजांमध्ये मी असा धीटपणा करणें खरोखर बरें नाही, पण तुम्ही आईबापांनी माझ्यासारख्या लेंकरांच्या विनंतीला पुत्रलोभाने मान द्यावा.
17-11
अहो पुंसा आपणचि पढविजे । मग पढे तरी माथा तुकिजे । कां करविलेनि चोजें न रिझे । बाळका माय ॥17॥
अहो ! राघूला आपणच शिकवावें व शिकून राघू बोलूं लागला म्हणजे आपणच आनंदाने मान डोलवावी किंवा लेंकरांकडून एखादी कौतुकाची गोष्ट करवून, ती पाहून आई आपणच आनंदी होत नाही काय?
18-11
तेवीं मी जें जें बोलें । तें प्रभु तुमचेंचि शिकविलें । म्हणौनि अवधारिजो आपुलें । आपण देवा ॥18॥
त्याप्रमाणे मी जें जें बोलतों तें ते, महाराज ! तुम्ही शिकविलेलेच बोलतों, म्हणून देवा ! तुम्ही शिकविलेलेंच तुम्ही ऐका.
19-11
हें सारस्वताचें गोड । तुम्हींचि लाविलें जी झाड । तरी आतां अवधानामृतें वाड । सिंपोनि कीजे ॥19॥
हें ललितवाङ्गमयाचे मधूर झाड तुम्हींच लाविलें, तेव्हा आता त्यावर अवधानरूपी अमृताचें सिंचन करून त्याचे पालन पोषन करावें.
20-11
मग हें रसभाव फुलीं फुलेल । नानार्थ फळभारें फळा येईल । तुमचेनि धर्में होईल सुरवाडु जगा ॥20॥
मग हें झाड, नानरसभावरूपी फुलाने फुलून जाईल आणि अनेक अर्थरूपी फळभाराने तें फलद्रूप होईल. तुमच्या या परोपकाररूपी धर्माने सर्व जगाला सुखाचा लाभ होईल.
21-11
या बोला संत रिझले । म्हणती तोषलों गा भलें केलें । आतां सांगैं जें बोलिलें । अर्जुनें तेथ ॥21॥
श्रीज्ञानेश्वर माउलिच्या या बोलण्याने संतांना फार समाधान झालें व ते म्हणाले, बाबा ! फार चांगले बोललास ! आम्हांला संतोष झाला आता पुढे अर्जुन काय म्हणाला ते सांगा.
22-11
तंव निवृत्तिदास म्हणे । जी कृष्णार्जुनांचें बोलणें । मी प्राकृत काय सांगों जाणें । परी सांगवा तुम्ही ॥22॥
तेव्हा निवृत्तिदासांचे दास श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अहो महाराज ! श्रीकृष्णार्जुनाचे पुढे काय बोलणें झालें, हे मज अज्ञानी लेंकराला सांगता येईल? परंतु तुम्हीच मजकडून बोलवा.
23-11
अहो रानींचिया पालेखाइरा । नेवाणें करविले लंकेश्वरा । एकला अर्जुन परी अक्षौहिणी अकरा । न जिणेचि काई ॥23॥
अहो ! जंगलांतील झाडांचा पाला खाऊन राहणार्या वानरांकडून लंकेश्वर जो रावण त्याचा पराभव श्रीरामांनी करवीला. एकटा अर्जुन, पण त्याने कौरवांचे अक्रोड अक्षौहिणी सैन्य जिंकले नाही काय?
24-11
म्हणौनि समर्थ जें जें करी । तें न हो न ये चराचरीं । तुम्ही संत तयापरी । बोलवा मातें ॥24॥
म्हणून समर्थ जे करूं म्हणतील ते जगांत घडून येणार नाही असे होत नाही. त्याप्रमाणे आपण संतजनांनीहि माझ्याकडून बोलवावें.
25-11
आतां बोलिजतसें आइका । हा गीताभाव निका । जो वैकुंठनायका- । मुखौनि निघाला ॥25
श्रीवैकुंठीचा स्वामी जो भगवान श्रीकृष्ण, त्याच्या मुखांतून जो उत्तम गीतोपदेश निघाला तो मी सागतों, ऐका.