भगव्या रंगाचा संबंध !

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

सर्व लेखांची सूची पहा.

(अवश्य वाचा. कारण आपण माणूस आहोत)

(अवश्य विचार करा)
भगव्या रंगाचा आणि वारकरी संप्रदायाचा कांही संबंध आहे कां? असा प्रश्न मला एका माणसाने विचारलेला आहे. त्याचे उत्तर प्रस्तुत लेखात देण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे.

प्रथमत: भगवा रंग हा त्यागाचे प्रतीक आहे. ज्या वेळेला आरंभी सृष्टी उत्पन्न होत असताना सूर्योदय झाला. त्याचा प्रथम रंग हा “केशरी रंग” होता. त्यातून सुर्योदयाच्या प्रसंगातून भगवंताने असा एक संकेत दिला की, आता त्यागाचा उदय झालेला आहे. म्हणून त्यागाचे प्रतीक म्हणूनच या भगव्या रंगाकडे, केशरी रंगाकडे पाहिले जाते. पुढे तो केशरी रंग ध्वजाला वापरात आला. त्यालाच “भगवा ध्वज” असे म्हणतात.

हा भगवा ध्वज सर्व धर्म मंदिरावर लावण्यात आला. जगामध्ये ज्या वेळेला सर्वत्र हिंदूधर्म व्यापक प्रमाणात होता. त्यावेळेला जगातील सर्व मंदिरावर भगव्या रंगाची भगवी ध्वजा उभारली होती. डौलाने फडकत होती. या भारत भूमीवरदेखिल जी हिंदूंची धर्ममंदिरे आहेत, या सर्व मंदिरावर आजही भगवे ध्वज आहेत, मोठ्या डौलाने फडकत आहेत, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा या भगव्या ध्वजाचे राज्य निर्माण केले आहे. कारण “हे राज्य शंभू महादेवाचे आहे, तुळजाभवानी मातेचे आहे” अशी त्यांची निश्चित धारणा होती. त्यामुळे हे भगवंताचे राज्य असून मी त्या राज्याचा सेवक आहे. अशी भावना महाराजांच्या अंतकरणातून कधीही निवृत्त झाली नाही. महाराजांनी संपूर्ण हिंदू समाजाला त्यागाची शिकवण, स्वाभिमानाची शिकवण दिलेली आहे. कारण संपूर्ण हिंदू समाज स्वाभिमान विसरून निधर्मी, नास्तिक, अत्याचारी लोकांचा गुलाम बनलेला होता. त्या समाजाला स्वाभिमानी आणि बाणेदारपणा शिकवण्याचे महत्त्वाचे काम हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले आहे, म्हणून शिवाजी महाराज हे “युगपुरुष” आहेत. असा हा युगपुरुष या पूर्वी आणि नंतर कधीही होणार नाही.
असो.

वारकरी संप्रदायीक संतांनीसुद्धा या भगव्या ध्वजाची गुढी खांद्यावर घेऊन पंढरीची वारी केलेली आहे. असा हा परम पावन भगवा ध्वज आहे. त्याला त्रिवार वंदन करतो.

परंतु……..
या भगव्या रंगाचा कांही लोक मात्र दुरुपयोग करताना दिसत आहेत.
भगवी वस्त्रे परिधान करणारा संन्यासी असतो !
कां?,
संन्यासी हा भगवी वस्त्रे परिधान करतो?
तर संन्यासी हा भगवी वस्त्रे परिधान करत असतो.

परंतु जो भगवी वस्त्रे धारण करतो, तो संन्यासी असतो असे मात्र नाही.
कारण
ब्रह्मचर्य,
गृहस्थ,
वानप्रस्थ,
संन्यास असे चार आश्रम असून
या चार आश्रमा पैकी संन्यासाश्रम स्वीकारणारासच भगवी वस्त्रे परिधान करण्याचे विधान आहे.
म्हणून ज्याला संन्यास घ्यायचा आहे, त्याने विधीपूर्वक संन्यास घेऊन अंगावर भगवी वस्रे धारण करावीत असा नियम आहे.

संन्यास हा कोणी घ्यावा? याविषयी सुद्धा नियम आहे.
परंतु हल्लीच्या कालामध्ये कोणीही भगवी वस्त्रे धारण करतात आणि संन्यासी म्हणून मिरवतात, ही दुर्दैवाची गोष्ट आहे,

एक महाराष्ट्रातील माणूस महाराष्ट्रामध्ये कांही दिवस राहिलेला नंतर तो उत्तर भारतामध्ये गेला, त्याठिकाणी त्याने भगवी वस्त्रे धारण केली, नंतर तो भागवतकथा करू लागला, पुढे त्याने एक-दोन ठिकाणी मठाची स्थापना केली, गोशाळेची स्थापना केली. नंतर मात्र त्याने संन्यास घेतला, नंतर त्याने भगवी वस्त्रे व दंड धारण केला.

मित्रहो जरा विचार करा.

त्याने जर आता संन्यास घेतला, आता भगवी वस्त्रे धारण केली तर या अगोदर त्यांने भगवी वस्त्रे धारण केली होती. मग त्यास संन्यासी म्हणावे कां नाही? आणि जर अगोदर सन्यास धारण केला असेल तर मग आता संन्यासाचा विधी कसा केला? असा देखील प्रश्न निर्माण होतो.

संन्याशी म्हणजे कोण? ज्याच्याकडे अब्जावधी रुपयांची प्रॉपर्टी असेल, संसारिक माणसाकडे जे वैभव नसेल, जे भोग नसतील ते जर संन्यासी म्हणवून घेणाराकडे असतील तर ते संन्याशी कसे समजावेत? तसेच दुपारी समजा, एखाद्या ठिकाणी संन्याशाला भोजनासाठी बोलावले, भोजन झाल्यानंतर त्या संन्याशास चार लवंगा खाण्यासाठी दिल्या, त्यापैकी त्याने दोन खाल्ल्या आणि दोन जर कमरेला खोवल्या. तर तो संन्यासी ठरत नाही. कारण त्यातून त्याचा परीग्रह सिद्ध होतो. मग जर दोन लवंगाचा संग्रह केला तर तो संन्याशी जर ठरत नाही तर मग अब्जावधी रुपयांची प्रॉपर्टी जवळ बाळगणारा संन्याशी कसा ठरतो? हा प्रश्न मला सतावत नसून चार तोंडाच्या ब्रह्मदेवाला देखील हा प्रश्न सतावत असेल! या बाबतीत त्यांची चार मस्तके सुद्धा काम देत नसावीत असे मला वाटते.

तसेच कोणीही भगवी वस्त्रे धारण करतो आणि संन्यासी म्हणवून घेतो, हा संन्यासाश्रमाचा अवमान आहे. कांही माणसे लग्न करत नाहीत, त्यांचे लग्न होत नाही, तरी देखील लोक त्यांना संन्याशी म्हणतात. पण ते संन्यासी ठरतात कां? हा देखील प्रश्न आहे. लग्न न केल्याने किंवा लग्न न झाल्याने तो फक्त अविवाहित ठरतो. पण संन्यासी ठरत नाहीत. संन्यासाश्रमाचा जो विधी आहे, त्या विधीने जो संपन्न आहे, त्यासंच ‘संन्यासी’ असे म्हणतात.

इतके लिहिण्याचे कारण असे की,

चार दिवसापूर्वी मृत झालेले ताजुद्दीन महाराज शेख यांनीसुद्धा भगवी वस्त्रे धारण केलेली होती, लोक त्यांना देखील संन्यासी म्हणत होते. परंतु संन्यासाश्रमाची दीक्षा न घेता ते संन्यासी कसे ठरू शकतात? शिवाय दोन कीर्तनाचे पस्तीस हजार रुपये घेणारा माणूस सर्वसंगपरित्याग करणारा कसा ठरू शकतो? असा देखील प्रश्न सारखा मनात घोळत असतो. एकंदरीत त्यांनी भगवी वस्त्रे धारण करण्याचा जो कार्यक्रम केलेला आहे, संन्याशी या सदरात न बसणारा आहे. कारण एक तर त्यांना संन्यासाश्रमाचा अधिकार आहे कां? तर मुळीच नाही. शिवाय त्यांनी संन्यासाश्रम धारण करण्याचा शास्त्रोक्त विधी केलेला आहे काय? तर मुळीच नाही. मग हे संन्यासी कसे ठरतात? शिवाय ज्यांच्या पाठीमागे शास्त्र नाही, ज्यांच्या पाठीमागे विद्वानांचे मत नाही, त्या व्यक्तीने धारण केलेले ते रूप जर संन्यासाश्रम वा संन्यासी ठरत नाही, तर मग ते संन्यासाश्रमाचे एक प्रकारे विडंबन आहे.
शिवाय
लाखो मूर्खांनी संन्यासी म्हणवणे चांगले कां एका शहाण्याने, एका विद्वानाने, एक ज्ञानी महात्म्याने संन्यासी म्हणणे चांगले! असा जर विचार केला तर शेवटी विद्वानांच्या शब्दाला किंमत असते, ज्ञानी पुरुषाच्या शब्दाला किंमत असते, हेही वाचकांनी लक्षात ठेवावे.

परिग्रह करणारा मनुष्य संन्यासी नसतो हे त्रिवार सत्य. ज्यांच्याकडे “सर्वसंगपरित्याग” नाही, तो मनुष्य महात्मा सुद्धा ठरू शकत नाही. कळावे~ बाबुराव महाराज वाघ. वाचा विचार करा. तुम्हाला देवाने मेंदू दिलेला आहे तो जरा चांगल्या विचारासाठी खर्च करा, कोणाच्याही मागे अज्ञानाने जाऊ नका आणि आपली फसगत करून घेवू नका, संतांना सर्व समाज डोळस हवा आहे, अंध परंपरा जोपासू नका, डोळस परंपरा जोपासा. हाच तुम्हाला ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांचा संदेश आहे.

आपला हितचिंतक~ बाबुराव महाराज वाघ पंढरपूर सर्व मित्रमंडळींनी हा संदेश सर्वत्र पाठवावा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇