ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.721

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-८ वे, श्रीनिवृत्तीप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७२१

कापुराचे कळिवर अनळाचा मरगळा । भेदून द्वैताचा सोहळा केवीं निवडों पाहे ॥१॥ बोलु अखरीच वळला भीतरी नाहीं आला । तो केवीं विठ्ठला पावे जी तुम्हां ॥२॥ मन बुद्धीसी जें आद्य तयासी जें वेद्य । कळिकाळा कवळेना संधि जोडूनि जाये ॥३॥ वाचाळपणे परा येवो नल्हाये दातारा । अनुभवो भीतरा बाहेजु वेडावला ॥४॥ निरयदृष्टि ती खोली येऊनी राहे बुबुळीं । लवण थाव घेऊनी जळी केवी निवडो पाहे ॥५॥ निवृत्तिदासु तेथें निवृत्ति करुनी यातें । श्रीगुरु निवृत्तिनाथें फुडें केलें ॥६॥

अर्थ:-
कापुराचे शरीर करुन जर त्याला अग्नी लावला तर ते शरीर अग्नीशी एकरुप होते. मग हा कापूर व हा अग्नी असा भेदभाव कसा निवडावा. शब्द हे केवळ अक्षररुपच असतात. ते केवळ अक्षराच्या योगाने अंतःकरणांत प्रगट होत नसतात. मग अशा विठ्ठलाला तुम्ही कसे पोहोचाल. मन बुद्धीला आद्य असून त्याचेकडून जे प्रकाशले जाणार ते कळीकाळालासुद्धा आकलन न होता त्यालाही सोडून पलीकडे जाते. तो परमात्मा केवळ शब्दाच्या वाचाळपणाने प्राप्त होत नाही. अनुभव झाला तरच तो अनुभव अंतर्बाह्य व्यापून साधक वेडावून जातो. स्वच्छ झालेली दृष्टी ती खोल ज्ञानरुपी बुडांत येऊन राहते. मिठाच्या खड्याने जर जळाचा ठाव घेतला तर त्याला वेगळा कसा निवडून काढावा कारण तो पाणीरुपच होतो. त्या प्रमाणे परमात्माचा अनुभव व घेण्याला निघालेला मुमुक्ष परमात्मरूप होतो. तो त्याच्याहून भिन्न राहत नाही. श्रीनिवृत्ति प्रसादानें प्राप्त झालेली स्थिति, माझ्या निवृत्तिनाथांनी माझ्यावर कृपादृष्टी करुन वरील दृष्टांताप्रमाणे निःसंशय परमात्मरुप केले. असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *