सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा ओवी २५१ ते २७५ पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, , , , , , ,

251-16
तैसें पापपुण्याचें खिचटें । करोनि खातां बुद्धिचेष्टे । कडु मधुर न वाटे । ऐसी जे दशा ॥ 251 ॥
त्याप्रमाणेपापपुण्य इत्यादि भेदाभेद न मानतां त्याची खिचडी (एकत्र) करून ज्याच्या सर्व क्रिया चालतात, व ज्याला इष्टानिष्ट भोग अशी कांहीं कल्पनाही नसते, अशी जी स्थिति, 51
252-13
तिये नाम अज्ञान । या बोला नाहीं आन । एवं साही दोषांचें चिन्ह । सांगितलें ॥ 252 ॥
त्याला अज्ञान असे म्हणावें ह्यांत शंका नाहीं; ह्याप्रमाणे सहाही दोषांचीं लक्षणे आम्ही सांगितलीं. 52
253-16
इहींच साही दोषांगीं । हे आसुरी संपत्ति दाटुगी । जैसें थोर विषय सुभगे अंगीं । अंग सानें ॥ 253 ॥
हे सहाच दोष खरे, पण, त्यांनीच ती फार बलिष्ठ झाली आहे. (सव्वीस गुण असलेल्या देवी संपत्तीपेक्षांही) (कारण पराक्रम संख्येवर अगर आकारावर नसतो). भुजंगी म्हणजे नागीण अंगाने दोरीप्रमाणे लहान असली तरी तिचे विष सर्व विषांत श्रेष्ठ असतें. 53
254-16
कां तिघा वन्हींच्या पांती । पाहतां थोडे ठाय गमती । परी विश्वही प्राणाहुती । करूं न पुरे ॥ 254 ॥
तीन प्रकारचे अग्नि (प्रलयाग्नि, विद्युदग्नि, वडवाग्नि ) ही संख्या लहान खरी, पण त्यांच्या प्राणाहुतीला विश्वही पुरे पडत नाही. 54
255-16
धातयाही गेलिया शरण । त्रिदोषीं न चुके मरण । तया तिहींची दुणी जाण । साही दोष हे ॥ 255 ॥
त्रिदोष झाल्यावर ब्रह्मदेवाला शरण गेल्यानेही मरण चुकत नाही; हे सहा दोष म्हणजे त्या. तीन दोषांची सर्व बाजूनी दुप्पट आहे असे समज.55

256-16
इहीं साही दोषीं संपूर्णीं । जाली इयेचि उभारणी । म्हणौनि आसुरी उणी । संपदा नव्हे ॥ 256 ॥
ह्या संपूर्ण सहा दोषांनीं आसुरी संपत्तीची उभारणी झाली असली म्हणून कांहीं ती आसुरी संपत्ति पराक्रमांत कमी नाही. 56
257-16
परी क्रूरग्रहांची जैसी । मांदी मिळे एकेचि राशी । कां येती निंदकापासीं । अशेष पापें ॥ 257 ॥
किंवा सर्व पापग्रहांची एकाच राशीवर एकेवेळीं दृष्टि यावी, किंवा निंदकापाशीं (पदरात) जशीं अशेष पापे येतात. 57
258-16
मरणाराचें आंग । पडिघाती अवघेचि रोग । कां कुमुहूर्तीं दुर्योग । एकवटती ॥ 258 ॥
मरणाराच्या शरीराला जसे सर्व रोग व्यापतात किंवा कुमुहूर्तावर सर्वच कुयोग एकत्र येतात. 58
259-16
विश्वासला आतुडवीजे चोरा । शिणला सुइजे महापुरा । तैसें दोषीं इहीं नरा । अनिष्ट कीजे ॥ 259 ॥
चोराला त्याच्यावर विश्वास ठेवणारा मनुष्य सांपडावा, शिणलेला मनुष्य महापुरांत लोटावा, त्याप्रमाणे, ह्या सहा दोषांनीं जीवांचे अत्यंत अहित होतें. 59
260-16
कां आयुष्य जातिये वेळे । शेळिये सातवेउळी मिळे । तैसे साही दोष सगळे । जोडती तया ॥ 260 ॥
किंवा मरण ओढवलें म्हणजे शेळीला जशी सात नाग्यांची इंगळी चावावी तसे हे साही दोष ज्याचे वाटोळे व्हावयाचे आहे त्याच्या वाट्यास येतात. 260

261-16
मोक्षमार्गाकडे । जैं यांचा आंबुखा पडे । तैं न निघे म्हणौनि बुडे । संसारीं तो ॥ 261 ॥
मोक्ष म्हणजे काय ह्याचे ह्याला मुळींच ज्ञान नसल्यामुळे, जो अखंड संसारसागरांत बुडलेलाच असतो. 61
262-16
अधमां योनींच्या पाउटीं । उतरत जो किरीटी । स्थावरांही तळवटीं । बैसणें घे ॥ 262 ॥
आणि अर्जुना, एकापेक्ष एक नीच योनीच्या क्रमानें घसरत घसरत जो अखेर स्थावर योनींतीलही शेवटची पायरी गांठतो. 62
263-16
हें असो तयाच्या ठायीं । मिळोनि साही दोषीं इहीं । आसुरी संपत्ति पाहीं । वाढविजे ॥ 263 ॥
हें असो; हे सहाही दोष एकत्र होऊन त्याच्या ठिकाणी ह्या आसुरी संपत्तीची अत्यंत वाढ करितात.63
264-16
ऐसिया या दोनी । संपदा प्रसिद्धा जनीं । सांगितलिया चिन्हीं । वेगळाल्या ॥ 264 ॥
अशा जगांत प्रसिद्ध असलेल्या ह्या दोन संपत्तींची लक्षणे आम्हीं वेगवेगळाली सांगितलीं. 64
दैवी संपद्विमोक्षाय निबन्धायासुरी मता ।
मा शुचः संपदं दैवीमभिजातोऽसि पाण्डव ॥ 16.5॥

265-16
इया दोन्हींमाजीं पहिली । दैवी जे म्हणितली । ते मोक्षसूर्यें पाहली । उखाचि जाण ॥ 265 ॥
ह्या दोन संपत्तीपैकी पहिली जी दैवसंपत्ति, तो मोक्षसूर्याचा उषःकालच समज. 65

266-16
येरी जे दुसरी । संपत्ति कां आसुरी । ते मोहलोहाची खरी । सांखळी जीवां ॥ 266 ॥
दुसरी जी आसुरी संपत्ति, ती जीवाला बद्ध करणारी मोहरूपी लोहबेडीच होय.66
267-16
परी हें आइकोनि झणें । भय घेसी हो मनें । काय रात्रीचा दिनें । धाकु धरिजे ॥ 267 ॥
पण हें ऐकून तुं कदाचित् मनांत कचरशील हो ! अरे, रात्र गांठील अशी सूर्याला कधीं भीति पडली आहे काय? 67
268-16
हे आसुरी संपत्ति तया । बंधालागीं धनंजया । जो साही दोषां ययां । आश्रयो होय ॥ 268 ॥
जो ह्या सहाही दोषांचे आश्रयस्थान असतो, त्यालाच ही आसुरी संपत्ति बंधनाला कारण होते. 68
269-16
तूं तंव पांडवा । सांगितलेया दैवा । गुणनिधी बरवा । जन्मलासी ॥ 269 ॥
अर्जुना, तुं तर वर सांगितलेल्या दैवी संपत्तीची जणू खाणच जन्माला आला आहेस. 69
270-16
म्हणौनि पार्था तूं या । दैवी संपत्ती स्वामिया । होऊनि यावें उवाया । कैवल्याचिया ॥ 270 ॥
म्हणून पार्था, ह्या दैवी संपत्तीचा स्वामी होऊन कैवल्यरूप सुखाचा धनी हो. 270
द्वौ भूतसर्गौ लोकेऽस्मिन् दैव आसुर एव च ।
दैवो विस्तरशः प्रोक्त आसुरं पार्थ मे श्रुणु ॥16. 6॥


271-16
आणि दैवां आसुरां । संपत्तिवंतां नरां । अनादिसिद्ध उजगरा । राहाटीचा आहे ॥ 271 ॥
अरे, ह्या दैवी आणि आसुरी संपत्तींनीं युक्त असलेल्या मनुष्यांचे जे अनादिसिद्ध असे रुळलेले मार्ग आहेत. 71
272-16
जैसें रात्रीच्या अवसरीं । व्यापारिजे निशाचरीं । दिवसा सुव्यवहारीं । मनुष्यादिकीं ॥ 272 ॥
ज्याप्रमाणे, निशाचरादिकांचे व्यवहार रात्रीच्या वेळीं चालतात व दिवसा मनुष्यादिकांचे सरळ व्यापार सुरू असतात. 72
273-16
तैसिया आपुलालिया राहाटीं । वर्तती दोन्ही सृष्टी । दैवी आणि किरीटी । आसुरी येथ ॥ 273 ॥
त्याप्रमाणे, पार्था, या जगांत आपापल्या अधिकाराप्रमाणे दैवी व असुरी संपत्तीचे लोक ठरलेल्या भिन्न भिन्न मार्गानीं रहाटत असतात.73
274-16
तेवींचि विस्तारूनि दैवी । ज्ञानकथनादि प्रस्तावीं । मागील ग्रंथीं बरवी । सांगितली ॥ 274 ॥
त्याच प्रमाणे, मागे ज्ञानकथनप्रसंग (9 अध्यायांत ) दैवी संपत्तीचे विस्ताराने आम्हीं वर्णन केले आहे. 74
275-16
आतां आसुरी जे सृष्टी । तेथिंची उपलऊं गोठी । अवधानाची दिठी । दे पां निकी ॥ 275 ॥
आतां जी आसुरीसृष्टि किंवा संपत्ति तिचे तुला अधिक कथन करितों; तिकडे नीट अवधान ठेव. 75

, , , , , , ,
✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading