किर्तनात काय सांगावे सांगू नये ! भाग १

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

सर्व लेखांची सूची पहा.

कीर्तनामध्ये आईबाप हा विषय असावा कां आईबापावर किर्तन असावे? तसेच कीर्तनामध्ये शिवाजीमहाराज असावेत कां शिवाजी महाराजांवर किर्तन असावे ? विचार केला तर आपण नेमके कशावर कीर्तन करत आहोत? हे तरुण कीर्तनकाराच्या लक्षात कसे येत नाही?

कीर्तनामध्ये शिवाजी महाराज हा विषय असू नये या विचाराचा मी नाही, शिवाजी महाराज यांच्या जीवनातील एखादा विषय कीर्तनामध्ये असणे गरजेचे आहे. पण यासाठीच कीर्तन करणे चुकीचे आहे, कारण कीर्तन या शब्दाचा अर्थ तरूण कीर्तनकारांनी लक्षांत घेणे गरजेचे आहे,

सध्याच्या काळामध्ये तरुण कीर्तनकार हे कीर्तनामध्ये किर्तन विषयाची चर्चा न करता पैशाची जास्त चर्चा करतात. ज्या ठिकाणी पैशाची जास्त चर्चा होते आणि भगवत भक्ती, साधना, आणि त्या अभंगाचा प्रतिपाद्य विषय याची चर्चा होत नाही, ते किर्तन कसे समजावे?

बरेच कीर्तनकार हे स्वतःला शास्त्री, भागवताचार्य, रामायणाचार्य, पंडित लावून घेतात आणि शास्त्रीय विषयाची चर्चा न करता गावंढळ विषय कीर्तनामध्ये चर्चिल्या जातात, हे त्यांच्या त्या शास्त्री, पंडित पदवीला शोभते कां? किर्तन हा जो विषय आहे याविषयी जर अभ्यास नसेल तर कीर्तन करण्याचा अट्टाहास कां? तसेच टीव्ही, मोबाईल वर किर्तन केले म्हणजे बुद्धिमत्ता ठरते कां? विचारवंत ठरतो कां? अभ्यासक ठरतो कां? समाज प्रबोधनकार ठरतो कां? या सर्व प्रश्नांची उत्तरे ‘नाही’ असे आहे.

मग नेमके आपण समाजाचे प्रबोधन कोणते करत आहोत? हे तरुण कीर्तनकारांनी लक्षात घेतले पाहिजे. उगीचच प्रसिद्धीच्या माध्यमाकडे झुकणे, यापेक्षा अभ्यासाकडे जर झुकले तर त्यांचे स्वागत होईल, कर्कश ओरडण्यापेक्षा शास्त्रोक्त गायनाकडे झुकले तर बरे होईल, कसेही कसेतरी विवेचन करण्यापेक्षा अभ्यासपूर्ण विवेचन केले तर बरे होईल, ‘भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या’ हे नाथ महाराजांचे सांगणे आपल्याला मान्य असेल तर आपण त्याविषयी कधी विचार करणार आहात कां नाही? नुसती लोकांची करमणूक करत आणि संसारी गोष्टी सांगत काल घालवणार आहात! हे देखील ठरले पाहिजे. आणि जर संसारिक गोष्टी सांगायच्या तर संसारी माणसापुढे संसारीक गोष्टी सांगणे निरर्थक आहे. मग आपण कीर्तनकार म्हणून आपल्यावर कांही जबाबदारी आहे कां नाही? याचे आत्मभान तरुण कीर्तनकारांना असले पाहिजे की नाही? हा विचार देखील आपण केला पाहिजे.

हीच गोष्ट महिला कीर्तनकारांची सुद्धा आहे. त्यांनीदेखील आपले स्वत्व हरवून बसले नाही पाहिजे, त्यांनीदेखील स्वतःचे व्यक्तिमत्व उज्वल ठेवले पाहिजे, त्यांच्याकडे पहात असताना समाजाने महिला किर्तनकारांमध्ये ही ‘स्त्री विद्वान आहे’ विचारवंत आहे, बुद्धिमान आहे असे मत या स्त्रीविषयी म्हटले गेले पाहिजे, आम्हाला ती अपेक्षा आहे. म्हणून महिला कीर्तनकारांनी सुद्धा बाष्कळ गोष्टी कीर्तनामध्ये न सांगता, नवरा-बायकोच्या गोष्टी कीर्तनामध्ये न सांगता, घेतलेल्या अभंगावर अभ्यासपूर्ण मांडणी केली पाहिजे, काहीतरी टिवल्याबावल्या करून वेळ मारून नेऊ नये.

कारण काहीतरी टिवल्याबावल्या करणे यासाठी तमाशा हे माध्यम असते. करमणुकीसाठी देखील तमाशा हे माध्यम आहे.
किर्तन हे किर्तन राहिले पाहिजे. तमाशा तमाशा राहिला पाहिजे. दोन्ही वेगवेगळे माध्यम आहेत. दोन्ही कार्यक्रम करणारे वेगवेगळी माणसे आहेत. एकमेकांनी एकमेकासारखे वागून कसे चालेल! याचे आत्मभान सर्व तरुण कीर्तनकार महिला व पुरुषांना असले पाहिजे. आपणाला सुधारण्याची भगवंताने संधी दिलेली आहे.

आपण संधीचे सोने केले पाहिजे असे वाटते. म्हणून कीर्तनकार माणसाची रहाणी साधी असावी आणि विचारसरणी मात्र उच्च असावी. नेमके उलट घडत आहे. विचारसरणी कमी दर्जाची आहे. आणि राहणी उच्च दर्जाची आहे. हे मात्र चारित्र्याच्या दृष्टीने घातक आहे. हे देखील आपण सर्व कीर्तनकार बंधू-भगिनींनी लक्षात ठेवावे, जास्त बोलणे योग्य नाही.

आपला हितचिंतक~ बाबुराव महाराज वाघ पंढरपूर सर्व मित्रमंडळींनी हा संदेश सर्वत्र पाठवावा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇