दृष्टांत 27 पाडाचे आंबे म्हणजेच दुखावलेला बाप

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

लघुकथा,
सकाळचे साडेआठ वाजले होते. मोबाईल चाळत बसलो होतो .फेसबुक वर कोणाचे वाढदिवस आहेत का ते पाहून मेसेज करत होतो. बायकोला ऑफिसला जायचे होते त्यामुळे तिची आवर आवर चालू होती .आई किचनमध्ये नाश्ता बनवत होती. आण्णा (माझे वडील) आणि रेवती (माझी सहा वर्षांची मुलगी) सकाळी सकाळी फिरायला सोसायटीच्या बागेमध्ये गेले होते .
“अरे आनंदा आंघोळ करून घे पाणी तापलंय”
असा आईचा आवाज आला. तसा मी बोललो हो आलो पाच मिनिटात. “काय मेलं त्या मोबाईल मध्ये असतं दिवसभर मोबाईल हातात धरून बसलेला असतो “
आईची बडबड चालू होती.
तेवढ्यात बाहेर रेवती चा आवाज आला “पप्पा आण्णांनी बघा तिथं पडलेले आंबे उचलून आणलेत” आवाज ऐकताच माझ्या कपाळावर आठ्या पडल्या .
दोन महिन्यांपूर्वीच मी स्वतः च्या फ्लॅटवर राहायला आलो होतो. त्याआधी अण्णा आणि आई गावी राहत होते. मी रेवती आणि माझी बायको इथे पुण्यातच भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होतो. रेवतीने बाहेरून बेल दाबली आणि मी पटकन उठून दरवाजा उघडला .


आण्णा आणि रेवती आत आले आणि दरवाजा लावून घेतला .मी आण्णांकडे वळालो आण्णांनी पंधरा ते वीस आंबे आणले होते .झाडावरून पडलेले असल्यामुळे त्यातले काही आंबे फुटले पण होते .
“आण्णा कळत नाही का तुम्हाला पडलेले आंबे उचलून आणले “
‘अरे पोरा कोणी टाकून दिलेले आंबे नाहीत ते झाडाचेच खाली पडलेले आंबे आहेत आण्णा म्हणाले .
“ते काही असू द्या आपण आता फ्लॅटमध्ये राहतो असल्या भिकार सवयी सोडा” नाहीतर रेवतीला पण त्या सवयी लागतील.
आण्णा काही न बोलता पिशवीतून आंबे काढत होते .
“आणि हो आता इस्त्री केलेले कपडेच घालायचे चुरगळलेले कपडे घालायचे नाहीत “.
“ते भोकं पडलेलं बनियन आधी टाकून द्या दरिद्री पणाचे लक्षण सोडा आणि जरा चांगले वागा “
बर बाबा आता तुझ्या घरात रहायचे म्हणल्यावर तुझंच ऐकावं लागेल.
“आण्णा अहो तुम्ही तीस वर्षात कमावला नसेल एवढा पैसा मी एका वर्षात कमावतो”
त्यामुळे ही असली फालतु ची काटकसर करू नका. आणि हो अजून एक तुम्ही सारखं सारखं खाली गेटवर वॉचमन शी गप्पा मारत बसत जाऊ नका सोसायटीतली माणसं तुमच्याकडे बघतात, बरं दिसत नाही ते. किती झालं तरी ते आपले नोकर त्यांच्याशी एवढी सलगी ठेवायची नाही.
माझा तोंडाचा पट्टा चालू होता .आणि आण्णा ते आणलेले आंबे आत मध्ये धुवायला घेऊन गेले.
आई माझं सगळं बोललेल ऐकत होती पण काही न बोलता तिचं काम चालू होतं.


थोड्याच वेळात बायको ऑफिसला निघून गेली. आता घरात मी आई आण्णा आणि रेवती आम्ही चौघेच होतो .अशाच गरमागरमीच्या वातावरणात दुपारचे दोन वाजले. जेवण वगैरे उरकल्यावर मी पुन्हा मोबाईल हातात घेऊन बसलो . आई पलीकडे चटई वर बसली होती.रेवती तिची खेळणी मांडुन तिच्या बाहुली सोबत खेळत होती .आण्णा खुर्चीतून उठले आणि सकाळी आणलेले आंबे घेऊन आले . त्यांनी सगळे आंबे एका पोत्यावर टाकले मी आपलं बघून न बघितल्यासारखं केलं .आंबे बघून रेवती आण्णांजवळ गेली. खरं तर तिला पण आंबा खायचा होता पण मी रागवणार म्हणून गप्प बसली होती. आण्णांनी एक आंबा तिला दिला, तसा तिने आंबा खायला सुरुवात केली.
” वाव किती गोड आंबे आहेत” रेवती बोलली. आणि माझं लक्ष तिकडे गेलं. मी सहज बोललो ‘खरंच एवढा गोड आहे का आंबा’
” हो पप्पा आपण मागच्या आठवड्यात आणलेल्या पेटीतल्या आंब्या पेक्षा गोड आहे”
मी तिचा आंबा खात असतानाचा फोटो मोबाईलवर काढायला लागलो. तसं मला आण्णांनी आवाज दिला, ‘पोरा तुला पण लहानपणी पाडाचे आंबे फार आवडायचे’ ,म्हणून तू शाळा सुटली की मुद्दाम हून पाटलाच्या आमराईतून घरी यायचा आणि आमराईत पडलेले आंबे तुझ्या शाळेच्या दप्तरात भरून आणायचा. पडलेले आंबे उचलले की पाटील पण कोणाला काही बोलत नसायचा झाडाचे आंबे पाडले की मग मात्र पाटलाच नुकसान व्हायचं.
मी आण्णा बोलत असल्याचं पाहून मोबाईल बाजूला ठेवला .


तू लहानपणी आणलेल्या त्या आंब्यांला माती लागलेली असायची नाहीतर ते आंबे पाखरांनी खाल्लेले तरी असायचे तरीपण तुला ते आंबे आवडायचे .
आता तुझ्याकडे पैसे आलेत म्हणून तुला ते सगळं नकोसे वाटायला लागलय
आमची चुरगळलेली फाटकी कापडं तुला नकोशी वाटायला लागलेत, गावाला दुष्काळ पडला होता तेव्हा फक्त तीन टाईमच्या जेवणावर मार्केट यार्डात रात्रीच्या पाळीला वाचमेन होतो मी ,रात्रीचं वाचमन काम आणि दिवसा हमाली केली त्या टायमाला. तुझ्या आईनी चार घरची धुणीभांडी केली पर कधी कुणासमोर हात पसरला नाही .
अरे आपल्या सोसायटीचा वॉचमन पण माणूसच आहे की आणि त्याच्या पोरानी नशीब काढलं तर तुझ्यासारखा साहेब होईलच की .
“अरे माणसाने माणसा सारखे राहिलं पाहिजे एवढेच कळतं बघ आम्हाला”. म्हणून तर त्या वॉचमन बरोबर गप्पा मारत असतो.
आरं पहिल्यापासून असच आहे बघा आम्ही.
“पर एक मातुर छाती ठोकून सांगतो, तुला धरून सहा पोरं वाढवली पर कधी एक रुपयाची सुद्धा लबाडी केली नाही बघ” .
“कालच्या वादळ वाऱ्याच्या पावसात हे पिकलेलं आंबे जसे गळून खाली पडले, तशी ही म्हातारी पाखर सुद्धा तुमच्या आयुष्यातून उडून जातील “.
‘आता आम्हा म्हातार्‍यांचे असे किती दिवस राहिलेत ‘


मी मान खाली घालून सगळे ऐकत होतो .
मध्येच आई कडे लक्ष गेलं ती पदराने डोळे पुसत होती .
माझ्या डोळ्यातपन पाणी आलं ,तसा मी अण्णांचे पुढे हात केला आणि आण्णाना म्हणालो
“आण्णा एक गोड बघून आंबा मला पण द्या की “
आण्णांच्या चेहऱ्यावर हसू फुललं तसा सुरकुतलेला त्यांचा चेहरा टवटवीत दिसायला लागला.


खरंच मित्रांनो प्रत्येकाच्या घरात असा वयोवृद्ध वटवृक्ष असतो. कुटुंबाची काळजी घेता घेता खंगून गेलेला असतो. घरातल्या अशा म्हाताऱ्या आजी आजोबा किंवा आई-वडिलांना थोडं त्यांच्या मनाप्रमाणे सुद्धा जगु द्या ,कारण आयुष्यभर ते मन मारून जगलेले असतात फक्त तुमच्यासाठी .

लेखक – अनामिक

१५० दृष्टांत संग्रह पहा.

Page: 1 2 12

😊💐💐🙏

दृष्टांत सूची पहा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *